निवृत्ती हा शब्द आपण फारच उथळपणे वापरतो असे वाटते. आपल्या नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी वयोमानानुसार सन्मानाने आपल्याला बाजूला व्हावेसे वाटणे म्हणजे ‘माझ्या कामाच्या धबडग्यातून मी निवृत्त झाले- झालो’ असे आपण मानतो.
 परंतु योगमार्गात प्रवृत्ती व निवृत्ती असे दोन मार्ग वर्णिले जातात. इंद्रिये ज्यामागे धावतात (म्हणजे मन इंद्रियांना घोडय़ाप्रमाणे पळविते) ती इंद्रियविषयक प्रवृत्ती, त्यांचे नेहमीचे खाद्यविषय त्यांना न देता त्यांना आतमध्ये वळविणे म्हणजे इंद्रियविषय निवृत्ती. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्हींचा संगम, समतोल साधणे म्हणजे खरी साधना. मन इंद्रियांवर प्रचंड ताबा मिळविण्यासाठी काही काही व्यवसायांमध्ये खरोखरच मनाचा कस लागत असावा असे वाटते. नित्य व्यवहारातील या मंडळींकडे पाहताना त्यांचे जीवन म्हणजे ‘साधना’च वाटते.
 उदाहरणार्थ, अत्यंत घाणीत काम करणारे सफाई कामगार, उंच मनोऱ्यावर रंगकाम करणारे कारागीर, फाशीची सजा अमलात आणणारे तुरुंगातील कर्मचारी, दिवसभर भटारखान्यांमध्ये राबणारे रसोईया, अग्निशमन दल, अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स व कर्मचारी, इतकेच नव्हे तर चार घरांमध्ये काम करून पोट भरणारी कष्टकरी स्त्री! काम करताना पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिये या साऱ्यांवर ताबा मिळविणे ही खरी निवृत्ती. नोकरीतून निवृत्त होणे नव्हे.
आजच्या आपल्या साधनेत शयनस्थितीतील पाय चक्राकर फिरवून घेऊ या. याला म्हणतात सुलभ चक्रपादासन. शयनस्थितीतील विश्रांती स्थिती घ्या. शक्य असल्यास दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवा अथवा एक पाय गुडघ्यात दुमडून पाऊल जमिनीवर ठेवा.
आता दुसरा पाय गुडघ्यात सरळ ठेवून जमिनीपासून साधारण वीस ते तीस अंशांवर उचला. संपूर्ण पाय चक्राकार पद्धतीने हवेत फिरवा. टाच जमिनीला टेकवू नका. आता विरुद्ध पायाने ही कृती करा. आपल्या क्षमतेनुसार पाच ते दहा वेळा ही कृती करा. कृती करताना नियमित श्वासाची जाणीव ठेवा. अवाजवी जोर लावू नका. मानेच्या स्नायूंवर येणारा अनावश्यक ताण टाळा. बाकीचे शरीर एकदम शिथिल ठेवा.खा आनंदाने!-  निंबोणीच्या झाडामागे..  
वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ)
अंगाईगीत म्हटले की आई आणि आजीची आठवण येतेच! ‘नीज नीज रे माझ्या बाळा’ म्हणत थोपटणारे माझ्या आजीचे हात अजूनही मी विसरले नाही. ते प्रेम, तो जिव्हाळा- कधीही न विसरण्यासारखा! नंतर मोठे झाल्यावर कधीतरी उणीव जाणवतेच, पण थोडेसे डोळे पाणावण्याइतपतच! शांत झोप लागण्यासाठीसुद्धा आजकाल बरेच प्लानिंग (?) करावे लागते. विशिष्ट वयानंतर सर्व जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडल्या याचा विचार करताना रात्र उलटून जाते आणि मग मनात विचार येतो, ‘अरे मला निद्रानाशाचा आजार तर जडला नाही ना? औषधांची गरज आहे का, सवय तर होणार नाही, दुपारी झोपायचे टाळू या, मग रात्री झोप येईल’ वगैरे वगैरे विचार समस्त आजी-आजोबांच्या मनात येतातच! म्हणूनच तुम्हा समस्त आजी-आजोबांसाठी ‘आहाररूपी अंगाईगीत’ बघू या काम करतेय का?    
निद्रानाश- सूचना १ : आपण वयाच्या अनुसार झोपेत कसे बदल होतात ते समजून घेऊ या.
वयानुसार विविध संप्रेरक पातळी शरीरामध्ये सतत बदलत राहते. त्यामुळे अनेकदा विस्कळीत झोप/ कमी झोप/ वेळी-अवेळी जाग येणे आणि मग झोप न लागणे असे प्रकार होऊ  शकतात. म्हणजेच शरीरातील अंतर्गत घडय़ाळ भिंतीवरच्या घडय़ाळाशी जुळत नाही. बऱ्याच वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागते आणि मग झोप येत नाही. मग अशा वेळी काय करायचे?
– तुम्हाला झोप मिळविण्यासाठी रात्री अंथरुणावर वेळेवर जावे लागेल (रात्री ९ च्या सुमारास) आणि दिवसा एक डुलकी घेऊन कमतरता भरून काढता येईल. बहुतांश व्यक्तींसाठी अशा प्रकारे ‘झोप बदल’ सामान्य आहेत आणि असे बदल समस्या सूचित करीत नाहीत.
नियमितपणे खालील लक्षणे दिसली तरच झोप ‘समस्या’ असू शकते.
आपल्याला थकवा जाणवत आहे का?
रात्रीच्या झोपेनंतर सकाळी ताजेतवाने वाटत नाही?
दिवसभरात चिडचिड होते किंवा निवांत वाटत नाही?
झोपेच्या गोळ्यांवर अवलंबून राहावे लागते?
पुढील भागात झोपेची समस्या का निर्माण होते आणि त्यावर आहारातून उपाय काय, याविषयी आपण बोलूयाच.
आजचा निद्रा-मंत्र :  
झोपायच्या ३० मिनिटे आधी १/२ कप कोमट दूध, हळद आणि जायफळ घातलेले घेणे हा उत्तम पर्याय.
संगणकाशी मत्री : फेसबुकवरील इतर पर्याय
संकलन-गीतांजली राणे – rane.geet@gmail.com
यापूर्वी आपण फेसबुकचे अकाउंट (खाते) कसे सुरू करावे याची माहिती घेतली, (५ एप्रिल) आज आपण फेसबुकवर काम करताना वापराव्या लागणाऱ्या इतर पर्यायांची माहिती घेणार आहोत.
१.फेसबुकचे अकाउंट लॉगिन (सुरू) केल्यावर आपल्यासमोर टाइमलाइनचे पान सुरू होते. तुम्हाला जर तुमच्या मनातील एखादा विचार  फेसबुकवर टाकायचा असेल तर whats on your mind?  असे लिहिलेल्या ठिकाणी तो लिहून post या बटणावर क्लिक करा. समजा तुम्हाला एखादा व्हिडीओ किंवा फोटो फेसबुकवर टाकायचा असेल तर  add photos/videos   या बटणावर क्लिक करून जिथे फोटो ठेवलेले असतील त्या फोल्डरमधून ते निवडून तुमच्या अकाउंटवर पोस्ट करा.
२. तुम्ही फेसबुकवर अपलोड केलेल्या या फोटोंवर, विचारांवर तुमच्या खात्यामधील मित्र प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा लाइक करू शकतात. कोणाच्याही पोस्टवर (फेसबुकच्या भाषेत आपण खात्यावर अपलोड करीत असलेल्या गोष्टीला ‘पोस्ट’ असे म्हटले जाते) किंवा फोटोवर स्वत:चे मत (comment) देण्याकरता तुम्ही त्या पोस्टच्या किंवा फोटोच्या खाली असलेल्या comment या चिन्हावर क्लिक करा. लाइक करण्यासाठी ‘हाताचा अंगठा वर केलेले चिन्ह’ असलेल्या चित्रावर क्लिक करा.
३. तुम्ही अपलोड केलेले फोटो किंवा पोस्ट काही ठरावीक लोकांनीच पाहाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर public असे लिहिलेल्या चौकटीच्या खाली निळ्या अक्षरात update status  असे लिहिलेला पर्याय असेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर मित्र, मित्रांचे मित्र, जवळचे मित्र, फक्त मी असे अनेक पर्याय सुरू होतात. त्यापकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा.
४. एखाद्या फोटोत किंवा पोस्टमध्ये तुम्हाला खात्यामधील व्यक्तीला जोडून घ्यायचे असेल (टॅग करायचे असेल) तर public  असे लिहिलेल्या चौकटीच्या खाली अधिकचे चिन्ह असलेली मानवी छाया दिसेल त्यावर क्लिक करून अपेक्षित व्यक्तीचे नाव टाइप करा. असे केल्यावर त्या व्यक्तीच्या खात्यावरही तुमची पोस्ट/ फोटो दिसू शकतो.
५. फेसबुक सुरू केल्यानंतर अगदी वर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला काही चिन्हं दिसतील, तुम्हाला प्रश्न पडला असेलच ही चिन्हं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध पर्यायांचा उपयोग काय? home या पर्यायाच्या शेजारी असलेल्या दोन मानवी छाया असलेल्या चिन्हांवर (हे चिन्ह peoples you may know या पर्यायाचे असते) क्लिक केले असता find friends, settings  हे पर्याय दिसतील. त्यापकी find friends या पर्यायामध्ये आपल्या ओळखणाऱ्या लोकांची यादी असेल त्यातील ज्या व्यक्तीला आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची असेल त्या व्यक्तीच्या नावापुढे असलेल्या  add friend  या पर्यायावर क्लिक करा. settings  च्या पर्यायावर क्लिक केले असता तुम्हाला कोणी ‘मित्र विनंती’ पाठवावी किंवा पाठवू नये याची नोंद तुम्ही करू शकता. तुम्हाला समोरून आलेल्या मित्र विनंत्यांची यादीही याच मानवी चिन्हांखाली दिलेली असते. त्यापकी तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीच्या नावापुढील confirm friend हा पर्याय निवडून तुम्ही मित्र विनंती स्वीकारू शकता. जर तुम्हाला ती व्यक्ती खात्यात नको असेल तर तुम्ही delet friend request चा पर्याय निवडू शकता.
आजी आजोबा आजच्यापुरती फेसबुकची शिकवणी इतकीच, पुढच्या वेळेस आपण फेसबुकच्या इतर पर्यायांची माहिती करून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आज शिकलेल्या टिप्स वापरून तुमच्या जुन्या सवंगडय़ांना शोधा, आणि तुमच्या नातवंडांनाही friend request पाठवून सुखद धक्का द्या!    

कायदेकानू : पोलिसांत तक्रार नोंदवताना
अ‍ॅड. प्रीतेश देशपांडे -pritesh388@gmail.com
अनेकदा आपल्या तक्रारीच्या निवारणासाठी अथवा गुन्हय़ांसंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याला पोलीस ठाण्यात जावे लागते. अशा वेळी आपल्या अधिकारांबद्दल माहिती असणे व जागृती असणे गरजेचे असते.
सर्वप्रथम, एखाद्या गुन्ह्य़ाबाबत नक्की कोठे फिर्याद द्यायची याबाबतच अनेकांमध्ये साशंकता असते. मूलत: गुन्हा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला त्या पोलीस ठाण्यात माहिती देणे/फिर्याद देणे गरजेचे असते. या ठिकाणी फिर्याद दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी सदर तक्रार/फिर्याद लेखी स्वरूपात घेणे बंधनकारक असते. फिर्याद लेखी स्वरूपात दिल्यानंतर त्या फिर्यादीची एक प्रत फिर्यादीस मोफत देणे बंधनकारक आहे. फिर्याद अथवा तक्रार देण्यासाठी कोणताही मोबदला अथवा पैसे देण्याची गरज नाही.
समजा, पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांनी फिर्याद/तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला तर फिर्यादी/ तक्रारदार हे त्यांच्या प्रथम उच्च अधिकाऱ्यास त्यांची तक्रार लेखी स्वरूपात देऊ शकतात व सदर अधिकारी हा संबंधित पोलीस ठाण्यास तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश देऊ शकतो.
फिर्यादी पोलीस ठाणेमधील ठाणे अंमलदार यांस त्यांची फिर्याद थेट लेखी स्वरूपातही देऊ शकतात. अशा वेळी मूळ फिर्याद ठाणे अंमलदाराजवळ दाखल करून फिर्यादीच्या प्रतीवर त्यासंदर्भातील तारखेसह सही-शिक्का दिला जातो व तक्रार नोंदवून घेतली गेली असे समजले जाते.
पुढील भागात (३ मे) गुन्ह्य़ाचे स्वरूप व अटक, अटकेनंतरचे अधिकार आदींविषयी.            
आनंदाची निवृत्ती – मी कविता  लिहू लागलो..
एकनाथ कृ. शंकपाल
नोकरीत असताना सांसारिक व्यापामुळे प्रवास करणे शक्य झाले नाही. पण त्यानंतर मात्र मी आणि माझी पत्नी शुभदा दरवर्षी भारतातील निरनिराळी प्रसिद्ध स्थळे पाहण्यासाठी प्रवास केला आणि आठ-दहा वर्षांत सारा भारत पाहून आम्ही समाधान पावलो.
त्यानंतर समाजाच्या दृष्टीने काही करण्याचा प्रयत्न सुरू केला. दहिसरमधील गृहसंकुलाच्या समस्या सोडवण्यासाठी विवेक स्थळेकर यांच्या सहकार्याने मी ‘फ्लॅट असोशिएशन ऑफ दहिसर’ (फूड) ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा सुरुवातीपासून जवळजवळ दहाबारा वर्षे अध्यक्ष होतो. आता त्यातूनही बाहेर पडलो आहे. लोकांना संस्थेचा बराच फायदा झाला.
मात्र निवृत्तीच्या दिवशी माझ्या मुलीने मला संत रामदासांचा ‘दासबोध’ भेट म्हणून दिला. त्यामुळेच मी दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे वाचन आणि मनन केले. त्यामुळेच अध्यात्माची ओळख झाली. याच सुमारास दहिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कामात मी रस घ्यायला लागलो. निरनिराळय़ा ज्येष्ठ नागरिक संस्थांतर्फे आयोजित निबंध स्पर्धामध्ये भाग घेत गेलो आणि पारितोषिकंही मिळवली. केवळ वाचनामुळेच हे शक्य झाले. याच काळात मी वैदिक गणित शिकलो आणि एका मासिकामध्ये एक लेखमालिकाही लिहिली. वाचकांचा मिळालेला प्रतिसाद आनंद देऊन गेला.
हा चमत्कार असावा कदाचित, विंदा करंदीकर यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम दहिसर विद्यामंदिर शाळेचा प्रांगणात झाला आणि कसे कुणास ठाऊक दुसऱ्या दिवशी मी ‘उगाच वाचले रामायण आणि महाभारत’ ही माझी पहिली कविता  १९९२ साली, माझ्या वयाच्या बासष्टाव्या वर्षी लिहिली आणि पाहता पाहता २००१ साली वयाच्या ७१ व्या वर्षी माझा पहिला कविता संग्रह ‘पहाटेच्या पारी’ मोहन सामंत यांनी प्रकाशितही केला. ज्येष्ट नागरिक संघ, अत्रे कट्टा या ठिकाणी मी कविता वाचन करीत गेलो. अजूनही मी कविता करतो आणि माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनाही या आनंदात सहभागी करून घेतो. रोज तीन ते चार तास मनोरंजक वाचनात घालवतो.
वाढत्या वयात होणारे संधीवात, मोतीबिंदू, कमी ऐकू येणे अशा आजाराशी साथ असतेच. पण शक्य तेवढे चालणे, मित आहार आणि छंद जोपासणे यामुळे वेळ बरा जातो. या सगळय़ा प्रवासात संगणक शिकायचे राहून गेले. आता मात्र परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना आहे की, पुनर्जन्म झालाच तर बाबा आमटेच्या घरात जन्माला यावे आणि ‘आनंदवना’च्या धुळीने पावन व्हावे.   

shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?