‘‘सगळी सुख-दु:खं आपली आपणच निर्माण करतो, अन् देवाला-दैवाला दोष देत बसतो. दु:खाच्या रेषेपुढे, दु:खाला छोटे ठरविणारी मोठी सहनशक्तीची रेषा काढता आली पाहिजे. तेवढं पुरेसं असतं. ते बळ, ती शक्ती मला इथं मिळत असेल कदाचित. तसेही हे सारे मनाचेच खेळ आणि मन तर अथांग, या मूळ स्वयंभू शक्तीसारखं! श्रावणातल्या सात वारांच्या कहाण्या असतात ना, तशी ही आठव्या वाराची ‘परिवारा’ची कहाणी. काही कहाण्या सफळ संपूर्ण, काही विफल अपूर्ण!’’
श्रावण मासाच्या कहाण्यांत एक आटपाट नगर असतं.
मुंबई तर अवाढव्य, बेफाट महानगर. त्यात मोक्याच्या ठिकाणी असूनही बिल्डर्स- डेव्हलपर्सच्या तडाख्यातून अजून तरी वाचलेली ‘देऊळवाडी’. ५०-५५ वर्षांपूर्वी शाळकरी वयात तिथं बराच काळ जायचा, खेळण्या-हुंदडण्याच्या निमित्तानं. त्या दिवशी कित्येक वर्षांनी पुन्हा त्या भागात कामानिमित्त गेलो, तेव्हा हटकून देऊळवाडीत गेलो. जुन्या आठवणी मनाशी जोपासत..
 देऊळवाडीत मुख्य देऊळ विठ्ठल-रखुमाईचं. काळानुरूप त्यात झालेले बदल. बाहेर चकाकत्या फरश्या, टय़ुबलाइट्स, संरक्षक जाळ्या, ‘चप्पल चोरांपासून सावधान’सारख्या सूचनांच्या पाटय़ा. एरवी गाभाऱ्यांत तीच शे-दीडशे वर्षे जुनी काळ्या पाषाणातील विठ्ठलमूर्ती. तशीच वामांगी रखुमाई. मागील बाजूस चकचकीत पितळी प्रभावळीवर आता नागफण्याची भर.
आषाढ नुकताच सुरू झाला होता. मंडपात कुणा महिला भजनी मंडळाचं भजन- प्रवचन चालू होतं, म्हणून दरवाजातूनच दर्शन घेऊन परत फिरलो. तेव्हा बाहेरील दोन्ही बाजूंच्या दीपमाळांना जोडणाऱ्या विस्तीर्ण कट्टय़ावर बसलेल्या एका वृद्ध महिलेने लक्ष वेधून घेतलं. चेहरा ओळखीचा वाटला. कृश शरीरयष्टी, गोरा रंग, पांढरे शुभ्र विरळ केस. स्वच्छ पांढरी बिनकाठाची नऊवारी साडी. रिकाम्या कपाळावर अंगाऱ्याचा टिळा. डोळे मिटलेले, तरी भजनाच्या तालावर दोन्ही हातांनी हलकासा  ताल धरलेला अन् ओठांचं पुटपुटणं..
चटकन संदर्भ लागेना. आईच्या मैत्रिणींपैकी तर कुणी नव्हे?.. मेघश्यामची आई तर नव्हे? पण इतक्या कृश..?
‘तुम्ही श्यामच्या आई.. शांतामावशी ना?’
‘अं.. हो, पण आपण?,’ रित्या नजरेनं त्यांनी विचारलं,
‘हल्ली कमी दिसतं हो. मी ओळखलं नाही तुम्हाला .’
मी माझा परिचय करून दिल्यावर, चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं.
‘अरे, हो हो. प्रायमरीत श्यामबरोबर होतास ना तू शिशुविकासमध्ये.. तुमच्या सारख्या बदल्या व्हायच्या ना रे.. पण एसेस्सीचे पेढे घेऊन आल्याचं आठवतंय सहासष्ट साली.. नजर अधू झाली तरी आठवण शाबूत आहे अजून.. ती संपली की सगळा आनंदच! अरे, पण बस ना तू, उभा का? कुठं असतोस? घरी कोण कोण आहे? आणि आई काय म्हणते रे? र्वष उलटून गेली भेट नाही..’
खूप दिवसांनी कुणीतरी बोलायला मिळाल्यासारखे त्यांचे अधीर प्रश्न.
‘आई नाही आता. झाली पंधरा-सोळा र्वष.. पण मावशी, श्याम कुठे असतो?’
शांतामावशी नि:शब्द. भिरभिरणाऱ्या डोळ्यात अस्वस्थता.
‘श्यामदेखील नाही रे आता. अठरा र्वष झाली.. यकृताचं- लिव्हरचं दुखणं. तुला पूर्वी कधी भेटायचा नाही का रे?’
‘एकदा ओझरता भेटला होता सी.एस.टी. स्टेशनच्या गर्दीत.. हरवलेला, अस्वस्थ वाटला. कुणीतरी पाकीट मारलं म्हणाला, पैसे नव्हते जवळ. तेव्हा आम्ही एकमेकांना टेलिफोन नंबर्स दिले. त्याचा नेहमी ‘राँग’ जायचा. त्याने फोन कधीच केला नाही.. कशामुळे झाला एवढा आजारी?’
मावशींनी एक उसासा टाकला. संभ्रमात पडल्यासारख्या क्षणभर थांबून बोलू लागल्या, ‘कुणाची दृष्ट लागण्यावर माझा विश्वास नाही, पण त्याला वाईट संगत मात्र लागली नोकरीत असताना. सुरुवातीचं ‘सोशल ड्रिंकिंग’ पुढे मुक्तपणे- बेहिशेबीपणे सुरू झालं. कालांतराने नोकरी गेली. राधाची नोकरी होती. प्रेमविवाह होता त्यांचा. परक्या जातीमुळे तिचं माहेरही तुटलं होतं. तिच्याकडे पैसे मागणं म्हणजे याचा अपमान. मग नशेसाठी बाहेर भेटेल त्याला, थापा मारून पैसे मागणं सुरू झालं. फोन लागेना तेव्हा माहितीतले लोक घरी येऊ लागले.. त्यांना टाळण्यासाठी, एकूणच मनस्ताप टाळण्यासाठी, दोघं नव्या मुंबईत भाडय़ाच्या जागेत राहू लागले. तिथे त्याच्या व्यसनमुक्तीसाठी तिनं जिवाचं रान केलं, त्रास सहन केला.. दोघातले ताणतणाव वाढत गेले, एक दिवस तिच्या बाजूने ते कायमचे संपले. अघोरीपणे.’
शांतामावशींना बोलवेना. मन हळवं झालं की पाणी डोळ्यात येतंच. ‘राहू दे, मावशी. त्रास होतोय तुम्हाला..’
‘त्रास सगळा तिनेच सहन केला रे. त्यातून माहेर कायमचं दुरावलेलं. संशयित नजरा, पोलिसी चौकशा.. घरगुती गॅसमुळे झालेला अपघात हा निष्कर्ष! पूर्वी लोक मला ‘श्यामची आई’ म्हणायचे तेव्हा मन धास्तावायचं. ‘त्या’ श्यामचा शेवट चटका लावणारा. माझ्या श्याममुळे राधेच्या आयुष्याचा शेवट झाला, ही रुखरुख कायम असतेच. संस्कार करण्याच्यादेखील मर्यादा असतात रे. नंतर सारं ज्याच्या त्याच्या सारासार विवेक बुद्धीवरच असतं, हे तेव्हा जाणवलं. दरम्यान मेघनादेखील कायमची माहेरी परत आलेली.. हे आघात श्यामच्या बाबांना सहन नाही झाले. तेही गेले. राधेचा जसा शेवट झाला, ते पाहून श्याम थोडाफार भानावर आला खरा, पण तोपर्यंत रोग आवाक्याबाहेर गेला होता..’ मावशींनी पदराने डोळे कोरडे केले.
‘मेघना म्हणजे ‘चिंधी’च ना, मावशी?’
‘तुला आठवतेय अजून चिंधी?’ त्यांच्या चेहऱ्यावर सावरल्याचे भाव. ‘तुमच्या व्हरांडय़ात आम्ही, मी आणि श्याम, अभ्यास करायचो चटईवर पसारा मांडून तेव्हा ती मध्ये बसून भरपूर खोडय़ा करायची, मिळेल त्या कागदाच्या चिंध्या करायची, म्हणून आम्ही तिला ‘चिंधी’ म्हणायचो.
‘आयुष्याच्यादेखील चिंध्याच झाल्या रे तिच्या. तिचादेखील प्रेमविवाहच. हल्लीच्या प्रेमाची तर गंमतच असते. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हे सगळ्यांना नाही जमत. जावयाचं पुन्हा ऑफिसात कुणाशी प्रेम जमलं. एक दिवस त्याने मेघनासमोर घटस्फोटाचे पेपर्स टाकले. अपमान सहन न होऊन कुठल्याही मागण्या-अपेक्षा न ठेवता तिनं सही केली, अन् पाच वर्षांच्या मंदारला घेऊन थेट माहेरी आली. तिला पर्याय तरी होता. आता कॉलेजात मानसशास्त्राची प्रोफेसर आहे, होईल दोन-तीन वर्षांत निवृत्त.. माहेर हे लागतंच रे!
‘मंदारदेखील आता मोठा झाला असेल चांगलाच..’
‘मोठा तर झालाच, पण वळणावर गेला.. शाळेत असेपर्यंत तो बापाचा तिरस्कार करायचा. कॉलेजात गेल्यावर जग पाहिलं, पैशाचं महत्त्व कळू लागलं, मुख्य म्हणजे स्वार्थ कळू लागला. बापाचा गडगंज पैसा, प्रॉपर्टी. दुसऱ्या लग्नापासून जेव्हा मूलबाळ झालं नाही, तेव्हा बापाला मुलगा आठवला, लहानपणी झिडकारलेला. सध्या मंदार उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असतो. क्वचित काही अपरिहार्य कारणानं फोन झालाच, तर तेवढाच त्याचा आमचा संबंध! मेघना कधी कधी विरक्तीनं म्हणते, आई, खरं सांगू, ना पुरुषांना कधी स्त्रियांचं मन कळलं, ना स्त्रियांना कधी पुरुषांचं. आम्ही नुसती पोपटपंची करतो कॉलेजात मानसशास्त्राची..अशिक्षित बहिणाबाईला किती सहज मन कळलं!
शांतामावशी शांत झाल्या. मी सु्न्न. एकदम हसून त्या म्हणाल्या, ‘कंटाळलास ना ‘कर्मकहाणी’ ऐकून?’
‘नाही मावशी, प्रश्न पडलाय की, इतकं सारं घडूनदेखील तुम्ही आज इथं देवळात आहात. अजूनही विश्वास आहे देवावर?’
क्षणभर विचार करून मावशी सहजतेनं बोलू लागल्या, ‘विश्वास असणाऱ्यांसाठी देव असतोच रे. इतरांचं माहीत नाही. माहेर सोडून इथं मुंबईत आले, त्याला ६५ र्वष झाली. माहेर १५ र्वषच लाभलं. आधी बाबा गेले, मग आई. नंतर दोन्ही भावांच्या संसारात मी पाहुणीच. माहेरवाशीण नव्हते कधीच. गेली ५० र्वष देऊळवाडी हेच माझं माहेर, अन् विठ्ठल-रखुमाई हेच ‘माय-बाप-बंधू-भगिनी’!.. कसं असतं, सगळी सुख-दु:खं आपली आपणच निर्माण करतो, अन् देवाला-दैवाला दोष देत बसतो. दु:खाच्या रेषेपुढे, दु:खाला छोटे ठरविणारी मोठी सहनशक्तीची रेषा काढता आली पाहिजे. तेवढं पुरेसं असतं. ते बळ, ती शक्ती मला इथं मिळत असेल कदाचित. तसेही हे सारे मनाचेच खेळ आणि मन तर अथांग, या मूळ स्वयंभू शक्तीसारखं! या शक्तीला शरण गेलं की मन शांतावतं, स्थिरावतं. आता तर दृष्टीच कमी झाल्यामुळे ही खऱ्या अर्थानं ‘अंधश्रद्धा’ असेल कदाचित..’ असं म्हणून त्या मोकळ्या हसल्या. पुढे म्हणाल्या, ‘श्रावणातल्या सात वारांच्या कहाण्या असतात ना, तशी ही आठव्या वाराची ‘परिवारा’ची कहाणी. काही कहाण्या सफळ संपूर्ण, काही विफल अपूर्ण!’ मी नमस्कार करून उठलो. त्यांनी माझे दोन्ही हात धरले, तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले. कदाचित श्यामसाठी.
‘येत जा रे या बाजूला आलास की. या वेळी मी इथंच असते.. ‘बोलावणं’ आल्याशिवाय कुठं जाणार नाही, नक्की!’ स्वत:च्याच या वाक्यावर त्या मंदशा हसल्या खऱ्या, पण सुरकुतलेल्या गालावर, रोखून धरलेले अश्रू ओघळलेच!