मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र येथे टाटा मूलभूत संशोधन संस्थेतर्फे विज्ञान व तंत्रज्ञान विषयात खालीलप्रमाणे संशोधनपर पीएचडी करण्याची संधी उपलब्ध आहे.

संशोधनासाठी उपलब्ध विषय- संशोधनासाठी उपलब्ध विषयांमध्ये प्राथमिक स्तरापासून पदवी स्तरापर्यंत विज्ञान विषयामधील शैक्षणिक उपक्रम- पद्धती, विज्ञान विषयातील कल्पक व सृजनशील शिक्षण पद्धती, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित या विषयांमध्ये वैचारिक पद्धतीवर आधारित रोचक पद्धती विकसित करणे, शालेय अभ्यासक्रमातील तंत्रज्ञान पद्धतीचा विकास करणे, विज्ञान शिक्षणाला दृक्श्राव्य पद्धतीची जोड देणे, शिक्षणाशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक अंगांचा विकास करणे, विज्ञान व तंत्रज्ञानासह पर्यावरण विज्ञान विषयाचा विकास करणे, ज्ञानाशी संबंधित शैक्षणिक पैलूंचा विचार करणे, विज्ञान क्षेत्रांतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, पर्यावरण विज्ञान या शाखांमधील शिक्षणाचा विकास करणे, इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक पात्रता – अर्जदारांनी सामाजिक विज्ञान, मानसशास्त्र, बिहेवियरल सायन्स, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, सामाजिक विज्ञान यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वरील पात्रतेशिवाय उमेदवारांना विज्ञान विषयांतर्गत शिकविणे, याच विषयातील शैक्षणिक लिखाण करणे, विद्यार्थ्यांच्या संदर्भात जिज्ञासू वृत्ती, विश्लेषणपर प्रवृत्ती व शैक्षणिक सुधारणा, इ. संदर्भातपण विशेष रुची असायला हवी.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १३ मे २०१८ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना टाटा मूलभूत संशोधन संस्थेतर्फे समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.

पाठय़वृत्तीची रक्कम व तपशील- निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधनकाळात दरमहा २५००० ते २८००० रु.ची संशोधन पाठय़वृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना पाठय़वृत्तीच्या ३०% घरभाडे भत्ता व वार्षिक आकस्मिक खर्चापोटी ३२००० रु. देण्यात येतील.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अधिक माहिती व तपशिलासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या दूरध्वनी क्र. ०२२-२५०७२३०४ अथवा २५०७२२३० वर संपर्क साधावा अथवा संशोधन केंद्राच्या http://www.hbcse.tifr.res.in/admissions अथवा http://www.hbcse.tifr.res.in/graduate-school/ph.d.-programme-in-science-education-2018/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून पुरुष उमेदवारांनी ६०० रु. तर महिला उमेदवारांनी १०० रु. भरणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज ग्रॅज्युएट स्कूल अ‍ॅडमिशन्स २०१८, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- ४०००८८ या पत्त्यावर ३० मार्च २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.