12 November 2019

News Flash

डेंग्यूचा विळखा

डेंग्यू या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून गेल्या ५ वर्षांत ही लागण तीन पटींनी वाढली आहे. दर वर्षी जगात २७ कोटी लोकांना हा आजार

| November 29, 2014 01:01 am

डेंग्यू या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून गेल्या ५ वर्षांत ही लागण तीन पटींनी वाढली आहे. दर वर्षी जगात २७ कोटी लोकांना हा आजार ग्रासतो. यांपैकी १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये तो गंभीर रूप धारण करतो. म्हणूनच अशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी लोकांची जबाबदारी ही प्रशासनाइतकीच किंबहुना प्रशासनापेक्षा अधिक आहे याची जाणीव होण्यासाठी हा लेख प्रपंच.
आजकाल आपण सर्वच वर्तमानपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ अशा अनेक माध्यमांद्वारे डेंग्यूचा विळखा, डेंग्यूचे अमुक बळी असे शब्द वारंवार ऐकतो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य (Viral) आणि डासांमार्फत पसरणारा एक तापाचा सर्वसाधारण आजार आहे, मात्र तो कधी तरी गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
     ‘डेंग्यू’ हा स्पॅनिश शब्द आहे. या आजाराची वर्णने इ.स. २७५ पासून उपलब्ध आहेत. चीनमध्ये याला
‘विषारी पाण्याचा आजार’ असे म्हटले जायचे, मात्र डेंग्यूची साथ १७७९ ते १७८० या सालामध्ये पहिल्यांदा आली. मग १९०० व्या शतकापासून या आजाराचे प्रमाण सतत वाढतच असून गेल्या ५ वर्षांत ही लागण तीन पटींनी वाढली आहे आणि ५ ते १० कोटी लोकांना, तर काही संस्थांच्या आकडेवारीनुसार जगात २७ कोटी लोकांना दर वर्षी हा आजार ग्रासतो. यांपैकी १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये तो गंभीर रूप धारण करतो. रुग्णांची संख्या पुढील कारणांमुळे वाढते आहे. १) वाढते
शहरीकरण २) वाढती लोकसंख्या ३) जागतिक तापमान बदल ४) वाढता आंतरराष्ट्रीय प्रवास.
   वरीलपैकी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे कारण महत्त्वाचे आहे कारण विषुववृत्तीय वातावरण असलेल्या भागांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. मात्र हेही तितकेच खरे की वाढत्या जागतिकीकरणामुळे डेंग्यू आज ११० देशांमध्ये (इंग्लंड, अमेरिकासुद्धा) दिसून येतो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारात मलेरिया वा हिवतापापाठोपाठ डेंग्यूचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक लागतो.
     डेंग्यू हा आजार ‘डेंग्यू व्हायरस’ (Dengu Viral) या  RNA प्रकारच्या विषाणूमुळे होतो. त्याच्या ५ उपजाती असून (पाचवी उपजात ही २०१३ मध्येच लक्षात आली आहे) हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो अशा व्यक्तीला जेव्हा इडिस ((Eedes) डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला  चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. सुमारे ४ ते ७ दिवसांनंतर या व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. त्यानंतर पहिले ३-४ दिवस ताप येतो. ४० अंश सेल्सिअसपर्यंत ताप असतो. दिवसातून दोन वेळा तापात चढ-उतार होते. हाडापर्यंत वेदना जाणवतात, सांधे दुखतात, अंथरुणातच झोपून राहावे वाटते, गळून गेल्यासारखे वाटते तसेच मळमळ, थोडी पोटदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे जाणवतात. ४-५ दिवसांनी अंदाजे ६० टक्के लोकांना अंगावर पुरळ उठते ते गोवरासारखे दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो.     
सर्वसाधारणपणे ९५ टक्के रुग्णांना इतपतच त्रास होतो आणि पुढील ३-४ दिवसांमध्ये पुष्कळसे बरे वाटून दोन आठवडय़ांत तो पूर्ववत दैनंदिन कामकाजास सुरुवात करू  शकतो. मात्र १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार तापानंतर ५ व्या दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करतो. त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १)DHF – डेंग्यू फिवर- यामध्ये डेंग्यूच्या तापाबरोबर डिंबिकांची संख्या (प्लेटलेट्स) प्रचंड प्रमाणात कमी होते, त्यामुळे रक्तस्राव संभवतो. रक्त गोठणं होत नाही. त्यामुळे नाक, तोंड, कातडी, मूत्रपिंड, फुप्फुस इ.मधून रक्तस्राव होतो आणि रोग्याची प्रकृती गंभीर स्वरूप धारण करते.
२) DSS (डेंग्यू शॉक सिंड्रोम)- डेंग्यूचा ताप आल्यापासून ४-५ व्या दिवशी डेंग्यूचा विषाणू आणि त्याविरुद्ध शरीराने तयार केलेले प्रतिपिंड (antibody) यांचा अतिप्रमाणात संयोग होऊन रक्ताच्या
केशवाहिन्यांमधून रक्तघटक पाझरू लागतात. त्यामुळे अंगावर सूज येते विशेष करून घोटय़ासकट पायावर, डोळ्यांभोवती अशाच पाझरामुळे छातीमध्ये व पोटामध्ये पाणी साठते व दम लागतो. त्याच वेळी रक्तातील पाण्याचे प्रमाण गंभीररीत्या कमी होते व रक्तदाब कमी होतो आणि त्यामुळे शरीराला
होणारा रक्तपुरवठा कमी-कमी होत जातो आणि निरनिराळ्या अवयवांची कार्यदुर्बलता वाढते आणि रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते.
 डेंग्यूचे हे वरील दोन गंभीर प्रकार मुलांमध्ये साधारणत: २ ते १४ वर्षे वयांमध्ये जास्त प्रकर्षांने आढळतात तसेच गर्भवती स्त्रिया, ६५ वर्षे वयांवरील व्यक्ती, मधुमेही, स्टिरॉइड घेणाऱ्या व्यक्ती व
कर्करोगग्रस्त व्यक्तींमध्ये गंभीर प्रकार होण्याचा धोका जास्त होतो. विशेष म्हणजे ज्या व्यक्तींना डेंग्यूचा आजार आधी होऊन गेलाय आणि आता नव्याने डेंग्यूच्या वेगळ्या
उपप्रकाराने जंतू-प्रवेश झाला त्यांनाच वरील प्रकारचा धोका असतो.
डेंग्यूची गंभीर लक्षणे-१) कातडीवर रक्ताळलेले पुरळ ((Purpura)
२) रक्तस्राव ३) झोप जास्त येणे, भ्रम. ४) दम लागणे, सतत उलटय़ा, पोटदुखी ५) सूज ६) शरीर थंड पडणे- रक्तदाब कमी होणे.
डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्ल्यू, सर्दी, मलेरिया, टायफाईड आदींसारखाच तो वाटतो म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्तचाचण्या कराव्या लागतात.
१) हिमोम्राम- पांढऱ्या पेशींचे प्रमाण (WBC) व डिंबिकांचे प्रमाण कमी आढळते.
२) NS – ही टेस्ट तापाच्या १ ते ४ दिवसांत पॉझिटिव्ह आढळून येते.
३) IGM – ही चाचणी ५ दिवस ते १५ दिवस या काळात पॉझिटिव्ह असते.
४) IgG – ही तपासणी १० व्या दिवसापासून पॉझिटिव्ह येते व कायम कमी-अधिक प्रमाणात पॉझिटिव्हच राहते.
डेंग्यू या आजारासाठी एखादे विशिष्ट औषध अजूनही उपलब्ध नाही. त्या दिशेने जोरदार प्रयत्न चालू आहेत. परंतु बहुसंख्य रुग्ण हे स्वत:च्या (औषधांनी निर्माण होणाऱ्या) प्रतिकारकशक्तीने बरे होत असतात. ताप व अंगदुखीसाठी फक्त पॅरॅसेटेमॉल (Crocin, मेटॅसिन इ.) घ्यावे (अ‍ॅस्पिरीन, ब्रुफेन इ. वापरू नये). भरपूर पाणी,  इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी प्यावे आणि पूर्णत: विश्रांती घेणे आवश्यक आहे. गंभीर लक्षणे जरा जरी दिसली तरी डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा आणि त्यांनी सुचवलेल्या इस्पितळात भरती व्हावे.
आजमितीला डेंग्यूविरुद्ध परिणामकारक धोकाविरहित सुरक्षित लस उपलब्ध नाही (२०१५च्या मध्यापर्यंत येईल असा आजचा अंदाज आहे). त्यामुळे डेंग्यूचे प्रतिबंधन हे ‘इडिस’ डासांचा नायनाट तसेच त्यांचा दंश टाळणे या दोन बाबींवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे हा डास दिवसा-उजेडी कार्यरत असल्याने दिवसभर संपूर्ण अंग झाकणारे, पूर्ण बाह्य़ांचे कपडे वापरणे, दुपारी विश्रांतीच्या वेळी मच्छरदाणी वापरणे तसेच डासांना पिटाळून लावणारी विविध रसायनयुक्त मलमे (उदा. ओडोमॉस), गुडनाइट, उदबत्त्या इ. वापर क्रमप्राप्त आहे. डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घरातीलही पाण्याच्या टाक्या, कुंडय़ा, पाणथळ भाग, करवंटय़ा, रबरी टायर, फुलदाण्या, कुलर्स इ. भागांमध्येही पाणी न साठण्याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही ठिकाणी ५ दिवसांच्या वर पाणी साठू देऊ नये. घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व कोरडा असावा. पाणीसाठा करणे आवश्यकच असेल तर त्यामध्ये कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच त्यामध्ये गप्पी मासे (हे नगरपालिकेकडून मोफत मिळतात) पाण्यामध्ये सोडावेत. डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्वरित कळवावे म्हणजे सक्षम अधिकारी त्या रुग्णाच्या आजूबाजूच्या भागात कीटकनाशक फवारणी करून इतरही सुयोग्य व परिणामकारक उपाय योजना सुचवतील.
    डेंग्यूसारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी लोकांची जबाबदारी ही प्रशासनाइतकीच किंबहुना प्रशासनापेक्षा अधिक आहे याची जाणीव होण्यासाठी हा लेख प्रपंच.    ल्ल

First Published on November 29, 2014 1:01 am

Web Title: dengue fever symptoms causes and treatments
टॅग Dengue,Dengue Fever