तृप्ती तोरडमल

‘‘पपांचे कॅमेऱ्यापेक्षा रंगभूमीवर जास्त प्रेम होते. ते नेहमी म्हणत, ‘‘रंगभूमीवर पूर्ण भरलेल्या थिएटरमध्ये भूमिका रंगवताना समोर बसलेल्या प्रेक्षकांशी जे नाते निर्माण होते, प्रेक्षकांची दाद ऐकल्यावर जो आनंद मिळतो त्याची सर कशालाच नाही, ती नशाच काही और असते.’’ वयाची ६० वर्षे मराठी रंगभूमी चित्रपट आणि साहित्याला देणारे.. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’,

‘गुड बाय डॉक्टर’, ‘अखेरचा सवाल’ आदी नाटकांनी रंगभूमी गाजवणारे, वयाच्या ८३व्या वर्षी २८ कादंबऱ्यांचे मराठीमध्ये रूपांतर करणारे.. मराठी  रंगभूमीवर आपली अमीट छाप सोडणारे प्रा. मधुकर तोरडमल यांच्याविषयी सांगत आहेत, त्यांच्या कन्या तृप्ती तोरडमल.

पपांनी वयाची ६० वर्षे मराठी रंगभूमी आणि साहित्याला दिली. रंगभूमीवर नितांत प्रेम, कलेवरची अपार निष्ठा आणि कठोर परिश्रम यांच्या त्रिवेणी संगमामुळेच त्यांची छाप आणि अस्तित्व गेली सहा दशकं प्रेक्षकांच्या मनात कायम राहिलेलं आहे. ते नेहमीच स्वत:च्या नियमांवर आणि अटींवर जगले. स्वत:च्या व्यवसायाशी नेहमी एकनिष्ठ राहिले. पपांनी असंख्य नाटकं लिहिली, अनेक चित्रपटांमधून, नाटकांमधून, मालिकांमधून कामं केली, पण मनापासून प्रेम केलं ते रंगभूमीवरच!

पपांचे आणि ‘चंद्रलेखा’ संस्थेचे अतूट नाते होते. मोहन वाघकाकांबरोबर मत्रीचे सूर खूप छान जुळले होते. पपांचा प्रत्येक शब्द वाघकाका अतिशय प्रेमाने झेलत. दोघांनी मिळून ‘चंद्रलेखा’ संस्थेतर्फे अतिशय दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. ‘चंद्रलेखा’ची सगळी नाटके पपा स्वत:च लिहून दिग्दर्शित करीत. कित्येक वेळेस पपा दिवसाला तीन तीन प्रयोग करत. सकाळी ११च्या प्रयोगात ‘बारटक्के’ रंगवायचे, दुपारी ४ वाजताच्या प्रयोगात ‘गुड बाय डॉक्टर’मधला भीतिदायक कुरूप डॉक्टर, तर रात्री ८.३०च्या प्रयोगात ‘बाप बिलंदर बेटा कलंदर’मधला बिलंदर बाप. पण हे सर्व करताना त्यांना कधीही थकवा आला नाही किंवा कधीही थिएटरमध्ये पोहोचायला पाच मिनिटांचाही उशीर झाला नाही.

पपा शिस्तीचे अतिशय कडक. ठरावीक वेळेवर तालमीला येणे, नाटकातले आपापले संवाद व्यवस्थित तोंडपाठ करणे, सर्व सहअभिनेत्यांनी दिग्दर्शकाने आखलेल्या चौकटीतच काम करणे, कोणत्याही वाक्यांची किंवा संवादांची सरमिसळ न करता आपला अभिनय करणे ही त्यांची वैशिष्टय़े. त्यांना कुठल्याही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने काम करताना स्वत:ची ‘अ‍ॅडिशन्स्’ घेतलेली खपत नसत. त्यामुळे पपांबरोबर काम करायला त्यांचे सहअभिनेते खूप घाबरत. पपांचा दराराच इतका प्रचंड होता की, कुणी काही चूक केली तर त्यांच्या रागाने वटारलेल्या डोळ्यात पाहायची कोणाची हिम्मत होत नसे. कुणी शिस्तीचा भंग केला किंवा त्यांनी आखलेली लक्ष्मणरेषा पार करायचा प्रयत्नही केला, तर थेट आणि कडक शब्दांत सुनवायचे.

मोहन वाघकाकांच्या सल्ल्यावरूनच पपांनी स्वत:ची पहिली निळ्या रंगाची फियाट गाडी घेतली होती. गाडीवरून आठवले, एकदा दिवाळीची सुट्टी संपवून पपा, आई याच निळ्या फियाटमधून घरी येत होते. माझा जन्म तेव्हा झाला नव्हता. माझे काका गाडी चालवत होते. पुण्यापर्यंतचा प्रवास सुखरूप झाला. पुढे पपा बसले होते, मागे आई, गाडी खंडाळा घाटातील वेडीवाकडी वळणे पार करीत वेगाने पुढे जात होती. अचानक काकांचा गाडीवरचा ताबा सुटला. खोल दरीजवळच्या झाडाच्या बुंध्याला गाडीने जोरदार धडक मारली आणि अक्षरश: गाडीचे टप खाली व चाकं वर अशा अवस्थेमध्ये गाडी खोल दरीपासून दोन फुटांच्या अंतरावर उलटी होऊन पडली. क्षणात लोकांची गर्दी जमली. लोकांनी पपांना उलटय़ा झालेल्या गाडीमधून कसेबसे बाहेर काढले. सगळे सुखरूप वाचले. आईंचा हात मात्र गाडीच्या काचा घुसून रक्तबंबाळ झाला होता. त्या वेळीसुद्धा पपांना मुंबईला लवकरात लवकर कसे पोहोचता येईल याची चिंता होती, कारण रात्री ८ वाजता ‘शिवाजी मंदिर’मध्ये त्यांचा ‘तरुण तुर्क’चा प्रयोग होता. प्रयोगाला उशिरा पोहोचणे हे त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. मुंबईकडे जाणाऱ्या एका प्रवाशाने आणि पपांच्या चाहत्याने आई-पपांना मुंबईपर्यंत त्याच्या गाडीतून आणले. मोहनकाकांनी आईला दवाखान्यात न्यायची व्यवस्था केली. पपांनी मात्र ‘शिवाजी मंदिर’मध्ये वेळेत पोहोचून ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चा प्रयोग रंगवला.

‘तरुण तुर्क..’ या नाटकाची यशस्वी घोडदौड सुरू होती. त्या सुमारासच एका समीक्षकाने वृत्तपत्रात टीका करत शेरा मारला की, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत, विशेषत: पांढरपेशा वर्गातील स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये.’ पण झालं उलटच. ही समीक्षा छापून येताच रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित स्त्रियांनी, मुलींनी अक्षरश: रांगा लावून तिकिटं विकत घेतली. बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल झाले. ते इतकं चालायला लागलं की, या नाटकाचे एकाच नाटय़गृहात दिवसाला तीन प्रयोग होत आणि तेही हाऊसफुल्ल! हा त्या काळातला विक्रमच होता. पुढे या नाटकाचे पाच हजारांहून जास्त प्रयोग झाले.

एक घटना आठवतेय, १४ जानेवारी १९७२ या मकरसंक्रांतीच्या दिवशी पुण्याच्या ‘बालगंधर्व’ नाटय़गृहामध्ये ‘तरुण तुर्क..’चे  सकाळ, दुपार, रात्र असे ३ प्रयोग होते. गंमत म्हणजे त्या दिवशी ‘बालगंधर्व’ला येणाऱ्या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि स्त्रियांना गजरे, तसेच तिळगूळ देऊन स्वागत करण्यात आले होते. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंतराव देसाई यांच्यासारखी दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.

पपांनी एकामागे एक अशा अनेक दर्जेदार, यशस्वी नाटय़कृती सादर करून मराठी रंगभूमी दणाणून सोडली होती. महिन्याला ४०-५० प्रयोग होत असत. पण मला आठवताहेत त्याप्रमाणे पपांनी कुठल्याच गोष्टींची कधी पर्वा केली नाही. ना कधी मिळत असलेल्या पारितोषिकांनी, मानसन्मान, नावलौकिकाने कधी हुरळून गेले, ना कधी कुणी केलेल्या टीकेने दु:खी झाले. एका गोष्टींची खंत मात्र त्यांना जरूर होती. त्यांना ‘नटसम्राट’मधले अप्पासाहेब बेलवलकर कधी रंगभूमीवर साकार करता आले नाहीत. १९७० मध्ये पुरुषोत्तम दारव्हेकरद्वारा दिग्दर्शित ‘नटसम्राट’मध्ये सर्वप्रथम अप्पा बेलवलकरांची भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी अप्रतिम रंगवली होती. प्रयोगांनंतर त्यांना हृदयाचा त्रास सुरू झाला आणि ते नाटक सोडावे लागले. त्यानंतर दत्ता भट यांनी ‘नटसम्राट’ सुरू केलं. तेही अप्पा बेलवलकरांची भूमिका लागूंच्या तोडीस तोड अप्रतिम करीत. काही प्रयोगांनंतरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांनाही ‘नटसम्राट’ सोडावे लागले. पुरुषोत्तम दारव्हेकरांना हे मान्य नव्हते. ते आमच्या घरी पपांनी ही भूमिका करावी असा प्रस्ताव घेऊन आले. कोणत्याही नटासाठी अप्पा बेलवलकर सादर करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट होती. पपांनाही हुरूप आला. पण तत्पूर्वी

डॉ. लागू आणि दत्ता भट, जे पपांचेही मित्र होते, त्यांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी ठरवले. पपा डॉ. लागूंना भेटले. ते स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांनी पपांना एक सल्ला दिला, ‘‘मामा, तुम्हाला अप्पा बेलवलकरांची भूमिका करायची संधी मिळतेय. एक अभिनेता म्हणून मी सांगेन की ही भूमिका जरूर करा. पण नट म्हणून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही भूमिका साकार करताना तुम्ही एक अभिनेता म्हणून या ‘कॅरेक्टर’मध्ये इतके गुंतून जाता की, स्टेजवर तुम्ही अक्षरश: तीन तास अप्पा बेलवलकर म्हणून जगता. त्याचा ताण तुमच्या शरीरावर, मेंदूवर पडतो. खूप थकायला होतं. याचा परिणाम म्हणजे मला आणि दत्ता भटांना हृदयाचा त्रास झाला. तुम्हालाही एकदा अ‍ॅटॅक येऊन गेलाय. तेव्हा एक मित्र आणि एक डॉक्टर होण्याच्या नात्याने जरूर सल्ला देईन, जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या.’’ पपांनी डॉक्टरांचा सल्ला मानला आणि दारव्हेकरांना विनम्रपणे आपली अडचण सांगून ‘नटसम्राट’ करायला नकार दिला. पुढे सतीश दुभाषी व त्यानंतर चंद्रकांत गोखले यांनी ‘नटसम्राट’ केलं.

दरम्यान, एकामागोमाग एक-दोन विनोदी नाटकांची निर्मिती केल्यावर पपांनी सत्य घटनेवर आधारित ‘ऋणानुबंध’ हे नाटक लिहिले, त्याचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिकाही त्यांनीच केली होती. नाटक गंभीर होतं. नाटक बघताना बायका, मुली अक्षरश: रडायच्या. आणि पपांना नाटक सुटलं की आत येऊन सांगायच्या, ‘‘मामा, खूप रडवलंत आज तुम्ही.’’ प्रेक्षकांच्या पसंतीला नाटक उतरलं. समीक्षकांनीही खूप तारीफ केली. एक मात्र खरं की पपा उत्कृष्ट अभिनेता होते, लेखक होते, दिग्दर्शक होते, पण त्यांना निर्माता होणे कदाचित जमले नसावे. एखादी कंपनी चालवण्यामागचा व्याप, कष्ट, दगदग त्यांना त्रासदायक वाटायला लागली, कारण व्यापारी वृत्ती त्यांच्यातल्या कलाकारामध्ये कधी नव्हतीच.

दरम्यान, नाटकांव्यतिरिक्त मराठी चित्रपटांतही काम स्वीकारायला पपांनी सुरुवात केली होती.  पुढे अरूण सरनाईक आणि त्यांनी मिळून अनेक चित्रपट, नाटकं केली आणि त्यातून त्यांची घनिष्ठ मत्री जमली. दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशीही पपांची घट्ट मत्री होती. तोरणे यांच्याबरोबर घरोबाही होता. आईंची मावसबहीण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री पद्मा चव्हाण या कमलाकर तोरणे यांच्या पत्नी होत्या. पद्मा चव्हाण पपांना खास मराठा शैलीमध्ये खूप आदराने ‘दाजीसाहेब’ म्हणायच्या. कमलाकर तोरणे यांनी दिग्दर्शित केलेल्या बऱ्याच चित्रपटांत पपांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘जावई  विकत घेणे आहे’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘कैवारी’ हे त्यातले काही चित्रपट. याव्यतिरिक्त पपांनी ‘बदला’, ‘सिंहासन’, ‘सुनबाई ओटी भरून जा’, ‘एकापेक्षा एक’, ‘शाब्बास सुनबाई’, ‘आत्मविश्वास’ अशा अनेक चित्रपटांत भूमिका केल्या.

मात्र पपांचे कॅमेऱ्यापेक्षा रंगभूमीवरच जास्त प्रेम होते. ते नेहमी म्हणत, ‘‘रंगभूमीवर पूर्ण भरलेल्या थिएटरमध्ये भूमिका रंगवताना समोर बसलेल्या प्रेक्षकांशी जे नाते निर्माण होते, प्रेक्षकांची दाद ऐकल्यावर जो आनंद मिळतो त्याची सर कशालाच नाही, ती नशाच काही और असते.’’ पपांनी नेहमीच चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर काम करणे जास्त पसंत केले याचे दुसरेही कारण होते. नाटक प्रदर्शित झालं, की निर्माते महिनाभराच्या तारखा घेऊन थिएटर बुक करतात. प्रत्येक प्रयोगामागे अनेक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. अशा वेळी शूटिंगसाठी तारखा दिल्या, की प्रयोग रद्द करावे लागत. याचा परिणाम सगळ्या टीमवर होतो. निर्मात्याचे तर नुकसान होतेच, त्याचबरोबर सहकलावंत तसेच बॅकस्टेज कामगारांचे खास करून नुकसान होते. दुसऱ्याच्या पोटावर दगड ठेवून स्वत:चा महाल बांधणे पपांना कधीच मान्य नव्हते.

पपा तसे फार कमी बोलायचे; पण एकदा बोलायला सुरुवात केली की, ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन त्यांचे बोलणे तासन्तास ऐकत राहायचा. त्यांची हुशारी, प्रत्येक विषयावरचे त्यांचे विचार, भाषेवरचे प्रभुत्व अलौकिक होते. त्यांच्या स्वभावाचे दोन पलू होते. कधी वज्राहून कडक, तर कधी मेणाहून मऊ. अतिशय प्रेमळ शब्दांमधून त्यांनी कधीच आपले प्रेम व्यक्त केले नाही, पण त्यांच्या कृतीमधून प्रत्यय यायचा, की ते किती प्रेमळ आहेत.

रंगभूमीवरून निवृत्ती घेतली आणि पपांनी लिखाणाला सुरुवात केली. इन्ग्रीड बर्गमन, लॉरेन्स ऑलिव्हर यांच्या आयुष्यावर आधारित ‘एक सम्राज्ञी एक सम्राट’ नावाने चरित्र लिहिले. ‘रंगरूप दर्शन’ ही रंगभूमीवर आधारित कादंबरी लिहिली. धोंडो केशव कर्वे यांच्या लिखाणावर आधारित ‘बुद्धिप्रामाण्य वाद’ नावाची मालिका लिहिली. याच सुमारास शशी थरुर यांनी लिहिलेल्या ‘भारत : नेहरूंपासून नंदनवनापर्यंत’ या नावाने मराठी भाषेमध्ये अनुवाद केला. त्याचप्रमाणे व्हिक्टर ह्य़ुगोच्या ‘ला मिसराब्ल’ या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘आयुष्य पेलताना’, जेन ऑस्टीनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिज’चे ‘समज आणि गैरसमज’ या नावाने मराठीत रूपांतर केले.

सगळ्यात आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे वयाच्या ८२-८३ व्या वर्षी २८ कादंबऱ्यांचे मराठीमध्ये रूपांतर केले आणि तेही जवळजवळ सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्णही केले. पपा लिहायला बसले की, त्यांचे फक्त फुलस्केप कागद आणि एक पेन एवढंच समोर असायचे. लिहायचे टेबल, खुर्ची अशा गोष्टींची त्यांना कधी गरजच भासली नाही. स्वत:च्या झोपायच्या पलंगावर समोर दोन उशा ठेवल्या की झालं काम. तासन्तास ते अशा रीतीने लिहीत बसायचे. तहान, भूक वगरे गोष्टींचा त्यांच्याशी दूरदूरचाही संबंध नसायचा. आईच्या मागे लागण्याला वैतागून कसेबसे दोन घास पोटात ढकलायचे आणि पुन्हा लिहिण्यात गर्क व्हायचे. शरीर साथ देत नव्हते, पण तीव्र स्मरणशक्ती आणि तीक्ष्ण बुद्धीने कधीच पपांची साथ सोडली नाही. म्हणूनच अंतिम क्षणापर्यंत त्यांच्या हातात लेखणी होती. पपांची राहणी जितकी साधी तितक्याच त्यांच्या गरजाही अगदी कमी होत्या. कडक कांजी केलेला कुडता पायजमा, पायात कोल्हापुरी चप्पल आणि हातामध्ये घडय़ाळ या तीन गोष्टींशिवाय त्यांनी कुठलीच हौस केली नाही.

मुलांचे पहिले गुरू त्यांचे जन्मदाते असतात. माझ्यावर पपांचा फार प्रभाव आहे. मी शेंडेफळ म्हणून माझ्यावर पपांचा विशेष जीव होता. आम्ही तिघी बहिणीच; कडक आणि शिस्तबद्ध वातावरणात आमचं बालपण गेलं. पण पपा जितके शिस्तीसाठी कडक होते तितकेच आधुनिक विचारांचे होते. आपले निर्णय आपण स्वत: घ्यायला सक्षम असले पाहिजे, या विचारांनीच आम्हाला वाढवले. वाढत्या वयात मी खूप चुका केल्या; पण  पपांसमोर जाऊन आपले मन मोकळं करत झालेली चूक कबूल केली, की अतिशय प्रेमाने पपा मला समजवायचे, ‘‘ऐक तृप्ती, आपण माणसं आहोत, आपल्या हातून चूक होणारच. तो गुन्हा नाही, पण तीच चूक पुन्हा करणे हा मोठा गुन्हा आहे. प्रत्येक चुकीमधून धडा घेऊन बरोबर काय आहे हे शिकणे यात शहाणपण असतं.’’ त्यांची ही शिकवण माझ्यासाठी अनमोल आहे. मी देवभोळी आहे. पूजाअर्चा करायची वेळ आली की, प्रत्येक गोष्ट विधीपूर्वक झालीच पाहिजे हा माझा अट्टहास अगदी लहानपणापासूनच असायचा. पपांच्या लक्षात ही गोष्ट आली. एके दिवशी त्यांनी मला जवळ बसवले आणि अतिशय मुद्देसूदपणे हळुवार शब्दांत समजावले, ‘‘हे बघ तृप्ती, तुझ्या देवभोळेपणावर माझा आक्षेप नाही, पण उगाचच या गोष्टींचा बाऊ करू नकोस. देव ही एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, जी मनुष्याला मानसिक बळ देते. विश्वास ठेव, पण अंधविश्वासाला थारा देऊ नकोस. आपल्या कर्मावर विश्वास ठेव. कर्माची पूजा केलीस तर देव यशाच्या, विजयाच्या स्वरूपात आशीर्वाद देतील.’’ पपांचे हे शब्द कायमचे सोबती झाले.

पपांच्या व्यक्तिमत्त्वात व्यावहारिक विचारसरणी अंगभूत होती. त्यांनी कुराण, बायबल, रामायण, महाभारत, गौतम बुद्धाचे विचार अनेकदा वाचले होते. गीतेमधील श्लोक पपांना तोंडपाठ होते. त्यांचा जातीयवादावर कधीच विश्वास नव्हता. प्रत्येक धर्माविषयी त्यांना आदर होता.

पपांचे शेवटचे दिवस मला लखलखीत आठवतात. त्यांची तब्येत खूप ढासळली होती. शेवट जवळ आला होता. डॉक्टरांनी पपांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जायचा सल्ला दिला. जड अंत:करणाने आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी ठेवायचे, त्यांच्या सगळ्या इच्छा पुरवायच्या, अशी गाठ पदरी बांधून आम्ही तिघी बहिणी उभ्या राहिलो. घरात भेटायला येणाऱ्या आप्तजनांची वर्दळ वाढायला लागली. पपांची खवय्येगिरी सगळ्यांना परिचित होतीच, शिवाय स्वादिष्ट भोजन ते किती प्रेमाने, तृप्त होत एन्जॉय करायचे हेही सगळ्यांना माहिती होते. त्यामुळे भेटायला येणारा प्रत्येक जण पपांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी करून घेऊन येत होते. मधुमेह वगरे गोष्टी बाजूला ठेवून न मीही पपांचे आवडते गोड पदार्थ पुरणपोळी, साजूक तुपातला मऊसुत शिरा, आइस्क्रीम, आमरस, चॉकलेट्स वगरे रोज त्यांना देत होते; पण नंतर नंतर त्यांच्या जिभेची चव गेली असावी. एकदा तर चिडून म्हणाले, ‘‘हे असले अळणी जेवण जेवणार नाही. मला आत्ताच्या आत्ता नाशिकचा कोंडाजीचा कांद्याचा तिखट चिवडा खायचा आहे. मी खाल्ला तर फक्त चिवडाच खाईन. नाही तर मला हे असले बेचव, अळणी जेवण नको.’’ हट्टच धरून बसले ते. उपेंद्र  दाते यांनी खास नाशिकवरून तो कोंडाजीचा तिखट चिवडा मागवला. पपांनी जेव्हा तो चिवडा खाल्ला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही आनंद देऊन गेला. मन भरून पपांनी त्यांचा तो आवडता चिवडा खाल्ला आणि तो खात असताना दौऱ्यावरून परतताना नाटकाची बस खास ‘कोंडाजी’च्या दुकानासमोर कशी थांबवली जायची त्याच्या आठवणीही होत्याच.

त्यानंतर पुन्हा एकदा पपांनी हट्ट धरला, ‘‘मला आत्ताच्या आत्ता भेळ खायची आहे.’’ तिखट भेळ अशा नाजूक अवस्थेमध्ये त्यांना कशी द्यायची, हा प्रश्न पडला. आम्ही तोडगा काढला. घरीच पपांच्या तब्येतीला सोसेल अशी हलकीफुलकी भेळ करून दिली. प्लेटभरून पपांच्या जवळ घेऊन गेले. ‘‘अरे वा, आज भेळीचा प्रोग्राम!’’ असं म्हणत अतिशय उत्साहात पलंगावर उठून बसले. ती भेळ पाहिली मात्र,  ‘‘ही कसली भेळ? काही तरी उगाचच बेचव करून माझ्यासमोर घेऊन येत जाऊ नका. मी खाईन तर ठेल्यावरची चमचमीत, तिखट भयाजीने केलेलीच भेळ खाईन, नाही तर खाणार नाही,’’ असे म्हणत पपांनी आमची घरगुती भेळ खाण्यास ठामपणे नकार दिला. शेवटी नाइलाज होऊन आम्ही गाडीवरची भेळ घेऊन आलो. पपांनी अगदी चवीने ती भेळ खाल्ली; पण पपांची अन्नावरची वासना हळूहळू कमी व्हायला लागली. जेवण समोर दिसले की त्यांचा पारा चढायचा. जेवले की पोटात प्रचंड यातना होतात अशी तक्रार सुरू व्हायची. आम्हा बहिणींना आता काळ जवळ येत चालला आहे हे दिसत होते. त्याच वेळी मी जॉन अब्राहम निर्मित माझा पहिला मराठी चित्रपट ‘सविता दामोदर परांजपे’ नुकताच पूर्ण केला होता. या चित्रपटातील मुख्य म्हणजे ‘सविता दामोदर परांजपे’ची प्रमुख भूमिका मी साकार केली होती. शूटिंग नुकतेच पूर्ण झाले होते. टेक्निकल कामे आणि सुधारणा बाकी होत्या. पपांच्या तोंडून एके दिवशी सहज निघून गेलं, ‘‘अगं तृप्ती, मला तुझे काम पाहायची फार इच्छा होती, पण आता नाही वाटत मी तुझा सिनेमा पाहू शकेन. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे.’’ मला रडू आवरेना. मी लगेच दिग्दर्शित स्वप्ना वाघमारे जोशी आणि जॉन अब्राहमला फोन लावून हे सांगितले. जॉनने ताबडतोब तो चित्रपट पेन ड्राइव्हवर कॉपी करून घरी पाठवण्याची व्यवस्था केली. मी पपांना माझा पहिला मराठी चित्रपट दाखवायची तयारी केली. पपांना दोन-अडीच तास बसून चित्रपट पाहाता येईल का, असा प्रश्न आमच्यासमोर होता, कारण दहा-पंधरा मिनिटे जरी खुर्चीत बसले तरी त्यांची कंबर असह्य़ दुखायची. बघू या कसे काय शक्य होते ते, नाहीच जमले तर टप्प्याटप्प्यामध्ये दाखवता येईल, असा विचार करून आम्ही दिवाणखान्यामध्ये ‘सविता दामोदर परांजपे’ पहायला बसलो. पपांची व्हीलचेअर टीव्हीसमोर, बरोबर दिवाणखान्याच्या मध्यभागी ठेवली. चित्रपट सुरू झाला. माझं सारं लक्ष पपांच्या चेहऱ्यावर होते. पपा एकाग्रतेनं पहात होते. थोडा जरी बाहेरचा आवाज किंवा फोनची रिंग जरी वाजली तरी पपा चिडून शांतता ठेवा, आवाज करू नका, असा इशारा देत होते. जणू काही त्यांना तो चित्रपट नि:शब्दपणे बघायचा होता. माझे काम, अभिनय, पडद्यावरील वावर, आवाजामधले चढउतार, फेरबदल यांचे सूक्ष्म निरीक्षण ते करीत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अडीच तास एका जागेवर व्हीलचेअरवर बसून पपांनी संपूर्ण चित्रपट एकावेळी पाहिला. मी कुतूहलाने पपांना त्यांचा अभिप्राय विचारला, तेव्हा हसून त्यांनी उत्तर दिलं, ‘‘सुंदर काम केलं आहेस तू.’’ मंद स्मित करत माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ‘‘माझा आशीर्वाद आहे तुला.’’ मला भावना आवरल्या नाहीत. पपांना घट्ट मिठी मारून मी खूप रडले त्या दिवशी.

पपांना एकच आवडता छंद होता तो म्हणजे वाचन आणि उत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी, हिंदी चित्रपट पाहायचे. नियतीचा खेळ बघा, त्यांनी स्वत:च्या आयुष्यातला अखेरचा चित्रपट पाहिला तो त्यांच्या लाडक्या मुलीचा! ‘सविता दामोदर परांजपे’ ३१ ऑगस्ट २०१८ ला प्रदर्शित झाला. माझ्या कामाचे खूप कौतुक झाले. वृत्तपत्रात समीक्षकांनी ‘तोरडमलांची मुलगी शोभून दिसतेस’ अशा शब्दांत कौतुक केले. सगळ्यांनी खूप शाबासकी दिली, पण हे सगळं पाहायला माझे पपा मात्र हयात नव्हते..

i.trupti@icloud.com

chaturang@expressindia.com