डॉ. किशु पाल

‘‘सुबलदांनी, माझ्या बाबांनी खूप लोकांना जोडलं होतं. अनेक कलाकारांच्या कारकीर्दीत नृत्यदिग्दर्शक म्हणून योगदान दिलं होतं. त्यांनी सुमारे ४५० चित्रपट केले. पण तरी ते नायकासारखे कायम एकटेच पुढे राहिले. त्यांना कोणी साथी मिळाला नाही. ते एकटेच होते लोकांच्या गर्दीत. कदाचित कोणत्याही ध्येय घेऊन चालणाऱ्या व्यक्तीच्या वाटय़ाला हे असं उदात्त एकटेपण कमीअधिक प्रमाणात येतच असावं तसंच. ‘एकला चालो रे’ हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं, ग्लॅमरच्या, झगमगाटाच्या दुनियेत राहूनही ते एखादय़ा साधकासारखे पांढऱ्या पोशाखातच जगले..’’ डॉ. किशु पाल सांगताहेत पिता नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांच्या व्रतस्थ आयुष्याविषयी..

मी किशु पाल. मूळची कृष्णा सुबल सरकार. माझ्या नावातील ‘सुबल सरकार’ या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचं वजन पेलण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला आणि अजूनही करतेच आहे. आज मला बाबांच्या आणि माझ्यामधील भावबंधाचा पट तुमच्यासमोर उलगडायचा आहे. बाबांविषयीच्या माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. मुलगी आणि वडील या नात्यातून आयुष्याकडे पाहायचं आहेच, पण गुरू-शिष्य, कलाकार या नात्यांनीही आम्ही एकमेकांशी कसे बांधले गेलो होतो, तेही मांडायचं आहे..

बाबांचा माझ्या आयुष्यावर असलेला प्रभाव निर्वविाद आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसं माझं आयुष्य त्यांच्याभोवती फिरलं. त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान खरंच सूर्यासारखं. जीवनदायी, प्रकाशमान, प्रेरक पण त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्त्वही सूर्यासारखे प्रखर, डोळे दिपवणारे, क्वचित प्रसंगी भोवळ आणणारेसुद्धा. सुबल सरकार म्हणजे एक मनस्वी कलाकार. नृत्य हा त्यांचा श्वास होता. ते कलाकार म्हणूनच प्रामुख्याने जगले. त्यामुळे सर्वसामान्य जगाच्या मोजपट्टय़ांमध्ये त्यांचं आयुष्य बसवणं अवघड जाणारच. त्यांच्या जन्माचीच कथा बघा किती विलक्षण आहे. बाबांचा जन्म एका संपन्न बंगाली परिवारात झाला. त्यांची आई निस्सीम देवभक्त होती. बाबांचा जन्म झाला तेव्हा हालचाल नसल्याने त्यांना मृत बालक समजण्यात आलं. ‘बाळ दगावलं’ म्हणून सारं घर शोकाकूल झालं. विधी-प्रथेनुसार तयारीही सुरू झाली. त्यांच्या आईने मात्र हार मानली नाही. तिने बाळाला जवळ घेतलं आणि एकाग्रतेने प्रार्थना करू लागली. काही क्षणातच बाळाने टॅहॅ केलं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. मोठं झाल्यावर ही घटना जेव्हा त्यांना कळली तेव्हा त्यांना ती फारच प्रभावित करून गेली. काही तरी वेगळं करण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म मिळाला आहे असाच त्यांनी या घटनेचा अर्थ लावला. आणि तसंच ते कायम जगले.

लहानपणी ‘काही तरी वेगळं’ म्हणजे काय त्यांनाही माहीत नव्हतं. पण त्यासाठी घरातून न सांगता ते पळून आले थेट त्या वेळच्या बोरीबंदर स्टेशनवर. तिथे त्यांनी चिक्की, अगरबत्ती असे जे काही विकता येऊ शकते ते विकून दिवस काढायला सुरुवात केली. कोलकात्याच्या सुखी-ऐश्वर्यशाली आयुष्यावर पाणी सोडून ते मुंबईत आले. स्टेशनवर त्यांच्यातला ‘स्पार्क’ ओळखून कोणी तरी त्यांना दादूंकडे अर्थात सचिन शंकर यांच्याकडे नेलं. तेथे खऱ्या अर्थाने बाबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी मुलाप्रमाणे दादूंची सेवा केली, नृत्याची तालीम घेतली आणि चित्रपटसृष्टीच्या नृत्य दिग्दर्शनात एक सुवर्णयुग निर्माण केलं. विशेषत: लावणी या नृत्यप्रकारावर बाबांचं प्रभुत्व होतं. तमाशापट त्यांच्या नृत्याने गाजले. बाबांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी सुमारे ४५० चित्रपट नृत्यदिग्दर्शित केले. ज्यात हिंदी, गुजराती, बंगाली, भोजपुरी ओरिया चित्रपटांचाही समावेश आहे. अनेक पुरस्कार मिळाले. मात्र मराठी चित्रपटांच्या प्रेमापोटी अनेक हिंदी चित्रपट त्यांनी सोडले. हिंदी चित्रपसृष्टीचा एक मोठा कालखंड गाजवलेले दोन थोर नृत्यदिग्दर्शक भाऊ होते. हिरालाल मास्टरजी आणि सोहनलाल मास्टरजी. हिरालालजी यांची स्टाईल तकड-भडक – उदा. त्याचं शम्मी कपूरचं ‘आऽ आऽ आजा’ हे गाणं तर सोहनलालजींची स्टाईल संयत- म्हणजे ‘होठों पे ऐसी बात!’ या गाण्यासारखी. या सोहनलाल मास्टरजींचे दोन लाडके साहाय्यक नृत्य दिग्दर्शक  म्हणजे सरोज खान आणि सुबल सरकार. या दोघांनी एकत्र अनेक हिंदी चित्रपट केले. आमच्या परळच्या घरी त्यांचं नेहमीच येणं जाणं असे. इतकंच नाही तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि तंत्रज्ञ मंडळींचा अड्डा म्हणजे आमचं परळचं घर असे. सगळ्यांचं हक्कानं आदरतिथ्य होई तिथे, कर्ज काढून काढून अगदी! या काळात यशाची अनेक शिखरं त्यांनी पादाक्रांत केली, पण त्यांना व्यवहार फारसा जमला नसावा. त्यांची वृत्ती काहीशी संन्यस्त होती. त्यामुळे आर्थिक आघाडीवर ते कायम पिछाडीवरच होते. मात्र त्यांचा स्वभाव निर्मोही होता. म्हणून तर त्यांनी स्वत:ची परिस्थिती बेताची असताना गावची सर्व मालमत्ता आपल्या भावंडांच्या नावे करून दिली.

खरं तर प्रत्येक मुलीसाठी आपले बाबा हा पहिला आदर्श असतो. माझ्या बाबतीतही ते वेगळे नाहीच. पण सामान्यत: मुलांना त्यांचे वडील जेवढे लाभतात तितके दुर्दैवाने मला नाही मिळाले. मी आठ वर्षांची होईपर्यंत तर आईचा पदर धरूनच जग पाहत होते. अचानक आई गेली. त्यांच्या आणि माझ्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. त्यांनी मग स्वत:ला कामात अधिकच झोकून दिलं, पण कदाचित माझ्या काळजीपोटीच त्यांनी दुसरं लग्न केलं, तेही माझ्या मावशीबरोबरच. आर्थिक अडचणी, वैयक्तिक दु:ख, लहान मूल.. फारच नाजूक परिस्थिती होती तेव्हा त्यांची. ते त्या काळात कामानिमित्त घराबाहेरच असायचे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, ‘‘मी माझ्या मुलीला झोपेतच मोठं झालेलं पाहिलंय.’’ खरंच होतं ते. मी जागी असताना बाबांचा आणि माझा संबंध फारच तुरळक येत असे, पण त्यातही अनेक प्रसंग माझ्या मनावर कोरले गेले ते कायमचेच!

असाच एक प्रसंग मला अजूनही आठवतो. एका रात्री मी गाढ झोपेत होते. कसलीशी चाहूल लागली आणि मी डोळे किलकिले करून पाहिले तर माझ्यासमोर पूर्ण काळ्या कोट-पॅण्टमध्ये एक अतिशय रुबाबदार व्यक्ती उभी होती. थोडं नीट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, हे तर बाबा! एखाद्या फिल्मस्टारसारखेच दिसत होते ते. (मोठी झाल्यावर कळलं की बाबांनी अनेक चित्रपटांत जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या डमीचं काम केलं आहे.) पण हा एक प्रसंग वगळता मी बाबांना पाहिलं ते कायमच पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट याच वेशात. आता वाटतं, ग्लॅमरच्या, झगमगाटाच्या दुनियेत राहूनही ते एखाद्या व्रतस्थ साधकासारखे पांढऱ्या पोशाखातच जगले.

बाबा स्मार्ट होते, डॅशिंग होते, त्यांचा आत्मविश्वास कमालीचा होता. त्यांची प्रत्येक गोष्ट पराकोटीची असायची, रागही आणि प्रेमही. मला आठवतंय, एकदा मला शाळेच्या कार्यक्रमासाठी एक नवीन ड्रेस हवा होता. दिवसभराच्या कामांच्या गर्दीतही ते ही गोष्ट विसरले नाहीत. ते नवीन ड्रेस घ्यायला दादरला पोहोचले, मात्र तोपर्यंत इतकी रात्र झाली होती की दुकान बंद झालं होतं. काहीही झालं तरी मुलीला ड्रेस घेतल्याशिवाय घरी जायचं नाही या निश्चयाने त्यांनी ती संपूर्ण रात्र त्या दुकानाच्या पायऱ्यांवर काढली. सकाळी दुकान उघडलं तेव्हा माझ्यासाठी ड्रेस घेऊनच घरी आले. असं पराकोटीचं प्रेम होतं बाबांचं, पण रागही तसाच. मी सातवीत असतानाचा किस्सा. बाबा घरात कोणत्या तरी गाण्याच्या स्टेप्सचा विचार करीत बसले होते. समोर मी दिसले. त्यांना काय सुचलं माहीत नाही. म्हणाले, ‘‘इथे ये. मी गाणं लावतो. तू नाच.’’ मला आयत्या वेळेस काय नाचावं ते सुचेना. मी एका जागी खिळून उभी राहिले. त्यांनी पुन्हा सांगितलं, ‘‘डान्स कर म्हटलं ना!’’ त्यांच्या आवाजातली जरब वाढली तसं माझं थरथरणंही वाढलं. त्यांनी गाणं बंद केलं आणि म्हणाले, ‘‘मी पुन्हा टेपरेकॉर्डर ऑन करणार आहे. म्युझिक सुरू झाले की तू गिरक्या घ्यायला सुरुवात करायचीस.’’ त्यांचे हे शब्द इतके थेट होते की एखाद्या खेळण्याला चावी द्यावी तशी मी गिरक्या घेत राहिले. मी किती वेळ गिरक्या घेत होते कुणास ठाऊक? पण गिरक्या घेत-घेतच बेशुद्ध होऊन खाली कोसळले. शुद्ध आली ती थेट हॉस्पिटलमध्ये. बाबा तेव्हा हळव्या स्वरात कोणाला तरी सांगत होते, ‘‘तिने सांगितल्याबरोबर माझं ऐकलं नाही, माझा पारा चढला. मी तिला गिरक्या घ्यायला सांगितल्या आणि रागाच्या भरात तिला थांब म्हणायचं राहून गेलं.’’

गंमत बघा, पुढे याच प्रसंगातून एक आगळीवेगळी संकल्पना जन्माला आली. माझ्या नृत्यसंस्थेत ‘नृत्यालिका’मध्ये आम्ही याला ‘फ्रेंडशिप डान्स’ म्हणतो. यात आम्ही कोणतंही गाणं वा संगीत लावतो आणि आयत्या वेळी कोणत्याही तालमीशिवाय, एखाद्या विद्यार्थ्यांला वा गुरूलाही नृत्य करायला सांगतो. त्या संगीताशी मनाची सलगी होते आणि कलाकाराच्या उत्स्फूर्त नृत्याविष्कारात आमचा संपूर्ण क्लास रंगून जातो. बाबांनी त्या वेळी रागाच्या भरात अतिरेक केला असेल किंवा त्यांच्या सांगण्याचा नेमका अर्थ मला त्या वेळी न कळल्यामुळे मी त्याची शिक्षा भोगली असेल, पण या प्रकारच्या नृत्यातून मिळणाऱ्या आनंदाची प्रचीती आता मला येते आहे. ती मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुक्तहस्ताने वाटते आहे.

बाबा अतिशय शिस्तप्रिय होते. त्यांना प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागीच लागायची. सकाळी उठल्यावर आंघोळीचा टॉवेल, कपडे, तेल, कंगवा, रुमाल इथपासून ते दारातल्या बुटापर्यंत प्रत्येक गोष्ट जागच्या जागी. थोडं विनोदी अंगाने पाहिलं तर मला वाटतं, त्या वस्तूही त्यांच्या धाकामुळे ठरलेली जागा सोडत नसाव्यात. खरं तर ते नेहमीच वस्तू जागच्या जागी ठेवत. रात्री कितीही उशिरा आले तरी वस्तू नीट ठेवल्याशिवाय ते अंथरुणाला पाठच टेकणार नाहीत. बाबांकडून मी किती तरी गोष्टी शिकले. खरं तर त्यांचं-माझं नातं थोडं गुंतागुंतीचं होतं. त्यांना आपल्याला मुलगा व्हावा असं वाटत होतं. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात ते माझ्यापासून थोडे अलिप्त होते. पण पुढे मला पूर्णत: स्वीकारलं. त्यामुळे मला स्वावलंबी बनवण्यावर त्यांनी नेहमीच खूप भर दिला. माझं दहावीचं वर्ष या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरलं. दहावीची परीक्षा झाली. बाबांनी मला बॅग भरायला मदत केली आणि घेऊन गेले स्टेशनवर. थेट गाडीतच बसवलं. ‘सेवन डाऊन कलकत्ता मेल’ या गाडीने मुंबई ते कलकत्ता असा चार दिवसांचा प्रवास मी एकटीने केला. अर्थातच, कलकत्त्यात स्टेशनवर मला घ्यायला मोठे काका आले होते. त्या वेळी बाबांचा राग आलाच, पण परतताना माझ्यात जागा झालेला आत्मविश्वास मलाच सुखावत होता. आता विचार केल्यावर वाटतं, की संपर्काची साधनं नसणाऱ्या त्या काळात पालक म्हणून बाबांना किती टेन्शन आलं असेल? पण आईविना मुलीला कोणत्याही प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी असावी या भावनेनेच त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं असेल. किंबहुना, आपल्या तालमीत जगाच्या मदानात शड्ड ठोकून उभं रहायला आपला हा पठ्ठय़ा तयार झालाय, याची त्यांना खात्री झाली असेल. त्याची चाचणी म्हणजेच तो प्रवास होता. त्या प्रवासात मी एकटी नव्हते, बाबांनी नकळतपणे माझ्यात रुजवलेलं धाडस, शिस्त आणि प्रसंगावधानाचं पाठबळ माझ्याबरोबर होतं आणि त्यांनी दिलेली भक्कम शिकवण मला आयुष्यभर पुरते आहे. त्या प्रवासाने मला आयुष्याच्या खडतर प्रवासासाठी तयार केलं.

याच विचाराने त्यांनी मला दहावीनंतर आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हायला सांगितलं. आधी तर त्यावर माझा विश्वासच बसेना, की मी कसे पैसे कमावणार होते? पण मग नृत्याचा उपयोग करून काही करता येईल का? हा विचार आला. तेव्हा ‘डान्स क्लास’ ही संकल्पनाच फारशी अस्तित्वात नव्हती. नृत्य शिकायचं तर गुरूकडे गुरुकुल पद्धतीने अशीच कल्पना होती. शास्त्रीय नृत्याविषयी समाजात विशेष जागरूकताही नव्हती. पण मी त्या वयात वर्ग घ्यायला सुरुवात केली, कारण बाबांचा आर्थिक स्वावलंबनाचा आग्रह. आज ‘नृत्यालिका’ या माझ्या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिकताहेत, यामागे कुठे तरी बाबांचा आशीर्वाद आहे, हे नक्की!

बाबा तसे भावना शब्दांत व्यक्त करणाऱ्यांपैकी नव्हते. मला तर त्यांचा दराराच अधिक जाणवायचा. त्यांनी बोलायला सुरुवात केली की आपण नजर खाली झुकवून उभं राहायचं हे आणि एवढंच माहीत होतं. चित्रपटाच्या बाबतीतली एक गम्मत सांगाविशी वाटतेय, बाबा अत्यंत म्हणजे कमालीचे कडक असायचे शुटिंगच्यावेळी. त्यांचा धाक इतका असायचा की काही कलाकार, मुख्यत: स्त्री-कलाकार सेटवर रडायच्या. मात्र त्याच पुढे नामांकित कलाकार झाल्या, त्यामुळे बाबांचं ओरडणं हे त्या वेळी ‘लक फॅक्टर’ झालं होतं. गुरू म्हणून ते मोठे होतेच, पण कलावंत म्हणूनही मोठे होते. एक  प्रसंग सांगते, मी एका नाटिकेचं नृत्यदिग्दर्शन करत होते आणि बाबा त्या नाटिकेत नृत्य करत होते. बाबांना स्टेप्स शिकवायच्या, या विचारानेच मला दडपण आलं होतं. माझ्या स्टेप्स त्यांना आवडतील का? नाही आवडल्या तर काय म्हणतील ते? सर्वासमोर माझ्यावर भडकले तर? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. पण घडलं भलतंच. बाबा तालमीला आले आणि सर्व कलावंतांच्या समोर सर्वात आधी माझ्या पाया पडले. मी भांबावूनच गेले, तर शांतपणे त्यांनी सांगितलं, ‘‘आज मी येथे नृत्य-कलाकार म्हणून आलो आहे. तू माझी ‘गुरू’ आहेस म्हणून तुझा मान मी तुला दिला.’’ कलावंतांची त्यांनी नेहमीच अशी कदर केली.

असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो. एका शासकीय फिल्मचं काम बाबा करत होते. ती स्त्री-केंद्रित नृत्य-नाटिका होती. मी मुख्य भूमिका करत होते. एक टेक झाला आणि अचानक बाबांनी जवळ घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. डोळे पाणावलेले होते. मला जवळ घेऊन म्हणाले, ‘‘इतके सुंदर एक्स्प्रेशन्स द्यायला कुठून शिकलीस गं? आय अ‍ॅम व्हेरी प्राऊड ऑफ यू!’’ हा क्षण माझ्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. यापेक्षा मोठय़ा पुरस्काराची मी कल्पनाच करू शकत नाही. अशीच त्यांची आणखी एक प्रतिक्रिया मी हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात जपून ठेवली आहे. मी कथ्थक, कुचिपुडी, उडीसी अशा विविध शास्त्रीय नृत्याशैलींचा संगम साधत ‘ऊर्जा’ नावाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली. नेहरू सेंटर येथे झालेला ‘ऊर्जा’चा प्रयोग रसिकांसह नृत्य क्षेत्रातील दिग्गजांनी उचलून धरला. कार्यक्रम झाल्यावर मी बाबांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या समोर गेले. एखाद्या लहान मुलासारखे ते नुसते रडत होते. त्यांच्या आसवांच्या आनंदसरीत मी अक्षरश: न्हाऊन निघाले.

मला नेहमी वाटायचं, की बाबा कायम ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरले. उलट मी नृत्याच्याच क्षेत्रात असले तरी माझं क्षेत्र तसं वलयांकित नाही. बाबांच्या बरोबरची मंडळी काय म्हणत असतील, ‘सुबलदांची मुलगी, फिल्म इंडस्ट्रीत यायचं सोडून काय नुसते क्लासेस घेत बसते?’ पण त्या क्षणी बाबांच्या डोळ्यात मी जो अभिमान आणि माझ्या कलेविषयी आदर पाहिला. माझ्या मनातील ते फिल्मी वेड पार दूर झालं.

बाबांसोबत ‘दूरदर्शन’चे अनेक कार्यक्रम मला करता आले. मी तर म्हणेन एरवी दुर्मीळ असणारा बाबांचा सहवास मला त्यामुळे अधिक मिळाला. बाबांसोबत अनेक कार्यक्रम मी केले. एका ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमाला तर बाबांसोबत डय़ुएट सादर करण्याची संधी मिळाली. ‘द सुबल सरकार’ या माझ्या आदर्श व्यक्तीसोबत नृत्य करणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती.

असाच एक मोठा आनंद ‘दूरदर्शन’च्या ‘दम दमा दम’ या कार्यक्रमाने दिला. यात बाबांसोबत परीक्षक म्हणून एकत्र बसण्याची संधी मला मिळाली. ते करताना त्यांचे ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ूज’ आणि बारकाईने असलेलं लक्ष मला अगदी जवळून अनुभवता आलं. बाबांनी मला नृत्य तर शिकवलंच, पण त्याहीपेक्षा अधिक त्यांनी मला जगायला शिकवलं. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांशी झगडायला शिकवलं. त्या तुफान वेगाने घोंगावणाऱ्या वादळातून जन्माला आलेला मी लहानसा कण. पण आज मी जे काही अस्तित्व कमावलं त्याला कारण बाबाच आहेत.

या उत्फुल्ल वादळाचं थकणं बघणं मात्र फार वेदनादायी होतं. वयाबरोबर बाबा थकू लागले. नृत्य दिग्दर्शित करताना ते स्टेप्स विसरू लागले. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. मी आणि माझा मुलगा कार्तिक सतत त्यांच्याबरोबर असायचो. एका कलावंताचं त्याच्या कलेपासून दूर जाणं म्हणजे जिवंतपणी मरण. मला आजही तो प्रसंग आठवतो. बाबा गेले त्याआधी काहीच दिवसांपूर्वीची घटना. ते मरणशय्येवर होते. एका रात्री मी त्यांच्या उशाशीच बसून होते. ते ग्लानीत होते. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवर वास्तव आणि कल्पना यांचा काही तरी वेगळाच संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला होता. दोन परिचारिका त्यांची तपासणी करण्यासाठी आल्या. बाबांना कळावं म्हणून मी पुढे झुकले आणि त्यांच्या हातावर हात ठेवला. त्यांनी डोळे उघडले. आजूबाजूला पाहिलं. मला म्हणाले, ‘‘तिला अजून थोडं राईटला घे.’’ क्षणभर मला कळलं नाही. मग लक्षात आलं की, त्या परिचारिकेला ते त्यांच्या ग्रुपमधली एक डान्सर समजले होते. ग्लानीतही ते नृत्यातच मग्न होते. मला भडभडून आलं. नृत्य हाच त्यांचा ध्यास, त्यांचा श्वास. त्यांचं आयुष्य रंगमंचाशीच बांधलं गेलं होतं. एका कलावंताचं जिणं व्यवहाराच्या चौकटीत सामावून जाणं नेहमीच संघर्षांचं असतं. त्यांनीही तो संघर्ष आयुष्यभर केला पण कलेवरची निष्ठा ढळू दिली नाही.

आयुष्यातील या संघर्षांमुळेच कदाचित त्यांनी मला फिल्मी दुनियेकडे वळू दिलं नाही, पण आयुष्याशी झगडा करण्याचा कणखरपणा मला दिला. त्यांचं माझं बाप-लेकीचं नातं सर्वसामान्यांपेक्षा वेगळं होतं. पण मला आनंद आहे, की त्यांनी मला त्यांच्या सावलीत नाही वाढवलं. उलट वेळप्रसंगी उन्हाचे चटके झेलायला लावले, ते सूर्यासारखेच होते. सूर्य जसा चंद्राला तेज देतो. चंद्राला वाटतो आत्मविश्वास, की आपण झळकतो आहोत स्वयंप्रभेने. पाहणाऱ्यालाही तसंच वाटतं. सूर्य मात्र चंद्राला तेजाचं दान देतो. बाबा माणूस म्हणून खूप साधेपणाने जगले. त्यांनी कधी अन्नाला वाईट म्हटलेलं आम्ही ऐकलं नाही. जे पानात वाढलं जाईल ते ‘मस्त’ म्हणून ते ग्रहण करायचं. पांढऱ्या रंगाचा पोशाख तर त्यांचा ट्रेडमार्क होता. स्वच्छता-टापटीप यांची आवड इतकी, की सहज हातात झाडू घेऊन अख्खी चाळ लख्ख करायचे. त्यांच्यासाठी कोणी काही केलं, तर ते कधीच विसरले नाहीत. अदब आणि कृतज्ञता हे त्यांचे अंगभूत गुण होते. समाजाविषयी, लोकांविषयी, उपजत ममता त्यांच्याकडे होती. शाहीर अमर शेख यांच्याबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. ते कार्य करताना ते एखाद्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेने वागले. आपल्याच तत्त्वांशी आणि कलेशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. व्ही.टी. स्टेशनवर एकटय़ाने सुरू केलेला प्रवास त्यांना ‘सुबल सरकार’ बनवून गेला. म्हणतात ना, ‘अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गये और कारवाँ बनता गया.’

माणसांचा फार मोठा वर्ग त्यांनी जोडला. एवढे चित्रपट केले. इतक्या कलाकारांच्या कारकीर्दीत नृत्यदिग्दर्शक म्हणून योगदान दिलं. पण खरं सांगू, तरी ते नायकासारखे कायम पुढे राहिले. त्यांना तसा कोणी साथी मिळाला नाही. ते एकटेच होते लोकांच्या गर्दीत असूनही. माझी आई, सुचित्रा सरकार हिची साथ त्यांना फार थोडा काळ लाभली. ती फारच विलक्षण होती. त्या काळातील कोटा युनिव्हर्सिटीची टॉपर, उत्तम नृत्यांगना, चित्रकार, कवयित्री, समाजसेविका. तिनेच बाबांना नृत्य शिकवलंही होतं. बाबांनी ‘नृत्य दिग्दर्शक’ व्हावं हे तिचंच स्वप्न होतं.  बाळंतपणात ती अचानक गेली. तेव्हा आम्ही राहायचो त्या नालासोपारा परिसरात लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. ती गेली आणि बाबा एकटेच पुढे जात राहिले. कदाचित कोणत्याही ध्येय घेऊन चालणाऱ्या व्यक्तीच्या वाटय़ाला हे असं उदात्त एकटेपण कमी-अधिक प्रमाणात येतच असावं. ते क्वचितच गायचे पण फार सुंदर गायचे. ते रंगात येऊन त्यांचं लाडकं  गाणं गुणगुणायचे. ‘एकला चालो रे..’ मला वाटतं ते त्यांच्या आयुष्याचंच गीत होतं व ब्रीदही.

शब्दांकन : डॉ. समिरा गुजर

drkishupal@gmail.com

chaturang@expressindia.com