मागील लेखात (दि. २६ डिसेंबर) आपण केस स्टडीजच्या अभ्यासाची सुरुवात म्हणून वेगवेगळ्या नैतिक द्विधांची परिस्थिती अभ्यासली. यामध्ये आपण (१) सार्वजनिक मालकीच्या वस्तू वैयक्तिक गरजेसाठी वापरणे, (२) चुकीचे चित्र निर्माण करणे, (३) अनैतिक कृतीं होत असताना शांत बसणे, (४) तसेच नियमांचे उल्लंघन करणे या द्विधा पाहिल्या. आज आपण अजून काही नैतिक द्विधांचा विचार करणार आहोत.

आंतरवैयक्तिक संपर्काच्या मर्यादांचे उल्लंघन करणे

कामाच्या ठिकाणी तयार झालेल्या मैत्रीपूर्ण संबंधांची परिणीती जर दुसऱ्या व्यक्तीस होणाऱ्या मानसिक अथवा शारीरिक त्रासात होत असेल तर असे संबंध अनैतिक आचरणामध्ये मोडतात. या प्रकारच्या आंतरवैयक्तिक संपर्काच्या मर्यादांचे उल्लंघन करणे अयोग्य समजले जाते. यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा वारंवार अपमान करणे, तिला धमक्या देणे, त्या व्यक्तिबद्दलची खासगी माहिती उघड करणे, या माहितीचा चार-चौघात उल्लेख करणे, व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयावरून त्याच्या/तिच्या व्यावसायिक आयुष्यातील निर्णयांचे मोजमाप करणे या व इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो. कामाच्या ठिकाणी स्वत:च्या पदाचा अथवा मैत्रीपूर्ण संबंधांचा पुरुषांकडून केला जाणारा वापर, स्त्री सहकाऱ्यांकडून लैंगिक संबंधांची अपेक्षा ठेवणे, बळजबरी करणे अथवा अशा वागणुकीकरिता सूचक संभाषण करणे हे सर्व कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर अर्थातच अनैतिक आचरण आहे.

हेही वाचा : Success Story: आई-वडिलांचा हरपला आधार! खचून न जाता सुरू ठेवला UPSC चा प्रवास; वाचा, ‘या’ आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट

वैयक्तिक आयुष्यात नैतिक आचरण न करणे

अनेकवेळा वैयक्तिक आयुष्यातील नैतिकता व व्यावसायिक आयुष्यातील नैतिकता या दोन पूर्ण भिन्न बाबी असू शकतात. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीचा व प्राधान्यक्रमाचा आपल्या कार्यालयीन कामकाजावर कोणताही प्रभाव नसतो असे दिसून येते. परंतु, अनेक वेळा व्यावसायिक व वैयक्तिक नैतिक मूल्ये एकमेकांत गुंतलेली असतात. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला गाडीचा चालक म्हणून काम करायचे आहे त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारुच्या आवडीला प्राधान्य देणे त्याच्या व्यावसायिक क्षेत्रात अडथळा आणू शकते. मद्याच्या अंमलाखाली गाडी चालविणे यामधून चालक केवळ स्वत:च्या व्यावसायिक नैतिक मूल्यांना बाधा आणत नाही तर त्याबरोबरच इतर अनेक जणांचा जीव धोक्यात घालत आहे. कामाचे आणि जबाबदारीचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाल्यावर अशा अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आचार-विचारांचाही नैतिकतेच्या चौकटीतून विचार करणे तितकेच गुंतागुंतीचे होते. व्यक्तीच्या नैतिक मूल्यांच्या प्राधान्य क्रमांचा कामाच्या ठिकाणी होणारा वाईट प्रभाव टाळण्यासाठी कोणतीही संस्था उत्सुक असते. म्हणून आजकाल कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र व्यतीत केलेल्या वेळांवरही नैतिकेच्या भिंगातून बघितले जाते.

कोणत्याही केस स्टडीचे उत्तर लिहीत असताना मुळात दिलेल्या केसमधील नैतिक प्रश्न कोणता आहे हे ओळखू येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न सोडवायचे तर, त्यांचे स्वरूप आणि तीव्रता लक्षात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यूपीएसीच्या पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या केस स्टडीजच्या प्रश्नांमध्ये एखाद्या परिस्थितीत व्यक्ती किंवा प्रशासकीय अधिकारी कोणती कृती करेल, कोणता निर्णय घेईल, तसेच त्या कृतीमागे किंवा निर्णयामागे कोणते नैतिक स्पष्टीकरण असेल याची विस्तृत चर्चा उमेदवाराने करणे अपेक्षित असते. म्हणूनच अशा प्रकारचे सविस्तर उत्तर लिहित असताना मुळात नैतिक प्रश्न कोणता आहे, हे ठरविणे अग्रक्रमाचे ठरते.

हेही वाचा : बिसलेरीसारख्या कंपन्यांना फुटला घाम! ‘या’ महिलेने वयाच्या १७ व्या वर्षी सांभाळली व्यवसायाची धुरा, कष्टाने कंपनीची उलाढाल ८००० कोटींवर पोहोचवली

तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर नेमका नैतिक प्रश्न कोणता आहे हे ओळखण्यासाठी उमेदवारांना वरील सहा मुद्द्यांचा विचार करता येईल. बहुतेक केस स्टडीजमधला नैतिक प्रश्न हा वरीलपैकी एका गटात बहुतेकदा मोडतो. प्रभावी उत्तर लेखनासाठी या मुद्द्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. अर्थातच केस स्टडीज सोडविण्याचा पुष्कळ सराव झाल्यानंतर आणि केस स्टडीजसाठी आवश्यक उत्तरलेखनाचा पुरेसा अंदाज आल्यानंतर, नैतिक प्रश्न आणि त्यातील बारकावे आपोआपच कळत जातात. मात्र नैतिक प्रश्न किंवा द्विधा कळलेली असणे आणि ती स्पष्टपणे मांडता येणे याचा केस स्टडीजच्या लिखानामध्ये कायमच मोठा वाटा असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएसीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमध्ये विभाग ‘ब’ हा पूर्णपणे केस स्टडीजसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. १२५ गुणांसाठी ६ केस स्टडीज विचारल्या जातात. यामध्ये प्रत्येकी २० गुणांच्या ५ केस स्टडीज आणि २५ गुणांसाठी १ केस स्टडी असे या विभागाचे स्वरूप आहे. विभाग ‘अ’ च्या तुलनेत विभाग ‘ब’ मध्ये लिखाण करणे व सरासरी किमान ५० ते ६० गुण मिळविणे सहज शक्य होते.
(समाप्त)
vikrantbhosale.theuniqueacademy@gmail.com