वेगवेगळ्या शाखांतील पदव्या घेऊन दरवर्षी लाखो मुले उत्तीर्ण होतात आणि देशातील बेरोजगारांच्या संख्येत थोडी थोडी भर पडते. मात्र दुसरीकडे अनेक क्षेत्रांत, अनेक कामांसाठी सक्षम मनुष्यबळ मिळत नाही. किंबहुना पदवीधारकांकडेही आवश्यक अशी कौशल्ये नसल्याची तक्रार कंपन्यांकडून केली जाते. त्या अनुषंगाने कौशल्य विकासाचा बोलबाला सुरू झाला. यंदा देशातील कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्चायच्या रकमेत सर्वाधिक प्राधान्य हे शिक्षण आणि कौशल्य विकासक्षेत्राला दिले आहे. आपल्याला क्षमता असलेले, कार्यशील मनुष्यबळ हवे तर ते आपणच तयार करावे अशी भूमिका कंपन्यांनी घेतल्याचे दिसत आहे.

भारतात या आर्थिक वर्षांत (२०१७-१८ ) एक हजार एकोणीस कंपन्यांनी नऊ  हजार ३४ कोटी रुपये सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च केले. त्यापैकी ३७ टक्के निधी हा शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी गुंतवण्यात आला आहे. शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर कौशल्य विकासासाठी कार्यक्रम राबवले जातात. पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी या कार्यक्रमातून प्रयत्न केले जातात. कंपन्या आणि महाविद्यालये एकत्रितपणे हे कार्यक्रम राबवतात. बाकी सगळ्या क्षेत्रांप्रमाणे शिक्षणातील ही गुंतवणूक कंपन्यांनाच दूरगामी फायदा करून देणारी आहे.

RasikaMulye@expressindia.com