News Flash

वाचक प्रतिसाद : महापुरुषांचा तटस्थ अभ्यास व्हावा

 नीरजाताईंचा ‘आषाढ एक निमित्त..’ (६ जुलै) हा लेख वाचला आणि लहानपणापासून आपल्या मनात खोलवर असलेले विचार कोणीतरी शब्दात मांडल्यासारखे वाटले.

नीरजाताईंचा ‘आषाढ एक निमित्त..’ (६ जुलै) हा लेख वाचला आणि लहानपणापासून आपल्या मनात खोलवर असलेले विचार कोणीतरी शब्दात मांडल्यासारखे वाटले. या सुंदर लेखामार्फत चिंतनाला चालना दिल्याबद्दल आभार. जे जे कठीण ते समजून घेण्याचे कष्ट कशाला असा साधारणत: मानवी स्वभाव असतो. त्यामुळे द्रौपदी असो, सीता असो किंवा आवली त्यांच्या वेदना समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. तो केला असता तर स्त्रीकडे असलेली प्रचंड सहनशक्ती हा तिचा दुबळेपणा न मानता आपण तिचा आदर केला असता आणि मग स्त्रीसन्मानावर भाष्य करण्याची गरज पडली नसती. पण आजवर तसे झाले नाही हे दुर्दैव. दुसरं म्हणजे, जसं आपण स्त्रियांच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले तसेच महापुरुषांच्या घडण्यात स्त्रियांचा जो मोठा वाटा होता त्याकडेही कानाडोळा केला. आज शिवाजी महाराज घडत नाहीत कारण आपण जिजाईंना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवलेच नाही.  या सगळ्याचं कारण शोधलं तेव्हा एकच गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण व्यक्तिपूजेत अडकलो. महापुरुषांच्या गुणांचा अभ्यास झाला असता, तर साहजिकच त्यांच्या जीवनाशी संबंधित व्यक्तींच्या गुणकौशल्यांबद्दलही कुतूहल निर्माण झालेच असते. अगदी विठ्ठलालाही आपण कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या मूर्तीपर्यंत मर्यादित मानलं. म्हणून तर रखुमाई एकटी पडली. जीवनविद्य्ोत ‘विश्वी ठसावला तो विठ्ठल’ ही व्याख्या ऐकली आणि मग वाटले विठ्ठलाला आपण अजून खूप समजून घ्यायचं बाकी आहे. महापुरुषांची व्यक्तिपूजा न होता त्यांच्या गुणांचा अभ्यास होईल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना आदर, भक्ती मिळेल. सोबतच रखुमाई, सीता, द्रौपदी, आवली यांचे योगदानही ठळक होईल!

– प्रीती कोंडकर, ठाणे

 

मन ढवळून टाकणारा लेख

नीरजा यांचा लेख खरोखरच मनाचा तळ ढवळून टाकणारा आहे. विशेषत: ‘मनात विठ्ठलाबरोबर रखुमाईसुद्धा असावी.’ हे वाक्य तर खूपच परिणामकारक! महापुरुषांच्या पत्नींची वेदना आधुनिक कवींच्या काव्यात दिसते. पूर्वी तर या गोष्टी कुणाच्या मनातही येत नव्हत्या. त्यांचा त्याग, सारे कुटुंब सांभाळणे, सहनशीलता, समर्पण या गोष्टी तर पूर्वीपासून स्त्रियांनी अंगी बाणवल्यात. वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेला लेख आणि कवितांचे संदर्भ मनात तरंग उठवून गेले.

– अर्चना काळे, नाशिक

 

वेदनेचे विश्लेषण भावले

नीरजा यांचा ‘आषाढ एक निमित्त’ हा लेख फार आवडला. रुक्मिणीच्या वेगळ्या मंदिराच्या निमित्ताने महापुरुषांच्या पत्नींच्या वेदनेचे वेगळे विश्लेषण करून पुरुषप्रधान समाजाला समजू न शकणारी वस्तुस्थिती सुरेखच मांडली आहे.

– संजय पुणतांबेकर, वापी, गुजरात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:09 am

Web Title: chaturang reader response mpg 94
Next Stories
1 झरोके
2 ‘द रोड नॉट टेकन’
3 रवींद्र विचार जगणारं ‘पाठोभवन’
Just Now!
X