20 October 2020

News Flash

बालमधुमेही

आपल्या मुलाला मधुमेहाचे निदान होणे म्हणजे पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. त्या अजाण वयात इन्सुलीन इंजेक्शन व आहारावरील बंधने त्यांच्यावर लादताना पालकांची कसोटी लागते.

| February 8, 2014 04:49 am

आपल्या मुलाला मधुमेहाचे निदान होणे म्हणजे पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. त्या अजाण वयात इन्सुलीन इंजेक्शन व आहारावरील बंधने त्यांच्यावर लादताना पालकांची कसोटी लागते. मात्र मधुमेह जर नीट नियंत्रणात असेल तर या मुलांच्या शैक्षणिक जीवनात बाधा तर येणार नाहीच, पण पुढे ते वैवाहिक जीवनही सुखात घालवू शकतील. आयुष्यात त्यांना हवे ते मिळवू शकतील.

बालवयात होणारा मधुमेह समाजात अधिकाधिक प्रमाणात दिसू लागला आहे. लहान मुलांमध्ये होणारा हा मधुमेहाचा प्रकार ‘टाइप क’ या नावाने संबोधला जातो. हा मधुमेह होण्याचे नेमके कारण अजून सापडलेले नाही. आपल्या शरीरात जठराच्या मागे स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते त्यात इन्सुलीन तयार करण्यासाठी बीटा पेशी असतात. बाल-मधुमेहींमध्ये काही कारणाने रोगप्रतिबंधक यंत्रणा (ऑटोइम्युनिटी) या बीटा पेशींना परके ठरवते व एखाद्या जंतूवर हल्ला केल्याप्रमाणे बीटा पेशींवर हल्ला करते आणि अर्थातच यात बीटा पेशींचा नाश होतो. या प्रक्रियेला अनेक घटक जबाबदार असतात; जसे विषाणू, प्रदूषण, आनुवंशिकता. मुख्य म्हणजे मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात तेव्हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त बीटा पेशी नष्ट झालेल्या असतात.
बालवयात मधुमेह होण्याची कारणे जरी नक्की माहीत नसली तरी उपाय १९२१ साली समजला. इन्सुलीन तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यामुळे इन्सुलीन बाहेरून शरीरात टोचून घातले तर ही कमतरता दूर होऊ शकते हे लक्षात आले. कॅनडात टोरंटो येथे डॉ. बॅन्टिंग व डॉ. बेस्ट यांनी इन्सुलीन वेगळे करण्यात यश मिळवले. ११ जानेवारी १९२२ रोजी १४ वर्षे वयाच्या मधुमेहाशी शेवटची लढत देत असलेल्या ‘लिओनार्ड थॉमसन’ नावाच्या मुलाला जगातले पहिले इन्सुलीन इंजेक्शन देण्यात आले आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्याच्यात चैतन्य येऊ लागले, तो हिंडू-फिरू लागला व रोज इन्सुलीनचे इंजेक्शन घेऊन हा मुलगा १३ वर्षे जगला. मधुमेहाने नाही पण दुर्दैवाने न्यूमोनियामुळे तो मरण पावला. इन्सुलीनचा हा यशस्वी प्रयोग पुढे अनेकांचे प्राण वाचविण्यास कारणीभूत ठरला. आपण जे अन्न खातो त्याचे ऊर्जेत (एनर्जी) रूपांतर करण्यासाठी इन्सुलीनची गरज असते. आता इन्सुलीन घेण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अगदी बारीक सुया, इन्सुलीन पेन्स, शुद्ध स्वरूपातील तसेच मानवी इन्सुलीनसदृश काम करणारी अ‍ॅनालॉग्ज, डिझायनर इन्सुलीन बाजारात उपलब्ध आहेत. इन्सुलीन पंपने तर दिवसातून ३-४ इंजेक्शन टोचून न घेता इन्सुलीन डिलीव्हरीमध्ये अनेक अ‍ॅडजस्टमेंट करत मधुमेहाचे नियोजन करणे सहज शक्य झाले आहे.
हे सर्व जरी खरे असले तरी दररोज २४ तास, ३६५ दिवस, नव्हे आयुष्यभर आता आपल्या मुलाला साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दिवसातून ३-४ इंजेक्शन्स, कमीत कमी दोनदा साखर तपासणी, खाण्यावरील बंधने.. अरे बापरे कशी जमणार ही तारेवरची कसरत? या विचारांनी पालक खचून जातात. दोन वर्षांच्या पिंकीला जेव्हा मधुमेहाचे निदान झाले तेव्हा तिच्या आईला पडलेला पहिला प्रश्न आता हिचे लग्न कसे होणार? हिचे इंजेक्शन, खाण्याची तंत्र सांभाळण्यासाठी आता मी नोकरी सोडावी का? नोकरी सोडली तर औषधाच्या खर्चाचा ताळमेळ बसेल का? अशा अनेक विचारांनी संपूर्ण कुटुंब सैरभैर होऊन गेले.
खाण्या-बागडण्याच्या वयात आहार व इन्सुलीनचे तंत्र शिकून घेणे, ते पाळणे, घरात इतर भावंडे व आई-वडिलांकडून एक वेगळी वागणूक मिळणे (जास्त काळजी घेतली जाते, ‘बिचारा’ ठरवले जाते) यातून येणारे नैराश्य, कुढेपणा, सामाजिक बंधनात स्वत:चा मधुमेह चोरून ठेवावासा वाटणे या सर्वातून एक कायमचा न्यूनगंड निर्माण होतो. बालवयात मधुमेह झालेल्या मुली जेव्हा वयात येतात तेव्हा पालकांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. यावेळी अशा कुटुंबाला समुपदेशनाची गरज असते.
मधुमेह नियोजनासाठी बालमधुमेहींच्या बाबतीत सर्वासाठी सरसकट नियम बनवता येत नाहीत. या वयोगटातील मुला-मुलींचा हा शारीरिक, मानसिक जडण-घडणीचा काळ असतो, त्यामुळे मधुमेहाच्या औषधोपचारांमधून केवळ साखरेवर नियंत्रण एवढेच उद्दिष्ट न ठेवता या मुला-मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक, लैंगिक अशा सर्व प्रश्नांची हाताळणी करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारची उपाययोजना टीम वर्क करू शकते. या गटामध्ये बालमधुमेहातील तज्ज्ञ डॉक्टर, मधुमेह प्रशिक्षक, आहारातज्ज्ञ, समुपदेशक, स्वत: बालमधुमेही व त्याचे कुटुंबीय या सर्वाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
मधुमेही मुलांच्या दिनचर्येत केलेले थोडेसे बदल आयुष्य सुखकर आणि दीर्घ जगायला पुरेसे आहेत. ते बदल काय असतील आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे ते बघू या-
१) कुटुंबातील लोकांनी विशेषत: आई-वडिलांनी लक्षात ठेवावे की, मुलांना मधुमेह होतो त्यात कोणाचाही दोष किंवा चूक नसते. घरातील मधुमेहीसाठी संगितलेली जीवनशैली त्याच्या एकटय़ासाठी न ठेवता संपूर्ण कुटुंबाने त्याचा स्वीकार करावा म्हणजे बालमधुमेहीस फक्त मीच का खायचे नाही, मीच का बंधने पाळावयाची ही भावना येणार नाही. उदा. एखादा पदार्थ बालमधुमेहीस खाता येणार नसेल तर घरात तो पदार्थ आणणे टाळावे. तसेच घरातील सर्वानीच व्यायामाची सुरुवात करावी.
२) इन्सुलीन इंजेन्शन देण्याचे तंत्र, ग्लुकोमीटरच्या साहाय्याने साखर तपासणी करणे हे कुटुंबातील सर्वानी माहिती करून घ्यायला हवे.
३) बालमधुमेही व त्याच्या पालकांसाठी हायपोग्लास सेमिया म्हणजे रक्तातील साखर आवश्यकतेपेक्षा कमी होणे (<८०) हा अतिशय भीतिदायक अनुभव असू शकतो. त्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी हायपोची लक्षणे (अचानक  घाम येणे, चिडचिड, चक्कर येणे, गोंधळून जाणे, रडणे) व त्यावेळी ताबडतोब करावयाचे उपाय (लगेच साखर तपासणे, ३ चमचे साखर किंवा हायपो टॅब किंवा फळांचा रस देणे, १५-२० मिनिटांनी परत साखर तपासून बघणे) याची योग्य ती माहिती संपूर्ण कुटुंबाला असणे गरजेचे आहे.
४) बाल मधुमेहींनी कोणताही आजार अंगावर काढू नये, अगदी छोटी-मोठी इन्फेक्शन्ससुद्धा. लघवीत किटोन दिसले तर भरपूर पाणी, पातळ पदार्थ सेवन करावेत व दर ३-४ तासांनी रक्तातील साखर व लघवीतील किटोन्स तपासावेत. पोटात दुखणे, उलटय़ा होणे, श्वासोच्छ्वासास त्रास होणे ही किटोन वाढल्याची काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी किंवा हेल्थ केअर टीमशी संपर्क साधावा.
५) मधुमेह समाजापासून लपवून ठेवू नका. बालमधुमेहीच्या शाळेत/ क्लास येथील जबाबदार व्यक्तींना, मित्रांना मधुमेहाविषयी व हायपोग्लायसेमियाची लक्षणे व उपचार याची माहिती असावी.
६) मधुमेही मुलांची आहाराची तत्त्वे इतर सामान्य मुलांसारखीच असतात. मधुमेह असल्यामुळे काही निराळा आहार, निराळे पदार्थ किंवा जास्त प्रमाणात जीवनसत्त्वांची गरज नसते. काबरेदकांचे प्रमाण, इन्सुलीनची मात्रा व वेळा यानुसार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बालमधुमेहीच्या आवडी-निवडी विचारात घेऊन रोजच्या आहारात वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी गटानुसार पर्यायी पदार्थाच्या यादीचा वापर करता येतो.
७) प्रत्येक बालमधुमेहीजवळ त्याचे ओळखपत्र असणे महत्त्वाचे आहे. त्यावर त्याचे स्वत:चे नाव, पत्ता, घरचा व डॉक्टरांचा फोन नंबर, त्याला चालू असलेली मधुमेहाची औषधे व त्याचा डोस तसेच इमरजन्सी अवस्थेत त्याच्यावर करावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती असणे गरजेचे आहे.  
८) शाळा, कॉलेजमधील सर्व उपक्रमांमध्ये (खेळ, सहल, स्पर्धा) बालमधुमेही इतर सामान्य मुलांप्रमाणेच सहभागी होऊ शकतो. आपल्याकडील अनेक बालमधुमेहींनी शिक्षणात, खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे, स्विमिंगमध्ये सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला आहे.
९) मधुमेहीच्या बाह्य़ लक्षणांवरून त्याची औषध योजना ठरविता येत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे? घेत असलेल्या इन्सुलीनचा डोस योग्य आहे का? हे ठरविण्यासाठी दिवसातून ३-४ वेळा ग्लुकोमीटरच्या साहाय्याने साखर तपासणे व त्याप्रमाणे इन्सुलीन डोसची अ‍ॅडजस्टमेंट करणे याचे योग्य प्रशिक्षण प्रत्येक बालमधुमेही व त्याच्या पालकांनी घेतले पाहिजे.
१०) बालमधुमेहींना रोजचे इन्सुलीन इंजेक्शन व वरचेवर रक्तातील साखर तपासणी याला पर्याय नाही. तसेच काही ठराविक कालावधीने इतर तपासण्या करणे आवश्यक असते. उदा- दर तीन-चार महिन्यांनी ऌुअ’ू वर्षांतून एकदा ्रेू१ं’ ३ी२३, डोळे तपासणी वगैरे. या सर्व गोष्टींचा सरासरी महिना खर्च एका मुलास अंदाजे २००० रुपये इतका येतो. आर्थिक अडचणींमुळे इन्सुलीन इंजेक्शन किंवा साखर तपासणीत चालढकल झाली तर हायपोग्लायसेमिया किंवा किटोअ‍ॅसीडोसीससारख्या गंभीर परिस्थितीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते व खर्च आपल्या आवाक्यात राहात नाही. मुलाचे शारीरिक नुकसान होते ते निराळेच.
आपल्या मुलाला मधुमेहाचे निदान होणे म्हणजे पालकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. या अजाण वयात इन्सुलीन इंजेक्शन व आहारावरील बंधने त्यांच्यावर लादताना पालकांची कसोटी लागते. तरीसुद्धा या सत्त्वपरीक्षेला पालक कार्यक्षमतेने उतरतात आणि मुलांना समर्थ नागरिक बनवतात. या त्यांच्या श्रेयात टीम वर्कचा मोठा वाटा आहे.
आपल्या मधुमेहासाठीचे उत्तम नियोजन करत आपल्या नोकरी-व्यवसायात सुस्थितीत आहेत, तसेच ५० वर्षे आपल्या बालमधुमेहाशी यशस्वीपणे लढा देत सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन गोंडस नातवंडांबरोबर आनंदात आयुष्य व्यतीत करत आहेत, अशी उदाहरणे बघितल्यावर पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन होते.
म्हणजेच मधुमेह जर नीट नियंत्रणात असेल तर मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये काहीही बाधा  येणार नाही, शिवाय त्यांचे वैवाहिक जीवन पण सुखात जाऊ शकेल व आयुष्यात त्यांना हवे ते मिळवू शकतील. बालमधुमेहावरील उपचारपद्धतींवर जगभर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. यातून बालमधुमेह बरा करणारे तंत्रज्ञान लवकर विकसित होईल अशी आशा आपण सर्वजण करू या. पण तोपर्यंत तरी नियमित इन्सुलीन व आरोग्यदायी जीवनशैलीला पर्याय नाही.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 4:49 am

Web Title: diabetic children
टॅग Chaturang
Next Stories
1 सोबुक्वे
2 स्वतंत्र, तरीही एकत्र
3 लढवय्यी कार्यकर्ती
Just Now!
X