लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये २०१५ पासून काही फेरबदल निश्चित केले. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटीपूर्ण भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरविले. तसेच निगवेकर समितीसारख्या समित्यांनी दिलेल्या अहवालांमधूनदेखील या बदलांची दिशा निश्चित झाली आहे.

एकूण २०० गुणांसाठी असणाऱ्या सीसॅटचा पेपर आता केवळ पात्रता निश्चित करण्याकरिता असणार आहे. म्हणजेच गुणवत्ता यादी ठरवत असताना त्यामध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये मिळालेले गुण धरण्यात येणार नाहीत. केवळ पहिल्या म्हणजेच सामान्य अध्ययनाच्या पेपरच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी बनविण्यात येईल. तसेच सीसॅटच्या पेपरमध्ये ३३% म्हणजे २०० पकी ६६ गुण मिळविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचबरोबर केवळ इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर आधारित आकलनाचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. याचाच अर्थ असा की, उताऱ्यांवर आधारित सर्व प्रश्नांकरिता उतारे इंग्रजी व िहदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत. या बदलांना अनुसरून २०१५ व २०१६ या दोन वर्षी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यातील जाणवण्यासारखा प्रमुख बदल म्हणजे उताऱ्यावरील प्रश्न हा घटक होय. आधीच्या पॅटर्ननुसार साधारणत: ३० प्रश्नांसाठी ७-८ उतारे विचारले जात असत. गेल्या दोन वर्षांत मात्र ३० प्रश्नांसाठी २०-२४ उतारे दिले गेले. प्रत्येक उताऱ्याची लांबी आणि त्यावरील प्रश्नसंख्या कमी झालेली दिसून येते. जवळपास १९ छोटय़ा उताऱ्यांवर प्रत्येकी एकच प्रश्न विचारलेला आहे, तर इतर ४ उताऱ्यांवर मिळून ११ प्रश्न विचारले आहेत. अशा प्रकारे ३० प्रश्न विचारले गेले. छोटे उतारे व त्यावर आधारित प्रत्येकी एकच प्रश्न या प्रश्न प्रकाराने स्वत:चे असे वेगळे आव्हान निर्माण केले आहे. त्याचा सामना कसा करायचा हे आपण पुढील लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

वरील बदलांचे स्वरूप लक्षात घेता सीसॅटच्या पेपरमध्ये नक्की कोणत्या प्रकारचे किती प्रश्न असतील व त्याकरिता कोणते परीक्षा तंत्र अवलंबले पाहिजे याचा विचार करणे आवश्यक आहे. वरील बदलांचे काही परिणाम हे नक्कीच उमेदवारांसाठी फायद्याचे ठरणार आहेत, तर काही बदल उमेदवारांना अडचणीत टाकणारे वाटू शकतात. नवीन बदलानंतर सीसॅटच्या पेपरचा उपयोग केवळ मुख्य परीक्षेकरिता पात्र होण्याकरिता केला जाऊ शकत नाही. सीसॅटच्या पेपरमध्ये अवाच्या सवा गुण व सामान्य अध्ययनामध्ये जेमतेमच गुण असे परीक्षातंत्र आता वापरता येणार नाही. मात्र याचाच दुसरा परिणाम असा की, सामान्य अध्ययनाच्या पेपरवर आधारित स्पर्धा ही अधिकच अटीतटीची होणार आहे. सामान्य अध्ययनाच्या पेपरमधील थोडय़ाफार गुणांच्या फरकामुळेदेखील अनेक उमेदवारांची भविष्ये ठरतील. सीसॅटच्या पेपरची या आधीची काठिण्यपातळी लक्षात घेतली तर ३३% गुण मिळविणे हे नक्कीच आव्हान नाही, असे अनेकांना वाटत असणार. मात्र २०० पकी ६६ गुण मिळवणे अगदीच सहज गोष्ट नसल्याचे, अनेकांच्या लक्षात आले आहे. याचाच अर्थ ३३% गुण मिळविण्यासाठीदेखील कसून प्रयत्न करावे लागतील. गेल्या दोन वर्षांत केवळ सामान्य अध्ययनावर आधारित काढल्या जाणाऱ्या गुणवत्ता यादीचा कट ऑफ ११० गुणांच्या आसपास आहे, असे बघायला मिळाले.

सामान्य अध्ययनाच्या पेपरवर खूप लक्ष केंद्रित केले पाहिजेच, कारण यावरच आता गुणवत्ता यादी व पर्यायाने मुख्य परीक्षेतील संधी अवलंबून असणार आहे. मात्र सामान्य अध्ययनावर भर देत असताना सीसॅटच्या पेपरमुळे त्यात अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणून सीसॅटच्या पेपरकडे संपूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. सीसॅटच्या पेपरची तयारी करत असताना किंवा सराव परीक्षा देत असताना उमेदवारांनी नियमितपणे ५०% मिळविण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. म्हणजेच २०० पकी १०० गुण विविध सराव परीक्षांमधून सातत्याने मिळविता आले पाहिजेत. असे ध्येय ठेवत असतानाच आपण देत असणाऱ्या सराव परीक्षादेखील विविध काठिण्य पातळीच्या आहेत याची खातरजमा करून घ्यावी. याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे जरी परीक्षेच्या दिवशी पेपर अपेक्षेपेक्षा अधिक कठीण असला तरी साधारण ७५-८० गुण मिळविणे सहज शक्य होईल.

केवळ इंग्रजी भाषेतील उतारे विचारले जाणार नाहीत. त्यामुळे एकूण परीक्षेबद्दलच्या व्यूहरचनेमध्ये फार मोठा फरक पडणार नाही. याचे कारण इतर उतारे इंग्रजीत वाचायला लागू शकतील अशी तयारी उमेदवारांनी कायमच ठेवली पाहिजे. िहदी भाषांतरित उताऱ्यांवर खूप भिस्त ठेवून चालणार नाही. याचे एक कारण म्हणजे िहदी भाषक नसलेल्यांना भाषांतरित िहदी उतारा अत्यंत आव्हानपूर्ण वाटू शकतो. दुसरे कारण म्हणजे इंग्रजी उताऱ्याचे दिलेले िहदी भाषांतर वाचण्यास सोपे व समजण्यास सुलभ असेलच असे नाही. या सगळ्या घटकांचा विचार करूनच उमेदवारांनी उताऱ्याच्या प्रश्नांकरिताची आपली व्यूहनीती निश्चित करावी.

उताऱ्यावरील ३० प्रश्नांव्यतिरिक्त पेपरमध्ये गणित, सामान्य बुद्धिमत्ता, विश्लेषणात्मक आणि अनुमानात्मक कौशल्ये या घटकांवर आधारित एकूण ५० अजून प्रश्न आहेत. अशा या ८० प्रश्नांच्या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक मुद्दय़ांची चर्चा पुढील लेखांमधून होईलच.

यूपीएससीने सुचविलेल्या या सगळ्या बदलांचा विचार करता उमेदवारांनी आपल्या दैनंदिन अभ्यासाच्या नियोजनात सीसॅटच्या पेपरच्या तयारीकरिता जाणीवपूर्वक वेळ ठेवावा. नियमितपणे सराव परीक्षांमध्ये ९०-१०० गुण मिळत राहण्यासाठी आवश्यक इतका वेळ या परीक्षेकरिता देणे गरजेचे आहे, कारण अर्थातच ही परीक्षा उमेदवारांच्या सामान्य अध्ययनातील गुणवत्तेची चाचपणी करण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. परीक्षातंत्र समजून घेऊन त्याबद्दलची व्यूहनीती निश्चित करण्याकरिता सराव परीक्षांचा अर्थातच खूप मोठा वाटा असणार आहे.

पुढील काही लेखांमधून आपण सीसॅटच्या पेपरच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक विषयाबद्दल सविस्तर माहिती करून घेणार आहोत. एकूण परीक्षेच्या संरचनेत त्या विषयाचे काय महत्त्व आहे व त्या विषयाची तयारी कशी करावी याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत.