*   मी सध्या इंजिनीअरिंग करत आहे. पण दुसऱ्या वर्षांला नापास झालो. आता मला एक वर्षांची गॅप घ्यावी लागली आहे. या वर्षांत काय करू?

कृष्णा जाधव

इंजिनीअरिंगमध्ये अशा प्रकारे नापास झाल्याने गॅप घेणे तुमच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे ज्या विषयात नापास झालात, त्याचा जास्त अभ्यास करा. संगणकीय प्रभुत्त्व, उत्तम इंग्रजीतून बोलण्याची आणि लिहिण्याची सवय करून घ्या. कौशल्यविकासासाठी आवश्यक असलेल्या या गोष्टी केल्यास तुम्हाला जरूर उपयोग होईल.

 

मी सध्या बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला यूपीएससी द्यायची आहे२७ऑक्टोबरच्या अंकात बीटेकच्या द्वितीय वर्गात असणाऱ्या एका विद्यार्थ्यांने मुक्त विद्यापीठातून बीए करण्याविषयी विचारले होते, अशा प्रकारे वैद्यकीय शाखेतल्या विद्यार्थ्यांला करता येईल का? त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात? मी चौथ्या वर्षी परीक्षा देऊ शकते का?

आरती देसाई

तुम्हीसुद्धा मुक्त विद्यापीठातून बी.ए. अभ्यासक्रम करू शकता. मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरण्याची किंवा प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. यासाठी खास विशेष कागदपत्रे आवश्यक नाहीत. बीए पदवी मिळवल्यावर यूपीएससी देऊ शकता किंवा बीएचएमएसच्या शेवटच्या वर्षांला असताना अथवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही यूपीएससीसाठी पात्र ठरू शकता.

 

मी मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल असून मराठी विषयात बी.. पूर्ण केले आहे. मला अजून शिकण्याची इच्छा आहे. मी काय शिकू?

महेश कट्टे

आपणास नेमके कशासाठी पुढील शिक्षण घ्यावयाचे आहे, हे आधी स्वत:च्या मनाशी पक्के ठरवा. कारण सध्या मुक्त विद्यापीठांमुळे आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांमुळे अनंत विषयांमध्ये पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येतात. तुम्हाला मराठी या विषयात रस असल्यास याच विषयात एम.ए. एम.फिल /पीएच.डी. केल्यास साहित्याचा आनंद घेण्यासोबतच मराठी विषयातील अध्यापक, पत्रकार, लेखक,अनुवादक आदी करिअरसंधी उपलब्ध होऊ  शकतात. यूपीएससी परीक्षा मराठीमध्ये देण्यासाठीही तुमची परिपूर्ण तयारी होऊ  शकते. सध्या तुम्ही कॉन्स्टेबल आहात. नजीकच्या काळात तुम्हास पुढील पदोन्नतीची संधी नसल्यास उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करण्यावर किंवा पोलीस उपअधीक्षक पदासाठी होणाऱ्या राज्य सेवा परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकता. एलएल.बी.ला प्रवेश घेऊन तुम्ही तुमचे कायदेविषयक ज्ञान वाढवले तर तुमच्या खात्यात इतरांपेक्षा तुम्हाला पदोन्नतीची अधिक संधी राहील. सध्या सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने स्वतंत्र सेलची स्थापना केली आहे. यासाठी भविष्यात महाराष्ट्राच्या पोलीस विभागास उच्च तांत्रिक मनुष्यबळाची गरज भासू शकते. ही बाब लक्षात घेऊन त्या दृष्टीने आतापासूनच सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही.

मी सध्या शारीरिक शिक्षण हा विषय घेऊन बी.. पूर्ण करत आहे. मला सैन्यदलामध्ये अधिकारी होता येईल का?

आकाश घोरपडे

आकाश, तुम्ही कम्बाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिस ही परीक्षा देऊन सैन्यदलात अधिकारी होऊ  शकता. सध्याच्या तुमच्या शैक्षणिक अर्हतेवर तुम्हाला केवळ भूदलात नोकरीची संधी राहील. तुमची निवड इंडियन मिलिटरी अकॅडमी/ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटरसाठी होऊ  शकेल. तथापी तुम्ही बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले असल्यास तुम्हास इंडियन नेव्हल अकॅडमी अथवा इंडियन एअरफोर्स अकॅडमीमध्ये निवडीसाठी संधी मिळू शकते.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com