News Flash

दुसऱ्या लाटेच्या निमित्तानं

अशा परिस्थितीत सुवर्णमध्य साधून संकटातून तरून जाण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करायलाच हव्यात

डॉ. नियती चितलिया बडे the3chitalias@yahoo.com

टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना पूर्वीसारखं बाहेर फिरणं, एकमेकांना भेटणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं, हे सगळं आपण करू लागलो. हे संकट संपलं, असंही म्हणू लागलो. पण गेल्या काही दिवसांत दररोज वाढणारी ‘करोना’ रुग्णसंख्या पुन्हा लक्ष वेधून घेऊ लागली. ‘दुसरी लाट’ वगैरे शब्द कानांवर आदळू लागले, काहींनी घाबरून जाऊन स्वत:ला पुन्हा घरात बंद करून घेतलं, तर काहींनी पुन्हा एकदा विविध काढय़ांचा, गरम पाण्याचा मारा सुरू  के ला. अनेकांनी मास्क नाकावरून खाली घसरल्याकडे लक्ष न देता बिनधास्त बाहेर फिरणं सुरू ठेवलं. ही दोन टोकं च. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य साधून संकटातून तरून जाण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करायलाच हव्यात.. 

१७ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिला ‘करोना’ संक्रमित रुग्ण चीनमध्ये सापडला होता. आपल्याकडे फेब्रुवारी २०२० च्या शेवटी आणि मार्चच्या सुमारास रुग्ण दवाखान्यात दाखल व्हायला सुरुवात झाली. २१ मार्च २०२० ला पहिली टाळेबंदी झाली त्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरची एक पोस्ट वाचण्यात आली, की चीनमधील एका डॉक्टरनं रुग्णांना फक्त चहा देऊन त्यांचा करोना बरा केला. मी चाटच पडले. कारण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी मीच चीनहून मुंबईला परतले होते आणि चीनमध्ये मला सगळीकडे अगदी प्रकर्षांनं जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक गल्लीबोळाच्या नाक्यावर असलेली गरम पाण्याची मशीन्स. प्रत्येक माणसाच्या हातात एक ‘फ्लास्क’ असतो. त्यात चहापत्ती, हर्बल चहापत्ती किं वा ग्रीन चहापत्ती घातलेली असते. त्यात गरम पाणी घालून सगळेजण चहाच पीत असतात. मग त्या डॉक्टरची बातमी खरी कशी मानायची? पण आपल्याकडेही सगळे गरम पाणी, काढे घ्यायला लागले. अगदी ‘कोविड सेंटर’मध्येसुद्धा. त्यानं करोना पळाला का? मनाचं एक आपलं समाधान, की आपण काढा घेतोय, तर आपल्याला नाही होणार करोना. पण हे तरी कितपत सत्य आहे?

एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी या संपूर्ण काळात काय काय पाहिलं, ते वाचकांना सांगावंसं वाटतं. मार्च महिन्यात हवामान अत्यंत गरम. युरोपमध्ये थंडीत करोना वाढला आणि उन्हाळा सुरू झाल्यावर कमी व्हायला सुरुवात झाली, असा सर्वसामान्य लोकांचा गैरसमज होऊ लागला. गैरसमज अशासाठी, की आपल्याकडे तर भर उन्हाळ्यातच आला की हा करोना! मग आला कसा आणि वाढला कसा? लोक गरम पाणी पिऊ लागले आणि जवळपास पुढच्या दहा दिवसांतच माझ्याकडे एक रुग्ण तोंडात जखमा झालेल्या दाखवायला आला. मी त्यांची नाडी बघितली. पित्त होतंच, पण इतकं नाही की अशा जखमा होतील. मसालेदार जेवण घेतलंत का, असं विचारताच ते म्हणाले, ‘‘डॉक्टर मी अगदी दर तासाला गरम-गरम पाणी पितो.’’ कारण विचारल्यावर म्हणाले, ‘‘सगळे सांगतात ना, की गरम पाणी प्या करोना होणार नाही!’’  मी त्यांना म्हटलं, ‘‘अहो अल्सर होतील अगदी तोंडापासून आतडय़ांपर्यंत. ते आयुष्यभर सहन करावे लागतील. करोना होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे.  उदा. ‘सार्स’नं माणूस मरत नाही, पण शरीर इतर रोगानं पोखरलेलं असेल, तर अशी व्यक्ती त्या रोगाचा सामना नाही करू शकणार.’’ असे अनेक रुग्ण माझ्याकडे पोटात जळजळ, आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी), मूळव्याध (पाईल्स) घेऊन येऊ लागले आणि त्यांना मी रोगप्रतिकारकशक्ती म्हणजे नक्की काय आणि ती कशी वाढवायची हे समजावून सांगू लागले.

हळूहळू आपल्याकडील ‘कोविड’ रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती, पण आता परत मार्च २०२१ मध्ये दुसरी लाट चालू झाली आणि  ये रे माझ्या मागल्या! मागे सांगितलेलं सगळं अगदी पालथ्या घडय़ावर पाणी ओतल्यासारखं लोक विसरून गेले. परत काढे चालू, हळद घालून दूध, पाणी घेणं सुरू झालं. जरा सारासारविचार करा. आपल्या जेवणात हळद असते, गरम मसाल्यात (आणि इतरही मसाल्यांमध्ये) लवंगा, मिरी, दालचिनी हे असतं. ते वेगळं, जास्त घेण्याचं कारणच नाही. आपण स्वयंपाकात हे सगळं वापरतो.

मग घ्यायचं काय आणि करायचं तरी काय? हे सांगण्याआधी करोना नेमका होतो कशामुळे आणि कसा? आणि ही जी दुसरी लाट आली आहे ती म्हणजे नेमकी काय? हे सांगायला हवं.  रोगांमध्ये काही रोग अत्यंत संक्रमक असतात. जसा टी.बी. (क्षयरोग). एखाद्याला छातीचा टी.बी. असेल आणि तो उपचार घेत नसेल, खोकत असेल आणि मास्क घालत नसेल, तर घरातील ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा व्यक्तीला तो लगेच होईल. आपण बघतो, की कांजिण्यासुद्धा एका मुलाला झाल्या की शाळेत वर्गातील जवळपास सगळ्यांना होतात. तसाच हा ‘करोना’ आहे. आपण खोकलो, समजा, तोंडावर हात धरून खोकलो. तोच हात आपण कोणाशी हस्तांदोलन करताना वापरतो. खोकल्याचे ‘ड्रॉप्लेट्स’ (थेंब) हातावर असतात, ते दुसऱ्याच्या हाताला लागतात. समजा, त्यानं तो हात नाक खाजवायला वापरला, तर त्याच्या हातावरील जंतू नाकातून आत शिरून त्याच्या फुफ्फुसांवर हल्ला करतात. जर एखाद्यानं हातात ग्लोव्हज् घातलेले असतील आणि ग्लोव्हज्चा हात तोंडावर धरून खोकल्यावर त्यानं तो हात एखाद्याशी मिळवला, तरीही तीच गोष्ट घडणार. म्हणजे ग्लोव्हज् घालून आपण काय मिळवलं? तेव्हा करोना मुळात कसा पसरतो हे कायम आपल्या डोक्यात असायला हवं.

आता ही दुसरी लाट कशी आली, ते सांगते. करोना आपल्या देशातून पूर्ण गेलेला नव्हता. पण हळूहळू जीवन मूळपदावर यावं म्हणून ट्रेन चालू झाल्या. इतर वाहतूकही पूर्वीसारखीच सुरू झाली. लोक परत दाटीवाटीनं एकत्र जमू लागले, भेटू लागले, बाजारात, गर्दीच्या ठिकाणी येऊ-जाऊ लागले. लग्न, समारंभ जोशात सुरु झाले. करोनाला वाढायला आणखी माध्यम मिळू लागलं.  इथे ‘सोशल डिस्टंसिंग’ अजिबात पाळलं गेलं नाही. म्हणून दुसरी लाट जवळजवळ सगळ्याच देशांमध्ये आली आहे. परंतु आता जोरदार लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. प्रत्येकानं लस अवश्य घ्यावी. करोना हा साधासुधा ताप नाही. त्याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. अनेकांच्या बाबतीत इतका वाईट परिणाम होतो, की आपली रोजची साधी कामं पण करणं कठीण होऊन जातं. म्हणून प्रत्येकानं आपल्या परीने तो कसा व्हायचा टाळता येईल याकडेच संपूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं.

सर्वप्रथम रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची कशी ते पाहू. ती काही दिवस औषधं घेऊन वाढत नाही. ती रोज करण्याची गोष्ट आहे.आपलं जीवन आपण अत्यंत नियमबद्ध करायला हवं. सकाळी ब्राह्म मुहूर्ताला (सूर्योदयापूर्वी ४५ मिनिटं आधी) उठून व्यायाम करणं, नुसतं प्राणायाम नाही, व्यायाम- जो शरीरातील प्रत्येक स्नायूला बळकट करेल असा समतोल व्यायाम. त्याबरोबर एखादी ‘एरोबिक अ‍ॅक्टिव्हिटी’ म्हणजे चालणं, धावणं, पोहोणं, सायकल चालवणं इत्यादी. करोना संक्रमणामुळे मैदानं ओस पडली, तरणतलाव बंद झाले. पण आपण या सगळ्या गोष्टी घरातल्या घरातसुद्धा करू शकतो. सकाळी नाही जमलं तरी दिवसभरात एकदा तरी कराच. त्यासह जेवणात नियमितता हवी. वेळच्या वेळी जेवण घेणं शरीराच्या पचनशक्तीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे ताजं जेवण आणि तेसुद्धा चांगलं, संतुलित हवं. दिनचर्या, ऋ तुचर्या या दोन्ही गोष्टी पाळणं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. ज्यांनी अशा आयुष्याची आता नवीनच सुरुवात केली आहे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला   किमान तीन ते सहा महिने लागतात. त्यामुळे या काळात त्यांनी जनसंपर्क जितका शक्य तितका कमी ठेवायला हवा. अशा वेळी  स्वत:ची जीवनशैली एकदम बदलल्यानंतर सुरुवातीला कदाचित शरीर दुखेल, ताप आल्यासारखं वाटेल, पण प्रयत्न सोडू नयेत. आहारात दूध, फळं, सगळ्या भाज्या, मांसाहार, सगळं असावं, पण पदार्थ खूप तिखट करून खाऊ नये. चटपटीत आणि चमचमीत, मसालेदार पदार्थ टाळावेत. आणि गोड पदार्थ किंवा साखरसुद्धा जितकी कमी घेता येईल तितकी कमी खावी.

आतापर्यंत वाचकांना लक्षात आलंच असेल, की गरम/ उष्ण पदार्थ या विषाणूला मारत नाहीत. उलट आपल्या शरीरालाच जाळू लागतात. घरगुती इलाजसुद्धा टाळावेत, कारण त्यात हे मसाल्याचेच पदार्थ जास्त येतात. उन्हाळा असल्यामुळे मध, च्यवनप्राश यांसारख्या औषधीसुद्धा टाळाव्यात. गुलकंद, मोरावळा, वाळ्याचं पाणी, धने, जिरे, बडीशेप भिजत घालून मग गाळून घेतलेलं पाणी थंड करून घ्यावं. सब्जाच्या बिया किंवा तुळशीचं बी भिजत घालून त्यात रोझ सिरप किंवा खस (वाळा) सिरप किंवा बडीशेप (वरीयाळी) सिरप घालून दूध घालून ते घेता येईल. थंड दूध घेतल्यानं काही अपाय नाही. उलट आता या ऋतूत थंडच घ्यावं.

दुपारच्या जेवणात ताक प्यावं. ताक मात्र जराही आंबट असता कामा नये. दोन्ही जेवणांतील आहाराचं प्रमाण कमी असावं. अर्धपोटच जेवावं. तळलेले पदार्थ जितके कमी खाता येतील तितके चांगले. दुपारच्या जेवणानंतर जसं ताक, तसं रात्रीच्या जेवणानंतर दूध अवश्य घ्यावं. उन्हाळा वाढत चालल्यानं हे दूध गरम न घेता ‘रूम टेंपरेचर’वर आणून घ्यावं. जेवणात दुधी, शिराळी, घोसाळी, काकडी, यांच्यासारख्या थंड भाज्या आणि सगळ्या पालेभाज्या जरूर घ्याव्यात. अशी आहारयोजना केली तर जास्त औषधांची गरज लागणार नाही. बाहेरून आणायचं असेल तर शतावरी कल्प दुधातून घ्यावा. शतावरी थंड आहे. शक्ती प्रदान करण्यात अश्वगंधाच्या खालोखाल आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर करावा. एक-एक चमचा शतावरी कल्प

१ ग्लास दुधातून दिवसांतून दोन वेळा घ्यावा. याशिवाय लिंबू सरबत किंवा संत्र्याचा रस किंवा संत्री, मोसंबी खाल्यास ‘क’ जीवनसत्त्वसुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतं.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबद्दल खूप काही सांगितलं जातं, ‘व्हॉट्सअ‍ॅपवरच्या माहितीला तर ऊतच आला आहे. त्यामुळे काहीही वाचलं, काहीही ऐकलं किंवा बघितलं, तरी त्याचा अवलंब करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना एकदा जरूर विचारा. माहिती वाचायची झाल्यास ‘आयसीएमआर’चे (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च) शास्त्रज्ञ जे उपाय करायला सांगतात तेच करावे. मास्क (मुखपट्टी) कधीही विसरू नका. मुख्य म्हणजे हा मास्क नाकावर असणं गरजेचं. गर्दीची ठिकाणं टाळा, मुख्य जनसंपर्कच टाळावा.

कागदावर, भाजीपाल्यावर हा विषाणू राहात नाही, जगू शकत नाही, असं ‘आयसीएमआर’नं अगदी गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्येच सांगितलं होतं. बाजारातून भाजी आणली की ती वेगळी करून पिशव्यांमध्ये भरून सरळ फ्रीजमध्ये ठेवायला हरकत नाही. जरी काही विषाणू असतील तरी ते १० तासांपेक्षा अधिक जगू शकणार नाहीत आणि तसंही गारव्यानं ते आधीच मरून जातील. इमारतीतील लिफ्टची हँडल्स, दरवाज्यांची हँडल्स यांना स्पर्श करूनच ती उघडावी लागतात. त्यामुळे प्रथम इतर कुठेही हात न लावता सरळ बेसिनमध्ये साबणानं वीस सेकंद चोळून चोळून हात धुवावेत. हँड सॅनिटायझरमध्ये ७० टक्के  अल्कोहोल असतं. त्यामुळे ते लावून लगेच जेवायला बसू नये. किंवा त्या हातांनी लगेच खाऊही नये. थोडा वेळ अल्कोहोल उडून जायला द्यावा.

एकूण काय, करोनाची साथ पुन्हा आलेली आहेच. त्यातून तरून जायचं असेल तर आहार विहाराचे भान राखा. आपलं आरोग्य राखा आणि आपल्या कुटुंबियांचंही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:06 am

Web Title: article on second wave of coronavirus zws 70
Next Stories
1 ज्येष्ठांचे लिव्ह इन : एका मनस्विनीची गोष्ट
2 व्यर्थ चिंता नको रे :  ‘हॅम्लेट’ झाल्यावर!
3 मी, रोहिणी.. : ‘फिल्म इंडस्ट्री’शी ओळख
Just Now!
X