फ्युजन संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिजीत पोहनकर यांच्या करिअरची कथा जाणून घेऊ या.. 

‘गवयाचे पोर सुरातच रडते’असे म्हटले जाते. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर ज्या घरात गाणे आणि संगीत आहे त्या घरातील मुलांवर अगदी लहानपणापासूनच संगीताचे संस्कार होताना दिसतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फ्युजन संगीतकार’आणि ‘की बोर्ड’वरील शास्त्रीय संगीताचे वादक अशी स्वतंत्र ओळख असलेल्या अभिजीत पोहनकर यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले. आजी सुशीलाबाई पोहनकर किराणा घराण्याच्या शास्त्रीय संगीत गायिका, वडील पं. अजय पोहनकर हेही शास्त्रीय संगीत गायक. त्यामुळे अभिजितची  जडणघडण संगीतमय वातावरणातच झाली. विलेपार्ले येथील माधवराव भागवत विद्यालयात प्राथमिक-माध्यमिक शिक्षण आणि पुढे म. ल. डहाणूकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतून ‘विपणन व्यवस्थापन’(मार्केटिंग मॅनेजमेंट) विषयात पदवी मिळविली.

महाविद्यालयीन काळात अभिजीतनी ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडे काही काळ संतूरवादनाचे धडेही गिरविले. गायक, संगीतकार, संगीत संयोजक अशा क्षेत्रात त्यांनी संचार केला. वाणिज्य शाखेचे पदवीधर असूनही संगीतातच अधिक रमल्याने अभिजीतनी करिअर म्हणून संगीतच निवडले. अर्थात घरातून पाठबळ होतेच. आजी सुशीला यांनीही त्यांच्यातील संगीत प्रेमाला जोपासले. काही काळ अभिजीतनी शास्त्रीय संगीतात काम केले. नंतर वेगळी वाट चोखाळली आणि जिद्द, परिश्रमाच्या जोरावर निवडलेल्या या वाटेचा राजमार्ग तयार केला. वाद्यवृंदातील महत्त्वाचे वाद्य असलेल्या ‘की बोर्ड’वर त्यांनी चक्क शास्त्रीय संगीत आणले.

अभिजीतला कौतुकाची पहिली थाप मिळाली होती, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. भीमसेन जोशी यांच्याकडून, तेही अवघ्या दहाव्या वर्षी. भीमसेनजी म्हणाले, ‘‘मोठा झाल्यावर कोणतेही वाद्य वाजव किंवा गाणे म्हण पण ते सादर करताना व्यासपीठावर कोणाच्याही आजुबाजूला बसू नकोस तर केंद्रस्थानी (मध्यावर) राहा/बस.’’ अभिजीतने हा सल्ला कायम हृदयावर कोरून ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचालही केली. तबला, व्हायोलिन, संतूर, संवादिनी या वाद्यांप्रमाणेच त्यांनी ‘की बोर्ड’वरील शास्त्रीय संगीत वादनाचे कार्यक्रम केले. शास्त्रीय संगीतातील मूळ चिजा, बंदिशी यांना कुठेही धक्का न लावता, त्यांचा मूळ बाज न बदलता अभिजीतनी शास्त्रीय संगीताचे ‘फ्युजन’ आणि ‘की बोर्ड’वर शास्त्रीय संगीताचे वादन हा प्रकार लोकप्रिय केला, रुजविला.

२००२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पिया बावरी’ आल्बममुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. चित्रपटबाह्य़ संगीत (गाणी) असलेला हा आल्बम ‘एम टीव्ही’ वाहिनीवर सलग तीन आठवडे ‘टॉप’वर होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या आल्बमला प्रसिद्धी मिळाली. ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीत-नाटय़संगीत गायक पं. जीतेंद्र अभिषेकी यांची काही जुनी आणि लोकप्रिय गाणी त्यांनी ‘अनुभूती’ या आल्बमद्वारे नव्या स्वरूपात रसिकांपुढे आणली. अभिजीत यांनी आत्तापर्यंत देशात आणि परदेशातही सुमारे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम केले असूून त्यांचे २० हून अधिक आल्बम प्रकाशित झाले आहेत. ‘एचएमव्ही’, ‘म्युझिक टुडे’, ‘युनिव्हर्सल वर्ल्ड वाईड’ आदी नामांकित कंपन्यांनी हे आल्बम प्रकाशित केले आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील दहा मोठय़ा कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग होता.

अभिजात संगीत प्रेमी-अभ्यासक आणि सर्वसामान्य संगीत रसिकांमध्येही अभिजीत यांचे संगीत लोकप्रिय आहे. विशेषत: युवा पिढी त्यांच्या संगीतावर भाळली आहे.  https://www.abhijitpohankar.com/ हे त्यांचे स्वत:चे संकेतस्थळही माहितीच्या महाजालात आहे. ‘ठुमरी’, ‘सजनवा’, ‘परंपरा’, ‘अलबेला सजन आयो’, ‘धरोहर’ आणि अन्य आल्बम प्रकाशित झाले आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताचे जतन, संवर्धन करणे आणि ते नव्या प्रयोगातून लोकांसमोर आणणे, युवा पिढीत शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करणे हे अभिजीत पोहनकरांचे ध्येय आहे.

‘फ्युजन’ म्हटले की काही संगीतप्रेमी नाक मुरडतात. ‘फ्युजन’ प्रकारात मूळ गाणे हरविले जाते, असेही काही जणांना वाटते. त्यावर अभिजीत म्हणतात, हा मोठा गैरसमज आहे. गाण्यात किंवा त्याच्या चालीत कोणताही बदल ‘फ्युजन’मध्ये केला जात नाही. मी स्वत: ‘फ्युजन’साठी शास्त्रीय संगीतातील मूळ चिजा, बंदिशी, ठुमरी यांचीच निवड करतो आणि अभिमानाने सांगतो की त्यांचे ‘फ्युजन’ करताना शास्त्रीय संगीताच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का पोहोचवत नाही किंवा त्यांच्या मूळ चालीत/रचनेत कोणताही बदल करत नाही. केवळ त्याच्या संगीत संयोजनात काही बदल करतो. गायन क्षेत्रातील नवोदितांना ते सल्ला देतात की, जुनी गाणी तशीच्या तशी गाऊन प्रसिद्धी मिळविणे हा लोकप्रिय होण्याचा सोपा मार्ग आहे. त्याऐवजी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करा. मुळात शास्त्रीय संगीत नीट आत्मसात करा आणि ते घोटवून संगीताचा पाया पक्का करा.

shekhar.joshi@expressindia.com