पंडित जसराज

आजही अष्टोप्रहर माझ्या तनामनात फक्त

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!

संगीतच रुणझुणत असतं. माझं गाणं आणि जगणं एकमेकांत बेमालूम मिसळून गेलं आहे. संगीत हाच माझा ईश्वर आहे. त्या ईश्वरात मी विलीन झालो आहे. ही खरोखर ईश्वरी कृपा आहे की आज वयाच्या नव्वदीतही मी संगीताच्या मैफिली करू शकतो. रसिकांना रिझवू शकतो. आजही घरी लोकांची वर्दळ असते. सतत माझा फोन वाजत असतो. निवृत्तीचं वय आपण साठ मानतो, पण मी नव्वदीतही अजून निवृत्त नाही झालो.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट! एका मैफिलीत मी ‘अल्ला मेहेरबान’ गायलो. खरं सांगतो ती अद्भुत अनुभूती होती. मी गाणं सुरू केलं आणि अलमाच्या आळवणीवर माझ्या शरीरात जणू वीज चमकली. ऐसे लगा जैसे भगवान ने मेरी गात्रवीणा छेडी है! ओम्  गाताना अल्ला दिसत होता आणि अल्लाची आळवणी करताना समोर कृष्ण! आज वयाच्या नव्वदीला मी या विचाराने अस्वस्थ होतो की माझं गाणं ‘त्याच्या’पर्यंत पोहोचतंय ना?  मी प्यासा आहे. कृष्ण भगवान मुझे कब दर्शन देंगे? असं वाटत असतानाच मला जाणवतं, तुमच्या रूपाने, जनतेच्या रूपाने जनार्दनाचंच दर्शन घडतं ना मला! मैफिलीत मी ‘जय हो’ करतो. याचा अर्थ रसिकांचं प्रेम मी स्वीकारत आहे. भगवान, गुरू मातापिता यांना वंदन करतो. गाताना काही चूक झाली तर म्हणून आधीच क्षमा मागतो आणि मगच साऽ लावतो. जी माणसं संगीतावर खरखुरं प्रेम करतात ते हेच मानतात की साऽ छान लागला की ते संगीत शास्त्रीय आहे, सुफी आहे की सुगम संगीत त्याने काय फरक पडतो? भगवान जिसे प्यार करता है उसी को संगीत की देन देता है! ‘त्याची’ इच्छा असेल त्याच्याच कंठाला सप्तसुरांचं देणं लाभतं, म्हणूनच चर्च, मंदिर, मस्जीद कोठेही ईश्वरासमोर नतमस्तक होताना मी मन:पूर्वक गात असतो.

दररोज प्रसन्न मनाने मी दीड तास पूजा करतो. मस्त मजेत ताना, पलटे घेत गात गात पूजा करतो. पूजा करतानाचा हा रियाझसुद्धा मी ईश्वरालाच अर्पण करत असतो. अष्टोप्रहर माझ्या तनमनात फक्त संगीतच रुणझुणत असतं. आज माझं गाणं आणि जगणं एकमेकांत बेमालूम मिसळून गेलं आहे. त्यामुळे माझा देह, आत्मा, मन, बुद्धी ही संगीतानेच व्यापून टाकलंय. संगीत हाच माझा ईश्वर आहे. त्या ईश्वरात मी विलीन झालो आहे.

ही खरोखर ईश्वरी कृपा आहे की वयाच्या नव्वदीतही मी संगीताच्या मैफिली करू शकतो. रसिकांना रिझवू शकतो. रोज माझ्या घरी लोकांची वर्दळ असते. बाहेरगांवाहून, परदेशातूनसुद्धा मला भेटायला लोक येतात. विद्यार्थी येत असतात. संगीत मैफिलींचं आयोजन करणारे आयोजक येतात. माझी मुलाखत घ्यायला वृत्तपत्राचे पत्रकार येतात. मुंबईत असलो की सतत माझा फोन वाजत असतो. निवृत्तीचं वय आपण साठ मानतो, पण मी नव्वदीतही अजून निवृत्त नाही झालो. लोकांबरोबर संवाद साधताना मला जितकी मजा येते तितकाच कौटुंबिक गप्पा गोष्टींतही मी रमतो. खेळ, राजकारण या विषयांवरचे लेख वाचून मी कुटुंबीयांबरोबर त्यावर खूप चर्चा करतो. टीव्हीवर चित्रपट, खेळाचे सामने बघण्यात माझा वेळ खूप मजेत जातो. अगदी टीव्हीवरच्या जाहिराती, जागतिक राजकारण यांचंही मला वावडं नाही.

रोजचा असा व्यस्त दिनक्रम मला झेपतो. कारण माझ्या आरोग्याकडे सर्वजण जातीने लक्ष घालतात. माझा स्वीय सहायक सुरेश नेमाने माझं रक्तदाब, शुगर तपासतो. त्याचा रिपोर्ट न चुकता माझी लेक दुर्गाला देतो. आहार- विहाराबाबत मी स्वत:ही खूप चोखंदळ आहे. कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ खात नाही. अत्यंत सात्त्विक आहार घेतो. मी पूर्ण शाकाहारी आहे. पूर्वी मी संध्याकाळी टोस्ट, पोहे घेत असे. हल्ली मला खांडवी, ढोकळा असे प्रकार आवडू लागले आहेत. रात्री जेवणात सूप हवंच. मशरूम, दुधी भोपळ्याचं सूप.. गरमागरम खिचडी, तीसुद्धा भरपूर साजूक तूप घालून खायला मला फार आवडते. पण आवडतं म्हणून मी खूप खात नाही. मी कमालीचा मिताहारी आहे. एकदा आशाजी दुर्गाला गमतीने म्हणाल्या, ‘‘साधारणपणे गवय्ये खवय्येही असतात. पण तुझे बापुजी इतकं कमी खाऊन काय जबरदस्त गातात!’

आहाराइतकाच व्यायामही महत्त्वाचा. मी रोज न चुकता श्वसनाचे प्रकार करतो. फिरायला जातो. फिरण्याची एक गंमत आहे. पाच हजार कदम, हजार कदम असा हिशोब करून मी चालतो. हा हिशोब मला आता मस्त जमायला लागला आहे. आजही कार्यक्रमांच्या निमित्ताने माझे दौरे सतत चालू असतात. फक्त आता एकच फरक झाला आहे. पूर्वी ज्या शहरांत कार्यक्रम असेल तिथे पहाटेच्या फ्लाईटने  मी जात असे आणि संध्याकाळी कार्यक्रम करत असे. आता मात्र संध्याकाळची फ्लाईट घेतो. दोन रात्री मुक्काम करतो. त्यानंतरच कार्यक्रम करतो. अर्थात हे मधले दिवस विश्रांतीचे कधीच नसतात. उलट प्रचंड ताणाचे असतात. परिचित, रसिक श्रोते माझ्या स्विटमध्ये, हॉटेलच्या लॉबीत वाट बघत बसलेले असतात. प्रत्येकाला माझ्याशी दोन मिनिटं का होईना त्यांना बोलायचं असतं. भेटायचं असतं. काही त्या शहरातले जुने परिचित असतात. त्यांच्या माँ, बहेन, नानीची मी आवर्जून चौकशी करतो याचा त्यांना खूप आनंद होतो. बरेचदा स्थानिक प्रसारमाध्यमंही येतातच. खूप वेळा स्थानिक प्रतिष्ठित अथवा कार्यक्रमाचे आयोजक भेटायला येतात. त्यांना वेळ द्यावा लागतो. ही व्यस्तता हा माझ्या जीवनाचा अपरिहार्य भाग झाला आहे. लोकांना भेटून मला गाण्याची ऊर्जा मिळते हे मात्र तितकंच खरंय!

आजही वर्षांतून काही महिने मी अमेरिकेत मुक्कामाला असतो. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, फ्लोरिडा, अटलांटा, टोरंटो, व्हॅनकुवर इथे माझ्या नावे म्युझिक स्कूल्स आहेत. तिथे मी रोज माझ्या विद्यार्थ्यांना आवर्जून शिकवतो. अर्थात फक्त जुन्या जाणत्या, विद्यार्थ्यांना! रोज मी रतन मोहन शमाजींचा मुलगा स्वर याला गाणं शिकवतो. मुंबईत असलो तर दोन तास आणि अमेरिकेत असलो तर व्हिडीओद्वारे! अमेरिकेतही जागोजागी माझे कार्यक्रम होत असतात. रसिक श्रोते माठय़ा संख्येने हजेरी लावतात. परदेशस्थ लोकांचं संगीतप्रेम मला भारावून टाकतं. मी तिथे असलो तरी हिंदुस्थान माझ्याबरोबरच फिरत असतो म्हटलं तरी चालेल. मी लंडन, दुबई, कतार, जर्मनी.. कुठेही असतो.. संपूर्ण माहौल जणू माझ्यासारखाच होतो. मला भेटायला येणारे लोक भारतीय असो वा पाश्चात्त्य. ते मला रुचेल असाच पेहराव करून येतात. त्यांचं वागणं, बोलणं, देहबोली, अभिरुची इतकी उच्च स्तरावर पोहोचलेली असते की ते भेटायला येताना माझ्यासारखेच भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली येतात. कुणीही कधीही उथळपणे माझ्या सामोर येत नाही याचं मला फार कौतुक वाटतं. मी स्वत:ही कोणालाही भेटतो त्यावेळी मी माझ्या वेशभूषेबाबत चोखंदळ असतो. पन्नाशीत होतो त्यापेक्षा आता मी कपडय़ांबाबत अधिक काटेकोर झालो आहे. केवळ कपडेच नव्हे आरोग्य, जीवनशैलीबाबत मी अत्यंत शिस्तप्रिय आहे. माझ्या प्रत्येक कृतीमागे सारासार विचार असतोच.

घरी असतो तेव्हा माझे कुटुंबीय माझी जेवढी काळजी घेतात तितकीच अमेरिकेत माझे विद्यार्थी, तृप्ती, रतनभैया अपार काळजी घेतात. कधी कधी दुर्गा माझ्यासोबत अमेरिकेत राहते. मध्यंतरी दिल्लीत लागोपाठ दोन कार्यक्रम होते तेव्हा माझी पत्नी मधुरा माझ्यासोबत होती. असं असूनही कधी कधी अचानक एखादी समस्या उद्भवते. पाच वर्षांपूर्वी एकदा अचानक माझा आवाज बसला. खूप डॉक्टर्स झाले. औषधोपचार झाले. चार महिने मी कार्यक्रम करत नव्हतो. पण काही कार्यक्रम पूर्वनियोजित होते. अशा वेळी प्रायोजकाची काळजी असते. मग मी आणि दुर्गाने मिळून कार्यक्रमाची वेगळी आखणी केली. अनेक कार्यक्रमांमध्ये अगदी सवाई गंधर्व, गुणीदास संमेलनातही दुर्गा मला बोलतं करत असे. माझे विद्यार्थी गात. मध्येमध्ये मीसुद्धा गात असे. दरम्यान मी स्पीच थेअरपी केली. डॉक्टरांनी माझे श्वसनाचे प्रकार बदलले. मी माझं गाण्याचं तंत्र बदललं. लोकांना प्रश्न पडला की मी या वयात हयातभर जपलेलं गायनाचं तंत्र कसं काय बदललं?  वयानुसार येणाऱ्या मर्यादा आणि क्षमतांच्या स्वीकार करून मी परिस्थितीशी जुळवून घेतलं. मला वाटतं, आपण आपल्या शरीराला आणि वयाला कधीही आव्हान द्यायचं नाही. मर्यादांच्या कक्षेत राहून कलेच्या माध्यमातून लोकांना आनंद देणं, हेच माझं परमकर्तव्य आहे. असं मला वाटतं. आजवरच्या आयुष्यात कितीही मानसन्मान मिळाले, रसिकांचं अलोट प्रेम लाभलं तरी मी उच्चस्थानी पोहोचलो आहोत, असं मला वाटत नाही. आयुष्यात जर आपण संतुष्ट झालो, काही इच्छाच उरली नाही तर जिंदगी खतम! उगवणारा सूर्य रोज तुम्हाला नव्या जीवनाचं दान देतो ते दान स्वीकारून आपण जगावं. ज्या दिवशी तुम्ही नव्या दमाने दिवसाचं स्वागत करणार नाही तो तुमच्या आयुष्यातला अंतिम दिवस असेल! त्याचा वयाशी तीळमात्र संबंध नाही. आखीर उम्र तो उम्र होती है! वह बढती या घटती नहीं! तुम्ही स्वत:ला तरुण ठरवत असाल तर तीच तुमची उम्र!

मी स्वत:ला तरुण ठरवतो. म्हणूनच युवा पिढीच्या गायकांचं मला कौतुक वाटतं. केवढी तयारीने गातात ही मुलं! तंत्रज्ञानाचा आधार घेत विश्वभरात संगीतसाधना करतात. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, पूर्वीचं संगीत हिमालयासारखं होतं. आज ते महासागरासारखं विस्तारित झालंय. सर्वदूर पसरलंय. संगीत कभी भी खत्म नहीं होगा! हां कभी कभी उसमें त्सुनामी जरूर आयेगी. त्यावर स्वार व्हायला जीवनाच्या प्रत्येक अंगात उत्तम गुणवत्ता असायला हवी. परफेक्शनचा अट्टहास हवा. मी माझ्या घरातील प्रत्येकापर्यंत हा विचार आग्रहाने पोहोचवतो. अर्थात ही नवीन पिढीसुद्धा आपली मतं, निरीक्षणं परखडपणे मांडते. अदबीने माझ्याशी वादही घालते. पण जी गोष्ट माझ्या आकलनाच्या कक्षेत येत नाही ती मी मोकळेपणाने स्वीकारतो. मान्य करतो. आमचे वाद मग हसत खेळत संपुष्टात येतात. हल्ली तर मी चिडलो की घरचे लोक  गमतीने म्हणतात, बापूजी थोडा वेळ आराम करा. म्हणजे तुम्ही शांत व्हाल. मग मला आणखीच राग येतो. पण तो सगळा गमतीचा भाग असतो.

आज नव्वदाव्या वर्षी कोणत्याही मैफिलीला सामोरं जाताना मी प्रसन्न असतो, कारण मला ठाऊ क आहे, त्या जगन्नियंत्याच्या निर्मितीचा मी एक कण आहे. त्यामुळे ‘मी’ गात नसतो. गानेवाला ‘वो’ है! सुननेवाला ‘वो’ है और सुनानेवाला भी ‘वो’ है। त्या ईश्वराने आपल्यासाठी जी प्राक्तनाची रेखा रेखली आहे त्या रेषेवर आपण विनातक्रार चालत राहिलो तर जिंदगी आसान होती है। ये पूरी तरह शरणागत अवस्था है। माझ्या जीवनभवरच्या संगीतसाधनेचं हे अमृतमय फलित आहे. जय हो!

शब्दांकन – माधुरी ताम्हणे

chaturang@expressindia.com