News Flash

पुढची पायरी : तणावमुक्त काम

कार्यालयीन ताणतणाव टाळण्याचे धोरण प्रत्येकाने आखायलाच हवे.

काम म्हटले की ताण हा आलाच. तो कुणाला चुकला नाहीच; पण त्याला कसे हाताळावे, हे मात्र आपल्या हातात आहे. कार्यालयीन ताणतणाव टाळण्याचे धोरण प्रत्येकाने आखायलाच हवे.

आयुष्य म्हटले की ताणतणाव आलेच; पण जोपर्यंत ते ताण आपल्या क्षमतेशी जुळणारे असतात तोपर्यंत ते प्रेरणादायी, आव्हानात्मक ठरतात; पण त्यापलीकडे गेले की मग मात्र आपल्या उत्पादकतेवर व कामगिरीवर परिणाम होतो, तसेच शारीरिक व भावनिक आरोग्यावरसुद्धा गंभीर परिणाम होतात. कार्यालयातील या पहिल्या वर्षांत असे ताणतणाव हाताळायची आपल्याला सवय नसते; पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुमच्या भविष्यातील व्यावसायिक कारकीर्दीत असे प्रसंग वारंवार येणार आहेत. तेव्हा असे ताणतणाव टाळायचे कसे किंवा कमी तरी कसे करावयाचे याचे धोरण आपल्याला आखता आले पाहिजे.

तणावांचा उगम –

 • बऱ्याच वेळा आपण तणावाखाली वावरतो, पण त्याचा उगमच कळत नाही व तणाव अजूनच वाढतो. म्हणूनच तुम्हाला पुढे दिलेल्यांपैकी याची काही कारणे दिसतात का ते शोधा. हीच तणावमुक्त होण्याची पहिली पायरी आहे.
 • शारीरिक दौर्बल्याने दररोजचे काम पूर्ण न झाल्याने उत्पादकता कमी होणे.
 • अतिरिक्त भावनिक आंदोलनांनी काम करताना एकाग्रता न होणे.
 • वेळेचे व हातातल्या कामांचे नियोजन न करता येणे, परिणामी सातत्याने एकही काम धड पूर्ण न होणे.
 • अंगावर पडलेल्या कामाचे तांत्रिक ज्ञान कमी असणे किंवा अजिबात नसणे.
 • सहकाऱ्यांच्या व वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे वाटणे; त्यामुळे नोकरी जाण्याची भीती वाटणे.
 • स्वत:बद्दल अवास्तव महत्त्वाकांक्षा ठेवणे.
 • विघ्नसंतोषी सहकाऱ्यांमुळे कामात सातत्याने अडथळे येणे.

तणावाखाली असल्याची लक्षणे –

 • बऱ्याच वेळा स्वत:लाच कळत नाही की आपण तणावाखाली जगतो आहोत. पुढे दिलेली लक्षणे तुम्ही तणावाखाली आहात असे दर्शवितात.
 • सारखी चिडचिड होणे, उदास वाटणे, कसली तरी चिंता वाटणे.
 • एकटे वाटणे, कामात लक्ष न लागणे. शांत झोप न लागणे, थकवा येणे.मन एकाग्र न होणे, छोटय़ा छोटय़ा गोष्टी विसरणे. छातीत अकारण धडधड होणे, तळहात, तळपायाला सारखा घाम येणे.
 • कार्यालयात न जावेसे वाटणे किंवा कामे टाळण्याची प्रवृत्ती होणे.

तणावमुक्तीसाठी प्रयत्न –

 • वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळली तर लगेच सजग व्हा आणि पुढील उपाय वापरून तणाव घालवण्याचा प्रयत्न करा.
 • जवळच्या विश्वासू सहकाऱ्याशी/कुटुंबातील व्यक्तीशी तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. तो/ती कदाचित तुम्हाला समस्या कशी सोडवावी ते सांगू शकणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला नक्कीच हलके वाटेल.
 • प्रशिक्षित गुरूकडून व्यायाम/ योगासने/ प्राणायाम/ ध्यान याचे शिक्षण घ्या. तसेच पोटभर पोषक आहार घ्या.
 • आवश्यक झोप घ्या. रात्री मोबाइल, दूरदर्शन, सोशल साइटवर वेळ घालवू नका. अपुऱ्या झोपेमुळे कामगिरी सुमार होते.
 • कामांची महत्त्वाचे आणि तातडीचे अशी क्रमवारी ठरवा. एखादे प्रलंबित महत्त्वाचे काम जेव्हा तातडीने करायला लागते तेव्हा तणाव वाढतो.
 • अचूकपणाचा अतिरेक, नकारात्मक विचार व आपल्या हातात नसलेल्या गोष्टींच्या परिणामांचा विचार टाळा. इतर सहकारी करत असलेल्या चांगल्या/वाईट कामांचे तुमच्या कामावर दडपण येऊ देऊ  नका.
 • आपल्याला कुणी आज्ञा देऊन एखादे काम करण्याऐवजी ते स्वत: पुढाकार घेऊन करा.
 • इतके करूनही कामाचा ताण असह्य़ होत असेल तर वरिष्ठांकडे जाऊन तसे प्रांजळपणे कबूल करा. शक्य असेल तर बदली मागा किंवा नवीन प्रकारचे काम मागा; पण हे लक्षात ठेवा की, दुसऱ्या ठिकाणीही ताण असणार आहेच. कामाच्या वेळेनंतर सहकाऱ्यांबरोबर कार्यालयासंबंधी फुकाच्या गप्पा मारत बसू नका.
 • या टवाळगप्पांपेक्षा आवडत्या छंदात मन रमवा. काही नवे शिका. भटकून या.
 • एकूणच ताण हाताळायची क्षमता वाढवून प्रभावी काम करायला शिका. हेच ताणावर नियंत्रण करावयाचे व बढती मिळवण्याचे खरे गमक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:28 am

Web Title: stress free work
Next Stories
1 वेगळय़ा वाटा : चित्रकला व छायाचित्रणाचा सुरेख संगम
2 सौर घरगुती दीप योजना
3 नोकरीची संधी
Just Now!
X