News Flash

दूरदृष्टीचं वकीलत्व

अंध असूनही आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळजवळ ९५ टक्केकामं स्वावलंबीपणे करून कायद्याच्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या सॉलिसिटर कांचन पामनानी यांची न्यायालयीन कारकीर्द म्हणजे समाजासाठी मार्गप्रवर्तक ठरलेले

| September 27, 2014 01:54 am

अंध असूनही आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळजवळ ९५ टक्केकामं स्वावलंबीपणे करून कायद्याच्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या सॉलिसिटर कांचन पामनानी यांची न्यायालयीन कारकीर्द म्हणजे समाजासाठी मार्गप्रवर्तक ठरलेले निर्णय आहेत. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणाऱ्या लेखनिकाच्या पात्रतेचे निकष आधी महाराष्ट्र राज्यासाठी, नंतर राष्ट्रीय पातळीसाठीही त्यांनी तयार केले आहेत. आव्हानांशी लढा देत स्वत:ला कायद्याच्या क्षेत्रात सक्षम करत अंध समाजासाठी लढणाऱ्या कांचन पामनानी या दुर्गेविषयी..
अधू दृष्टी असलेली एक मुलगी हळूहळू आपली दृष्टी गमावते. मात्र तरीही हार न मानता कायदा आणि न्यायव्यवस्थेसारख्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करायचा निर्धार करते. बी.कॉम., एलएल.बी, एलएल.एम., सॉलिसिटर अशा एकाहून एक उत्तुंग परीक्षा दृष्टी अधू असण्यापासून ते दृष्टीहीन होण्याच्या अवस्थेदरम्यान पूर्ण करते. बौद्धिक स्वामित्व संपदा कायद्यातील पदविका आणि इंग्लंडमधील लॉ सोसायटीची क्वालिफाइड लॉयर्स ट्रान्स्फर टेस्ट या परीक्षाही ती उत्तीर्ण होते. अंध विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा देताना लेखनिक लागतो, त्याच्या पात्रतेचे निकष त्या, आधी महाराष्ट्र राज्यासाठी, नंतर राष्ट्रीय पातळीसाठी तयार करतात. हे सारेच विस्मयकारक आणि तितकेच प्रेरणादायीसुद्धा. कांचन पामनानी.. मुंबईस्थित या अंध वकील. ‘आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे माझी जवळजवळ ९५ टक्के कामे मी स्वावलंबीपणे करू शकते,’ असे आत्मविश्वासाने सांगत असताना जाणवतो तो त्यांचा स्वत:वरचा दृढ विश्वास आणि कठोर परिश्रमाची तयारी.
  ‘‘मी जन्मजात नेत्रहीन नव्हते. माझी दृष्टी अधू होती. पण त्यावेळी समाजात वैद्यकीयदृष्टय़ा अधू हा शब्द फारसा रुळलेला नव्हता. त्यामुळे अनेकदा बिचारी, हिला दिसत नाही, असाच समाजाचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण, माझे आईवडील, माझे शाळेतील काही शिक्षक आणि माझे काही स्नेही यांनी मात्र माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. माझे आयुष्य स्वावलंबी असायला हवे यासाठी आधी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातूनच माझी जडणघडण झाली..’’ कांचन आपल्या समोर त्यांचा जीवनपट थोडक्यात सादर करतात.
 ‘‘न्यायव्यवस्थेसारख्या क्षेत्रात येताना अंधत्व ही मर्यादा नाही का वाटली.’’ आपली पहिली शंका. त्यावर त्यांचं दिलखुलास उत्तर असतं, ‘‘आव्हानं प्रत्येक क्षेत्रातच असतात. तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, तुम्हाला आव्हानांवर मात करावीच लागते. आणि प्रत्येकच जण त्यादृष्टीने प्रयत्न करतो. मला फक्त थोडे जास्त कष्ट पडले, पण मेहनतीची तर माझी कायमच तयारी होती. शिवाय बदललेले तंत्र, न्यायदानाच्या प्रक्रियेतील बदललेल्या पद्धती, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांची मला या आव्हानांचा सामना करताना मदतच झाली.’’
कोणत्याही वकिलासमोरचे मुख्य आव्हान असते ते कागदपत्रांच्या वाचनाचे, पुराव्यांच्या छाननीचे. एका अंध वकिलासाठी हे नक्कीच आव्हानात्मक काम होतं. मात्र त्यासाठी त्यांनी मदत घेतली ती आधुनिक तंत्रज्ञानाची. सुरुवातीला चाचपडल्यानंतर त्यांना सापडला तो जादूई दिवा, ज्याच्या मदतीने त्यांनी पुढची आपली व्यावसायिक वाटचाल सुकर केली. तो दिवा म्हणजे संगणकातील जॉस अर्थात जॉब अप्लिकेशन्स विथ स्पीच. या तंत्रज्ञानाचा त्यांना खूपच फायदा झाला. आपण टाईप केलेले प्रत्येक अक्षर-प्रत्येक शब्द हे सॉफ्टवेअर उच्चारून दाखवते, तीच बाब आपल्याला आलेल्या इ-मेल किंवा अन्य कागदपत्रांचीही. त्यामुळे डोळ्याला दिसलं नाही तरी श्रवणशक्ती तीक्ष्ण असल्यामुळे प्रत्येक शब्द न् शब्दांची शहानिशा करता येते. तेच तंत्रज्ञान त्यांनी आपल्या मोबाइल फोनमध्येही उपयोगात आणलंय. ‘‘मी माझ्या नोकिया मोबाइलमध्ये ‘टॉक्स’ नावाचे सॉफ्टवेअर टाकून घेतलेय. त्यामुळे मला आलेला प्रत्येक एसएमएस आणि इमेल मला ऐकता येतो. हा मोबाइल ही माझी खरी डार्लिग आहे,’’ कांचन हळव्या मनाने सांगतात.
कांचन पामनानी यांनी आपल्या वकिलीचा अभ्यास विविध केस लढविण्याबरोबरच अंधांविषयींची सामाजिक मानसिकता बदलवण्यासाठी केला. आपल्या मुद्देसूद वक्तव्यांनी समोरच्याला ती ती गोष्ट पटवून देऊन ती कामकाजात प्रत्यक्षात राबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कांचन यांचं काम म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
‘‘काही वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात सुरू झालेल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, धनादेश पुस्तिका यांसारख्या सुविधा अंध व्यक्तींना उपलब्ध नव्हत्या. जर या देशाचे संविधान देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समान दर्जाची ठरवते तर अंध किंवा शारीरिक मर्यादा असलेल्या व्यक्तींना बँका समतेचा दर्जा कशा काय नाकारू शकतात, असा प्रश्न मला पडला. मग मी झुंजायचे ठरविले. पण अनेकदा झुंजण्यासाठी न्यायालयीन मार्गाचीच गरज असते असे नव्हे उलट समंजस चर्चेद्वारे आणि संवेदनशील अंत:करणाद्वारे कित्येक प्रश्न सुटू शकतात, यावर माझा विश्वास होता. त्यामुळे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या एका डेप्युटी गव्हर्नर बाईंशी मी चर्चा केली. या सुविधा अंध व्यक्तीही परिणामकारकपणे वापरू शकतात आणि या सुविधा त्यांच्यादृष्टीने तितक्याच उपयुक्त असल्याचे मी त्या बाईंना पटवून दिले. त्यानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि इंडियन बँक्स असोसिएशनने अंध आणि अपंग व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.’’ कांचन यांच्या या एका छोटय़ाशा पण महत्त्वाच्या ठरलेल्या कामांचा किती लोकांना उपयोग होऊ शकतो याची कल्पनाच केलेली बरी. तसाच प्रयोग त्यांनी शेअर मार्केट संदर्भातही केला.
‘एनएसडीएल’चे माजी प्रमुख चंद्रशेखर भावे यांचा एक किस्सा कांचन यांनी सांगितला. अंध व्यक्तीला शेअरबाजारात उलाढालींमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या व्यक्तीला तो अधिकार नाही का, असा सवाल त्यांनी चंद्रशेखर भावे यांना केला. अंध व्यक्तीस शेअरबाजारातील उलाढालींविषयक माहिती मिळताना येऊ  शकणाऱ्या संभाव्य अडचणींमुळे भावे सुरुवातीस साशंक होते. त्यावेळी आव्हान म्हणून कांचन यांनी त्यांना मोबाइलमधील ‘टॉक्स’ सॉफ्टवेअरद्वारे भावे यांच्यापेक्षाही जलदगतीने एसएमएस करून दाखविले आणि अंध व्यक्तीच्या समर्थतेची जाणीव करून दिली. प्रभावित झालेल्या भावे यांनीही त्यांच्या मागणीस पाठिंबा दर्शवीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
कांचन यांचं अंध समाजासाठी महत्त्वाचं कार्य म्हणजे लेखनिक वापराविषयक त्यांनी तयार केलेली मार्गदर्शक सूत्रे. जी आधी महाराष्ट्र राज्यासाठी आणि आता केंद्रीय पातळीवरही स्वीकारली आहेत. त्या सांगतात, ‘‘अंध व्यक्तींना लेखनिक घेऊन परीक्षा देता येते मात्र यासाठी अनेक अटी असतात. संपूर्ण परीक्षा कालावधीत एकच लेखनिक असावा, अंध व्यक्ती ज्या इयत्तेची परीक्षा देत आहे, त्या इयत्तेपेक्षा सदर लेखनिक एक इयत्ता मागे असावा, त्याने किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. अशा स्वरूपाच्या अटी या लेखनिकांसाठी घालण्यात आल्या होत्या. शिक्षणातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेता एखाद्या विद्यार्थ्यांला जर, संस्कृत आणि गणित असा विषयगट अभ्यासासाठी निवडायचा असेल तर त्याने संपूर्ण परीक्षेसाठी एकच लेखनिक घेऊन कसे चालेल? कारण त्याच्यावतीने लेखन करणाऱ्या व्यक्तीला संस्कृत किंवा गणित यांसारख्या विषयाचे लेखन करण्याची क्षमता नको का, हा प्रश्न मी उपस्थित केला. शिवाय समजा एखाद्याला फ्रेंच भाषेचा पेपर द्यायचाय तर त्या लेखनिकाला फ्रेंच अवगत असणं गरजेचे आहे. तसेच सध्या परीक्षांचा कालावधी इतका लांबला आहे आणि दोन पेपरमधील अंतर इतके वाढू लागले आहे की आपला लेखनिक परीक्षा पूर्ण होईपर्यंत उपलब्ध होणे कठीण नाही का, हाही एक प्रश्नच होता. त्याविरुद्ध मी आवाज उठवला. याशिवाय लेखनिक कसा असावा तर ज्याचे हस्ताक्षर सुवाच्य आहे आणि ज्याला स्पेलिंग – शब्द अचूक लिहिता येतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, ही गोष्ट मी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडली. त्यामुळे न्यायालयाने अंध व्यक्तींसाठी हितकारक निर्णय दिला.’’ आपल्या स्वानुभवाचा उपयोग पुढच्या पिढीच्या भल्यासाठी करण्याचा सुज्ञ व दूरदृष्टीने करणाऱ्या कांचन पामनानी म्हणूनच महत्त्वाच्या ठरतात. त्या मागचं समीकरण त्या स्वच्छपणे मांडतात. त्या सांगतात, जे अंध, अपंग, विकलांग आहेत त्यांचे प्रश्न त्या व्यक्ती स्वत: किंवा त्यांच्या नातेवाईकच अधिक ठोसपणे मांडू शकतात. कारण त्यांच्यासमोर जी आव्हाने असतात, समस्या असतात त्या अव्यंग व्यक्ती तितक्याच प्रभावीपणे समजून घेईलच असे नाही. पण हीच लोकं  भीडस्तपणे वागताना दिसतात. ‘आपणच आपले प्रश्न मांडले तर समाज आपल्या हेतूंविषयी शंका घेईल, अशी शंका त्यांना वाटत असते. मात्र अंध, अपंग व्यक्ती ज्यांच्या घरात आहेत, अशांनीच जर हे प्रश्न लावून धरले नाहीत, तर समाजाला ते कसे कळतील?’’ त्या आपल्यासमोरच प्रश्न टाकतात.
खरं तर कांचन यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड. जसजशी दृष्टी कमीकमी होत गेली तसतशी ही आवड कशी जोपासायची हा प्रश्न निर्माण होऊ  लागला. पण आता कांचन यांनी या अडचणींवर मात केली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी स्वत:साठी २५ जणांचा वाचकवर्ग तयार केला आहे. अनेक विद्यार्थी आणि गृहिणी आजही त्यांना फावल्या वेळात विविध पुस्तके वाचून दाखवतात. त्यांना जॉन ग्रिश्ॉम, नॅन्सी डर्य़ू यांचे रहस्यकथा लेखन आवडते पण हॅरी पॉटरसारख्या कथाही त्यांना मोहित करतात.
अपंग व्यक्तींना आत्मविश्वास वाढविणारे समुपदेशन करणे, चर्चेद्वारे अधिकाधिक समस्यांवर तोडगा काढणे, अंध व्यक्तींच्या समस्या प्रभावीपणे मांडणे आणि ज्यांची मुलं अंधत्वाने जखडली आहेत अशा पालकांना त्यांची मुलं किती उंची गाठू शकतात हे दाखविणे, त्यांना मार्गस्थ करणे अशी विविध कामे कांचन आपली वकिली सांभाळून करीत आहेत. ‘कॉर्पोरेट कायदा आणि बौद्धिक स्वामित्त्व संपदा’ यात त्यांचा हातखंडा असून आपला वकिली पेशा हेच त्यांचे चरितार्थाचे मुख्य साधन आहे. त्यांनी दूरदृष्टी दाखवत समाजातील अंधांचा जगण्याचा दर्जा उंचावण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असणाऱ्या कांचन पामनानी म्हणून नेत्रहीन असूनही डोळस ठरतात.   
संपर्क- kanchanpamnani@gmail.com दूरध्वनी-०२२-२२०२९१२६ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:54 am

Web Title: creative inspiring powerful stories of women empowerment article 7
Next Stories
1 मानसिक अपंगत्वावर मात
2 प्रतिकूलतेशी खंबीर लढा
3 नाचे रोमा !
Just Now!
X