05 March 2021

News Flash

दुग्ध तंत्रज्ञानातील संधी

दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढल्यामुळे आता यातील संधी वाढत आहेत.

शेती हा मुख्य तर दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय समजला जातो. दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढल्यामुळे आता यातील संधी वाढत आहेत. अगदी पूर्वीपासूनच आहारात दूध सेवनाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे दुधावर प्रक्रिया, ग्राहकांपर्यंत दर्जेदार दुधाचे योग्य वितरण यासाठी दुग्ध तंत्रज्ञान हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. दूध प्रक्रिया उद्योगात चांगल्या संधी आहेत.

दुधाचे उत्पादन, प्रक्रिया, वितरण आणि प्रक्रियायुक्त पदार्थाचे मार्केटिंग या गोष्टींचा समावेश असणाऱ्या डेअरी टेक्नॉलॉजीलाही आता मागणी येत आहे. या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये दूध आईस्क्रीम, चॉकलेट यांच्या उत्पादनाचा समावेश आहे. अमुल, कॅडबरी, नेस्ले या कंपन्यांमध्ये आईस्क्रीम आणि चॉकलेटचे उत्पादन अतिशय मोठय़ा प्रमाणावर करतात त्यामुळे त्यांना उत्पादन, वितरण आणि क्वालिटी कंट्रोल इत्यादी कामांमध्ये अशा दुग्ध तंत्रज्ञान पदवीधरांची गरज असते.

दुग्ध तंत्रज्ञान पदविकेपासून पीएच.डी.पर्यंत सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सोय भारतामध्ये आहे. विविध कृषी महाविद्यालयांमध्ये हे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबईमध्ये डेअरी सायन्स इन्स्टिटय़ूट ही संस्था आहे आणि या संस्थेत डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय आहे. तसेच जबलपूर (मध्य प्रदेश) येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड अ‍ॅग्रीकल्चर येथेही दुग्ध व्यवसायाचे शिक्षण दिले जाते. राजस्थानातील उदयपूर येथील राजस्थान अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्‍‌र्हसिटीच्या कॉलेज ऑफ डेअरी सायन्समध्येही हे शिक्षण दिले जाते. कोलकत्ता येथे तर या विषयाचे स्वतंत्र पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅनिमल अँड फिशरी सायन्सेस हे  विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठात डेअरी टेक्नॉलॉजीच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे.

दुग्ध तंत्रज्ञानातील अभ्यासक्रम

१) पदविका अभ्यासक्रम – Indian Dairy Diploma (IDD)

२) पदवी अभ्यासक्रम – बी. टेक. (दुग्ध तंत्रज्ञान किंवा बी.एस्सी. दुग्धशास्त्र)

३ ) द नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट संस्थेतील विविध अभ्यासक्रम तसेच अनेक महाविद्यालयात डेअरी तंत्रज्ञान, डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी इंजिनिअरिंग इत्यादींचे पदव्युत्तर अभ्यासक्रम M. Tech. / M.Sc  आणि पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

इंडियन डेअरी डिप्लोमा (IDD)

मुंबई येथे इंडियन डेअरी डिप्लोमा सुरू आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. अभ्यासक्रम मुंबईत आरे कॉलनीतील महाविद्यालयातून शिकवण्यात येत असून, तो महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे.

पात्रता – १२वी विज्ञान – ढउट गटात कमीत कमी ५० टक्के गुण व  इंग्रजी विषयात किमान ४०टक्के गुण आवश्यक आहेत.

माहितीसाठी संकेतस्थळ www.mfsu.in

बी.टेक. / बी.एस्सी. दुग्ध तंत्रज्ञान

आपल्या देशात साधारणत: डेअरी तंत्रज्ञानाची १६ महाविद्यालये आहेत, त्यात महाराष्ट्रातील पुसद (ता. वरूड) व उदगीर (जि. लातूर) येथे आहेत. या सर्व महाविद्यालयांतील २५ टक्के प्रवेश भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांमार्फत होतात आणि  उर्वरित जागा संबंधित महाविद्यालयाच्या विद्यापीठामार्फत भरल्या जातात.

आयसीएआरमार्फत होणाऱ्या प्रवेशाबद्दल माहिती

पात्रता – १२वी विज्ञान शाखेस प्रवेश घेतलेले किंवा १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण

प्रवेशप्रक्रिया – ‘आयसीएआर’च्या संवर्गातून प्रवेश द्यावयाचा असल्यास ‘आयसीएआर’ने ठरवून दिलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत असणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा ही अकरावी, बारावी विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणिताच्या  अभ्यासक्रमावर असते. ही परीक्षा बहुपर्यायी असते.

बी. टेक. दुग्ध तंत्रज्ञान पदवी

राज्यात वरूड (ता. पुसद) व उदगीर (जि. लातूर) येथील दुग्ध तंत्रज्ञान या महाविद्यालयांतून बी.टेक. दुग्ध तंत्रज्ञान या विषयाची पदवी मिळते. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे.

पात्रता – १२वी विज्ञान शाखेत ढउट गटामध्ये ५० टक्के गुण आवश्यक, इंग्रजीमध्ये ४० टक्के गुण आवश्यक. या अभ्यासक्रमासाठी १२वी विज्ञानाच्या एकूण गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे शेतीचा ७/१२चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजुराचा उतारा असेल अथवा बारावीला त्यांचा डेअरी सायन्स हा विषय असल्यास अतिरिक्त २० टक्के गुण मिळतात.

संकेतस्थळ: ( www.ndri.res.in )

बी.एस्सी. दुग्धशास्त्र पदवी

महाराष्ट्रातील बऱ्याचशा महाविद्यालयांत बी.एस्सी. दुग्धशास्त्र पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो

द नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट ही दूध व दुग्धोत्पन्न पदार्थाचे उत्पादन व दुग्ध पक्रिया क्षेत्रात संशोधन करणारी देशातील अग्रगण्य प्रयोगशाळा आहे पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रम या संस्थेकडून चालवले जातात. (६६६.ल्ल१्रि.१ी२.्रल्ल )

हरियाणा कर्नाल येथील द नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट ही संशोधन संस्था १९२३ साली बंगलोर येथे स्थापन झाली. १९५५ साली संस्थेचे मुख्यालय बंगळुरू येथून कर्नाल- हरियाणा येथे हलविण्यात आले. बंगळुरू येथील कार्यालय संस्थेचे दक्षिण विभागीय कार्यालय म्हणून कार्यान्वित झाले. १९७० मध्ये संशोधनाची व्याप्ती व स्वायत्तता वाढवण्यासाठी ‘एनडीआरआय’ ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेचा  (आयसीएआर) उपक्रम म्हणून कार्यरत झाली.१९८९ साली या संशोधनशाळेला अभिमत विद्यापीठाचा दर्जाही देण्यात आला. या संस्थेत डेअरी उद्योगविषयीच्या शिक्षणाच्या १२ शाखांमध्ये पदवी (बी.टेक.)पदव्युत्तर (एम.एस.सी.)आणि पीएच.डी. (अत्युच्च) शिक्षणाच्या संधी संस्थेत उपलब्ध आहेत.

संकेतस्थळ  ( www.ndri.res.in )

पुढे काय?

  • स्वत:चा उद्योगधंदा चालवू शकतो.
  • राज्यातील कृषी विद्यापीठांत प्राध्यापक, भारतीय कृषी संशोधन संस्थेत, संशोधन संस्थांतून शास्त्र व संशोधन सहाय म्हणून संधी.
  • देश-परदेशातील दुग्ध प्रकल्पांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:32 am

Web Title: job opportunity in dairy technology
Next Stories
1 नोकरीची संधी
2 यूपीएससीची तयारी : सुख म्हणजे नक्की काय असते?
3 एमपीएससी मंत्र : अर्थव्यवस्था आणि योजना
Just Now!
X