12 July 2020

News Flash

दिवाळी हे निमित्त,आपापला परीघ वाढवण्याचं!

गृहहीन, अनाथ मुलं संस्थेत दिवाळी साजरी करतात, तेव्हा आनंदाचा महापूरच लोटतो.

संस्थेला एकदम घरपण येतं.

गृहहीन, अनाथ मुलं संस्थेत दिवाळी साजरी करतात, तेव्हा आनंदाचा महापूरच लोटतो. या दिवसात मुलांनी स्वत:वर घेतलेली जबाबदारी वाढते. संस्थेला एकदम घरपण येतं. भेटवस्तू सांभाळणं, रांगोळ्या काढणं, आकाशकंदील तयार करणं, संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवणं, फराळ खाणं, काय कमी कामं आहेत का ही? मुलं नुसत्या आनंदानं नव्हे, तर समर्थपणे ही जबाबदारी पेलतात.. पण त्याच वेळी त्यांना पाहून अनेक जण चुकचुकतात, हळहळतात. मुलं कानकोंडी होतात. दिवाळीचा आनंद मुलांपासून हिरावून घेणारी ही रिकामी हळहळ नको वाटते. अशा वेळी, दिवाळी हे निमित्त, आपापला परीघ वाढवण्याचं हे आम्हाला स्पष्ट दिसतं आणि समजतंही.

झी एक मामी प्रत्येक सणाला काही ना काही खरेदी करायचीच. तिला खरेदीला फक्त निमित्त पुरायचं. मात्र त्यातही दसरा, दिवाळीला खरेदीचा खूप जोर असायचा. त्यामुळे माझी आई, मावशी तिला ‘दसऱ्याला, दिवाळीला’ असं तालात म्हणत चिडवत असत. (नणंदांना भावजयांना चिडवण्याचं काम परंपरेनंच दिलंय ना!) त्यामुळे दिवाळी म्हटली की खरेदी असं समीकरण मनाशी लहानपणापासून घट्ट बसलं होतं. मग त्याच अनुषंगानं सुगंधी साबण, उटणं, फराळ, असुरनाशक कारीट या गोष्टी आल्याच. एकंदरीत दिवाळी म्हणजे मंद पेटणाऱ्या पणत्या, त्यामुळे उठून दिसणाऱ्या रांगोळ्या, पहाटे केलेलं स्नान व चापलेला फराळ असा कमालीचा आनंद एवढंच समीकरण मनात असायचं. यात आणखी एक छोटी भर घालते. माझ्या लहानपणी, लहानपणी कशाला आता, आतापर्यंत आकाशकंदील करण्याची टूम होती. त्यासाठी रात्र, रात्र जागरणं, मुलामुलांत होणारं तुंबळ युद्ध, मग होणारा समेट व त्यानंतर प्रयत्नानं तयार होऊन झगमगणारा आकाशकंदील! वाह! वो भी क्या दिन थे!

पुढे मोठी झाल्यावर वंचित (अनेक अर्थानं) मुलांच्या जगाशी जोडली जात असताना, घरात राहणारी मुलं व आमच्या ‘एकलव्य’ संस्थेत राहणारी मुलं यांच्या खास करून दिवाळी साजरी करण्याच्या संदर्भात महदंतर आहे, हे लक्षात आलं. हे लक्षात आलं म्हणण्यापेक्षा येतच गेलं. पण या विषमतेचा प्रमुख मुद्दा एका मुलीकडून आला. बालपणीचा काही काळ घरात घालवलेली पण बापाच्या पराकोटीच्या व्यसनामुळे नाइलाजानं संस्थेत राहायला आलेली ही मुलगी मला एकदा अचानक म्हणाली, ‘‘ताई, तुमच्या लक्षात आलं का, दिवाळी जवळ आली की संस्थेत एकदम ढिगानं जुने कपडे दान म्हणून यायला लागतात. लोकांना आपापल्या मुलांसाठी नवीन कपडे घ्यायचे असतात. आम्हांला कपडे देऊन ते आपली कपाटं रिकामी करतात.’’ तिचं हे बोलणं ऐकताना चटका बसल्यासारखं झालं.

विविध कारणांसाठी नाइलाजानं (प्रत्येक मुलाला घरीच राहावंसं वाटतं) संस्थेच्या आश्रयाला आलेल्या मुलांसाठी नवीन कपडय़ांची सोय केलीच पाहिजे, खास करून दिवाळीसाठी हे समजलं. ‘समजलं’ म्हणतेय कारण तसं जाणवलं होतंच आधी, पण थेट त्या मुलांकडून येणं याला फार महत्त्व आहे. वेगवेगळ्या कारणांनी बालपणींच्या आनंदाला मुकलेल्या मुलांच्या दिवाळीविषयी त्यांना काय वाटतं, याची चाचपणी केली तर आपल्या संस्थेतली दिवाळी अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल असं वाटलं. नवीन कपडय़ांविषयी मी अनेक मित्रमंडळींशी बोलले. किती तरी लोकांनी सहकार्याचा हात पुढे केला. माझी एक मुंबईची मैत्रीण तर दसऱ्यापासूनच आमच्या मुलांसाठी नवीन कपडय़ांच्या शोधात मुंबईची मार्केट्स पायाखाली घालते. अगदी नवीन फॅशनचा अंदाज घेते व त्या फॅशनचे कपडे दिवाळीच्या चार दिवस आधी मुलांपर्यंत पुण्यात पोचतात. पुण्यातील एका डॉक्टरांचा याला हातभार लागतो. समाधान याचं वाटतं की कपडे अनेकविध रंगांचे, प्रकारचे असल्यानं मुलांना निवडीचं बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळतं. तरीही भांडणं होतातच. पण भावंडांत भांडण होणारच, नाही का? एकदा तर आय.टी. क्षेत्रातील काही तरुण, हौशी मंडळी गटागटानं मुलांना दुकानात घेऊन गेली व त्यांना हवे ते कपडे घेऊन मुलं परतली.

मुलांना पहिल्या अंघोळीचा आनंद फारसा मिळत नाही, असं लक्षात आल्यावर पहाटे समारंभपूर्वक स्नान सोहळ्यासाठी कोण येऊ शकेल, याची चाचपणी केली. किती तरी तरुण मंडळी यासाठी तयार झाली. उटणं, तेल, साबण, टॉवेल, कपडे, सगळं नवीन कोरं करकरीत. प्रत्येकाचं अभ्यंगस्नान. मुलांचे चेहरे तर प्रफुल्लित होतातच पण या ‘हमामात’ सामील होण्यासाठी आलेल्या मंडळींचे चेहरे या आनंदाच्या वर्षांवात चिंब होऊन जातात, ते बघणं फार प्रेक्षणीय असतं. माझ्या मुंबईच्या एका सहकारिणीनं गेल्या कित्येक वर्षांत यात एकदाही खंड पडू दिलेला नाही, हे खास.

मुलांच्या दिवाळीच्या शाही स्नानाच्या तयारीची सुरुवात आधीपासूनच करावी लागते. प्रत्येक मुलाच्या साहित्याची पॅकेट्स तर तयार होतातच पण त्यांना घरी जायला मिळणार असेल (आई-वडील, घरासारखी व्यवस्था व तिथं नेण्याची त्यांच्या पालकांची तयारी) तर त्यांच्या कुटुंबीयांनाही फराळापासून सगळं मिळेल, अशी तयारी करावी लागते. दिवाळीतच आधी काही मुलांना नेण्यासाठी पालक येतात. त्यांचं खूप आगतस्वागत करून मुलांची पाठवणी केली जाते. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवतोय. पदपथाचा आसरा घेऊन राहणारी एक आई मुलाला दोन दिवस नातेवाईकांकडे घेऊन जाण्यासाठी आली होती. अनेक प्रकारची तेलं, साबण, उटणी (पुण्यातील अभिनव प्राथमिक शाळेचे छोटे विद्यार्थी गेली अनेक र्वष ही दिवाळी थेट प्रेमानं देताहेत) हा एवढा मोठा सरंजाम बघून ती आई चक्रावून गेली. हरखून गेली. किती तरी वेळ सामानाच्या त्या ढिगाकडे बघत तशीच बसून राहिली. आणलेल्या पिशवीत दिलेल्या साहित्याची पाकिटं घातल्यावर मुलगा आईला निघण्याची घाई करू लागला. शेवटी नाइलाजानं उठता, उठता आईनं हातचलाखीनं तिला आकर्षक वाटलेलं आणखी एक पाकीट शिताफीनं आपल्या पिशवीत घातलं. मात्र मुलाच्या नजरेतून ते सुटलं नाही. तो आईजवळ येऊन शांतपणे म्हणाला, ‘‘आई, ती पाकिटं सगळ्यांसाठी आहेत. ठेव ते परत.’’  ऐकताना वाटलं, दिवाळीची आणखी मोठी भेट कोणती असू शकेल? रस्त्यावर राहणारा, रात्रंदिवस वस्तू विकणारा एक मुलगा संस्थेच्या आश्रयाला येतो व दुसऱ्यांसाठी असलेल्या वस्तू आपण घ्यायच्या नसतात, असं सहज शिकतो व आईलाही शिकवतो.

दिवाळीच्या या दिवसात मुलांनी स्वत:वर घेतलेली जबाबदारी वाढते. संस्थेला एकदम घरपण येतं. एवढय़ा भेटवस्तू (भेटवस्तू, दानवस्तू नव्हेत) सांभाळणं, त्याचं वर्गीकरण करणं, कपडय़ांच्या रंगरूपावरून होणारी लहान-मोठी भांडणं सोडवणं, रांगोळ्या काढणं, आकाशकंदील तयार करणं, संस्थेचा परिसर स्वच्छ ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फराळ खाणं. काय कमी कामं आहेत का ही? मुलं नुसत्या आनंदानं नव्हे, तर समर्थपणे ही जबाबदारी पेलतात.

फराळाचा विषय निघालाय, तर एक छोटी खंत वाटते. सगळ्या मुलांना पुरेल एवढय़ा मोठय़ा फराळाचा घाट काही आम्ही संस्थेत घालत नाही. होळीला पुरणपोळी करतो, दसऱ्याला श्रीखंड करतो. पण तो कसा एक जिन्नस असतो. दिवाळीचा फराळ करायचा म्हटलं की विविध प्रकार, त्यात तळणं भरपूर. नेहमीच्या स्वयंपाकाच्या गडबडीत एवढा रेटा खूप होऊन बसतो. यावर उपाय म्हणून मग थोडय़ा प्रमाणात फराळ करणं. मुलांना फराळ करण्याचा आनंद देणं. त्यांच्या लुडबुडीला व त्यामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या गोंधळाला स्वयंपाकाच्या काकू कंटाळतात पण मुलं या सगळ्या अनुभवांना वंचित आहेत, हे समजतं त्यांना. मुलं काही तरी करण्याचा हट्ट करायला लागली ना की मला माझं लहानपण हमखास आठवतं. माझी आजी, मावशी आणि आई घरी पापड करायच्या, पापडाच्या लाटय़ा करणं व त्या मोठय़ांची नजर चुकवून खाणं (लाटय़ा लाटणं) हे आमचं आनंदाचं विधान होतं. तिच लुडबुड मुलं करतात व आपण दिवाळीच्या तयारीत केवढा मोठा हातभार लावलाय असं वाटून त्यांची मन आनंदानं भरून येतात. आम्हांला मोठय़ा प्रमाणातला फराळ मात्र आमच्या एका बालक मित्र स्नेहय़ाकडून येतो.

थोडक्यात, दिवाळी म्हणजे काय, आनंदाची देवाण-घेवाण, उल्हासाचं आदान-प्रदान. पहाटेची मंगल फेरी. फेरीवरून आठवलं, दिवाळीत पहाटे, पहाटे मुलांना फिरायला नेणं ही भन्नाट मजेची गोष्ट आहे. पुण्यात सारसबागेत दिवाळी पहाट साजरी होते. गाण्याचा कार्यक्रम होतो. त्या वेळी मुलं तिथं पोचतात. मुलं गाणीबिणी ऐकतातच असं नाही, पण सारसबागेचा भव्य परिसर, पहाटेच्या कोवळ्या उन्हात चमकणारा, तळ्यातला गणपती, रेशमी, सुगंधी वस्त्रांची सळसळ व नव्या कपडय़ात सजलेली आमची मुलं! लक्षात घ्या, या अशा वेळा म्हणजे मुलांना त्यांच्या अवतीभवतीच्या पर्यावरणाशी एकरूप होऊन जाण्याची संधी. आपण संस्थेत राहतो, याचा अर्थ आपण कोणी तरी वेगळे आहोत, असा नसून या समाजाचे आपण एक भाग आहोत. अशी भावना मुलांपर्यंत सहज पोचते. अर्थात, याला मनापासून पाठिंबा देणारी त्यात आपला सहभाग देणारी माणसं आहेत, तसा त्याला छेद देणारी मंडळीही आहेत. आम्ही (मुलं आणि आम्ही मोठे) कुठेही अशा सार्वजनिक ठिकाणी गेलो की काही माणसं थांबून, कुतूहलानं वळून वळून आमच्याकडे बघत राहतात. जवळ येतात व चौकशांना प्रारंभ करतात, चुकचुकतात, हळहळतात. आणि हे सगळं मुलांसमोर चालतं. मुलं कानकोंडी होतात. मग आम्ही दिवाळीच्या सुमुहूर्तावरच ही चुकचुक, हळहळ नाकारण्याचं  ठरवलं, तेही मुलांशी बोलूनच. आता मुलांसकट आम्ही अशा या चौकशांना नम्र खंबीरपणे नकार देतो. दिवाळीचा आनंद मुलांपासून हिरावून घेणाऱ्या या रिकाम्या हळहळीचा निषेध करतो. आता हे सगळं विचारणारी माणसं क्रूर असतात, संवेदनहीन असतात, असं मुळीच नाही. उलट ती फार दयाळू असतात. अनेकदा फक्त काय, कुठे, केव्हा, व तेही खास वैयक्तिक आयुष्यातील बाबींविषयी, पाळाव्या लागणाऱ्या बंधनाविषयी, तसं कमीच प्रशिक्षण असतं आपल्याला! शिवाय मनातल्या मनात सुप्त तुलनाही चालू असते. तुलनेनं आपलं, आपल्या मुलांचं खूपच चांगलं चालू आहे, याची परत एकदा, नव्यानं आठवण येते.

तुलना म्हटलं की आमच्या मुलांची एक अनोखी दिवाळी आठवते मला. एका सामाजिक संस्थेनं, कमतरतेचा सामना करणाऱ्या मुलांची एक दिवाळी आयोजित केली होती. एका मोठय़ा हॉलमध्ये खूप, सारी मुलं जमली होती. त्यात अंध मुलं होती, कर्णबधिर मुलं होती, मति-गतिमंद मुलं होती, घर हरवलेली, भिक्षेकरी, देवदासींची मुलं, एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह मुलं, या सगळ्यांचं एक मोठ्ठं संमेलन तिथं भरलं होतं. दिवसभर मुलांनी दिवाळी साजरी केली. मुलं परत आली तेव्हा ती फार समाधानी दिसत होती. दिसू न शकणाऱ्या, ऐकू न येणाऱ्या, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या मुलांसोबतची ‘डोळस’ दिवाळी मुलांचा आनंद द्विगुणित करून गेली आहे, हे स्पष्ट दिसत होतं.

दिवाळी हे निमित्त, आपापला परीघ वाढवण्याचं हे आम्हाला स्पष्ट दिसलं आणि समजलं. मी आत्तापर्यंत जे काही लिहिलंय ना, ते काही आमच्या एकाच संस्थेबद्दल नाही. दिवाळी तशी सीमित राहीलच कशी?

आपण एखाद्या घटनेची, प्रसंगाची अथवा अनुभवाची प्रचीती घेतो, त्याविषयी लिहितो, बोलतो, तेव्हा ती बाब अधिक व्यापक बनत जातेच ना! देवदासींच्या मुलांशी जोडलो गेलो, तेव्हा त्या मुलांच्या आईंची दिवाळी करायची ठरलं. भाऊबीजेचा बेत ठरला. प्रेरणा अर्थात विजयाताई लवाटेंची. त्यांच्याकडे असे आपण समारंभ होताना बघितले होते. किती तरी स्नेही भाऊ बहिणींकडून ओवाळून घ्यायला आले. आमच्यापैकी एकाच्या डोक्यात या स्त्रियांना नवीन साडय़ा ओवाळणी म्हणून द्याव्यात असं आलं. पण नंतर मात्र आम्हाला असं वाटलं की, आम्ही असं करायला नको होतं. साडय़ा देण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बायकांचा ओघ सुरू झाला. तितक्या प्रमाणात साडय़ा अर्थातच आमच्यापाशी नव्हत्या. म्हणजे मुळात कल्पना होती की संस्थेतील मुलांच्या पालक मातांना बोलवायचं पण ते तसं होऊ शकलं नाही. कार्यक्रमाचं स्वरूप त्यानंतर आम्ही बदललं, मर्यादित केलं. साडय़ा देण्याचं महत्त्व अशासाठी वाटतं की इथल्या वस्तीत राहून आयुष्यभर आपल्या घरी पैसे पाठवणाऱ्या बायका, भावानं मुलाच्या लग्नात आपल्या व्यवसायामुळे बोलावलं नाही, पण किमान लग्नाची साडी तरी तो आपल्याला पाठवील, या अपेक्षेनं तळमळत असतात. त्यामुळे साडय़ांची कल्पना आजही मनात घर करून आहेच. या स्त्रियांविषयी सणांच्या संदर्भात नोंदवण्यासारखं आणखी एक निरीक्षण म्हणजे सणासुदीच्या दिवसात समाजात पुरुषांकडे बरेच पैसे असतात. त्यामुळे ‘इथं’ येणाऱ्यांची संख्या वाढते. त्याचा परिणाम असा होतो की सणासुदीच्या दिवसात मुलांकडे लक्ष द्यायला बायांना फुरसत नसते, इच्छा असली तरी नसते. हे मला एका पालक मातेनंच सांगितलं. दिवाळीच्या फटाक्यांच्या कर्णकटू आवाजात किती दबलेले हुंदके अस्फुट नि:श्वास असतील याची कल्पनाच करावी लागते.

दुष्काळासारख्या निसर्ग व मानवनिर्मित (पावसाचा अभाव व डाळींचे साठेबाज कसे एकमेकांचा हात धरून असतात) संकटात कुटुंबंच्या कुटुंब महानगरात स्थलांतरित होतात. वर पांघरूण म्हणून आकाश आणि खाली आधाराला जमीन असते. दरवर्षी माणसं येतच राहतात. त्यांची दिवाळी कशी होत असणार, हा ज्यानं-त्यानं करण्याचा विचार आहे. अशी खऱ्या अर्थानं गृहहीन मुलं संस्थेच्या सोबतीनं दिवाळी साजरी करतात, तेव्हा आनंदाचा महापूरच लोटतो व ते बघण्याच्या हर्षांत आपण सहभागी होता, पण त्याच वेळी या मुलांचे आई-वडील, नातेवाईक, आप्तेष्ट यांची अवस्था बघता, मन अस्वस्थ होऊन जातं खरं. दर दिवाळीला वाटतं, दीपावलीच्या आनंदात आणखी लोक एकमेकांच्या जवळ यायला हवेत. दिव्यांच्या मंद उजेडात उत्साहानं चमकणाऱ्या डोळ्यांची अधिकाधिक भेट व्हायला हवी. ल्ल

ekalavyatrust@yahoo.co.in

संपर्क – ९८५०८९४५०४

www.ekalavyapune.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 12:15 am

Web Title: article on diwali of orphaned children
Next Stories
1 रसिकात देव माझा..
2 गोडवा चिरोटय़ाचा, भरारी यशाची!
3 पणत्यांच्या प्रकाशात उजळला व्यवसाय!
Just Now!
X