21 October 2019

News Flash

शब्दबोध

फारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द तयार झाला.

डॉ. अमृता इंदुरकर

नव्या वर्षांत शब्दबोध हे सदर दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे. शब्दांचा शोध आणि बोध घेण्यातली गंमत यातून अनुभवण्यास मिळेल.

गर्द

‘रात्रीचा गर्द काळोख तिची भीती अधिकच वाढवत होता.’ चित्तथरारक, रहस्यमय कथा, कादंबरीमध्ये शोभणारे हे वाक्य समस्त रहस्यकथा लेखकांचे अतिशय आवडते. गर्द म्हणजे दाट, घट्ट, गडद असे जमणारे अथवा दाटून येणारे. मग तो एखादा रंग असो किंवा धुके असो. मराठी कवितेत देखील ‘गर्द’ हा शब्द चांगलाच दाटलेला आहे. कवितेत येणाऱ्या ‘गर्द’ शब्दामुळे ती कविता अधिक अलवार होते.

शरच्चन्द्र मुक्तिबोध यांच्या कवितेतून हाच अनुभव येतो, सांज ये हळूहळू नि गाढ गर्दले धुके क्लांतशा मुखावरी हसे पुसटसे फिके

तर कवी ग्रेस या गर्दचा वापर कसा करतात बघा- ‘श्रावणातिल वासनांची गर्द प्रतिमा जांभळी’ मूळ फारसी शब्द देखील ‘गर्द’ असाच आहे. पण फारसीमध्ये दाट, गडद याव्यतिरिक्त अजून अर्थ आहेत. ते म्हणजे धूळ, धुराळा, धुलीभूत, नष्ट इ. शिवाय एक प्रकारचे रेशमी कापड या अर्थानेसुद्धा वापरतात.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या उदाहरणामध्ये दाट हा अर्थ व्यक्त होतो-‘मनात उगीच संशयाची गर्द आली असेल ती काढून टाकिली म्हणजे साफ काहीच खत्रा नाही.’ तर ऐतिहासिक लेखसंग्रहात नष्ट या अर्थाचे उदाहरण मिळते -‘टिपूचे संस्थान गर्द झाले हे सरकारचे दौलतीस चांगले नाही.’ किंवा ‘मारून गर्द करणे’ हा वाक्प्रयोगही याअर्थीच येतो. या गर्द वरूनच ‘गर्दी/गरदी’ हा शब्द तयार झाला. लोकांची दाटी म्हणजे गर्दी, वाहनांची गर्दी. पानिपतच्या बखरीमध्ये एका ठिकाणी गर्द आणि गर्दी अशा दोन्ही शब्दांचा एकाच वाक्यात उपयोग दिसतो -‘खासे विश्वासरावसाहेब अगदीच गर्दीत गर्द होऊन गेले.’ बालकवींच्या सुप्रसिद्ध ‘औदुंबर’ या गूढ कवितेत या गर्दीचे उदाहरण मिळते-’ शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.’

फारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द तयार झाला. गर्दन म्हणजे मान, गळा. फारसीत ‘गर्दन मारणे’ या अर्थी वाक्प्रयोग रूढ आहे. म्हणजे ठार मारणे. पण हिंदीत मात्र गर्दन म्हणजे केवळ गळा अथवा मान. तर असा हा विविध अर्थानी ‘गर्दलेला’ शब्द.

वाली

‘पती निधनानंतर तिला कुणी वाली राहिलेला नाही.’ अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो किंवा कधी घरात एखादा पदार्थ बरेच दिवस पडून असेल कुणी खात नसेल तर गमतीने म्हटलं जातं अरे त्या चिवडय़ाला कुणी वाली आहे का नाही?  वाली म्हणजे धनी, कैवारी, रक्षणकर्ता, त्राता, आश्रयदाता, मालक, पती. मूळ अरबी शब्द वाली असाच आहे व त्याचा अर्थ हाच आहे. सुप्रसिद्ध शाहीर होनाजी बाळ यांच्या रचनेत वाली हा शब्द आला आहे,

ही लूट नौतिची लाली, तू माझा वाली इश्काची शिपायावाणी, बान्धलिस ढाली.

अरबीमधला ‘वालीद’ शब्द या वालीवरूनच तयार झाला आहे. वालीद म्हणजे पिता, बाप आणि वाली म्हणजे रक्षणकर्ता. पिता हा एकप्रकारे मुलांचे रक्षणच करीत असतो त्यावरून वालीद हा शब्द तयार झाला असावा.

First Published on January 3, 2019 1:11 am

Web Title: vocabulary