सुभाषशी लग्न म्हणजे ‘कॅम्लीन’ला सवत म्हणून स्वीकारणं होतं. मी त्याची दुसरी बायको होते. अर्थात या पहिल्या बायकोचा संसार त्याच्या बरोबरीनं मी उभारला, वाढवला. रंगांच्या जगात हरखून, हरवून गेलो आम्ही. ना ना रंगानी रंगलेला आमचा संसार म्हणजे एक परिपूर्ण चित्रच आहे.
सुभाष आणि मी लग्नाच्या बंधनात अडकलो ते माझ्या चंपा मावशीमुळे आणि सुभाषच्या चुलत वहिनीमुळे- सरोजवहिनी दांडेकर. तो इंग्लंडहून एम.एस्सी. करून परत यायचा होता आणि दांडेकरांच्या घरातला हा ‘एलिजिबल बॅचलर’ सर्वानाच आपली भाची किंवा पुतणीसाठी हवा होता.   चंपामावशीने मला, आईला अंधेरीला नेऊन कारखाना, त्याचे इंग्लंडला जाताना निरोप समारंभाचे फोटो दाखवले होते. तो टेक्निकल डायरेक्टर असल्याचं सांगितलं होतं. त्यावर मी म्हटलं होतं, ‘आपलाच कारखाना म्हटल्यावर काहीही पद देता येतं.’ त्यावेळी ‘कॅमल’ शाई, गम, पेस्ट, खडू, स्टँपिंग व्ॉक्स बनवत होती. ही सगळी उत्पादनं त्याच्या वडिलांनी बनवली होती १९३१ मध्ये. मग मी चंपामावशीच्या घरी त्याला बघितलं. त्याच संध्याकाळी शिवाजी पार्कला तो त्याच्या मित्रांबरोबर आला. आम्ही फुटपाथ बदलला. तरी पुढच्या वेळी तो हसला माझ्याकडे बघून! मग मात्र चक्र  फिरायला लागली. गणेशचतुर्थीला साखरपुडा आणि २५ डिसेंबरला लग्न! माझं बीए फायनल वर्ष होतं, त्यामुळे आई नाखूश होती की मुलगी बी.ए. होणार नाही. सासऱ्यांनी मात्र खात्री दिली की, अभ्यास करायला वेळ मिळेल. लग्नानंतर सबंध दिवस मी कॉलेजात घालवायची. लेक्चर्स आणि मग लायब्ररी. सासूबाई गरम पोळी प्रथम खायला लावायच्या, मग भात. माझा आवडता!
सासऱ्यांना वाटलं नव्हतं मी खरंच पास होईन, पण झाले. त्यांनी आईला खात्री दिली होती. त्यामुळे अभ्यास करावाच लागला. मग मुलं झाली. आशीष आणि अनघा. चौकोनी कुटुंब झालं. मला वाटलं की आता झालं! पण सासूबाईंच्या मनात वेगळंच होतं. अनघा ६ महिन्यांची होती, तेव्हा म्हणाल्या, ‘आता ऑफिसमध्ये जायला लाग’, मी म्हटलं, ‘मुलं लहान आहेत.’ तर त्याचं उत्तर, ‘मी बघेन त्यांना. तू मदत कर सुभाषला.’ मी म्हटलं, ‘मी बीए झालेय इतिहास आणि समाजशास्त्र घेऊन.’ तर म्हणाल्या, ‘हुशार असलं की सगळं येतं.’ माझ्या मनात आलं की, ‘त्यांना माझ्या हुशारीवर विश्वास आहे. मग करायला हरकत नाही.’ खरं तर त्यांना मुलं झाली तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की सुनेला प्रोत्साहन देईन. पण मला म्हणाल्या, ‘निदान तो दिसेल तरी ऑफिसला गेलीस की!’ सुभाष खूप तास काम करायचा. रंगांवर त्यानं संशोधन चालवलं होतं ना! १९६४ मध्ये आर्ट मटेरिअल विभाग सुरु झाला होता. आम्ही साखरपुडय़ानंतर फिरायला जायचो तर आमच्या गप्पा कुठल्या असायच्या, तर रंगांच्या! रंगाची तुलना कागदावर करत असायचा तो. मला विचारायचा की कुठला रंग ‘विन्सर न्यूटन’सारखा झालाय? त्याला दर्जेदार उत्पादनं हवी होती, त्यामुळे जगभर ख्याती असलेल्या इंग्लिश उत्पादनांच्या तोडीची व्हायला पाहिजे होती. जे करू ते उत्तमच असायला हवं, असं आमचं दोघांचं मत होतं त्यामुळे पटकन एकमत व्हायचं!
मी ऑफिसमध्ये जायला सुरू केलं १९६७ मध्ये. आधी आशीषला वांद्रय़ाला शाळेत सोडून तिथे जायची. त्यावेळी क्रायलिन नवीन उत्पादन होतं. माझ्या नणंदेने पुण्याला प्रदर्शन भरवलं होतं क्रायलिनने रंगवलेल्या कपडय़ाचं. सगळ्या प्रकारच्या कपडय़ांवर, हॉलसाठी, झोपण्याच्या खोलीचे पडदे, डायनिंग टेबलक्लॉथ, टेबलमॅट्स सगळं होतं. सगळ्यांना वाटायचं रंगवणं म्हणजे डाय करणं. त्याला खूप गर्दी झाली. मग ओळीने उभं करणं, गर्दीचं नियमन करणं आलंच. त्यावेळी आयुष्यात मी पहिल्यांदा क्रायलिनच्या साडय़ा नेसून मॉडेलिंग केलं. आता ते फोटो बघताना हसू येतं. विनोदी अवतार होता!
पण माझा अभ्यास सुरू झाला. जो उद्योग करायचा त्यातलं आपल्यालाही कळलं पाहिजे ही जाणीव स्वत:लाच होत गेली आणि मग शिकणं आलंच. आमच्याकडे बाळ वाड नावाचे  आर्ट डायरेक्टर होते. त्यांनी प्रात्यक्षिकं दाखवली. त्यांना जे सहज यायचं, ते मला जमायचं नाही. मग सराव करणं आलंच. शाळेत जो विषय मला आवडायचा नाही तो करणं भाग पडलं. लग्नामुळे रंगांवर प्रेम करायला शिकले. सुरुवातीला जमायचं नाही, पण सोडायचं नाही, प्रयत्नांनी सगळं येतं, असं मनाला बजावायची मी, निराश झाले की मात्र बाथरूममध्ये जाऊन रडायची. सुभाष खंबीरपणे मागे होताच. तो सतत प्रोत्साहन द्यायचा. पण माझं मलाच शिकणं आलं.
माझं पहिलं प्रात्यक्षिक मुंबईत माहीमच्या अल्ट्रा सोसायटीत होतं. सासूबाईंच्या मैत्रिणीच्या घरी. सकाळपासून ते टाळण्याचा माझा प्रयत्न होता, तापासारखं वाटतंय, पोटात दुखतंय असं काहीतरी चालू होतं. पण २ तासांतच मी स्वत:ला सांगितलं, ‘जिद्द दाखव, नाहीतर ऑफिस बंद.’ मग गेले त्या प्रात्यक्षिकाला, हातपाय थरथरत होते, मग झालं नीट. सासूबाईंनी कौतुक केलं.
 सुभाष उत्तम शिक्षक त्यामुळे बाकी सगळं शिकले, पण आकडय़ांशी वैर होतं माझं! त्यामुळे माझ्या जाहिरातींचं, उद्योग वाढविण्याच्या सगळ्या योजनांचं मी बजेट केलं, पण कंपनीचा ताळेबंद बॅलन्स शीट वाचायला मी अजून शिकले नाही. तो म्हणतो कायम, ‘त्याने कमवायचं आणि मी खर्च करायचा- जाहिरात म्हणजे खर्चच की! लग्नानंतर मी त्याला अहो, जाहो म्हणायची, पण आमच्या मित्रांना एकेरी हाक मारताना नवऱ्याला अहो म्हणणं विचित्र वाटायचं. ऑफिसमध्ये त्याला अजून अहोजाहो करते, पण घरी कधी गळून पडलं ते कळलंच नाही!
मी ‘कॅम्लीन’मध्ये जवळजवळ ४०/४५ र्वष काम केलं. खूप शिकले. आधी मी पब्लिसिटी ऑफिसर होते, सुरुवातीच्या दोन वर्षांत मला सगळ्या खात्यात काम करावं लागलं, त्यामुळे सगळ्या पैलूंची ओळख झाली. २ वर्षांनी मला पगार सुरू झाला, किती तर ३५० रुपये! कामगार नव्याने लागतात तेवढाच. पण मी ग्रॅज्युएट होते, तरी इतका कमी का? असं विचारायचं सुचलं नाहीच. सुभाषइतकीच मी झोकून दिलं होतं कामात! मग जनसंपर्क अधिकारी झाले. क्रायलिनच्या प्रात्यक्षिकांमुळे आणि चित्रकारांच्या प्रदर्शनांमुळे कामाची व्याप्ती वाढली होती. त्यात भारतभर क्लास चालू केल्यामुळे माझं फिरणंही वाढलं.
लग्नानंतर १० वर्षांनी एकदा जपानला जाण्याची संधी आली. साकुरात रंग बनवणाऱ्या कंपनीत काही मशीन आणण्यासाठी. सासूबाई म्हणाल्या की, तिथपर्यंत जा, पुढेही कॅनडा, अमेरिकेला जाऊन भावाला भेटून ये. मग काय, चंगळच! परदेशी बाजारात कॅमल रंग बघून सुभाषचा अभिमान वाटला त्यावेळी. मला कारखाने बघायला खूप मजा आली. त्यांच्याकडून २ मशिन्स घेतली आम्ही. एक ऑइल पेस्टल रंग बनवण्याचं आणि लेबल लावण्याचं आणि दुसरं वॉटरकलर टय़ूब्जमध्ये भरण्याचं आणि ती बाजू बंद करून लेबल लावण्याचं. या कामांना खूप कामगार लागायचे. मशीन आल्यावर सासऱ्यांना दाखवलं कसं चालतं ते. त्यांना खात्री पटली की, माझ्या जाण्याने कंपनीला फायदाच होतो.
अमेरिकेला स्टॅनफर्ड, बर्कले विद्यापीठ बघितल्यावर वाटलं, आपण उगाच लग्न केलं. असं शिकायला मजा आली असती. भारतात आल्यावर मुलांना म्हटलं तसं. तेव्हा आशीष-अनघा म्हणाले, तुझी इच्छा होती, तर आम्ही जाऊ आणि दोघंही उच्च शिक्षणासाठी गेलेही!
साकुरा भेटीनंतर ‘ऑल इंडिया कॅमल कलर काँटेस्ट’ घेतली. भारतभर लिम्का बुक, गिनेसमध्येही तिचं नाव गेलंय. त्यासाठी भारतभर शाळांना भेट द्यायची, सेल्समनला कसं बोलायचं, स्पर्धेची माहिती देणं हे शिकवणं चालू झालं. रंग बनवल्यावर प्रत्येक सेल्समनला सुभाष मुंबईत ६ महिने ठेवायचा, आधी लॅबमध्ये रंग कसे बनतात, विक्रीच्या वेळी कसं वागायचं, हे शिकवायचा. मी त्याच पावलावर पाऊल ठेवून चालले. आमची जोडी छान जमली होती. कामात व्यस्त होती. सगळ्या अधिकाऱ्यांशी मिळून मिसळून वागलो, आपापसात स्पर्धा करायला वेळच नव्हता. बाजारात इतर स्पर्धकांना लोळवता येतं, यातच आम्ही खूश. जसजसं काम समजत गेलं, तसे आमचे मतभेद व्हायला लागले. पण समजावून सांगितलं की, पटतं एकमेकांना, आजही! एकदा कोणीतरी मुलगी ऑफिसात रडत होती. सुभाष मला म्हणाला की, तू बघ. बोल तिच्याशी. एक नवी जबाबदारी समुपदेशनची माझ्या गळ्यात टाकली. पण नंतर कौतुकाची थापही मिळाली!
सुभाष मूळ केमिस्ट, पण रंगसाहित्याच्या विभागासाठी कायदे तसंच अकाऊंट्स शिकला. त्याने कॉम्प्युटर्सही आणले. कपाटाएवढय़ा कॉम्प्युटर्सपासून सुरू केलं त्याने कॅम्लीनमध्ये! त्यावेळी त्याला कार्ड पंचिंग लागायचं. सुभाषचं अर्थज्ञान खूप. त्याने ५० प्रोग्रामीन करून घेतले. पुढे कॅमल आणि इंक यांना एकत्र करून ‘कॅम्लीन’ सुरू झालं. त्याने ‘कॅम्लीन’मध्ये खूप आर्थिक शिस्त आणली. खरोखरी आमचं विश्व ‘कॅम्लीन’भोवतीच फिरायचं. तो सतत फिरतीवर असायचा मग आम्ही एकमेकांना पत्र पाठवायचो खूप. पण सुभाषच्या पत्रांमध्ये ‘कॅम्लीन’च असायचं. काय योजना आहेत, कुठलं मशीन बघायचं वगैरे. तर माझ्या पत्रांमध्ये मुलांची खुशाली!
सुभाषबरोबरीने माझंही काम जोरात सुरू होतं. जपानहून परत आल्यावर ०.५ एमएम शिसं आणि त्यांच्या सगळ्या रंगांच्या पेन्सिली विकण्याची रेंज पूर्ण झाली होती. त्यानंतर टेक्निकल इन्स्ट्रमेंट, हॉबी रेंज झाली. शाळांमध्ये स्पर्धा सुरू केल्या. शाळांसाठी स्पर्धा आहे, चित्रकारांसाठी का नाही? मग ‘कॅमल आर्ट फाऊंडेशनचा’ जन्म झाला. त्याच्या परीक्षक म्हणून मला जावं लागायचं. ‘कॅम्लीन’साठी अशा शेकडो बक्षीस समारंभांमध्ये भाषणं केली आहेत. भाषणाबाबत आधी विचार करायची, मुद्दे लिहायची आणि मग आपले विचार भाषणात सांगायची. कधी लिहिलेलं वाचून दाखवलं नाही. त्या विषयात माझं ज्ञान मी कायम, नियमित, काळानुरूप वाढवलं. आमची भूमिका खूप स्वच्छ होती, हे सगळं आम्ही चित्रकलेच्या विकासासाठीच करतोय असा विश्वास होता.
हे सगळं करताना मुलांकडे दुर्लक्ष झालं नाही. उलट आमच्या चर्चा ऐकून ते, पण तयार झाले. आज त्याही दोघांचा उद्योग आहे. आम्ही भारतभर उद्योग वाढवला, मग निर्यातीकडे लक्ष दिलं. सुभाषनं जगभर िहडून निर्यात वाढवली. फ्रँकफर्टला पेपरवर्ल्ड प्रदर्शन ४ दिवसांचं असतं. सुभाषमुळे त्यांच्यात १० र्वष भाग घेतला. एक भारतीय उद्योग स्पर्धा करतोय हे त्यांना महत्त्वाचं वाटलं. प्रत्येक वर्षी २/२ जणं लॅब, मार्केटिंग डिपार्टमेंटमधले नेले. निर्यात विभाग होताच, मी होते.
६० व्या वर्षी निवृत्त झाले. नंतर सल्लागार म्हणून सगळं काम केलं. पण आजही कोठेही तुम्ही रजनी दांडेकर ना असं विचारलं की मजा येते. आमच्या मॅनेजरच्या मुलाचं लग्न होतं, ते सुभाषशी ओळख करून द्यायला लागले तर व्याही थेट माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘तुमचं ‘लोकसत्ता’तलं लिखाण आम्हाला खूप आवडतं, मग सुभाषची ओळख मीच करून दिली. हे गमतीशीर होतं.
आज मागे वळून बघताना जाणवतं, सुभाषचा पाठिंबा होता, म्हणून हे सगळं घडलं. मला काय हवंय हे त्याला बरोबर कळतं, न बोलता. माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात. अर्थात सिनेमा बघायला जायचं त्याच्याबरोबर तर अगदी मध्यंतराला पोहोचायचो आम्ही. संशोधन हा त्याचा प्राण आहे, त्यामुळे उशीर होतो हे मी समजून घेत असे. ‘कॅम्लीन’ ही त्याची पहिली बायको, मी दुसरी. पण पहिलीवर पराकोटीचं प्रेम आहे आजही, हे कळतं मला. तो अगदी कुटुंबाला वाहिलेला आहे. बायको, मुलं, त्याचा भाऊ, बहीण, माझे त्याचे आई-वडील, त्या सर्कलमध्ये असतात. सर्व मित्रमैत्रिणी, ‘कॅम्लीन’चे सगळे. त्याचा परिवार खूप मोठा आहे. म्हणून माझाही. त्याचं सामाजिक कार्यही खूप आहे. खूप संस्थांमध्ये काम करतो, सगळं अत्यंत मनापासून!
सुभाष खरंच मोठा झालाय. मला त्याचा विलक्षण अभिमान वाटतो, त्याच्या ज्ञानामुळे! पण आता आम्ही एकमेकांसाठी खूप असतो. माझी विशेष काळजी घेतो. लग्नाला ५२ र्वष झालीत, पण ओलावा टिकून आहे, आता तर सवय झालीय आम्हाला एकमेकांची!