18 December 2018

News Flash

‘प्रयोग’शाळा : मराठीशी दोस्ती

पावरी भाषेशी दोस्ती करून विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्याचे काम करत आहेत, शिक्षिका स्मिता सराफ

गेली २० वर्षे स्मिता सराफ जि.प. शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत

धुळे जिल्ह्य़ातील कापडणे जि.प.शाळा क्र.४ मधल्या बहुतांश विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी नाही तर पावरी आहे. जी एक आदिवासी भाषा आहे. याच पावरी भाषेशी दोस्ती करून विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लावण्याचे काम करत आहेत, त्यांच्या शिक्षिका स्मिता सराफ.

गेली २० वर्षे स्मिता सराफ जि.प. शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या जेव्हा कापडण्याच्या शाळेत बदली होऊन आल्या तेव्हा पहिलीच्या वर्गावर गेल्या. तिथे विद्यार्थ्यांना त्यांनी विमानाचे चित्र दाखवून विचारले, हे काय आहे? मुलांनी उत्तर दिले ‘उडनखटलू’ मग चूल दाखवली तेव्हा मुले म्हणाली, रुटू. मुलांची भाषा स्मिताताईना कळेना आणि त्यांची भाषा मुलांना कळेना. याचे कारण असे की, हे सगळे विद्यार्थी म्हणजे मध्य प्रदेशातील स्थलांतरित मजुरांची मुले, सालदारांची मुले. शाळेत जाणारी यांची ही बहुधा पहिलीच पिढी. त्यांची मातृभाषा पावरी. कापडणे परिसरातील बोली अहिराणी आणि शाळेतली शिकण्याची भाषा प्रमाण मराठी. आता हे त्रांगडे कसे सोडवावे, असा प्रश्न स्मिताताईंना पडला. विद्यार्थी आणि आपल्यात संवादच निर्माण झाला नाही तर शाळेची गोडी, अभ्यासाची गोडी वगैरे गोष्टी विसरूनच जाव्या लागतील, हे स्मिताताईंच्या चांगलेच ध्यानात आले. बरे हे पालकांवर सोडूनही चालण्यासारखे नव्हते. कारण अनेकांची रोजची हातातोंडाची गाठ तिथे पोराच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ कुणाला होतोय. मग स्मिताताईंनी ठरवले, शाळेमध्ये आल्यावर यांचे पालकत्व आपणच स्वीकारायचे. सुरुवात स्वच्छतेपासून झाली. मुलांना वेळच्या वेळी नखे कापणे, हात धुणे, शरीरस्वच्छता राखणे याचे महत्त्व समजवायला सुरुवात केली. अर्थात असे नुसते सांगून मुलांनी ऐकले नसतेच. त्यासाठी त्यांच्याशी दोस्ती होणे गरजेचे होते. पुन्हा भाषेचा प्रश्न होता. मग स्मिताताईंची पावरीची तर मुलांची मराठीची शिकवणी सुरू झाली. वर्गात दिल्या जाणाऱ्या सर्वसाधारण सूचना स्मिताताईंनी आधी पावरीमध्ये पाठ करून घेतल्या. मराठीबरोबरच वर्गात ते शब्द वापरायला सुरुवात केली. आपल्या भाषेत बोलणाऱ्या बाईंबद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी वाटू लागली. पुढची पायरी होती अभ्यास. आधी स्मितांनी विद्यार्थ्यांना गोष्टी वाचून, समजून सांगायला सुरुवात केली. शब्दांशी फटकून असलेल्या विद्यार्थ्यांना शब्द आपलेसे वाटू लागले. अभ्यास म्हणजे नापास होणे आणि बाईंचा मार नव्हे हे पटू लागले. मग स्मितानी धूळपाटीसारखी रांगोळीपाटी तयार केली. एका जुन्या खोक्यात रांगोळी पसरली. त्यात अक्षरे काढून देऊन मुलांना ती गिरवायला सांगितली. अक्षरांचा आकार बोटांमध्ये आणि मेंदूमध्ये पक्का बसू लागला तर शब्द हृदयात शिरू लागले. शाळेतल्या सहशिक्षिकांच्या मदतीने स्मिताताईंनी जिगसॉ पझलही तयार केले. अशा पद्धतीने अभ्यास गमतीशीर वाटू लागल्यावर विद्यार्थ्यांना त्यात उत्साह वाटू लागला. स्मिताताई सांगतात, ‘‘इथे येणारे बरेचसे विद्यार्थी सहा वर्षांचे झाल्यावरच पहिल्यांदा शाळेचे तोंड पाहतात. पूर्वप्राथमिक शिक्षण न मिळाल्याने अनेकांना  मूलभूत क्रियाही येत नसतात. अगदी सुरुवातीला तर आम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांना डाळ, गहू एकत्र करून वेगळे काढायला देतो. ते करताकरता त्यांच्या बोटांना हालचालींची सवय होते आणि ती अक्षरओळखीसाठी तयार होतात.’’ या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचा नसेल पण कलेचा वारसा असतो. मग स्मिताताईंनी पानाफुलांनी अक्षरांच्या रांगोळ्या काढल्या. कधी त्यात बिया वापरल्या तर कधी लहान दगड. परिसरात सहज मिळेल, अशा साधनांनी अभ्यास सुरु होता. अशा शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावनाही वाढीला लागली. हे सगळे उपक्रम घेताना स्मिताताईंना त्यांच्या सहकाऱ्यांची पुरेपूर साथ मिळते. सहशिक्षकांच्या मदतीशिवाय हे उपक्रम शक्यच झाले नसते, असे त्या आवर्जून सांगतात.

पहिलीमध्ये चांगली अक्षरमशागत झाल्यानंतर पुढच्या इयत्तेमध्ये विद्यार्थी अभ्यास आपसूकच आवडीने करू लागतात. पण घरी प्रमाण मराठी बोलली जात नसल्याने भाषेचे आकलन होण्यात कमी पडतात. अशा वेळी मग स्मिताताईंनी एक नवा खेळ शोधला. एका बाटलीत अनेक शब्दांच्या चिठ्ठय़ा टाकलेल्या असायच्या. म्हणजे शेतकरी, राजकन्या, फूल, डोंगर इ. मग मुलांचे गट करायचे. प्रत्येक गटाने ३-४ चिठ्ठय़ा उचलायच्या. त्यात आलेल्या शब्दांवरून एखादी गोष्ट गुंफायची. मुलांनी लिहिलेल्या अशा गोष्टींचे ‘रानफूल’ हे हस्तलिखित स्मिता सराफ आणि त्यांच्या सहकारी हर्षदा बोरसे यांनी तयार केले आहे. याच बाटलीच्या खेळातून ‘मेरी आवाज सुनो’सारखी स्पर्धाही शाळेत होऊ लागली. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांने एक चिठ्ठी उचलायची आणि त्या विषयावर पाच वाक्ये बोलायची. ‘मी ज्ञानवंत’ही प्रश्नमंजूषाही शाळेत घेतली जाते. एका डब्यात सामान्यज्ञानाचे प्रश्न असतात. ज्याला जी चिठ्ठी येईल त्याने त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. ज्याला जास्त गुण त्याला ‘मी ज्ञानवंत’ असा बिल्ला मिळतो. त्याचबरोबर आता शिक्षकांच्या मदतीने इथले विद्यार्थी पाठय़पुस्तकातल्या कविता आपल्या भाषेत अनुवादितही करू लागले आहेत. या अनुवादातून त्यांना पुष्कळ ज्ञान, अनुभवही मिळतो आहे. याचसोबत लेखकांना पत्र पाठवणे, व्हॉट्सअ‍ॅपवर आपली प्रतिक्रिया पाठवणे आदी गोष्टींतही इथले विद्यार्थी तरबेज झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त वाव मिळावा, यासाठी स्मिताताईंनी हर्षदा बोरसेंच्या मदतीने या विद्यार्थ्यांसाठी चक्क आकाशवाणीचा कार्यक्रम बसवला आणि शेतमजूर आई-बापाची ही गरीब लेकुरे धुळे आकाशवाणी केंद्राचा स्टुडिओ गाजवून आली. या सर्व उपक्रमांच्या, अभ्यासाच्या मदतीने ही आदिवासींची मुले खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ पाहतायत. स्मिता सराफ यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षिकेसाठी हेच समाधानाचे आहे!

स्वाती केतकर- पंडित – swati.pandit@expressindia.com

First Published on February 28, 2018 2:39 am

Web Title: inspirational work for marathi by teacher smita saraf