मंगला जोगळेकर

आपला इवलासा मेंदू क्षणाक्षणाला, अविरत आणि न थकता कसं काम करतो, याविषयी जाणून घेतलं तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहाणार नाही. हजारो ‘सुपर कॉम्प्युटर्स’नाही कदाचित जमणार नाही, इतकं व्यापक आणि गुंतागुंतीचं काम मेंदू करत असतो. असं असूनही मेंदूच्या खऱ्या ताकदीची आपल्याला अद्याप कल्पनाच नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जगभर अनेक वर्षांपासून चाललेल्या संशोधनांमधूनही मेंदूच्या कामाबद्दल संपूर्ण माहिती हाती लागू शकलेली नाही. अशा अद्वितीय मेंदूची ही थोडक्यात ओळख .

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

मेंदूबद्दल तसं पाहिलं तर आपल्याला फारशी माहिती नसते. मेंदू अगदी नाजूक असून तो कवटीत बंदिस्त असतो आणि त्याच्यावर किती सुरकुत्या आहेत यावर आपली बुद्धिमत्ता अवलंबून असते, यापलीकडे मेंदूची ओळख व्हावी म्हणून आपण कधी रसही घेतलेला नसतो. म्हणूनच आज निसर्गाच्या या अद्भुत देणगीची ओळख करून घेणार आहोत.

मेंदू आपल्यासाठी क्षणाक्षणाला काय करत असतो याची झलक बघण्यासाठी आपण सकाळी घाईगडबडीत घरचं काम उरकून नोकरीवर जाणाऱ्या एका स्त्रीचं उदाहरण घेऊ या. गॅसवर एका बाजूला चहाचं आधण ठेवण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला दूध तापतंय. दोन्हीकडे लक्ष ठेवून एकीकडे भाजी चिरणं चालू आहे. चहा गाळून, तो तयार आहे म्हणून नवऱ्याला आरोळी ठोकून झाली आहे. एका बाजूला भाजी फोडणीला टाकून, परातीत कणीक काढली आहे.  घडय़ाळाकडे सतत लक्ष आहेच. अजून पाच मिनिटांनी मुलांना उठवायला हवंय. अजून काय करायचं त्याचा आणि ऑफिसला गेल्यावर असलेल्या मीटिंगचे विचार डोक्यात चालू आहेत. पाच-पन्नास कामांचा विचार एकावेळी करून, थोडय़ाशा वेळात अनेक कामं तडफदारीनं पूर्ण करणाऱ्या या स्त्रीचा मेंदू किती कार्यक्षम असेल याचा विचार करा. केवळ सकाळीच नव्हे, तर दिवसभर अगणित कामांचं अवधान ठेवणारा, कुठलंही काम न विसरता वेळच्या वेळी करणारा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून आपला स्वत:चा कर्तृत्वशाली मेंदू आहे.

मेंदूतील अब्जावधी, खरं म्हणजे परार्धावधी पेंशींमध्ये कोरलेल्या आठवणी या आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत. उदाहरणादाखल अशी कल्पना करा, की कित्येक वर्षांत न भेटलेल्या मित्राचा तुम्हाला फोन आला आहे. त्या मित्राचा नुसता आवाज ऐकून क्षणार्धात हा तुमच्या मित्राचा आवाज आहे हे तर समजतंच पण त्याच्याबरोबर केलेली मजा, टिंगलटवाळी, चेष्टामस्करी, एकत्र जागून केलेला अभ्यास, हे सर्व मन:पटलावर उमटतं. नुसत्या श्रावणधारांकडे बघितलं, की आपल्या प्रिय व्यक्तीबरोबरच्या चोरटय़ा भेटी आणि हळवे क्षण जागे होऊन तुमचं अंग मोहरून जातं. तुमच्या मुलांचे बालपणीचे फोटो बघून तान्हं बाळ असताना त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणल्या वेळचा क्षण तुमच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहातो. आईच्या जुन्या साडीवरून हात फिरवताना तिचा प्रेमळ हात तुमच्या पाठीवरून फिरल्याचा भास होऊन तुमच्या डोळ्यांत टचक्न पाणी येतं. तुमच्या जीवनाचा चित्रपट पाहिजे तेव्हा, जसाच्या तसा, आनंदाच्या, सुखाच्या, दु:खाच्या, मानाच्या, अपमानाच्या प्रसंगांसह चितारण्याची किमया फक्त तुमच्या मेंदूनं तुमच्यासाठी जिवापाड जपलेल्या करोडो आठवणींमध्ये आहे, याबद्दल तुमच्या मनात आता काही संभ्रम उरला नसावा.

शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या पेशींचं, उदा. कातडीतील, पोटातील पेशींचं आयुष्य मर्यादित असतं. पहिल्या पेशी गळून त्यांची जागा सातत्यानं नवीन पेशी घेत असतात. परंतु मेंदूमधील पेशी मात्र आठवणी साठवण्याचा वसा निर्धारानं आयुष्याच्या अंतापर्यंत सांभाळतात. आपल्या आठवणींच्या साक्षीदार बनतात. पंचेद्रियांचं, इतर अवयवांचं कार्य चालवतात, आपल्याला अनेक भाषांमध्ये बोलतं करतात, लिहितं करतात, शरीर अहोरात्र कार्यरत ठेवतात, आपल्याला समजण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता देतात, संगीताची मजा लुटू देतात, खेळातील आनंद घ्यायला शिकवतात, आपल्या निवडलेल्या क्षेत्रात निष्णात करतात, जगावर प्रेम करायला शिकवतात,               आई-वडिलांचा आधार बनवतात, मुलांचे खंबीर मातापिता बनवतात. आपलं व्यक्तिमत्त्व घडवतात. भविष्याद्दल विचार करायला लावतात. मेंदू आपल्यासाठी करत असलेल्या अशा शेकडो गोष्टींबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे. त्याबद्दल तुमच्या मनात जितकी जिज्ञासा वाढत जाईल तितके तुम्ही आदरानं त्याच्यापुढे नतमस्तक होत जाल. मेंदूच्या खऱ्या ताकदीची आपल्याला कल्पनाच नाही, असंही कित्येक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हजारो ‘सुपर कॉम्प्युटर’ एकत्र केले तरीही एक मेंदू करतो तेवढं कार्य करणं त्यांना जमणार नाही, इतकं मेंदूचं कार्य अवाढव्य, गुंतागुंतीचं आणि म्हणूनच अचंबित करणारं आहे. वर्षांनुवर्ष संपूर्ण जगभर चाललेल्या संशोधनांमधून मेंदूच्या कामाबद्दल फक्त वरवरची माहिती आपल्याकडे आहे याबद्दल तुम्हाला आता आश्चर्य वाटायला नको.

मेंदू म्हणजे मोठी फॅक्टरीच

अनेक वर्षांच्या संशोधनातून मेंदूचा कुठला भाग प्रामुख्यानं काय आणि कसं काम करतो, हे आता शास्त्रज्ञांना बरंचसं ठाऊक झालं आहे. त्यावरून मेंदूचं काम एका अजस्र फॅक्टरीसारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं फॅक्टरीमध्ये स्वतंत्र विभाग असतात तसेच मेंदूमध्येही असतात. परंतु मेंदूचं कार्य अव्याहतपणे सुसंघटित चालू राहाण्यासाठी हे भाग एकाच वेळी स्वतंत्रपणे तसंच एकत्रितपणेही काम करत असतात.

विद्युतवेगाचं संदेशवहन

मेंदूचं कार्य हे त्याच्या पेशींमधील संदेशांच्या देवाणघेवाणीमुळे घडतं. एखादं वाक्य बोलण्याची इच्छा होणं, खावं-प्यावंसं वाटणं अशा इच्छांचा, विचारांचा उगम कुठल्या तरी एका पेशीमध्ये किंवा पेंशींच्या पुंजक्यामध्ये होतो. त्यानंतर हा विचार विजेच्या झटक्याच्या सहाय्यानं आणि विजेच्याच वेगानं इतर पेशींमध्ये पोहोचवला जातो. या देवाणघेवाणीतून विचाराचं कृतीत रूपांतर होतं. उदाहरण म्हणून तुमचा एक हात डोक्यावर ठेवा. हे वाक्य वाचून संपेपर्यंत तुमचा हात डोक्यावर गेला ना? किती वेगानं विचार मेंदूकडे जाऊन क्रियासुद्धा झाली. मेंदूतील या संदेशवहन करणाऱ्या पेशींना न्युरॉन म्हणतात. न्युरॉन हा मेंदूचा सूक्ष्मदर्शकाखाली न दिसणारा एक अतिसूक्ष्म घटक. परंतु परार्धावधी न्युरॉन्सचं जाळं हे मेंदूच्या कार्यप्रणालीचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यामुळे संदेशवहनाची प्रक्रिया शक्य होते. संदेशवहनाची वेगवान प्रक्रिया मेंदूच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. न्युरॉन्समुळे मेंदू आणि सर्व शरीराचा एकमेकांशी संवाद चालू राहातो आणि आपलं दैनंदिन जीवन जगणं शक्य होतं. आपलं वागणं, उठणं, बसणं, भावना दर्शवणं, हे सगळं न्युरॉनमधील संदेशांच्या दळणवळणामुळे घडतं. न्युरॉन्सचं जाळं जितकं जोमदार, तितकी तुमची स्मरणशक्ती धारदार. या दळणवळणाला जर कुठल्याही कारणानं बाधा आली, तर मेंदूच्या तत्परतेवर त्याचा लगेच परिणाम दिसून येईल.

मेंदूची रचना

मेंदूचं वजन अदमासे तीन पौंड असतं. इतर इंद्रियांच्या मानानं मेंदूमध्ये अविश्रांत काम चालू असल्यामुळे मेंदूला संपूर्ण शरीराच्या २० ते २५ टक्के रक्तपुरवठा आणि ग्लुकोज लागतं. प्रत्येक व्यक्तिमत्त्वातील फरक त्यांच्या मेंदूमधील न्युरॉन्सच्या जाळ्याच्या भिन्नतेमुळे असतो असं म्हणायला हरकत नाही.  मेंदूचे तीन प्रमुख भाग असतात. मोठा मेंदू (सेरेब्रम), लहान मेंदू (सेरेबेलम) आणि ब्रेन स्टेम. या भागांची थोडक्यात माहिती पाहू या.

मोठा मेंदू – जवळजवळ संपूर्ण कवटी व्यापून टाकणारा मोठा मेंदू हा डावा आणि उजवा अशा दोन भागांमध्ये विभागलेला असतो. दोन जुळी फळं एकमेकांना चिकटलेली असावीत तसे हे दोन भाग असतात आणि मध्यात एक खोबण असते. या भागांचं कार्य पूर्ण स्वतंत्रपणे चालतं. सर्वसाधारणपणे डावा मेंदू हा उजव्या बाजूच्या शरीराचा पालनकर्ता असतो, तर उजवा मेंदू डाव्या बाजूच्या शरीराचा. त्यांची कामंही निरनिराळी करतात. उदा. उजवा भाग हा एखाद्या गोष्टीचं चित्र बघतो आणि त्यावरून त्या गोष्टीला मूर्त स्वरूपात ओळखतो. उदा. ‘ही खुर्ची’-  डावा भाग या माहितीला भाषेचं स्वरूप देतो. त्यावर विचार करतो, म्हणतो, ‘पन्नास वर्षांपूर्वी घेतलेल्या या खुर्चीवर बसून वडिलांनी आपलं लिखाणाचं काम केलं होतं. वडिलांची आठवण म्हणून मला ही खुर्ची फार प्रिय आहे.’ इत्यादी.

लहान मेंदू- मानेच्या वरच्या बाजूला छोटय़ा सफरचंदाएवढय़ा आकाराचा हा भाग मेंदूच्या तळाशी बसवलेला असतो. शरीराचा तोल संभाळणं, स्नायूंच्या हालचालींत सुसूत्रता आणण्याचं काम त्याची जबाबदारी.

ब्रेन स्टेम- ब्रेन स्टेममुळे पाठीचा मणका तसंच लहान आणि मोठा मेंदू एकत्र जोडले गेलेले असतात. शरीराचा श्वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरण सांभाळण्याची जबाबदारी या भागावर असते. मोठय़ा मेंदूवरील आवरणाला ‘कॉर्टेक्स’ म्हणतात. या आवरणामुळे मेंदूवर घडय़ा/ सुरकुत्या पडलेल्या दिसतात. कॉर्टेक्स हा मेंदूमधील अनन्यसाधारण भाग आहे. प्राणी आणि मानवातील वेगळेपण ही या भागाची देणगी आहे. इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा माणसांमध्ये हा भाग प्रगत असल्यामुळे विचार करणं, नियोजन करणं, भविष्यकाळाचा विचार करणं, हे आपण करू शकतो. थोडक्यात प्राणीजगतावर आपण मात केली आहे ती मेंदूच्या या भागामुळे. कॉर्टेक्सचा भाग म्हणजे मेंदूमधील पेंशींची विणून केलेली तलम शाल आहे, असं आपण म्हणू शकू. न्युरॉन्स या शालीत गुंफलेले असतात. ही शाल साधारणपणे वर्तमानपत्राच्या पानाएवढी मोठी असते. खोबऱ्याच्या वाटीएवढय़ा मेंदूवर ती पसरली असल्यामुळे साहजिकच तिच्या घडय़ा पडतात. प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळा असला तरी या घडय़ांची रचना एका विशिष्ट रीतीची असते. त्यामुळे मेंदूचे महत्त्वाचे भाग अमुक ठिकाणी आहेत, असं समजू शकतं. कॉर्टेक्सचे चार मुख्य भाग समजले जातात. त्यांना ‘लोब’ असं म्हणतात. मेंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही भागांमध्यम्े हे चारही लोब असतात. त्यांची कामं ठरवलेली असतात. शेजारच्या आकृतीमध्ये हे लोब्स दाखवलेले आहेत.

डोक्याच्या मध्यभागी, मेंदूच्या गाभ्यात कॉर्टेक्समध्ये दडलेला मेंदूचा अजून एक भाग असतो. त्याला ‘लिम्बिक लोब’ किंवा ‘लिम्बिक सिस्टीम’ असं म्हणतात. प्राचीन काळात माणसाचा मेंदू के वळ एवढाच होता. लिम्बिक सिस्टीममधले भाग आपल्या भावनांशी निगडित असतात. राग, भीती, आनंद, स्त्री/ पुरुष यांचं एकमेकमंबद्दलचं आकर्षण, अशा माणसाच्या जीवनासाठी आवश्यक अशा नैसर्गिक भावनांचा उगम इथे होतो.

‘अमिग्डला’ आणि ‘हिप्पोकॅम्पस’ या भागांचा स्मरणशक्तीशी मोठा संबंध असतो. कुठल्या आठवणींचं जतन करायचं आणि ते कुठे करायचं हे अमिग्डला हा भाग ठरवतो. ज्या आठवणींमध्ये आपल्या भावना जास्त गुंतलेल्या आहेत त्या आठवणींना साठवणीत प्राधान्य दिलं जातं. जपून ठेवण्याच्या आठवणी कुठे ठेवाव्यात हे ठरवणं, तसंच त्यांची गरज पडल्यावर लगोलग त्या शोधणं, हे काम हिप्पोकॅम्पसचं असतं. लिम्बिक सिस्टीममधील ‘थॅलमस’ या भागाचा पंचेंद्रियांशी आणि शरीराची हालचाल सुरळीत चालण्याशी संबंध असतो. खरं म्हणजे या कामासाठी मेंदूचे इतर भाग, पाठीचा मणका यांच्यामधला दुवा म्हणून थॅलमस काम करतं. ‘हायपोथॅलमस’ आपल्या शरीरातील हार्मोन्सची (संप्रेरकांची) नियंत्रित निर्मिती करतं, त्यामुळे शरीराचं तापमान राखण्यासारखी महत्त्वाची कामं केली जातात. ‘ऑलफॅक्टरी बल्ब’ या भागामुळे शेकडो वासांमधला फरक समजू शकतो.

खूप शास्त्रीय माहिती न मांडता मेंदूच्या अचंबित करणाऱ्या कामाची तुम्हाला ओळख व्हावी आणि त्याची जपणूक करणं किती महत्त्वाचं आहे हे पटावं इतकाच उद्देश समोर धरून मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कामाचं मला समजलेलं हे विवेचन. पुढच्या लेखात माहितीच्या आठवणी कशा होतात याविषयी..

mangal.joglekar@gmail.com