25 March 2019

News Flash

‘प्रयोग’  शाळा : निसर्गराजा, ऐक सांगतो..

रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतले विद्यार्थी सोमवारची आतुरतेने वाट पाहतात.

सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडी गावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतले विद्यार्थी सोमवारची आतुरतेने वाट पाहतात. कारण निसर्गज्ञानावर आधारित एक नवे भित्तिपत्रक  शाळेत त्यांची वाट पाहत असते. जे तयार करतात, त्यांचे शिक्षक डॉ. सुधीर कुंभार. आजवर त्यांनी अशी ८०० भित्तीपत्रके तयार केली आहेत.

प्रत्येक शाळेमध्ये एक सूचना फलक असतो. इथे विद्यार्थ्यांऐवजी सूचना देणाऱ्या कागदांचीच गर्दी असते. ढेबेवाडी गावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतला सूचना फलक मात्र बोलका असतो. दर आठवडय़ाला विद्यार्थी तो वाचायला गर्दी करतात. कारण त्यांच्या सुधीर कुंभार सरांनी तयार केलेले नवे भित्तिपत्रक तिथे दिमाखात झळकत असते.

गेली २७-२८ वर्षे ते रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बीएस्सी, बीएड, एमए, एमएड, शिवाय एन्व्हायर्न्मेंटल कम्युनिकेशनमध्ये पीएचडी अशी भक्कम शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेले सुधीर विज्ञानप्रेमी, निसर्गप्रेमी. आपली हीच आवड विद्यार्थ्यांमध्येही यावी यासाठी त्यांनी एक कल्पक मार्ग शोधला, भित्तिपत्रकाचा. हे साल होते, १९९८. तेव्हापासून आजपर्यंत सुधीर हा उपक्रम न कंटाळता, न थकता चालवत आहेत. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे. आजतागायत ८००च्या वर भित्तिपत्रके त्यांनी स्वत: तयार केली आहेत, सांभाळून ठेवली आहेत. त्याची प्रदर्शनेही ते भरवत असतात. तसेच ज्ञानरचनावादाचा वापर करून कसे शिकवावे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या चमूमध्येही समन्वयक म्हणून कुंभार सर काम करत आहेत. रयत विज्ञान परिषदेसाठीही ते समन्वयक म्हणून काम करतात.

हा उपक्रम त्यांनी सुरू केला तेव्हा ते रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव मावळ इथल्या शाळेत कार्यरत होते. त्यानंतर सातारा जिल्ह्य़ातील कराड तालुक्यातल्या सवादे गावी त्यांची बदली झाली. तिथेही त्यांनी हा उपक्रम चालू ठेवला आणि आता ढेबेवाडीच्या शाळेतही ते हा उपक्रम उत्साहाने राबवत आहेत.

या भित्तिपत्रकाचे नाव आहे, निसर्गज्ञान. निसर्गाची थोडक्यात पण शास्त्रीय माहिती मिळावी, असा हेतू होता. यात शब्द कमी आणि दृश्ये जास्त होती, ज्यायोगे ते आकर्षक वाटावे. १९९८ मध्ये जेव्हा हा उपक्रम सुरू झाला तेव्हा साप, पक्षी, प्राणी, आपल्या परिसरातील नदी, झाड असे विषय घेतले गेले. कधी एखाद्या बातमीवर माहिती दिली गेली. गणेशोत्सव, होळी, रंगपंचमीसारखे सण साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, याविषयी  जनजागृती केली. सुरुवातीला कुतूहलाने डोकावणारे विद्यार्थी या भित्तिपत्रकामध्ये आपणहून रस दाखवू लागले. ते भित्तिपत्रक तयार करण्यात कुंभार सरांना मदत करू लागले. कुणी एखादा विषय घ्याच, असा हट्ट करू लागला. सर असे अभ्यासू हट्ट पुरवतही असत. कारण विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची, विज्ञानाची आवड रुजत होती.

या माध्यमातून वाढलेल्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानभुकेला खाद्य म्हणूनच सुरू झाला, ‘वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी विज्ञान पंधरवडा’. पुस्तकांच्या पलीकडचे विज्ञान समजून घ्यायचे तर विद्यार्थ्यांनी प्रयोग करायला हवे. विज्ञानातील प्रयोगांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या तंत्रज्ञांसोबत गप्पा मारायला हव्यात, माहिती घ्यायला हवी. यासाठी सुरुवातीला कुंभार सरांनी शाळा भरण्याच्या आधी काही छोटी व्याख्याने, स्लाइड शो दाखवायला सुरुवात केली. निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या चौकटीत न मावणारे विषयही इथे अवतरले. महाराष्ट्रातल्या देवराया, फटाक्यांचे दुष्परिणाम अशा विषयांपासून सुरुवात झाली. स्वत: कुंभार सरही विविध ठिकाणांहून माहिती मिळवत होतेच. त्यातूनच मग अरविंद गुप्ता आणि त्यांची वैज्ञानिक खेळणी यांची ओळख सरांना झाली. लगोलग त्यांनी ती मुलांनाही करून दिली. शाळा भरण्याच्या आधी चालणारी व्याख्याने, वैज्ञानिक खेळण्यांविषयीचे प्रयोग या सगळ्या गोष्टी एका सुसूत्रबद्ध कार्यक्रमात कराव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच ‘विज्ञान पंधरवडय़ाची’ संकल्पना आकाराला आली. डिसेंबर, जानेवारीच्या आसपास शाळा आणि विद्यार्थी यांना सोयीचे पडतील, असे पंधरा दिवस हा पंधरवडा साजरा होतो. रयत शिक्षण संस्थेपुरताच हा उपक्रम मर्यादित आहे; परंतु तो कोणासाठी बंधनकारक नाही. शाळा भरायच्या आधी ९ ते ११ पर्यंत रोजची व्याख्याने, तज्ज्ञांच्या गप्पा, विद्यार्थ्यांचे प्रयोग असा जो काही असेल तो कार्यक्रम होतो. ११ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे शाळा सुरू होते. या उपक्रमाअंतर्गत पोलीस ठाणे, रुग्णालय, एमआयडीसीमधल्या कंपन्यांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. विज्ञानाचा प्रत्यक्ष वापर पाहिला. सर्पमित्र, पक्षिमित्रांकडून निसर्गातील अद्भुत शास्त्र समजून घेतले. विज्ञान पंधरवडय़ामध्ये विज्ञान प्रदर्शनही लावले जाते. इथे कुंभार सरांची भित्तिपत्रके असतात, शिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेले इतर साहित्यही असते.

विज्ञान आणि निसर्गाच्या अभ्यासात महत्त्वाचा भाग म्हणजे निरीक्षणे आणि सर्वेक्षणे.   त्याचेच कसब विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे, यासाठी कुंभार सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना गावातल्या वेगवेगळ्या गोष्टींची सर्वेक्षणे, निरीक्षणे करायला लावली. त्यासाठीची प्रश्नावली विद्यार्थ्यांकडूनच तयार करून घेतली. उदा. ढेबेवाडीमध्ये किती पाणी वाया जाते याची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली. इतकेच नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवल्या. अशाच प्रकारे गावातील वाहनांची संख्या, इमारतींची स्थिती, वीज, पाणी याविषयी विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणे केली आहेत. नुकतेच या विद्यार्थ्यांनी तब्बल ७०० महिलांशी बोलून  महिला आणि अंधश्रद्धा यावर एक सर्वेक्षण केले आहे.

या सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य वाढते. अहवाल लेखनातून विश्लेषण करण्याचे, निष्कर्षांप्रत येण्याचे कसब विकसित होते. विज्ञान पंधरवडय़ाचे आयोजन, नियोजनही विद्यार्थी करतात. विशेष म्हणजे त्यात अगदी पाचवी ते बारावीपर्यंतचे कोणतेही विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. आपली जबाबदारी निवडतात, ती पारही पाडतात. माजी विद्यार्थीही यात उत्साहाने सामील होतात. एकूणच या उपक्रमांतून कुंभार सरांच्या मनातला विज्ञाननिष्ठ, निसर्गप्रेमी विद्यार्थी या संस्थेमध्ये हळूहळू आकाराला येतो आहे.

स्वाती केतकर- पंडित ; swati.pandit@expressindia.com

First Published on March 14, 2018 3:49 am

Web Title: teacher dr sudhir kumbhar unique way of teaching on natural science