कृषी भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. कृषी जवळपास निम्म्या लोकसंख्येला उपजीविका पुरवते आणि देशाच्या मोठ्या लोकसंख्येसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुनिश्चित करते. वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रियांसारख्या उद्योगांसाठी कच्चा माल कृषीद्वारे पुरविला जातो. ग्रामीण विकासाला कृषी चालना देते. निर्यातीच्या उत्पन्नात कृषीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. २०२४ च्या मुख्यपरीक्षेत यावर ५० गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत.

आयोगाने यासाठी दिलेला अभ्यासक्रम :

देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी संबंधित मुद्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली – उद्दिष्टये, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा; शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र.

भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.

भारतातील जमीन सुधारणा.

२०२४ च्या मुख्य परीक्षेत याच्याशी संबंधित पुढील प्रश्न बघा –

प्रश्न. देशाच्या काही भागात जमीन सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणते घटक जबाबदार होते? सविस्तर सांगा. १५० शब्द १० गुण

या प्रश्नातील उत्तरासाठी अपेक्षित मुद्दे आपण पाहू –

भारतातील काही प्रदेशांमध्ये, विशेषत: पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांमध्ये जमीन सुधारणा यशस्वीपणे लागू होण्यास अनेक घटकांनी योगदान दिले. समान जमीन वितरण आणि सुधारित कृषी उत्पादकता या ध्येयांवर काम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत –

प्रभावी राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्व: पश्चिम बंगालमध्ये, मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखाली आणि केरळमध्ये ई.एम.एस. नंबूदरीपाद यांच्या नेतृत्वाखाली, जमीन सुधारणा लागू करण्यासाठी निर्णायक राजकीय बांधिलकी होती. या सरकारांनी शक्तिशाली जमीनदार वर्गाच्या संभाव्य विरोधाला न जुमानता जमीन पुनर्वितरण आणि भाडेकरू हक्कांना प्राधान्य दिले.

मजबूत कायदेशीर चौकट आणि कायदे: केरळच्या जमीन सुधारणा कायद्याने (१९६३) जमिनीच्या मालकीची स्पष्ट मर्यादा निश्चित केली आणि भाडेकरूंचे संरक्षण केले. पश्चिम बंगालमधील ऑपरेशन बर्गा, हे भाडेकरूंचे हक्क कायदेशीररित्या मान्य करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यावर केंद्रित होते.

सक्रिय तळागाळातील सहभाग आणि सामाजिक एकत्रीकरण: शेतकरी संघटना, शेतकरी चळवळी आणि स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागामुळे जमीन सुधारणांच्या यशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या गटांनी उपेक्षित लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यात, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी मागणी करण्यास सक्षम बनवण्यात आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सामाजिक दबाव निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीने जमीन मालकांना स्वेच्छेने जमीन पुनर्वितरणासाठी दान करण्यास प्रोत्साहित करून भूमिका बजावली.

कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा: जमीन सुधारणांची जटिल प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी एक कार्यक्षम आणि वचनबद्ध नोकरशाही आवश्यक होती. ज्या राज्यांमध्ये कार्यक्षम प्रशासकीय प्रणाली, सुव्यवस्थित भूमी अभिलेख व्यवस्थापन आणि प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा होती, तेथे लाभार्थींची ओळख पटवणे, जमीन कमाल मर्यादा लागू करणे आणि जमीन पुनर्वितरण व्यवस्थापित करणे अधिक यशस्वी झाले. उदाहरणार्थ, पंजाबच्या डिजीटल भूमी अभिलेख प्रणालीमुळे मालकी मिळवणे आणि विवाद सोडवणे सोपे झाले.

समर्थक न्याय व्यवस्था: काही घटनांमध्ये, न्यायपालिकेने जमीन सुधारणा कायद्यांचे समर्थन करण्यात आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या बाजूने खटले निकाली काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कायदेशीर आव्हानांना न जुमानता आणि शक्तिशाली जमीनदारांकडून होणारी प्रणालीची हेराफेरी रोखून, न्यायपालिकेने हे सुनिश्चित केले की इच्छित लाभार्थ्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत.

विकेंद्रीकृत प्रशासन: विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज संस्थांनी सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक गरजा समजून घेण्यासाठी, लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि तळागाळात उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज होत्या.

जागरूकता मोहीम आणि कायदेशीर शिक्षण: अशासकीय संस्था आणि इतर संस्थांद्वारे आयोजित केलेल्या जागरूकता मोहिमा आणि कार्यशाळांद्वारे जमीन सुधारणा कायद्यांनुसार शेतकरी आणि भाडेकरूंना त्यांच्या हक्कांबाबत शिक्षित केल्याने, त्यांना त्यांचे हक्क मागण्यास सक्षम बनण्यास मदत झाली.

प्रश्न. भारतातील आरोग्य आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बाजरीची भूमिका स्पष्ट करा. १५० शब्द १० गुण

प्रश्न. भारतातील शेतीच्या किमती स्थिर करण्यासाठी बफर स्टॉकचे महत्त्व स्पष्ट करा. बफर स्टॉकच्या साठवणुकीशी संबंधित आव्हाने कोणती आहेत? चर्चा करा. २५० शब्द १५ गुण

प्रश्न. अलिकडच्या काळात भारतीय सिंचन व्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती आहेत? कार्यक्षम सिंचन व्यवस्थापनासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजना सांगा. २५० शब्द १५ गुण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य परीक्षेसाठी कृषीची तयारी करण्यासाठी, अभ्यासक्रमात नमूद केलेल्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. प्रमुख पिके आणि पीक पद्धती, सिंचन, सबसिडी (किमान आधारभूत किंमत, अन्न वितरण प्रणाली), अन्न सुरक्षा, कृषी विपणन आणि भूमी सुधारणा यांसारख्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करा. समकालीन समस्या आणि शासकीय उपक्रम समजून घेण्यासाठी शासकीय अहवाल, आर्थिक सर्वेक्षण आणि प्रमाणित वृत्तपत्रे यांसारख्या स्त्रोतांकडून कृषी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करा. प्रभावीपणे उत्तरे लिहिण्यासाठी उत्तर लेखनचा सराव नियमितपणे करणे अपेक्षित आहे.

sushilbari10@gmail.com