गेल्या ५०-६० वर्षांत दुर्बिणीच्या रचनेमध्ये अफाट वेगाने थक्ककरणारी प्रगती झाली आहे. आज २०१५ साली पचनसंस्थेच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विकारांचं निदान दुर्बिणीतून करणं, एवढंच नव्हे तर त्याच वेळी त्या विकारावर उपचार करणं या गोष्टी तज्ज्ञ डॉक्टरांच्या आवाक्यात आल्या आहेत.

माणसाच्या तोंडापासून गुदद्वारापर्यंत पचनसंस्थेचा मार्ग हा सलग असला तरी वळणावळणाचा आणि लांबलचक आहे. यकृत-पित्ताशय आणि स्वादुपिंड हे अवयवसुद्धा आपापले पाचक रस त्यातच आणून ओततात. पचनसंस्थेत नेमका काय बिघाड झाला आहे हे शोधून काढणं म्हणूनच बरेचदा अवघड काम असतं. रक्त तपासणी, बेरियम एक्स-रे, सोनोग्राफी अशा विविध पद्धतींनी प्रयत्न करून हाती काही लागत नाही. अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं यांच्या थेट आत जाऊन बघायला मिळालं तर? अठराव्या शतकापासून वैद्यक व्यावसायिकांना पडलेल्या या स्वप्नाचं सत्यात रूपांतर झालं जपानमध्ये.
तिथे जठराच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव फार, गाठ बरीच मोठी झाल्यावरच लक्षात यायची. पहिला फायबर ऑप्टिक एंडोस्कोप म्हणजेच पचनमार्गाच्या वळणांमधून लीलया संचार करणारी दुर्बीण इथेच प्रथम वापरली गेली, ते वर्ष होतं १९५० आणि जी कर्करोगाची गाठ दिसून आली, तिचा आकार होता २ ते ३ सें.मी. तेव्हापासून गेल्या ५०-६० वर्षांत दुर्बिणीच्या रचनेमध्ये अफाट वेगाने थक्ककरणारी पदार्थवैज्ञानिक प्रगती झाली आहे. आज २०१५ मध्ये पचनसंस्थेच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विकारांचं निदान दुर्बिणीतून करणं, एवढंच नव्हे तर त्याच वेळी त्या विकारावर उपचार करणं या गोष्टी तज्ज्ञ डॉक्टरांच्या आवाक्यात आल्या आहेत. आजच्या लेखात अत्याधुनिक दुर्बिणीचे विविध उपयोग याविषयी माहिती देणार आहे.
कमालीचा शक्तिमान व्हिडीओ कॅमेरा (२ दशलक्ष पिक्सेल क्षमतेचा) ही आजच्या दुर्बिणीची खासियत. जसजशी दुर्बीण घशातून अन्ननलिकेत आणि पुढे पुढे प्रवास करते तसतसे अत्युच्च दर्जाचे फोटो मिळत जातात आणि आतडय़ांच्या अंतस्तत्वचेवरचे सूक्ष्म बदल त्यातून ओळखू येतात. या त्वचेवर व्हिलस नावाचे बोटासारखे अवयव असतात. या बोटांच्या रचनेत रोगामुळे पडलेला फरक दुर्बिणीतून सुलभतेने दिसून येतो.
डिजिटल क्रोमो-एन्डोस्कोपी या तंत्राने एक विशिष्ट चाळणी (फिल्टर) वापरून ‘अरुंद पट्टय़ाची प्रतिमा’ मिळते. आतडय़ाचा दाह, कर्करोग यामुळे वाढलेला रक्तप्रवाह, नव्याने तयार झालेल्या रोगग्रस्त रक्तवाहिन्या या प्रतिमेत वेगळ्या दिसल्याने तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचं लक्ष तिकडे वेधलं जातं आणि नेमकी त्याच भागात सुई घालून बायोप्सी घेता येते. या तंत्रामुळे रोगनिदानाची अचूकता किती तरी वाढलेली आहे.
‘एन्डोसायटोस्कोपी’ हे अजून एक अद्ययावत् तंत्र. दुर्बिणीतून पाहणी करत असताना ज्या ठिकाणी काहीतरी ‘वेगळं’ दिसत आहे तिथे दुर्बिणीतल्याच एका सूक्ष्म नलिकेतून विशिष्ट रंगद्रव्याचा फवारा मारला जातो. अंतस्त्वचेच्या पेशी अनेक पटींनी मोठय़ा दिसत असल्याने पेशींचे अंतर्गत अवयवसुद्धा त्यात दृग्गोचर होतात, जणू काही पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ही तपासणी व्हावी इतक्या सुस्पष्ट प्रतिमा यात दिसून येतात. रंगद्रव्यामुळे रंगलेल्या रोगपेशी इतर सामान्य पेशींपेक्षा निराळ्या दिसतात. अर्थात हे तंत्रज्ञान खूपच खर्चीक असल्याने त्याचा वापर सरसकट होत नाही.
दुर्बिणीतून सोनोग्राफी होऊ लागल्यापासून आतडय़ांच्या विकारांचं निदान आणि उपचार यामध्ये खरोखर क्रांती झाली आहे. हिचा फायदा असा की ज्या अवयवाच्या पोकळीत दुर्बीण पोहोचली आहे त्याच्या आसपासच्या भागाची प्रतिमाही दिसू शकते. उदा. अन्ननलिकेतील सोनोग्राफी केल्याने छातीच्या पोकळीतील हृदय, फुप्फुस इत्यादी आजूबाजूचे अवयवसुद्धा पाहता येतात तसंच सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली संशयास्पद भागातून बायोप्सी घेता येते. जठरामधून सोनोग्राफी केल्यास जठरामागच्या भागाची पाहणी करता येते. गुदाशयामधून केलेल्या सोनोग्राफीमुळे पोटाच्या खालच्या भागात साठलेला द्रव लक्षात येतो. या सोयीमुळे प्रत्यक्ष पोट उघडून बघावं इतकं स्पष्ट दिसतं. आणि उपचाराचे निर्णय घेणं सोपं होतं. छातीच्या किंवा पोटाच्या पोकळीत साठलेले धोकादायक टाकाऊ पदार्थ-रक्त, पूमिश्रित पाणी किंवा जाडसर द्राव सोनोग्राफीच्या मदतीने बरोबर नेमक्या ठिकाणी सुई घालून बाहेर काढता येतात. क्षारमिश्रित पाणी (सलाइन) घालून ती जागा पुन: पुन्हा धुऊन घेतात. असा हानीकारक द्रव पुन्हा साठू नये म्हणून जिथून सुई घातली त्या छिद्रामध्ये एक धातूची जाळीदार स्प्रिंग ऊर्फ स्टेंट बसवतात जिच्यातून तो द्रव आतडय़ात येत राहतो. पूर्वी अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. असे रुग्ण बहुधा गंभीर आजारी असल्यानं शस्त्रक्रिया अवघडच असायची. आता मात्र शरीराला नको असणारे हे घातक पदार्थ अशा रीतीने स्वच्छ केल्यावर रुग्ण शस्त्रक्रिया करावी न लागता बरा होतो, हे महत्त्वाचं.
पचनसंस्थेचा कोणताही भाग कर्करोग अथवा अन्य विकारामुळे अरुंद झाला असेल तर अन्न पुढे जाण्याचा मार्ग बंद होऊ लागतो आणि रुग्णाला पोटदुखी, अपचन, उलटय़ा वगैरे त्रास होऊ लागतो. दुर्बिणीला जोडलेल्या बलूनच्या साहाय्याने असा भाग पुन्हा रुंद करता येतो. कधी कधी हा अडथळा बराच कडक असल्यानं बलून काम करत नाही. अशा वेळी दुर्बिणीतून सोडता येणाऱ्या लेसर किरणांच्या हत्यारानं अडथळा दूर करता येतो. अन्न पुढे पुढे जाण्याची क्रिया चालू राहते. कर्करोगाची वाढ बरीच झालेल्या रुग्णांना हा उपचार थोडा तरी आराम देऊ शकतो. अन्ननलिका, मोठं आतडं यांच्या रुंदीकरणासाठी ही पद्धत उपयोगी पडते.
पोटाच्या तक्रारींमध्ये यकृत-पित्ताशय आणि स्वादुपिंड या महत्त्वाच्या ग्रंथींचे विकार हे बऱ्याच वरच्या क्रमांकावर असतात. विशेषत: पित्तनलिकेत अडकलेले किंवा स्वादुपिंडनलिकेत शिरून स्वादुपिंडाचा दाह घडवून आणणारे पित्तखडे फारच त्रासदायक ठरू शकतात. अशा वेळी ईआरसीपी ही दुर्बीण क्रिया कामाला येते. यामध्ये दुर्बीण नेहमीच्या पद्धतीने तोंडातून अन्ननलिकेत, जठरात आणि तिथून लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात आणली जाते. तेथे उघडणाऱ्या पित्तनलिकेच्या मुखातून आत प्रवेश केला जातो आणि नेमका अडथळा काय आहे हे पाहून खडा असल्यास तो एका बास्केटमध्ये पकडून आतडय़ात आणला जातो, त्याचे बारीक तुकडे करून ते दुर्बिणीतूनच बाहेर काढले जातात. खडा कडक असल्याने तुकडे करायला कठीण असल्यास लिथोट्रिप्सी पद्धतीने शरीराबाहेरून कंपनशक्तीचा मारा करून खडा फोडता येतो आणि बाहेर काढता येतो. याच पद्धतीने स्वादुपिंड नलिकेत प्रवेश करून तिथे अडकलेले खडेही बाहेर काढता येतात. या दोन्ही नलिकांमध्ये विशिष्ट रंगद्रव्य सोडून एक्स-रे काढल्यास संपूर्ण नलिकाजालाचा नकाशा उपलब्ध होतो आणि त्यावरून पुढे काय करायचं हे ठरवतात. इथेही कर्करोगासारख्या रोगांमुळे नलिका अरुंद झाल्याने आलेला अडथळा बलून वापरून दूर करतात, तसंच मार्ग मोकळा राहण्यासाठी वर वर्णन केल्याप्रमाणे स्टेंटचा वापरही करतात. निकेल टायटनियम मिश्रधातूचे हे स्टेंट आजूबाजूला त्रास न देता कित्येक आठवडे आत राहू शकतात. त्यांच्यावर पेशींची वाढ होऊ नये म्हणून सिलिकॉनचं आवरण घातलेलं असतं. यकृत आणि स्वादुपिंडाच्या तीव्र दुखण्यांमध्ये ही दुर्बीणक्रिया जीवनदायिनी ठरते.
दुर्बिणीतून धातूचे चिमटे वापरून बऱ्याच गोष्टी साध्य करतात. एखाद्या ठिकाणी चालू असलेला रक्तस्राव थांबवण्यासाठी, घेतलेला छेद पुन्हा बंद करण्यासाठी, स्टेंट इकडे तिकडे सरकू नये म्हणून योग्य जागी घट्ट बसवण्यासाठी, तसंच अंतस्त्वचेला झालेला व्रण बंद करताना हे चिमटे उपयोगी पडतात. आतडय़ाला थेट भोकच पडलं असेल तर तेवढा भाग उचलून त्याच्याभोवती ‘फास’ (स्नेअर) आवळून ते बंद करता येतं. अक्षरश: जिवावरच्या दुखण्यातून शस्त्रक्रियेविना रुग्ण बरा होऊ शकतो.
पचनसंस्थेचा वरचा आणि खालचा भाग दुर्बिणीतून पाहणं सहज शक्य आहे, पण मधला भाग, म्हणजे लहान आतडी कशी तपासता येतील? या प्रश्नाचं उत्तर दिलंय ‘कॅप्सूल एन्डोस्कोपी’ नं. या पद्धतीत रुग्णाला एक खास कॅप्सूल गिळायला सांगितली जाते. या कॅप्सूलमधला छोटासा व्हिडीओ कॅमेरा ताबडतोब आतल्या अवयवांचं चित्रण सुरू करतो आणि या प्रतिमा डॉक्टरांना तेव्हाच किंवा नंतरही बघता येतात, त्यावरून निष्कर्ष काढता येतात. सुमारे १२ तास कॅमेरा चालू राहतो आणि तेवढय़ाच काळात कॅप्सूलचा प्रवासही पुढे पुढे गुदद्वारातून बाहेर पडेपर्यंत चालूच असतो. या चित्रीकरणात वाढलेल्या गाठी, व्रण, क्षयरोग किंवा अन्य विकारामुळे रोगग्रस्त झालेली अंतस्त्वचा हे सगळंच स्पष्टपणे दिसून येतं. बहुधा अंतर्गत रक्तस्रावाच्या रुग्णांमध्ये रक्त नेमकं कुठून येत आहे हे पारंपरिक स्कोपी करून समजत नसल्यास ही पद्धत स्वीकारली जाते. अनेक वर्षांपूर्वी ‘फँटास्टिक व्हॉयेज’ या गाजलेल्या चित्रपटात हीच कल्पना रंगवली होती, ती सत्यात उतरवलीय आजच्या तंत्रज्ञानानं!
अगदी अलीकडे सुरू झालेली आणखी एक दुर्बिणीची करामत म्हणजे ‘थर्ड स्पेस एन्डोस्कोपी.’ अतिशय कौशल्यपूर्ण अशी ही शस्त्रक्रियाच, पण दुर्बिणीतून करण्यात येणारी! कधी कधी आतडय़ांच्या काही भागाचे स्नायू घट्ट आवळले गेल्यामुळे तेवढय़ा भागात अडथळा निर्माण होतो. अडथळ्याच्या वर ३-४ सेमी. अंतरावर दुर्बिणीतील धारदार पात्याने अंतस्त्वचेला एक छेद घेतात आणि दुर्बीण त्या छेदातून हलकेच आत सरकवतात. हळूहळू क्षारमिश्रित पाण्याचं इंजेक्शन देता देता ती जागा मोठी करत जातात. अडथळ्याच्या पलीकडे ३-४ से.मी.पर्यंत असं केल्यावर आता आवळलेल्या स्नायूंवर लांबवर छेद घेतला जातो. त्यामुळे स्नायू शिथिल होऊन अडथळा दूर होतो. विशेषत: अन्ननलिकेचा खालचा भाग आणि जठर व लहान आतडय़ाच्या जोडणीचा भाग या ठिकाणी अशा स्वरूपाची दुर्बीण शस्त्रक्रिया केली जाते. याच पद्धतीने अंतस्त्वचेवर वाढणाऱ्या गाठीसुद्धा काढता येतात.
दुर्बिणीचा शोध लागून जसजसा काळ लोटतो आहे, तसतसं डॉक्टर मंडळींचं ती हाताळण्याचं कौशल्य अधिकाधिक विकसित होतंय. देशातल्या सर्व महानगरांमध्ये, वैद्यक शिक्षण संस्थांमध्ये याच्या प्रशिक्षणाची सोय होऊ लागली आहे. रुग्णाला होणारा शस्त्रक्रियेचा, भूल घेण्याचा त्रास टाळणारी, रुग्णालयातले दिवस कमी करणारी दुर्बीण हे खरोखर वरदान म्हटलं पाहिजे.
(या लेखासाठी विशेष साहाय्य:डॉ. अमोल बापये, पोटाचे विकार व एन्डोस्कोपी तज्ज्ञ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे )

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?

डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com