राज्यसेवा पूर्वपरीक्षा मागच्या रविवारी संपन्न झाली. परीक्षा झाली तरी, परीक्षेचे कवित्व लवकर संपणारे नसते. पेपर काहींना बरा गेला असेल, काहींना अवघड. कुणाला बऱ्यापैकी चांगला गेला असेल. एकूण काय, पेपर संपला तरी सहसा तो उमेदवारांची पाठ सोडत नाही. येथून पुढचे काही दिवस उत्तर तालिकेची वाट पाहण्यात, बरोबर किंवा चूक उत्तरांची संख्या शोधण्यात उमेदवारांचा वेळ जाईल. या परीक्षेनंतरचा काही काळ किती गुण मिळतील, पास, नापास याबाबतचे अंदाज बांधण्यात जातो. ते स्वाभाविकच आहे.

सामान्य अध्ययन पेपर क्र. १ आणि क्र. २ पारंपरिक स्वरूपाचे, यूपीएससी पॅटर्नचे किंवा एमपीएससीच्या जुन्या पॅटर्नचे होते, अशी वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळते. राज्यसेवेचा पेपर दिल्लीत सेट झाला. यूपीएससीने केला अशा अनेक भन्नाट चर्चा सोशल मीडियामध्ये रंगलेल्या आहेत. मुळात पेपर कोणी सेट केला, कधी केला हा उमेदवारांचा प्रांत नव्हे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट आपण ठामपणे समजून घेतली पाहिजे की आयोगाचे काम आहे ‘परीक्षा घेणे’ आणि उमेदवारांचे काम आहे अभ्यास करून ‘परीक्षा देणे.’ त्यामुळे तयारी करताना परीक्षेला सामोरे जाण्याच्या मानसिकतेने अभ्यासाची रणनीती ठरवली पाहिजे.

पूर्वपरीक्षेमध्ये दरवर्षी घटक आणि विषयनिहाय प्रश्नांची संख्या बदलत असते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास ही बाब लक्षात येईल. गतवर्षी ज्या घटक विषयावर प्रश्नांची संख्या जास्त असेल तोच विषय जास्त महत्त्वाचा मानून त्यावरच अभ्यास केंद्रित करणे किती धोकादायक असते हेही विश्लेषणांतूनच लक्षात येईल. सन २०११मध्ये राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचे प्रारूप पूर्णत: बदलले. यूपीएससीचा पॅटर्न, अभ्याक्रम जसाच्या तसा ‘कॉपी पेस्ट’ केला. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना हे बदल लक्षात घेऊन अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. एका वर्षी भूगोल या घटक विषयावर तर त्या पुढील वर्षी पर्यावरण घटक विषयावर जास्त संख्येने प्रश्न विचारले गेले. त्यायोगे उमेदवारांचा अभ्यासाचा फोकस भूगोल आणि पर्यावरण यांच्या अवतीभवती होता. पण त्या पुढील वर्षी पूर्व परीक्षेमध्ये प्रश्नांचा राजा होता आíथक सामाजिक हा विषय घटक. यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यावरणविषयक प्रश्नांची संख्या एक किंवा दोनपेक्षा जास्त नाही. सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यास करताना जीवशास्त्र-रसायनशास्त्र-भौतिक शास्त्र हा क्रम आपल्या अभ्यासाचा प्राधान्यक्रम असतो. पण या वर्षी प्रश्नांची संख्या नेमकी उलटय़ा क्रमाने विचारली गेली. अकॅडेमीक पद्धतीने समीकरणे/गणिते विचारली गेली.  प्राचीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारताना मध्ययुगीन भारत पूर्णपणे बाजूला सारला गेला. भूगोल विषयावर वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित, नकाशावर आधारित पारंपरिक प्रश्न विचारले गेले. नोटाबंदीच्या विषयामुळे चालू घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थशास्त्र हा विषय होता. त्यामुळे यंदा पूर्वपरीक्षेत अर्थशास्त्रावर जास्त प्रश्न विचारले जातील असा अनेक उमेदवारांचा कयास चुकीचा ठरला.

प्रश्नपत्रिकेची रचना करताना उमेदवारांची नेमकी मानसिकता त्यांनी लक्षात घेतलेली असते. म्हणून अभ्यास करताना उमेदवारांनी पेपर सेट करणाऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन मगच आपला अभ्यासाचा मार्ग आखायला हवा. पायाभूत पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केलेल्या आणि एनसीईआरटीच्या बेसिक पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केलेल्या उमेदवारांसाठी ही पूर्व परीक्षा सुखकारक ठरेल. पायाभूत अभ्यास किती महत्त्वाचा असतो किंवा मूलभूत संकल्पना स्पष्ट असण्याचे महत्त्व काय हे समजायला या वर्षीची पूर्वपरीक्षा नक्कीच उपयुक्त ठरेल. अति महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे अशी वर्गवारी करून अभ्यास करायला हरकत नाही, पण एखाद्दुसरा विषय वगळून, फक्त आयएमपी आणि व्हीआयएमपी घटक विषयांवर ज्यास्त लक्ष देऊन अभ्यासाचा समतोल बिघडवणारी रणनीती अजिबात उपयुक्त नाही. पायाभूत संकल्पनांचा अभ्यास, चालू घडामोडींचा अद्ययावत अभ्यास आणि संपूर्ण अभ्यासक्रम सामावून घेणारी रणनीती स्पध्रेमध्ये तुम्हाला बळकटी देणारी ठरेल.

पूर्वपरीक्षेनंतर चूक/बरोबर उत्तरे शोधण्यात वेळ घालवू नका, असे म्हटले जाते. ते पटते आणि कळतेही. वळत मात्र नाही. निकालाची चिंता आणि उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. पण एकदा पेपर संपला की आपल्या हाती फक्त पुढच्या अभ्यासाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अभ्यास करणे एवढेच असते. पूर्वपरीक्षा आपण पास होऊ असा काहींचा अंदाज असेल. काहींना नक्की नापास होण्याची खात्री असेल तर काही द्विधा मन:स्थितीत, संभ्रमात असतील, पण या सर्व उमेदवारांची पुढील योजना एक आणि एकच असली पाहिजे, आपण सर्व मुख्य परीक्षा देणार आहोत असे गृहीत धरून एकाही मिनिटाचा वेळ न दवडता अभ्यास सुरू केला पाहिजे. तरच यावर्षी आणि पुढील वर्षी पूर्वपरीक्षेपूर्वी आणि पूर्वपरीक्षेनंतर तुम्ही स्पध्रेत असाल.

फारूक नाईकवाडे