मला वाटले, विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत उभे आहे. अर्धा तास झाला, एक तास झाला विमान हलेचना. प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. तितक्यात घोषणा झाली, न्यूयॉर्कमध्ये बर्फाचे वादळ अचानक उद्भवल्याने तेथील विमानतळ बंद आहे व न्यूयॉर्कला जाणारी सर्व विमाने रद्द झाली आहेत. परत बॅगा घेतल्या. पुन्हा जावयांकडे..
बघता बघता अमेरिकेतला सहा महिन्यांचा कालावधी केव्हा संपला हे समजलेच नाही. नातवाचे कौतुक व संगोपन करता करता निघायचा दिवस, ती सकाळ आलीसुद्धा. भारतात परतण्याचे वेध लागले. जावयाची व मुलीची धावपळ गेले दोन दिवस चालू होती. बॅगा पुन:पुन्हा भरणे, वजन करणे यातच सकाळचे नऊ वाजून गेले. दीड वाजताचे विमान होते. मात्र विमानतळ जवळ असल्याने घाई नव्हती. जावई ,मुलगी, विहीणबाई, नातू सर्वच जण विमानतळावर आम्हास निरोप देण्यास आले होते. बाराच्या सुमारास बोìडग पास घेऊन बॅगा चेक इन करूनही तासाभराचा अवधी होता. बोìडग गेट जवळच असल्याने, गेटला लागून असलेल्या हॉटेलमध्ये जेवायचे ठरले. विमानांच्या संदर्भातील घोषणा इथे ऐकू येत असल्याने व शेजारीच गेट असल्याने पाच मिनिटे आधी गेलो तरी चालेल असे जावयाचे व मुलीचे म्हणणे. यामुळे समारोपाचे जेवण अगदी व्यवस्थित पार पडले. विमान सुटायला अजूनही २० मिनिटांचा अवधी असल्याने आम्ही बोìडग गेटकडे गेलो व बाकी सर्व पाìकगकडे. सेक्युरिटी चेक होऊनसुद्धा १५ मिनिटे अगोदर आल्याने आम्ही बिनधास्त होतो.
परंतु बोìडग गेटवर आम्हास प्रवेश नाकारण्यात आला व सांगण्यात आले की आमची न्यूयॉर्कची तिकिटे दुसऱ्यांना देण्यात आली आहेत. नियमाप्रमाणे ४५ मिनिटे अगोदर रिपोर्ट न केल्याने प्रवेश नाकारण्यात आला. क्षणभर आम्हाला काही सुचेचना. ‘आम्ही बॅगा चेक इन केल्या आहेत, बोìडग पास आहे, सीट नंबर आहेत, न्यूयॉर्कहून मुंबईसाठी कनेक्टेड विमान आहे’ असे वारंवार सांगूनही गेटवरचा कर्मचारी वर्ग काही ऐकून घेईना. या सर्व वादात आमच्यासमोरच आमचे विमान गेलेले दिसले. काय करावे तेच समजेना. जवळ इंटरनॅशनल फोन नसल्याने जावई-मुलीशी संपर्कही करता येत नव्हता. समोरच्या स्टाफशी भांडणे हाच एक पर्याय उरला होता. परत परत तेच तेच बोलत राहिलो.  स्टाफमधल्या एकीने स्वत:जवळच्या मोबाइलवरून आमच्या जावयाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, उत्तर मिळत नव्हते. न्यूयॉर्कचे पुढचे तिकीटही एक आठवडा मिळणार नव्हते. आमच्या नावाची घोषणा का नाही केली, हाच प्रश्न आम्ही वारंवार विचारीत राहिलो.
शेवटी समोर दोन कर्मचारी आणि आम्ही दोघेच उरलो. खूप वेळानंतर आम्हास दुसऱ्या दिवशीचे तिकीट देण्यात आले. जावयाशी-लेकीशी संपर्क होत नव्हता. आता जायचे कोठे? परदेशीवारी असल्याने जास्तीची रजा मंजूर होणार नव्हती, त्यामुळे नोकरी करणाऱ्या माझ्या बायकोला वेळेत पोहोचायची घाई होती. ‘आता आम्ही कुठे जाऊ?’ असे त्या स्टाफला सारखे विचारत राहिलो. बोर्डिगच्या वेळी आमचे नाव घेतले नव्हते ही चूक त्यांच्या लक्षात आली होती. स्टाफने त्यांच्या ऑफिसशी संपर्क साधला. आम्ही हॉटेलमध्ये जाण्याचे नाकारले व परत मुलीकडे जायचे ठरवले. पण संपर्कच होत नव्हता. जवळजवळ दोन तास हे सर्व सुरू होते. आम्ही आमची तीच तीच बाजू परत परत मांडत राहिलो. थोडय़ाच वेळात काऊंटरवरच्या बाई आमच्याकडे आल्या व त्यांनी आम्हाला नुकसानभरपाईचा चेक देण्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशीचा बोìडग पास-तिकीट जवळ असल्याने मला थोडा जोरच चढला. चेक कितीचा आहे हे न पाहताच मी तो नाकारला. माझे अमेरिकेत बँक खाते नसल्यामुळे व दुसऱ्या दिवशीच भारतात परतायचे असल्याने मी रोख रकमेची मागणी केली. त्या बाईंनी परत त्यांच्या ऑफिसशी संपर्क साधला व दहा मिनिटांतच १३०० डॉलरचे दोन डिमांड ड्राफ्ट सहीनिशी आमच्या नावे तयार करून दिले. विश्वासच बसेना. कोठेही न जाता, आम्हास कोठेही न पाठवता, बसल्या जागी २६०० डॉलर्सची (जवळजवळ सव्वा लाख रुपये)नुकसानभरपाई दिली. डिमांड ड्राफ्ट आमच्या नावे, परत खिशात भारतात जाण्याची तिकिटे बोनस म्हणून, काहीच समजेना. वर परत रोख चलनात भरपाई देता न आल्याने ती कर्मचारी स्त्री माफी मागत होती. टिपिकल भारतीयाप्रमाणे मनात शंका आलीच व तिला विचारले की डिमांड ड्राफ्टवर सही करण्याचा अधिकार तुला आहे काय? तिने हसून सांगितले, मला तसे अधिकार फोनवरच मिळाले आहेत व न सांगताच तिने परत जावयाशी संपर्क साधला. जावयांना वाटले आम्ही सुखरूप न्यूयॉर्कला पोहोचलो. मात्र आम्ही अजूनही लुइव्हिले विमानतळावरच असून आम्हाला विमानात चढून दिले नाही हे कळले, तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. त्या बाईला वाटले की, जावई आम्हाला घरी घेऊन जाण्यास तयार नाहीत, तिला आमची खूप दया आली, तिने थेट माझ्या हातून फोन घेतला व जावयांना सर्व हकीकत समजावून सांगितली.
  थोडय़ा वेळाने जावई आले. त्यांनी तिकीट व ड्राफ्ट पाहिला. घरी येताना विमानात ठेवलेल्या बॅगा नेण्यास आम्ही विसरलो नाही. जावई म्हणाले, ‘पपा, आम्ही तेथे नव्हतो हेच बरोबर झाले, तुम्ही नीट वादावादी केलीत व जास्तीत जास्त वसुली केलीत, परंतु आता डिमांड ड्राफ्टचे पैसे ताब्यात घेऊ आणि मगच घरी जाऊ. कारण याच डिमांड ड्राफ्टचे पसे भारतात खूपच उशिरा मिळतील.’ मग तिथेच बँकेत जायचे ठरले. रात्रीचे ८ वाजलेले, ड्राफ्ट माझ्या नावावर, अमेरिकेत माझे खाते नाही, दुसऱ्याच दिवशी भारतात परतावयाचे ही सर्व स्थिती बँकेतील स्टाफला सांगितली. पंधरा मिनिटांत रोख डॉलर मिळाले केवळ एका माझ्या पासपोर्टवर. मात्र रोखीचा व्यवहार तिथे कमी असल्याने त्यांना मुख्य तिजोरी उघडून पसे द्यावे लागले. रात्रीच्या वेळी, एका परदेशी माणसाला, इतक्या झटपट सेवा मिळाली हे अनुभवतानाच भारतात आपण सेवा कशी देतो, कशी घेतो व अनुभवतो याची तीव्रतेने आठवण आली व भरुन आले.
सर्व जण घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी परत जायचे असल्याने बॅगा गाडीतच ठेवल्या. विमान चुकल्याची खंत कोणालाच नव्हती. कारण अमेरिकेचा प्रवास पूर्णपणे फुकटात पडून वर दक्षिणा मिळाली होती. पुन्हा गैरसोय नको म्हणून जावयांनी एक स्थानिक मोबाइलही नवीन विकत घेऊन दिला.
दुसऱ्या दिवशी विमानतळावर हजर झालो. बोìडग गेटवर कालच्याच बाई होत्या. त्यांनी हसून आमचे स्वागत केले. विमानात प्रवेश मिळाला, विमानाची दारे बंद झाली, विमान सुरू झाले. नवीन मोबाइलवरून जावयांना फोन केला व घरी जाण्यास सांगितले. विमान धावपट्टीवर जाऊ लागले, सिटबेल्ट लावून शांतपणे डोळे मिटले. छान वाटले. नंतर हळूहळू विमान थांबले. मला वाटले, विमान आता उड्डाणाच्या प्रतीक्षेत उभे राहिले. अर्धा तास झाला, एक तास झाला विमान हलेचना. प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. तितक्यात घोषणा झाली, न्यूयॉर्कमध्ये बर्फाचे वादळ अचानक उद्भवल्याने तेथील विमानतळ बंद आहे व न्यूयॉर्कला जाणारी सर्व विमाने रद्द झाली आहेत. परत बॅगा घेतल्या. तुफान गर्दी झाली होती. जवळजवळ ३० विमाने रद्द झाल्याने काऊंटरवर तिकिटासाठी झुंबड उडाली होती. मी जवळील फोनवरून जावयांना कळविले. तोपर्यंत त्यांनाही टीव्हीवरील बातम्यांमुळे ही खबर मिळालीच होती. तासाभरात जावई दुसऱ्या दिवशीचे मुंबईसाठीचे तिकीट व्हाया जर्मनी घेऊनच आले. अमेरिकेत २ तास व जर्मनी मध्ये ५ तास हॉल्ट, मग मुंबई, असे तिकीट घेण्यावाचून गत्यंतर नव्हते.
परत रात्री घरी आलो. दोन वेळा निरोपाचे दही घेऊनही आम्ही जाऊ शकत नाही हे पाहून उगीचच अपराधीपणा वाटत होता, समोर उभ्या असलेल्या विहीणबाईंना पण काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजेना. मनात ठरवून टाकले, उद्या परत विमान रद्द झाले तर विमानतळावरच मुक्काम करावयाचा, कोणाला कळवायचेही नाही. परत रविवारी सकाळी तयार झालो, या खेपेस बरोबर येण्यास कोणी इच्छुक नव्हते. जावई एकटेच आले. त्यांना यावेच लागले. चहा-कॉफी काहीही न घेता सरळ बोìडग गेटमधून विमानात जाऊन बसलो. स्टाफ तोच असल्याने परत उत्साहात स्वागत झाले व आज विमान नक्की सुटेल यासाठी शुभेच्छा मिळाल्या. विमान सुरू झाले, तरी जावई जाण्यास तयार नव्हते, म्हणाले, ‘‘पपा, विमान हवेत उडू दे, मगच जातो.’’ विमान ट्रॅकवर धावू लागले. जावयांना परत फोन केला, परंतु ते विमान उडण्याची वाट पाहत असतील असे वाटले. मोबाइलचे सिग्नल बंद झाले. मनातल्या मनात मीच त्यांना घरच्या परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. स्वस्थपणे मान टाकून सौभाग्यवतीकडे पहिले, ती काळजीत दिसली. तिला वेध लागले होते ते वाढीव रजेच्या परवानगीबाबतचे आणि मी मात्र आतुरतेने वाट पाहत होतो मुंबईची. जवळजवळ ९० तास ताणलेला प्रवास संपण्याची!