18 February 2019

News Flash

करिअर वार्ता 

अनेक भारतीय शैक्षणिक संस्थांच्या अत्यावश्यक मूलभूत गरजांना ब्रिटनमधून मदत पुरविण्यात आलेली आहे.

ब्रिटनचे शैक्षणिक योगदान

ब्रिटनने जगभर राज्य केले तसेच शिक्षणाची बीजेही रोवली. आपल्या ताज्या अर्थसंकल्पात जितका निधी देशभरातील शिक्षणासाठी देण्यात आला आहे, त्याहून कैक पटीने निधी ब्रिटनने तिसऱ्या देशातील राष्ट्रांसाठी मदत म्हणून जाहीर केला आहे. अफ्रिकी देशांत या निधीचा बराचसा वाटा जाणार असला तरी आत्तापर्यंत अनेक भारतीय शैक्षणिक संस्थांच्या अत्यावश्यक मूलभूत गरजांना ब्रिटनमधून मदत पुरविण्यात आलेली आहे. ७५ दशलक्ष पौंडाच्या या मदतीद्वारे जगभरात जिथे शिक्षण पोहोचू शकलेच नाही, तिथे शाळा उघडल्या जाणार आहेत. तेलव्याप्त आफ्रिकी राष्ट्रे श्रीमंत असली, तरी निम्म्या राष्ट्रांमध्ये शिक्षणाची कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. पुढील तीन वर्षांसाठी जगभरातील शिक्षण मदतीचा ओघ ५२ दशलक्ष पौंडांपासून ७५ दशलक्ष पौंडांवर नेण्यात आल्याचे ब्रिटनकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. तीन वर्षांत २४०० शालेय वर्ग आणि एक लाख सत्तर हजार शिक्षक या निधीतून शिक्षणाचे जाळे उभारणार आहेत. हा विषय यासाठी की, २००७ ते २०१३ पर्यंत भारतातील दुर्गम भागातील शिक्षण सुकर व्हावे यासाठी ब्रिटन ३३८ दशलक्ष पौंड निधी देत होती. नंतर त्यात वाढही करण्यात आली होती. पण हा निधी देऊनही भारतीय ग्रामीण भागातील शिक्षणात प्रगती झालीच नाही, हे निदर्शनास आल्यामुळे त्यात खंड पडला. शिवाय भारताकडून आम्हाला तुमची मदत नको असे सांगण्यात आले. २०१५ नंतर हा मदतनिधी आटला. आजच्या शहरी भागातील आणि देशातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दर्जाचे अहवाल पाहता, आपण आपल्या देशातील ज्ञानगंगेसाठी उपलब्ध निधीचा किती नि कसा उपयोग करून घेतो, ते समोर आले आहे.

मनोरंजन जगताची शिक्षणसाथ

रिहाना नावाची एक गायिका आहे. ही खरी बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरची, पण सध्या अमेरिकी मनोरंजन वर्तुळातून जगभर प्रसिद्ध झालेली. प्रसिद्धीची शक्ती तिने या शुक्रवारी दाखवून दिली. सेनेगल या आफ्रिकेतील सर्वाधिक गरीब राष्ट्रामध्ये जागतिक शिक्षण परिषद भरत आहे. या परिषदेत रिहाना सहभागी होणार आहे. पण एवढय़ावरच न थांबता तिने चक्क जगातील श्रीमंत राष्ट्रांतील नेत्यांना शिक्षणासाठी निधी उभारण्याचे आवाहन केले. ट्विटर हॅण्डलवरून तिने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांना लक्षावधी डॉलरचा निधी उभारण्यासाठी मदत मागितली. आणि त्याची चांगली फळेही दिसू लागली. या परिषदेला जगभरातून चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे. मनोरंजन विश्वातली ही सामाजिक साक्षरता कौतुकास्पद आहे.

First Published on February 3, 2018 1:50 am

Web Title: carrier news