टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे पंतप्रधान नरेंद्र यांच्या भेटीसाठी भारत दौऱ्यावर येणार होते. भारतात ते कंपनीकडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची अपेक्षा होती. परंतु, हा दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
टेस्लातील फार मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे भारत भेट लांबणीवर पडली आहे. परंतु, मी यावर्षाच्या शेवटी भारतात येण्यास उत्सुक आहे, अशी पोस्ट एलॉन मस्क यांनी केली आहे.
हेही वाचा >> “पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
एलॉन मस्क २३ एप्रिल रोजी भारतात येणार होते. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन गुंतवणुकीची योजना जाहीर करणार होते. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन बाजारपेठ असून त्यात आता टेस्लाचाही सहभा होणार आहे. यासाठी ही भेट नियोजित करण्यात आली होती. टेस्लासाठी अमेरिका आणि चीन या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे विक्री कमी झाल्याने मनुष्यबळात १० टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेस्लाने मुंबई आणि दिल्लीत नवीन दालनांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. कंपनीच्या बर्लिनमधील उत्पादन प्रकल्पात उजव्या बाजूला चालक आसन असलेल्या मोटारींचे उत्पादनही सुरू झाले आहे. तिथून भारतात मोटारी निर्यात केल्या जातील.
परंतु, टेस्लाच्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीबाबत चर्चा करण्याकरता अमेरिकेतील महत्त्वाच्या बैठकीसाठी एलॉन मस्क यांना २३ एप्रिल रोजी जावं लागणार आहे. त्यामुळे हा पूर्वनियोजित दौरा रद्द करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
हेही वाचा >> अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
आयात शुल्कात कपातीमुळे निर्णय
मस्क यांनी गेली अनेक वर्षे भारतात आकारण्यात येणाऱ्या जास्त आयात शुल्काला विरोध केला होता. यात बदल व्हावा, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी घेतली होती. केंद्र सरकारने मार्च महिन्यात नवीन ई-व्ही धोरणात आयात शुल्क १०० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणले आहे. देशात ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करून उत्पादन प्रकल्प सुरू करणाऱ्या मोटार निर्मिती कंपन्यांसाठी हे धोरण आहे. त्यामुळे टेस्लाकडून ही गुंतवणूक केली जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.