प्राची कुलकर्णी-गरुड – prachihere@gmail.com

करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकरी व्यवसायावर गदा आली. व्यवसाय ठप्प झाले तरी आयुष्य थांबत नसतं. जगणं तर भाग आहे. एक मार्ग बंद झाला तर दुसरा उघडतोच,  परंतु तो उघडेपर्यंतचा काळ परीक्षा बघणारा असतो. स्वत:च्या क्षमता ताणणारा, अनेक गोष्टी नव्याने शिकायला लावणारा असतो. आपल्याबरोबर आपल्या कु टुंबीयांचं दु:ख त्रासदायक ठरवणारा असतो, असुरक्षितता निर्माण करणारा असतो.  परंतु ‘रात जैसी गुजर गयी सोते हुये..’ म्हणताना रात्र संपणारच आहे हा संदेश महत्त्वाचा ठरतो. ही दिवाळीसुद्धा आशेचा किरण अनेकांच्या आयुष्यात आणते आहे  हेच यातील अनेकांच्या उदाहरणामुळे दिसतं आहे..

दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा! घासून गुळगुळीत झालेली ओळ असली तरी सगळ्या भारतीयांच्या उत्सवी मानसिकतेचं दर्शन घडवणारी आहे. वर्ष आर्थिकदृष्टय़ा कसंही गेलेलं असो, वैयक्तिक आयुष्यात दु:खद घटना घडलेल्या असोत, आशेचं प्रतीक मानली जाणारी एक पणती तरी किमान दारात लावली जातेच. यंदाचीही दिवाळी या सगळ्याला अपवाद नाही. ‘करोना’ नावाच्या महाभयंकर विषाणूनं जगात प्रचंड उलथापालथ केली आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आर्थिक घडी विस्कटताना आपण पाहिली आहे. आणि ‘Survival of the fittest’ ही जाणीव दृढावली आहे. आरोग्य आणि पैसा या दोन्ही बाबतीत जे पुरेसे ‘फिट’आहेत, तेच पुढे तग धरतील ही भावना आहे. या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात नोकरी गमावलेल्या, व्यवसाय बंद पडल्यामुळे आर्थिक झळ सोसलेल्या काही मित्र-मैत्रिणींच्या दिवाळीबाबत काय भावना आहेत, ते जाणून घ्यायचा प्रयत्न के ला.

टाळेबंदी ते शिथिलीकरणाच्या विविध टप्प्यातला गेल्या सात महिन्यांतला प्रवास चमत्कारिक, मती गुंग करणारा आहे. सगळे व्यवहार, वाहतूक वगैरे बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिकदृष्टय़ा सर्वाधिक फटका बसला. हृषीकेश शेलार हा एक व्यावसायिक ‘व्हीएफएक्स (व्हिज्युअल इफेक्टस) आर्टिस्ट’. आतापर्यंत अनेक मोठय़ा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रकल्पांसाठी त्यानं काम केलं आहे. टाळेबंदीच्या काळात कामं मिळेनाशी झाली तेव्हा त्यानं पर्यायी उत्पन्नस्त्रोतांचा विचार केला. पारंपरिक तसंच नवं नक्षीकाम असलेली पितळी भांडी आणि दिवे अशा कलाकुसरीच्या वस्तूंच्या विक्रीला सुरुवात केली. स्वत: कलाकार असल्यामुळे त्याची सौंदर्यदृष्टी चांगली आहे. या वस्तूंच्या ‘ऑनलाइन डिस्प्ले’ आणि जाहिरातीसाठी त्याला स्वकौशल्याचा चांगला उपयोग झाला. जाहिरात, वस्तूंची मागणी आणि त्यांचं वितरण सगळंच ऑनलाइन माध्यमातून शक्य होतं आणि त्या काळात कुरिअर सेवाही व्यवस्थित सुरू होती त्याचा त्याला फायदा झाला. त्याची ही व्यवसाय कल्पनाही लोकांना खूप आवडली आणि त्याच्या वस्तूंना मागणी येऊ लागली. दिवे विक्रीतून त्याला नवीन व्यवसाय मिळाला. पण त्याला स्वत:चं असं काहीतरी निर्माण करायचं होतं. ‘वेंताज’ ब्रॅन्ड सुरू करून त्यानं कॅलिग्राफी असलेले प्रिंटेड टीशर्ट तयार करून विकायला सुरुवात केली. त्याच्या या कल्पनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आज त्याचा ग्राहकवर्ग वाढतो आहे. त्याचं एकूणात म्हणणं असं होतं की, कष्टांना पर्याय नव्हताच. आधी काम करताना बौद्धिक गुंतवणूक जास्त होती आणि आताच्या कामांत सर्जनशीलते- बरोबर शारीरिक श्रमांची भर पडली आहे. मनापासून केलेलं काम, त्याला मिळालेली पावती आणि आपल्या कामांतून इतरांना मिळालेला आनंद हीच खरी दिवाळी. आणि त्याच्यासाठी ही दिवाळी नवे अनुभव देणारी, नवं काही शिकवणारी, नवी दिवाळी आहे.

रमा देसाई  ही कोकणातली माझी मैत्रीण.  पेशानं वकील आहे आणि तिच्या नवऱ्याचा वेगवेगळी सरबतं, सिरप्स, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम अशा स्वत:च्या उत्पादनांचा स्थानिक व्यवसाय होता. टाळेबंदीच्या काळात या वस्तूंची मागणी पूर्णपणे थांबली आणि त्यांचा पिढीजात व्यवसाय बंद पडला. दरम्यान, न्यायालयं बंद असल्यामुळे रमाकडे येणारी कामंही थांबली आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे प्रचंड नैराश्य येऊन तिचा पती  मानसोपचार घेत आहे. वृद्ध सासूसासरे, एक मुलगा, नवरा, स्वत:चे आईवडील या साऱ्यांची जबाबदारी आता रमाच्या खांद्यावर आहे. कमी भांडवलाचा आणि कुणा मदतनीसांवर फारसं अवलंबून राहावं लागू नये म्हणून तिनं स्वत:चं पोळी-भाजी केंद्र सुरू केले आहे. सासू आणि आईची थोडीफार मदत होते तिला, पण त्यांच्यावर अवलंबून राहावं अशी परिस्थिती नाही. रमा म्हणते तसं ती स्वत:च्या क्षमता ताणतेय, पूर्ण प्रयत्न करतेय, रोजची लढाई, त्यातले इवले आनंद हीच तिची दिवाळी आहे.

माध्यम क्षेत्रावरही याचा परिणाम झालाच. करोना विषाणूच्या प्रसाराच्या भीतीतून अनेक वृत्तपत्रेही सुटली नाहीत.  अनेक वृत्तपत्र वितरकांनी अंक उचलण्यास नकार दिला आणि त्याचा वृत्तपत्र व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यापैकी एक माझा पत्रकारितेचं शिक्षण घेत असतानाचा सहाध्यायी. तो काम करत असलेल्या वृत्तपत्रातून त्याला राजीनामा देण्यास सांगितलं गेलं. त्याच्या म्हणण्यानुसार, नोकरी गेली म्हणजे आयुष्यातून स्थिर उत्पन्नाची सुरक्षितता गेली असली तरी जगणं थांबलेलं नाही. रोजीरोटीचा पर्यायी मार्ग शोधून काढावा लागतोच. आतापर्यंत लावून घेतलेली बचतीची सवय कामी येते. ‘सोशल मीडिया मार्केटिंग’च्या माध्यमातून त्यानं नव्यानं सुरुवात केली आहे. मन दुखावलेलं असलं तरीही कुटुंबीयांसाठी, भाचेमंडळींसाठी खरेदी करून त्यांच्या चेहेऱ्यावरच्या आनंदात आपला आनंद सापडेल अशी आशा त्याला वाटते.

आणि पुढचा अनुभव मला फारच जवळचा असा. गेली १८ र्वष माझा नवरा मराठी डिजिटल पत्रकारितेत कार्यरत आहे. भारतातल्या एका अग्रणी माध्यमसमूहाच्या मराठी साईटचा एडिटर म्हणून तो काम पाहात होता. टाळेबंदी जाहीर झाली आणि त्याच्यासह काही सहकाऱ्यांकडून राजीनामे मागितले गेले. त्यात एचआर विभाग प्रमुख स्त्रीही होती. वाईट गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान तिच्या नवऱ्याचीही नोकरी गेली.

अशा घटनांमुळे अनेकांसमोर अन्य पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. अशी उदाहरणं पुष्कळ आहेत. चाळिशी पार केलेली असताना वाढत्या वयाचे प्रश्न, घरकर्जाचा हप्ता, भविष्यासाठीची तरतूद या अशा असंख्य प्रश्नांनी अनेकजण वेढले गेलेले आहेत. अर्थातच उत्पन्नाचे पर्यायी मार्ग ते चोखाळत आहेतच. ताबडतोब यशाची भाबडी स्वप्नंही ते पाहात नाहीत, पण परिस्थितीनं दिलेल्या या फटक्यामुळे सगळ्या जगण्याचा, सण-उत्सवांचाही वेगळा विचार ते नक्की करत आहेत.

आतापर्यंत माझ्यासाठी दिवाळी म्हणजे वर्षभरात आपण मिळवलेलं यश, गाजवलेलं कर्तृत्व-पराक्रम, शिकलेल्या नव्या गोष्टी, घरात आलेल्या नव्या सदस्यांचं कौतुक, अशा सगळ्याचा मनापासून झालेला आनंद साजरा करण्याची वेळ, अशी होती. मी पाहातेय, नवीन कपडे, फराळ, गोडाधोडचं जेवण वगैरे गोष्टी वर्षभर सुरूच असतात. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने त्याचं अप्रूप राहिलेलं नाही. घरातल्या लहानग्यांचा आनंद जपायचा म्हणून पणती लावली जाईल आणि मनावर जमलेली काजळी पुसण्याचा प्रयत्न तर सतत सुरू असेल. परंपरेनं दिलेलं भान, सकारात्मक वृत्ती जपण्याचा प्रयत्न तर नक्कीच असेल..