31 October 2020

News Flash

इटुमिलानी

'इटू' त्याच मातीतली. हिंबांच्या, मंडेलांच्या, पोप टुटुंच्या. इटूच्या डोळय़ांतलं गूढ मला हिंबांच्या गूढ गोष्टीशी जोडावंसं वाटतं आहे. हे सगळं वाटतं तितकं एकमेकांपासून दूर किंवा तुटलेलं

| May 31, 2014 01:01 am

‘इटू’ त्याच मातीतली. हिंबांच्या, मंडेलांच्या, पोप टुटुंच्या. इटूच्या डोळय़ांतलं गूढ मला हिंबांच्या गूढ गोष्टीशी जोडावंसं वाटतं आहे. हे सगळं वाटतं तितकं एकमेकांपासून दूर किंवा तुटलेलं नाही. या सगळय़ाला जोडणारा एक अदृश्य धागा आहे, असा विश्वास ठेवावासा वाटतो आहे.
ती मला पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेतल्या ‘जोहान्सबर्ग’मधल्या ‘फ्ली मार्केट’मध्ये दिसली. ‘फ्ली मार्केट’ हा कृष्णवर्णीय लोकांनी स्वत:च्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा मोठा बाजार आहे. आफ्रिकेत या कृष्णवर्णीय लोकांच्या अनेक जमाती आहेत. या बाजारात या वेगवेगळय़ा जमातींनी बनवलेल्या अनेक रंगीबेरंगी वस्तू आहेत. मण्यांपासून बनवलेले दागिने, कपडे, वेताच्या, मण्यांच्या टोपल्या, दगडी, लाकडी पुतळे, मुखवटे, शहामृगाच्या अंडय़ावर हातांनी रंगवून काढलेली वारलीसारखी पक्ष्याप्राण्यांची चित्रं, पिसांपासून बनवलेले धनुष्यबाण, कुणाकुणाच्या कातडय़ापासून बनवलेली वाद्यं अशा शेकडो सुंदर वस्तू तिथे आपली वाट पाहत सजून बसलेल्या असतात. या वस्तूंचे मालक असलेले अनेक कृष्णवर्णीय तिथे आपल्याला बघताच त्याच्या आफ्रिकी उच्चारांत ‘वेलकऽऽम् आयु फॉम इंडिया सिस्ट ऽऽ.’ आय वी शो यु सम ब्युटीफुल थीन्स!’’ असं म्हणत आपल्याला त्यांच्या दुकानात आग्रहाने नेऊन अवाच्या सव्वा किमती सांगून लगेच म्हणतात, ‘ हे सिस्ट ऽ टेल मी युवर प्राईस. वौटिस युवस प्राईस सीस्ट  ऽऽ’
या बाजारातल्या नागमोडी गल्ल्या घेत मी पुढे जात असताना एका छोटय़ाशा दुकानातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात ती मला दिसली. पाहताक्षणी माझे डोळे तिच्या डोळय़ांत अडकले. तिचे लोकरीचे काळेभोर केस मोकळे होते. ती कृष्णवर्णीय होती. तिनं अंगात केशरी आणि काळय़ा चौकटींचा बिनबाह्य़ांचा फ्रॉक घातला होता. त्यातून तिचे बिनबोटांचे कृष्णवर्णीय गोबरे हात तेवढे दिसत होते, पाय झाकलेले. तिच्या तोंडाच्या जागी एक केशरी अर्धगोल स्मित होतं आणि नाकाच्या जागी लोकरीची दोन काळी टिंबं.. तिला पाहताक्षणी मला माझ्या लहानपणच्या बाहुलीची, ‘पिट्ट’ची आठवण झाली. माझे डोळे तिच्यावरून हटत नाहीत हे त्या दुकानाच्या मालकानं हेरलं आणि लगेच तिची किंमत माझ्या तोंडावर फेकली, ‘अडीचशे रॅण्डस्!’ लगेच मी मनातल्या मनात एक रॅण्ड म्हणजे सात रुपये, अडीचशे गुणिले सात म्हणजे सतराशे पन्नास! असा हिशोब केला आणि ‘इतकी महाग बाहुली नकोच!’ असं म्हणून तिथून चालायला लागले. पण तिला पाहण्याआधीची मी आणि तिला पाहिल्यानंतरची मी एकच नव्हते. त्या दुकानापासून स्वत:ची समजूत घालत दूर जात असताना माझं खूपसं काही तिथंच राहिलं आहे असं वाटत होतं. ती माझ्या लहानपणच्या बाहुलीसारखी होती, या पलीकडे तिच्यातलं काहीतरी मला बोलवत होतं. ते काय होतं हे न कळून मी नुसतीच अस्वस्थ होऊन तिथून निघाले. जाताना पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे. गूढ.! ते मला पुन्हा अडकवतील या भीतीनं घाईनं तिथून निघाले.
दुसऱ्या दिवशी माझा दक्षिण आफ्रिकेतला मित्र राजीव तेरवाडकर दुसऱ्या काही कामासाठी पुन्हा ‘फ्ली मार्केट’ला जाणार होता. मी त्याच्याबरोबर पुन्हा त्या गल्ल्यांमध्ये पोचले. मी तिथे पुन्हा पाय ठेवला आणि दुसरंच कुणीतरी माझ्यावर नियंत्रण करत आहे असं वाटायला लागलं. मला काही कळायच्या आत मी पुन्हा एकदा ‘ती’ असलेल्या दुकानासमोर उभी होते. ती अजूनही त्याच कोपऱ्यात तशीच होती. त्या दुकानाचा मालक दिसताच मला एकदम कसनुसं झालं. मी पुन्हा त्या बाहुलीसाठी आले आहे हे त्याला कळायला नको म्हणून मी खूप तटस्थपणे इतर वस्तूंकडे पाहत राहिले. त्यानं मला ओळखू नये असं फार वाटत होतं. पण तो लगेच म्हणाला, ‘हे सिस्ट ऽ आय नो यू.. यू वॉन्ट हऽऽ?’ असं म्हणून त्यानं तिला त्या कोपऱ्यातनं उचलली आणि पुन्हा माझ्या हातात ठेवली. मी भारल्यासारखी तिच्यात अडकत असतानाच राजीव त्याचं काम संपवून मला शोधत तिथे आला. मी त्याला (दुकानदाराला कळू नये म्हणून) मराठीत म्हटलं, ‘मला ही हवी आहे. तो अडीचशे म्हणतो आहे. त्याला खाली आण?’ राजीव म्हणाला, ‘कितीला हवीय तुला?’’ मी दडपून म्हटलं, ‘पन्नास.’ राजीव बेधडक त्या दुकानाच्या मालकाला म्हणाला, ‘आय टेक हर फॉर फिफ्टी’ तो मालक हसत म्हणाला, ‘आयु किडिंग!         फी ऽऽप्तीऽऽ नोऽऽ!  
‘आय गीव यू फॉर वन फिफ्ती’ मी चेहऱ्यावर बेदरकार भाव आणले आणि तिला त्याच्या हातात आदळून तिथून निघाले.  राजीव दुसऱ्या काही दुकानांत काही वस्तू घ्यायला लागला. माझं कशातच लक्ष लागेना. हळूहळू मार्केट बंद व्हायची वेळ आली. दुसऱ्या दिवशी मी भारतात यायला निघणार होते. ती बाहुली आता कायमची अंतरली म्हणून उदास वाटायला लागलं होतं. राजीवचं काम होऊन आम्ही निघण्याच्या बेतात असतानाच मला तो दुकानाचा मालक माझ्या दिशेने येताना दिसला. तो २०-२२ वर्षांचा, कुरळय़ा केसांचा, धिप्पाड कृष्णवर्णीय मुलगा होता. त्याच्या हातात एक कागदाचं बंडल होतं. तो थेट चालत माझ्याकडे आला. ते बंडल पुढे करून म्हणाला,‘तेक इट, शी इज युवर्स आय गीव हऽ फॉ हंद्रेद’ मी झडप घालून ते बंडल ताब्यात घेतलं. त्याला म्हटलं, ‘सिक्टी!’ तो म्हणाला, ‘हे सीस्टऽऽ ओके गीव मी सेवन्टी, आय गीव यु डॉल प्लस माय डान्स!’ असं म्हणून तो चक्क माझ्यासमोर नाचायला लागला. कुठल्याही संगीताशिवायचा तो सुंदर नाच! माझा घासाघिशीचा सूर क्षणात विरघळला. मला तो एकदम आवडूनच गेला! तो मनापासून हसत नाचत राहिला. मीही हसून त्याला सत्तर रॅण्डस दिले तेव्हा तो थांबला. मी म्हटलं, ‘हे ब्रो, आय वील नेव्हर फरगेट यु.. थँक्यू फॉर द डॉल अ‍ॅण्ड धिस ब्युटीफुल डान्स!’ तो म्हणाला, ‘शी वॉज युवर्स, शी केम टू यु!’ आणि निघून गेला. मी ते बंडल उघडलं आता ती कायमची माझी झाली होती. शेजारी उभ्या असलेल्या राजीवला म्हटलं, ‘तू इतके र्वष इथे राहतो आहेस. एखादं छान दक्षिण आफ्रिकी नाव सांग ना हिच्यासाठी..’ तो म्हणाला, इटुमिलानी.. म्हणजे ‘हॅपीनेस!’ मी भारतात आल्या आल्या तिला माझ्या नवऱ्याच्या, संदेशच्या हातात ठेवून म्हटलं, ‘ही आपली मुलगी, इटुमिलानी!’ तो ही माझ्यासारखाच तिच्या डोळय़ांत अडकला. म्हणाला, ‘मला ही आवडली.’
‘इटू’ आल्यापासून सगळय़ांनाच आवडते आहे. तिच्या डोळय़ांत सगळय़ांनाच अडकायला होतं आहे. ते डोळे मोठय़ा माणसाचे आहेत. माफ करणारे, सामावणारे. ती आल्यापासून वाटत होतं ते गूढ डोळे काही सांगू पाहत आहेत. ती माझ्याकडे येणं हे प्राक्तन वाटतं आहे. या सगळय़ांची कारणं माझ्याकडे नाहीत. हे माझं ‘वाटणं’ आहे. या ‘वाटण्याचं’ एक कारण आयुष्यानं नुकतंच माझ्यासमोर आणलं आहे असं वाटतं आहे.
 संदेशनं काही दिवसांपूर्वी एका दक्षिण आफ्रिकी जमातीविषयी एक दैवी गोष्ट सांगितली. त्या जमातीचं नाव ‘हिंबा.’ या लोकांच्यात बाळाचं वय हे ते जन्मल्यापासून नाही, तर त्याच्या आईच्या मनात त्या बाळाचा विचार येतो त्या दिवसापासून मोजलं जातं. तो विचार त्या आईच्या मनात येताच ती दूर कुठेतरी एका झाडाखाली जाऊन बसते. तिथं तिला तिच्या त्या मनातल्या बाळाचं गाणं ऐकू येतं. ते ऐकून ती परत येते. तिला ज्याच्यापासून बाळ हवं असेल त्या पुरुषाला ती ते गाणं शिकवते. ते संग करतात. ते बाळ तिच्या पोटात वाढायला लागल्यापासून ती अनेकदा ते गाणं म्हणते. ते बाळ जन्मायला येईपर्यंत गावातल्या सगळय़ांना ते गाणं यायला लागलेलं असतं. बाळ जन्मतं तेव्हा अख्खं गाव त्याचं गाणं म्हणतं. ते बाळ मोठं होत असताना त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक विशेष क्षणी सगळं गाव त्याच्यासाठी ते गाणं म्हणतं. लग्नाला, सणासुदीला. मोठं झाल्यावर जर त्या जिवाकडून काही गुन्हा घडला तर त्याला शिक्षा केली जात नाही. त्याला मध्ये ठेवून सगळं गाव त्याच्याभोवती रिंगण धरतं आणि फक्त त्याचं गाणं त्याला ऐकवतं. बास! त्या गाण्यातनं त्याला सांगतं, ‘तू असा आहेस, हे गाणं म्हणजे तू आहेस, ही तुझी ओळख.’ गुन्हा म्हणजे तरी काय.. त्या क्षणापुरती आपण आपली विसरलेली ओळख! आतली ती हललेली ओळख त्या गाण्यातनं गाव परत आणून देतं आणि तो वाभरलेला चुकला जीव पुन्हा वाटेवर येतो. शांत होतो. त्या जिवाच्या मरणक्षणी त्याचं गाणं पुन्हा एकदा गायलं जातं, त्याला निरोप देण्यासाठी. हे गाणं गाणारे ‘हिंबा’ ज्या मातीत राहायचे त्याच मातीत ‘इटू’ बनली आहे. तिथल्याच काळय़ा हातांनी तिला बनवलं आहे. मध्ये एका व्याख्यानात ऐकलं होतं, कुठलाही जीव जेव्हा जातो तेव्हा त्याचं शरीर जातं, पण त्याचे अणू-रेणू भवतालात तरंगत राहतात. ते आपल्या आसपास असतात. आपण जर त्या व्यक्तीच्या विचारांचं चिंतन केलं तर ते अणू-रेणू आपल्याकडे आकर्षित होतात. आपण कुणाचे आणि कुठले विचार करतो त्यावर कुणाचे आणि कुठले अणू-रेणू किंवा जीवनकण आपल्या आसपास, आपल्या आत येतील हे ठरेल. कुणी सांगावं, मी जर एखाद्या आंधळय़ा माणसाला रस्ता ओलांडून दिला तर माझ्यात मदर तेरेसांचा एखादा अणू येईलसुद्धा! या सगळय़ाला पुरावा आहे का माहीत नाही. मला हे सगळं ‘हिंबां’च्या गोष्टीसारखं गूढ वाटतं. म्हणून यावर विश्वास ठेवावासा वाटतो. म्हणून मी परदेशात किंवा भारतात सुद्धा मोठय़ा व्यक्तींच्या जन्मगावी, त्यांच्या जतन केलेल्या घरांमध्ये अवश्य जाते. दक्षिण आफ्रिकेला ‘सोवेतो’ गावी एक रस्ता आहे. तो जगातला एकमेव रस्ता आहे. जिथे दोन नोबेल पुरस्कार विजेते एकमेकांपासून काही पावलांवर राहतात. एक अर्थातच नेल्सन मंडेला आणि दुसरे दक्षिण आफ्रिकेचे आर्च बिशप डेस्मन टुटु. मी माझ्या तिथल्या मित्राला, राजीवला म्हटलं, ‘मला या ठिकाणी जायचं आहे. तिथे जाऊन त्या दोघांच्या घरांसमोर साष्टांग दंडवत घातला. मनात म्हटलं, ‘तुमचे अणूरेणू इथे आहेत का.. मंडेला नाहीत पण पोप तर आहेत. तुमच्या श्वासोच्छवासातून ते आसपास आहेत का? त्यातले काही तरी माझ्या आत पाठवा. तुमच्या विचारांनी जगात एवढा बदल घडवला. मला खारीएवढा तरी बदल घडवण्याची शक्ती द्या. माझ्या हातून चांगलं काम होऊ द्या.’
मी सध्या ‘रोआल्ड डाल’ नावाच्या एका फार मोठय़ा लेखकाचं पुस्तक वाचते आहे. तो लहान मुलांसाठी पुस्तकं लिहायचा. त्याची ‘चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी’ आणि ‘बी.एफ.जी’ ही पुस्तकं मला विशेष आवडतात. ‘बी.एफ.जी.’ हा माणसं न खाणारा एक अत्यंत चांगल्या मनाचा राक्षस असतो. तो रात्रीच्या नीरव शांततेत त्याच्याकडच्या ट्रंपेटमधून झोपलेल्या लहान मुलांच्या मनात छान छान स्वप्नं फुंकत असतो. त्याची गोष्ट त्याच्याच तोंडून ऐकणाऱ्या त्या पुस्तकातल्या छोटय़ा मुलीला हे सगळं अविश्वसनीय वाटतं. तेव्हा तो राक्षस तिला म्हणतो, ‘मी तुला भेटण्याआधी तुला राक्षस नाहीत असंच वाटायचं ना?’
मला गूढ गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो. आंधळा नाही, डोळस विश्वास. हिंबाच्या गोष्टीला किंवा त्या अणू-रेणूंच्या थिअरीला पुरावा आहे का माहीत नाही. पण या सगळय़ावर माझा विश्वास आहे. इतकंच नाही, ‘इटू’ला माझ्या हाती सोपवणारा तो नाचणारा दुकानदार इथे पुन्हा एकदा आठवतो आहे. तोही दक्षिण आफ्रिकेच्याच मातीतला. हिंबांचं अदृश्य अणू-रेणू त्याच्यातही नसतील कशावरून? ‘इटू’ही त्याच मातीतली. हिंबांच्या, मंडेलांच्या, पोपच्या. इटूच्या डोळय़ांतलं गूढ मला हिंबांच्या गूढ गोष्टीशी जोडावंसं वाटतं आहे. हे सगळं वाटतं तितकं एकमेकांपासून दूर किंवा तुटलेलं नाही. या सगळय़ाला जोडणारा एक अदृश्य धागा आहे असा विश्वास ठेवावासा वाटतो आहे. इटूच्या डोळय़ांची माझी गोष्ट रचावीशी वाटते आहे. आता ‘इटू’च्या डोळय़ांत बघताना मला दुरूनसं एक गाणं ऐकू येऊ लागलं आहे. ते गाणं.. माझा जीव वाभरा होईल तेव्हा मला शांत करेल.. काय आहे ते गाणं.. काय म्हणतं आहे ते गाणं.. मी ऐकते आहे.. शोधते आहे.. रचते आहे.. मी ‘इटू’च्या डोळय़ांत बघते आहे, बघतेच आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 1:01 am

Web Title: beautiful doll and dance
टॅग Chaturang,Dance
Next Stories
1 ब्रह्मक्षण
2 पुरस्कार
3 फणा
Just Now!
X