१५व्या शतकात अनेक युरोपीय देश सागरीमार्गाने भारतात व्यापारासाठी आले. त्यापैकी पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रजांनी भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६०-६१ पर्यंत अधिसत्ता गाजवली. तर ब्रिटिशांनी १९४७ पर्यंत भारतावर राज्य केलं. या लेखातून आपण भारतातील युरोपीय देशांच्या आगमनाबाबत जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे युरोपबरोबर असलेले व्यापारी संबंध फार पूर्वीपासून चालत आहेत. मध्ययुगात हा व्यापार इराणचे आखात ते कॉन्स्टॅटिनोपल (आताचे इस्तंबुल ) ते इटली या खुश्कीच्या मार्गाने होत असे. त्या वेळी या व्यापारावर इटालियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. मात्र, १४५३ साली ऑटोमन तुर्कस्तानने कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकल्याने हा व्यापारी मार्ग तुर्कांच्या नियंत्रणाखाली आला. त्यांनी पश्चिम युरोपमधील स्पेन आणि पोर्तुगीजांच्या व्यापाऱ्यांना या मार्गावरून व्यापार करण्याची परवानगी नाकारली. परिणामी भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गांचा शोध लावणे या देशांना क्रमप्राप्त ठरले.

हेही वाचा – Indian Modern History : ब्रिटिश आणि डचांचा भारतातील प्रवेश

पोर्तुगीजांचे भारतातील आगमन

१५व्या शतकात युरोपमध्ये जहाज निर्मितीक्षेत्रात मोठी प्रगती झाली होती. त्या वेळी स्पेन आणि पोर्तुगीजांकडे सागरी मार्गाने प्रवास करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधणे उपलब्ध होती. त्यामुळेच त्यांनी भारताबरोबर थेट व्यापार करण्यासाठी सागरी मार्गांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वप्रथम इ.स. १४९२ मध्ये स्पेनने कोलंबस या खलाशाला भारताकडे जाणाऱ्या नव्या सागरी मार्गाचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मात्र, त्याला शोध लागला तो थेट अमेरिकेचा. पुढे इ.स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामानेही भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांत तो आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप येथे पोहोचला. तिथून अरब व्यापारी अब्दुल माजिदच्या मदतीने तो थेट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या कालिकत बंदरावर येऊन पोहोचला. कालिकतमध्ये झामोरिन या भारतीय राजाने त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिली. काही दिवसांतच त्याने कोची, कालिकत, कन्नोर या ठिकाणी वखारीसुद्धा स्थापन केल्या. त्या वेळी वास्को-द-गामाने त्याच्या प्रवासाच्या खर्चापेक्षा ६० टक्के जास्त नफा कमावला असल्याचे सांगितले जाते.

पोर्तुगीजांनी भारतात व्यापार करण्यासाठी एस्टिडो द इंडिया ( Astido The India ) ही कंपनी स्थापन केली. या कंपनीवर पोर्तुगीजच्या राजाचे पूर्ण नियंत्रण होते. इ.स. १५०५ मध्ये पोर्तुगीजच्या राजाने फ्रान्सिस्को-डी-अल्मेडा याला भारताचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. तसेच त्याला सैन्य आणि दारूगोळाही पुरवण्यात आला. त्याने हिंद महासागरावर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी एक योजना बनवली. त्याच्या याच योजनेला ‘ब्ल्यू वॉटर पॉलिसी’ ( Blue Water Policy ) म्हणून ओळखले जाते.

फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

इ.स. १५१० मध्ये अल्फान्सो-डी-अलबुर्क याची भारताचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या कारकिर्दीतच पोर्तुगीजांनी होमुर्झ ते मलाक्का या किनारपट्टीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तसेच पोर्तुगीजांनी इ.स. १५१० मध्ये बिजापूरच्या सुलतानकडून गोवा जिंकून घेतले. याबरोबरच त्याने पोर्तुगीजांना भारतीय महिलेशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहनही दिले. पुढे इ.स. १५२९ मध्ये निनो-दा-कुन्हा (Nino da cunha ) याला भारताचा नवा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. निनो-दा-कुन्हाने इ.स. १५३० मध्ये आपले मुख्यालय कोचीवरून गोव्याला हलवले.

पोर्तुगीजांचे भारतातील योगदान

पोर्तुगीजांनी भारतात टोमॅटो, बटाटे, मिरची, तंबाखू आणि अफीम यांसारख्या पिकांची शेती सुरू केली. तसेच पोर्तुगीजांनी भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस इ.स. १५५६ साली गोव्यात सुरू केली. याबरोबरच भारतातील गोथिक स्थापत्य शैलीच्या इमारतींची निर्मितीसुद्धा पोर्तुगीजांनी केली. जहाज निर्मितीतील नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात पोर्तुगीजांचे मोठे योगदान होते.

कार्ट्ज आर्मेडा

कार्ट्ज आर्मेडा ही कर वसूल करण्यासाठी असलेली एक व्यवस्था होती. हिंद महासागरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून काही शुल्क वसूल करण्यात येत असे. यालाच कार्ट्ज (Cartaz) असे म्हटले जायचे. पोर्तुगीजमधील Cartas या शब्दापासून कार्ट्ज (Cartaz) शब्दाची निर्मिती झाली.

पोर्तुगीजांचे भारतातील पतन

१६व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश आणि फ्रान्सच्या व्यापाऱ्यांनी पोर्तुगीजांच्या व्यापारी मत्तेदारीविरोधात जोरदार मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गतच १६१२ मध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात स्वाली येथे युद्ध झाले. या युद्धात पोर्तुगीजांचा पराभव झाला. त्यामुळे पोर्तुगीजांचं राज्य गोवा, दीव आणि दमण एवढ्या भागापुरतेच मर्यादित राहिले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian mordern history european entry and british expansion in india spb
First published on: 05-06-2023 at 10:00 IST