News Flash

तिच्या जगात, परदेशात : पुनर्वसन, पुनर्निर्माणातून विकास

हुकूमशाहीपाठोपाठ अनेक वर्षे चाललेल्या यादवी युद्धामुळे आणि वांशिक तणावांमुळे म्यानमार पोखरून निघालेला असताना, एका विधवा स्त्रीनं विस्थापितांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘मेट्टा डेव्हलपमेंट

| August 29, 2014 01:09 am

हुकूमशाहीपाठोपाठ अनेक वर्षे चाललेल्या यादवी युद्धामुळे आणि वांशिक तणावांमुळे म्यानमार पोखरून निघालेला असताना, एका विधवा स्त्रीनं विस्थापितांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘मेट्टा डेव्हलपमेंट फाउंडेशन’ची स्थापना करत लाखो निर्वासितांना आधार दिला, विविध जमातींमध्ये सलोखा निर्माण केला. स्थिर व स्वयंपूर्ण समाजासाठी झटणाऱ्या लाहपाई सेंग वॉ यांच्याविषयी..

उ ज्ज्वल भवितव्याची आस धरणारा म्यानमार हा देश अजूनही भीषण भूतकाळाच्या काळ्याकुट्ट सावल्यांमधून पूर्णपणे बाहेर पडू शकलेला नाही. पन्नास वर्षांच्या अत्यंत क्रूर अशा हुकूमशाहीमुळे, जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या अनेक दशकांच्या यादवी युद्धामुळे आणि वांशिक तणावांमुळे हा देश पोखरून निघाला. जगात एकटा पडला आणि जगातील अविकसित देशांपैकी एक, या पातळीवर घसरला. २०१० साली घेतल्या गेलेल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे खुल्या लोकशाहीच्या भविष्याकडे या देशाने पहिलं पाऊल उचललं आहे आणि पहिले मुलकी सरकार प्रस्थापित केले आहे. परंतु म्यानमारचं भवितव्य घडवण्याच्या मार्गात अजूनही असंख्य बिकट आणि गुंतागुंतीच्या अडचणी उभ्या आहेत.
अल्पसंख्याक असलेल्या काचिन वंशातली, लाहपाई सेंग वॉ ही चौसष्ट वर्षीय विधवा स्त्री, या समस्यांशी दोन हात करण्यात आघाडीवर आहे. राज्यस्तरीय सरकारी अधिकारी असलेल्या पित्याची आणि शिक्षिका असलेल्या मातेची ही सुकन्या, देशहिताच्या कामात १९८७ पासून महत्त्वाचा सहभाग घेऊ लागली. यांगून विद्यापीठात मानसशास्त्राचं शिक्षण घेत असताना तिनं लष्करी दंडेलशाहीचा जवळून अनुभव घेतला. तिच्या भावाने काचिनच्या बंडखोरीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच्याशी तिचा संपर्क असल्याच्या संशयापोटी तिला कैदेत टाकण्यात आलं होतं. म्यानमार-चीन सीमेलगतच्या विस्थापितांच्या मदतकार्यात महत्त्वपूर्ण सहभाग घ्यायला तिनं १९८७ साली प्रारंभ केला. १९९० साली ती बँकॉकला गेली आणि तेथून तिनं काचिन-स्वतंत्र-संस्थेच्या सेवाभावी दलात विकास अधिकारी हे पद सांभाळायला प्रारंभ केला. १९९७ साली तिनं आणखी एक धारिष्टय़ केलं आणि सेवभावी संस्था आणि निष्ठावान समर्थन यांच्या मदतीनं तिनं लष्करी हुकूमशाही राजवट असलेल्या म्यानमारमध्ये ‘मेट्टा डेव्हलपमेंट फाउंडेशन’ नावाची एनजीओ सुरू केली. विस्थापितांच्या समस्या, युद्धग्रस्त भागात मदत पुरवण्याचं काम यासारख्या गोष्टी या संस्थेनं हाती घेतल्या. उत्तर म्यानमारमध्ये या कामाला त्यांनी सुरुवात केली. काचिन बंडखोर आणि सरकारी लष्कर यांच्यातील लढय़ामुळे, या भागात सत्तर हजार लोक विस्थापित झालेले होते.
लाहपाई सेंग वॉ हिचं प्राथमिक उद्दिष्ट होतं की, मेट्टा विकास संस्थेतर्फे दीर्घकालीन र्सवकश मदत पुरवताना, परस्पर संबंध जोडून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा. कृषीक्षेत्रासाठी मेट्टा विकास संस्थेनं सहाशेहून अधिक शेतकी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आणि पन्नास हजारांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांना शेती आणि जंगलं यांचं उत्कृष्ट व्यवस्थापन करायला शिकवलं. या संस्थेनं बालवयात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक प्रयत्नांनी पाणी स्वास्थ्य आणि स्वच्छता या गोष्टींची काळजी घ्यावी, म्हणून मेट्टानं पुढाकार घेऊन लोकांना एकत्र आणलं. उपजीविका मिळवून देणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी मेट्टानं तंत्रज्ञानाची आणि वित्तीय स्वरूपाची मदत पुरवली. २००८ सालचं ‘नर्गिस’ हे चक्रीवादळ म्यानमारच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती ठरले. या चक्रीवादळाचा फटका बसून लक्षावधी लोक बेघर-विस्थापित झाले. त्या वेळेस मेट्टाचे नेतृत्वगुण प्रकर्षांनं सर्वाना जाणवले. या संस्थेनं पुनर्वसन, पुनर्निर्माण आणि विकास यासाठी देशभरात प्रयत्न केले आणि लक्षावधी लोकांना साहाय्य पुरवलं, त्यांना आधार दिला.
सेंग वॉच्या नेतृत्वाखाली मेट्टा-संस्था-म्यानमारमधली सर्वात मोठी सेवाभावी संस्था बनली आहे. यांगूनबाहेरही या संस्थेच्या सहाशे शाखा आहेत, संस्थेची तीन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रं आहेत आणि वेगवेगळ्या २३५२ जमातींमधल्या सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेतला आहे. युद्धजर्जर आणि सामाजिकदृष्टय़ा दुभंगलेल्या देशातल्या या धैर्यशाली स्त्रीनं सरकार आणि बंडखोर या टोकाच्या दोन मंडळींना आपल्याकडे वळवून घेऊन, मोठय़ा कुशलतेनं या सेवाभावी संस्थेचा रथ प्रगतिपथावर वेगानं हाकला आहे. ज्या देशात यादवी आणि अस्थिरतांचे थैमान सुरू असते तिथं स्थिर आणि स्वयंपूर्ण समाज प्रस्थापित करणं ही विकासाची पहिली पायरी आहे. हे या चाणाक्ष स्त्रीनं पुरेपूर जाणलं. या विश्वासापोटीच तिनं सुचवलं की, म्यानमारमध्ये शांती आणि सलोखा घडवून आणायचा असेल तर सर्व जमातींना विश्वासात घेऊन विकास प्रक्रिया करणं आवश्यक आहे. ‘मेट्टा’ या शब्दाचा अर्थ आहे दयाशीलता. ती स्वत:च या शब्दाचं मूर्त रूप आहे. ती स्वत: काचिन जमातीची असून ख्रिस्तीधर्मीय आहे. म्हणजे दुहेरी अल्पसंख्याक म्हणता येईल अशी. मात्र याही परिस्थितीतून ती तावून-सुलाखून बाहेर पडलेली असल्याने, नेतृत्वस्थानी असताना तिनं कमालीचं पारदर्शित्व, चतुराई दाखवून वेगवेगळ्या वंशाच्या, धर्माच्या आणि राजनैतिक निष्ठांच्या विभिन्न जमातींमध्ये सुसंवाद निर्माण केला आहे. तेरा वर्षे ‘मेट्टा’च्या कार्यकारी संचालक पदाची धुरा कार्यक्षमतेनं सांभाळल्यावर तिनं स्वेच्छेनं ते स्थान नव्या पिढीच्या हाती सोपवलं आहे आणि त्यायोगे त्यांना सत्तास्थान दिलं आहे. परंतु अजूनही ती म्यानमारमधील सेवाभावी समाजाचा सक्रिय घटक आहे, शांतता आणि विकास यासाठी ती अजूनही अत्यंत प्रयत्नशील आहे.
अत्यंत शांतपणे संप्रेरक आणि सर्वसमावेशक नेतृत्व पुरवून तिनं युद्धजर्जर आणि विविध वंश, धर्म आणि राज्यनिष्ठांनी दुभंगलेल्या समाजाला जे नवसंजीवन दिलंय, सर्वानी सहभाग घेऊन सुसंवादानं विकास घडवण्याची तिनं समाजाला जी शिकवण दिलीय आणि त्यायोगे तिनं म्यानमारच्या शांत भवितव्यासाठी जो स्थिर पाया रचला आहे, त्याची सादर दखल घेऊन रमन मॅगसेसे पारितोषिकाच्या विश्वस्तांनी तिला २०१३ सालचा मॅगसेसे पुरस्कार देऊन तिचा गौरव केला.
या संस्थेच्या अध्यक्षा, कार्मेन्सिटा अबेल, २०१३ सालच्या मॅगसेसे पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळेस म्हणाल्या, ‘‘या वर्षी तीन असाधारण व्यक्ती आणि विस्मयजनक कार्य करणाऱ्या दोन संस्था या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत. या सर्वानी आपापल्या देशातील विविध सामाजिक समस्यांवर, चिकाटीनं आणि हुशारीनं एका वेळी एक पाऊल पुढे टाकत, यशस्वीरीत्या तोडगे शोधले आहेत. निस्पृहतेनं, विना अहंकार आणि तरीही अत्यंत प्रभावीपणे काम करून त्यांनी आपल्यापुढे वस्तुपाठच घालून दिला आहे, की कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशक सहकारी नेतृत्व खरोखरच अगदी तळागाळापासून परिवर्तनाच्या लाटा उसळवू शकतं. या लोकांनी शोधलेले तोडगे त्यांचे स्वत:चेच असले, तरी या सर्व मॅगसेसे पुरस्कारधारकांमध्ये एका गोष्टीत साधम्र्य आहे. त्यांच्या सर्वाच्या ठायी, परिवर्तन-प्रवर्तक अशी प्रचंड ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा त्यांच्या इतरांचं आयुष्य सुधारण्याच्या उद्दिष्टाला अविरतपणे इंधन पुरवते आहे.’’
या पारितोषिकाचा नम्रपणे स्वीकार करताना सेंग वॉ हिनं कार्यात मदत करणाऱ्या सर्वाचे आभार मानले आणि त्यानंतर तिची खरीखुरी खंत व्यक्त करत म्हटलं, ‘‘दुर्दैवानं काचिनमध्ये झालेली शस्त्रसंधी कायमस्वरूपी टिकली नाही. सतरा वर्षांनंतर, जून २०११ मध्ये, पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला आणि युद्धभूमीवरून जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या ग्रामीण जनतेची संख्या आता एक लाखांवर पोचली आहे. संपूर्ण म्यानमार देशात आज पाच लाख विस्थापित निर्वासित लोक आहेत आणि त्यांच्यासाठी प्रचंड मानवहितकारी मदत पुरवणं गरजेचं झालं आहे. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित झाल्याखेरीज खराखुरा विकास घडणं अशक्य आहे.. शांतपूर्ण परिवर्तन घडवण्याच्या प्रक्रियेसाठी जनसामान्यांचे आवाज सर्वदूर पोहोचवणं गरजेचं आहे. त्यात मी जमेल तेवढा सहभाग घेत राहीन.’’
पारितोषिकानं गौरवल्यामुळे खरीखुरी कळकळ असणाऱ्या कार्यकर्त्यांचं काम कधी थांबत नसतं. या पारितोषिकाद्वारे आपल्या देशातील समस्येकडे जगाचं लक्ष वेधलं जाऊन अनेकांचा आपल्या देशहिताला हातभार लागू शकेल, एवढंच त्यांच्या लेखी या सन्मानाचं महत्त्व असतं. त्यांच्या दृष्टीनं हा गौरव म्हणजे जोमानं विकास घडवण्याचं केवळ एक माध्यम असतं!suneetikane@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:09 am

Web Title: development from rehabilitation and reconstruction
टॅग : Chaturang,Development
Next Stories
1 स्वत:ला बदलताना : होते ओझे इतिहासाचे अन् पूर्वग्रहांचे!
2 उद्योगाचे दारी
3 वेगळी लेखणी
Just Now!
X