आज शहरातील स्वयंपाकघरात ६० ते ७० टक्के पदार्थ रेडीमेडच असतात. खरं तर वेळ वाचतो, श्रम वाचतात असा (गर) समज करून घेत स्वत कष्टाने कमविलेल्या पशात हे असे (पौष्टिक?) पदार्थ विकत घेऊन आपण आपलं व आपल्या कुटुंबाचं आयुष्य दावणीला लावतोय. आकर्षक पाकिटातून येणारे अनेक रेडिमेड वा अर्धेकच्चे पदार्थामध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह, कृत्रिम रंग, तापमान राखण्यासाठीची रसायनं असतात, ज्याचा गंभीर परिणाम शरीरांवर होतो आहे. म्हणूनच त्याच्या वेष्टनाला, वरलीया रंगाला न भुलता असे तयार अन्नपदार्थ टाळणे हाच योग्य उपाय आहे.

अगदी २-३ वर्षांपूर्वीपर्यंतसुद्धा तिळगुळाचे लाडू आणि २१ मोदक विकत आणणाऱ्या मत्रिणीला हसणारे आपण अलीकडे मात्र सर्रास पुरणाची पोळी काय किंवा रात्री घरी येते वेळी एक प्लेट झुणका काय किंवा दालफ्राय किंवा तत्सम काही विकत आणू लागलोय आणि तेही स्वखुशीने.
फ्लॅट संस्कृती वाढल्याने वाळवणासाठी-साठवणासाठी जागा अपुरी पडू लागली. मग कुरडया, पापड, मुंगवडय़ा, सांडगे, लोणचं, तिखट, हळद, गरम मसाला हे पदार्थ जसे दर महिन्याच्या किराणा सामानात येऊ लागले, तसंच वर्षभराचं धान्य घेणंही आपण बंदच केलं. त्याऐवजी १० किलो गहू, ५ किलो तांदूळ, ३ किलो डाळ इत्यादीही त्या सामानाबरोबरच येऊ लागले. हळूहळू तर गव्हाऐवजी विकतची कणीकच पाकिटातून घरी अवतरू लागली. कारण आणलेला गहू निवडणं, तो चक्कीवर दळायला नेणं हे कोण करणार? मग कणकेसोबतच सोजी, जाड कणीक, बेसन, पिठी, ज्वारी, बाजरीचं पीठ इत्यादीही आयतीच पाकीटबंद आणायचा ट्रेंड सुरू झाला. सुपरमार्केटमुळे ती बरी सोय झाली! आणि पुढे सुपरमार्केटचीही त्यामुळे चलती झाली तो भाग अलाहिदा!
आता तर चटणी प्रकार म्हणजे लसणाची, तिळाची, जवसाची इत्यादीही आपण विकतच आणतो. मोड आलेली कडधान्ये विकत मिळू लागल्याने घरात दोघा-तिघा जणांसाठी ती धान्य धुणं, उपसणं, रात्रभर मोड आणायला बांधून ठेवणं कशाला करायचं? मटकी-मूग यांच्यासह हल्ली मोड आलेली मेथीसुद्वा विकत मिळू लागलीय. इतकंच कशाला डोसा आणि इडलीचं तयार पीठही किलोच्या पॅकमध्ये केव्हाही मिळतं. त्याची तयार चटणीही मिळते. दळलेलं पीठ घरी न्या, तसंच तव्यावर घाला. ताबडतोब डोसा तय्यार! खरंच किती ही सोय!
आजकाल तर हलवायाकडे ओल्या नारळाच्या करंज्या, अनारसे, बेसनाचे लाडू, चकल्या, खोबऱ्याच्या वडय़ा इत्यादी केव्हाही अगदी ३६५ दिवस उपलब्ध असतात. खमण ढोकळा, इन्स्टंट इडली, इन्स्टंट उपमा या सोबतच आता पालक पनीर, कोफ्ता करी, बिर्याणीसुद्धा अर्धे शिजवलेल्या स्वरूपात पाकिटात मिळतेय. भाज्या आणा, वाटण करा, रस्सा बनवा, कशाचीच काळजी नाही! या सोबतच निरनिराळे ‘सूप’चे प्रकार, अगदी व्हेज-नॉनव्हेजसुद्धा तयारच मिळतात. पाकीट घरी आणा, कापा, गरम पाण्यात टाका. गरमागरम सूप तयार! शिवाय कॅनमधील फळं (देशी- विदेशी दोन्ही कोणत्याही सीझनमध्ये) वेगवेगळे सिरप, चवीत बदल हवा असेल तर छास, (अर्थात ताक), गोड दही, थंड फ्लेवर्ड दूध, दही हेसुद्धा उपलब्ध आहे.
कांदा, आलं, लसूण यांच्या रेडीमेड पेस्टची पाकिटं मिळायला लागल्यापासून खरोखरच गृहिणींचा वेळ किती तरी वाचू लागलाय. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर केवढा दिलासा मिळाला. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढल्यानेही घरी करत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा जे जे विकत मिळेल ते ते विकत आणण्याचा कल वाढला. अगदी दुकानांमधून त्यांच्यासाठी तयार पोळ्या, पराठय़ांची पाकिटंही मिळू लागली. पाहता पाहता दहा वर्षांत तयार वस्तूंनी बाजारपेठा काबीज केल्या. गृहउद्योगाला प्रचंड मागणी वाढली. गृहिणींचा वेळ आणि श्रमाची तर प्रचंड बचत होऊ लागलीय. या व्यवसायाचा वेग आणि आवाका पाहता पुढील काही वर्षांमध्ये जे सधन आहेत अशा घरकुलांमध्ये घरगुती उपयोगासाठी कच्चा माल (जसे दाणे, पोहे, साबुदाणा, रवा, मदा इत्यादी) आणायची गरज पडणार नाही की काय अशी शंका यायला लागलीय. वरवर पाहता ही प्रचंड प्रगतीची झेप, आधुनिकता, सधनता इत्यादी बरंच काही वाटत असलं तरी ‘क्या खोया क्या पाया’ या दृष्टिकोनातून तौलनिक अभ्यास केला तर समोर येणारं वास्तव भयंकर आहे. डोक्याला झिणझिण्या आणणारं आहे आणि गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे.
विचार करा. आधी आपण गहू विकत आणायचो. आता अनेक घरी तयार आटा (अर्थात कणीक) आणि काही ठिकाणी तर तयार पोळ्याच विकत आणल्या जातात. बाजारातून भाज्या विकत आणून, त्या स्वच्छ धुणं, निवडणं, चिरणं, फोडणी घालणं हे सगळं आपण करायचो, प्रसंगी डोळ्यांदेखत करवून घ्यायचो. यात स्वच्छतेची हमी होती. योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात टाकण्याची हमी होती. मुख्य म्हणजे हे पदार्थ योग्य वेळात खाल्ले जाणार असल्याने त्यात वेगळे प्रिझव्‍‌र्हेटिव्ह टाकण्याची गरजच नव्हती. खूप उरवणं, खूप नासोडाही नव्हता. पण व्यापारीकरणामुळे अशा जास्त काळ टिकवण्याच्या सक्तीमुळे त्यात अशा अनेक गोष्टी टाकल्या जाऊ लागल्या, ज्या आपल्या आरोग्याला अपायकारक आहेत.
* गिऱ्हाइकाच्या डोळ्यांना पदार्थ आकर्षक दिसावा म्हणून त्यात गरज नसतानाही खाण्याचे रंग वापरावेच लागतात. (उदा. पनीर टिक्का, हराभरा कबाब, टोमॅटो सूप इ.) जे पचत नाहीत.
* तयार माल टिकवण्यासाठी, प्रत्येकच पदार्थात मीठ वा साखरेचे प्रमाण, इतर रासायनिक पदार्थाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्तच असतं. (उदा. वेफर्स, कुरकुरे, खारवलेले दाणे, काजू)
* या पदार्थाना हवाबंद डब्यांमध्ये म्हणजे प्लॅस्टिक वा पत्र्यांच्या कंटेनर्समध्ये भरावेच लागतात. (उदा. पॅक लंच)
* पदार्थाच्या गुणधर्माप्रमाणे तापमानाचा तोल सांभाळावा लागणार. (उदा. दही, ताक, फ्लेवर्ड दूध)
* पदार्थाची चव नेहमीच एकसारखी (कुठल्याही ऋतूमध्ये) लागावी. ब्रँडचं नाव व्हावं म्हणून स्टँडर्डायझेशनसाठी त्यात वेगवेगळ्या अनावश्यक घटकांची सरमिसळ करावीच लागत असणार.
* ‘मॅन्युफॅक्चिरग डेट’ आणि ‘एक्स्पायरी डेट’ यांचं गणित जमवावंच लागणार.
* शिवाय सर्वसामान्य लोकांच्या मानसिकतेचा विचार करून बहुतेक पदार्थ लो कॅलरी, लो फॅट्स, लो कोलेस्ट्रॉल ठेवण्याची कसरत केली जाणार.
या सगळ्याचा ग्राहक म्हणून आपल्या तब्येतीवर परिणाम होणारच. गेल्या काही काळात आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्या वाढल्याचे आपण बघतच आहेत. या पदार्थामध्ये असलेलं अतिमीठ पोटात जाऊन हृदयविकार, रक्तदाब या रोगांना आपणच आमंत्रण देतोय हे लक्षातच येत नाही.
* पदार्थामधील पदार्थ अधिक काळ टिकावेत म्हणून घातलेले प्रिझर्वेटिव्हज् व कृत्रिम रंग यामुळे मुलांमध्ये वाढलेली हायपर अ‍ॅक्टिव्हिटी तर मोठय़ांमधली उन्माद अवस्था यांसारख्या विकारांचा सहसंबंध आहे असा संशोधनांचा निष्कर्ष आहे.
* अतितेलकट अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅॅिसडिटी, अपचन, जळजळ इत्यादी पोटाचे विकार वाढले आहेत.
* चवीत बदल म्हणून पावभाजी, दाबेली, वडापाव, बर्गर; तर न्याहारीतही बिस्किट, केक, ब्रेड, टोस्ट याचा उपयोग केला जातो यातूनच अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतोय.
* भरपूर जेवणानंतर भरपूर खाल्लेलं आइस्क्रीम शरीर कसं पचविणार? पोटाचा- कंबरेचा घेर, स्थूलता त्यामुळे वाढतच जातेय.
आरोग्याचे हे प्रश्न वाढण्याचे कारण आपला भाबडेपणा त्या मागे आहे का? कारण त्या पदार्थाच्या पाकिटावर जरी त्यातल्या पौष्टिक मूल्यांविषयी लिहिलेले असेल तरी आकर्षक पॅकिंग, वस्तूंची जाहिरात, पदार्थाच्या वाहतुकीसाठी होणारा खर्च, स्टोरेजवर होणारा खर्च, बाजारातील स्पर्धा, माल तयार करणाऱ्याचा फायदा, विकणाऱ्याचा फायदा इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करून त्याची अंतिमत किंमत ठरते आणि त्यामुळेच एवढय़ा सगळ्या अग्निदिव्यातून पार पाडलेल्या या पदार्थाचं पौष्टिक मूल्यही तेवढंच उच्चतम् असेल आणि वेष्टनावर दिलेली प्रोटिन, व्हिटॅमिन, कॅल्शियम या बाबींची हमी दर्शवणारी आकडेवारी खरी समजायला आपण इतके दुधखुळे केव्हापासून झालो?
एका अभ्यासानुसार, आज शहरातील स्वयंपाकघरात ६० ते ७० टक्के पदार्थ रेडीमेडच असतात. खरं तर वेळ वाचतो, श्रम वाचतात असा (गर) समज करून घेत स्वत कष्टाने कमविलेल्या पशात हे असे (पौष्टिक?) पदार्थ विकत घेऊन आपण आपलं व आपल्या कुटुंबाचं आयुष्य दावणीला लावतोय. अनेक कुटुंबात वीक डे मध्ये निदान पाकिटांमधून आणले गेलेले पदार्थ घरातल्या कढईत गरम तरी होताहेत. वीकएंडला तर तेवढेदेखील कष्ट नकोसे होतात. आपण थकलेलो असतो, आठवडय़ाची तुंबलेली कामे करायची असतात. आवराआवरी, दुरुस्त्या, मुलांचा अभ्यास, शिवाय संपलेले पदार्थ पुन्हा भरायचे असतात. म्हणून मॉलमध्ये जायचं असतं. वेळ कुठे असतो स्वयंपाकाला? म्हणून मग बाहेरच जेवण उरकलं जातं!
यातून असंही होत असावं, की एखादी गोष्ट सहज उपलब्ध आहे म्हटल्यावर ती आणली जाते..( थोडा जास्त पसा खर्च करून) मिळतंय ना, मग का उगाच एवढा विचार करायचा .. हळूहळू या आळशीपणातून परावलंबन वाढतं. पुढे आपण त्या सवयीचे गुलाम होतो. याच्या पुढचं पाऊल म्हणजे तेच ‘कल्चर’ वाटायला लागतं.
आज कुणालाच वेळ नाही. नोकरी वा उद्योग करणाऱ्या स्त्रियांना तर नाहीच, पण ‘होम मेकर्स’ आहेत अशा असंख्य गृहिणींनासुद्धा वेळ नाही. वेळ सोडून सर्व काही उपलब्ध! अशी सर्वत्र परिस्थिती..मला तर प्रश्न पडतो, की एवढा सगळा अट्टहास ज्या वेळेसाठी केला जातो, तो हा ‘अतिमहत्त्वाचा’ वेळ वाचवून केलं तरी काय जातंय? अनेकदा उत्तर हेच मिळतं की, त्या वेळेत बघितल्या जातात वेगवेगळ्या चॅनल्सवरील प्राईम टाईमच्या मालिका ..! स्पष्ट शब्दांत सांगायचं तर आपण स्वतच स्वतच्या पायांवर कुऱ्हाड चालविण्यासारखं आहे हे! तरीही जिथे एकत्र कुटुंब पद्धती आहे तिथे आणि फारच कर्तव्यनिष्ठ आणि या दुष्परिणामांविषयी सजग असलेल्या स्त्रियांच्या घरात अजून तरी बाहेरून सर्रास रेडीमेड पदार्थ आणणे यावर थोडा वचक आहे. पण इतर चौकोनी कुटुंबात तर हे सगळं केव्हाच स्वीकारलं गेलंय.
हे सगळं मांडताना या गोष्टीची कल्पना आहे की, या वाचलेल्या वेळेचा उपयोग काही लोक खरोखरच विधायक कामांमध्ये सहभागी होऊन सार्थकी लावत असतीलही. काहींच्या घरी कुटुंबातील कुणाची तरी आजारपणं, घरी करणारं कुणीच नसणं, नोकरीच्या ठिकाणी जाण्या- येण्यात लागणारा प्रचंड वेळ, यांसारखी किंवा याहीपेक्षा गंभीर परिस्थिती, मन:स्थिती असेलही, त्यांच्या अडचणी खरोखरच वेगळ्या असतील आणि केवळ पर्यायच नाही म्हणून त्यांना या जीवनशैलीला स्वीकारावं लागलं असेल, तरी त्याचा अपवाद वगळूनही बहुसंख्य कुंटुबीयांनी ही ‘झटपट’ संस्कृती जवळ केली आहे. मागणी प्रचंड आहे म्हणून तर रोज नवनवीन ब्रॅन्ड बाजारात येत आहेत. या जीवनशैलीचे आत्ताच जाणवू लागलेले परिणाम वेगवेगळ्या स्तरांवरील आहेत आणि पुढे हे वाढत जायची शक्यता जास्त आहे.
*‘वैविध्य’ हे खरं तर आपल्याला मिळालेलं वरदान. पण ‘झटपट आणि रेडीमेड’ जीवनशैलीमुळे या वैविध्यावरच पहिला घाव बसलाय. (अनेकदा आपण म्हणतोही की कोणत्याही हॉटेलच्या लोणच्याची चव सगळीकडे सारखीच.) चवीमधील वेगळेपणा लयाला जातोय. काही खास पदार्थ बनविताना प्रत्येक गृहिणीची ती पदार्थ करण्याची स्वतची खास पद्धत, अनुषंगाने ‘चव’ होती. म्हणूनच मग गोळेभात खायचा तर तो आईच्याच हातचा. नारळीभात खायचा तर तो सासुबाईंच्याच हातचा. फणसाचं लोणचं आवडायचं फक्त मावशींनी केलेलं तर ‘आमटी’ खावी ती फक्त मामींच्याच हातची. अशा प्रत्येक व्यक्तीशी त्या त्या पदार्थाच्या त्या विशिष्ट चवीच्या संदर्भातील आठवणी स्मृतीमध्ये कोरलेल्या होत्या. त्या हळूहळू विस्मृतीत जाऊ लागल्या आहेत.
* मागणी तसा पुरवठा असल्याने जे पदार्थ बाजारात मिळतील तेच आपण खाऊ शकतो. आपल्या घरांमधले काही ‘खास’ पदार्थ बहुधा लुप्तच होतील. उदा. दडपेपोहे, काकडी सातुपीठ, रोडगे, पानगे, मिश्रपिठांची थालीपिठं, सोजी, कढीगोळे, गुरगुटय़ाभात, धोप्याच्या पानांच्या वडय़ा, चिंचवणी, डाळवांगे, मुटकुळे, वरणातील फळे, आळण शिवाय, लालभाजी, अंबाडी, माठाची भाजी, शेवग्याच्या शेंगा, तोंडलीभात, कांदेभात, भरल्या मिरच्या, इ. इ. खरं तर ही यादी प्रत्येक कुटुंब वा प्रदेशाप्रमाणे वाढत जाणारी. नव्या पिढीला असा एखादा ‘खास’ पदार्थ खावासा वाटला तर जुन्या पुस्तकांचाच आधार घ्यावा लागणार, पण हातात कायम कोल्ड ड्रिंक, वेफर्स, कुरकुरीत पदार्थाची पाकिटं घेऊन मिरवणारी नवी पिढी िशगाडे, करवंद, कवठं, आवळे, चिंचबिलाई असल्या रानमेव्याची चवही चाखायला तयार नाही की आपल्या आजी-पणजीच्या काळातले पारंपरिक पदार्थ खायलाही तयार नाहीत. त्यांच्या चवी बदलत चालल्या असून फक्त चमचमीत खाण्याकडे कल वाढला आहे असे दिसते आहे. जे खाल्ल्यानंतरही सतत भुकेची जाणीव होतच राहणार.
म्हणजे, एवढं सगळं झाल्यावरही जेवणानंतर तृप्तीची ढेकर न येता आणखी काहीतरी खावंसं वाटणे ही भावना विचित्रच नाही का? हे सगळं दिवसेंदिवस असंच राहणार की यापेक्षाही बिकट होणार? केव्हातरी आपण वापरतोय ते सर्व पदार्थ त्यांची शुद्धता, त्यातील पौष्टिकमूल्य, त्याचा आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम याचा लेखाजोखा घ्यावाच लागेल. प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. वेळ वाचवायचा की शरीरस्वास्थ्य? यासाठी काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करावाच लागणार आहे.
आवडत्या टीव्ही सीरियल्स पाहण्यासाठी आपण केवढं धडपडतो, आटापिटा करतो. मालिकांच्या वेळेप्रमाणे स्वतच्या सगळ्या कामांचं नियोजन करतो. तडजोडी करतो. मग ही लवचीकता, हे वेळेचं नियोजन स्वतच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठीही दाखविता येईल. आहारासंदर्भातील आपली निर्भरता कमी करण्यासाठी काय-काय करता येईल? काय-काय पर्याय समोर आहेत?
* एखादी गोष्ट करण्यातले फायदे समजले, पटले की हळूहळू का होईना, ती गोष्ट आचरणातही येते. ताबडतोब १०० टक्के सगळं जमणार नाही. पण २० टक्क्य़ांपासून तर सुरुवात करता येईल?
* माझं आणि माझ्या कुटुंबाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे महत्त्वाचं आणि ते निरंतर काळापर्यंत तसंच राहण्यासाठी मी काही गोष्टी बदलायला तयार आहे हे सर्वप्रथम मला मान्य करावं लागेल.
* हे मला समजून घ्यावं लागेल की मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची, माझ्या प्रत्येक कृतीची मला किंमत मोजावी लागेल. निर्णय घेतला नाही तरी किंमत मोजावी लागेल. (दरवेळी किंमत पशाच्याच स्वरूपात असेल असेही नाही)
* आपल्या कुटुंबाच्या रोजच्या आहाराच्या गरजांसाठी ‘रेडीमेड’ गोष्टींवर आपण किती अवलंबून आहोत याची एक छोटी यादी करता येईल. उदा. नाश्त्यासाठी, मधल्यावेळी खाण्यासाठी वा जेवणासाठी किती वेळा- किती दिवस बाहेरचे पदार्थ आणले जातात? कोणते? जसे – ब्रेड, वडापाव, मिसळपाव, जिलबी आदी गोड पदार्थ, समोसा, उपमा, इडली सांबार, केक, टोस्ट-बिस्कीट, पिझ्झा-पास्ता आदी किंवा घरी अन्नपदार्थ बनवताना त्यासाठी जे जिन्नस वापरतेय ते किती टक्के ‘रेडीमेड’ प्रकारातले आहेत? व त्यांची आठवडय़ातील वापरण्याचे प्रमाण किती आहे ? जसे – आलं, लसूण पेस्ट, तयार सूप, विकत आणलेली मोड आलेली कडधान्ये, डोसा-इडलीचे तयार पीठ, चटण्या, दही, किंवा अर्धवट शिजवलेल्या पाकीटबंद भाज्या (पालक पनीर, दाल मखनी, दम आलू, हैदराबादी बिर्यानी इ.) अशी एकदा यादी तयार झाल्यावर लक्षात येईल की हे सगळ्या सगळं मी एकदम बंद करू शकणार नाही. पण त्याचे प्रमाण कमी करता येईल. जेवढं जितकं कमी करू तितकं आपलं आपल्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळलं जाईल.
* अनेक कुटुंबे दर महिन्याला भिशीसाठी- कुठल्याशा निमित्ताने पार्टीसाठी शहरातील वेगवेगळय़ा हॉटेल्समध्ये जमतात. त्यानिमित्ताने स्नेहभेट आणि सहभोजन हा उद्देश असतो. अशा वेळी दरवेळी हॉटेल्सचेच जेवण न करता ‘पॉट डिनर’ म्हणजे प्रत्येक सदस्याने स्वतच्या घरून एक पदार्थ बनवून नेणे, हा पर्याय अधूनमधून सुचवता येईल.
* पाणीपुरी, पावभाजी, पिझ्झा सगळय़ांनाच आवडतात. दरवेळी ते बाहेर जाऊन खाण्याऐवजी एखादय़ा रविवारी घरीच एखादा पदार्थ करता येईल. म्हणजे दिवसभर मनसोक्त त्या पदार्थावर ताव मारता येईल आणि आपल्याला हव्या त्या पौष्टिक पदार्थाची त्यात भरही घालता येईल.
* दाण्याचा कूट, पिठीसाखर आपण घरी करतो त्या जोडीला धणे-जिऱ्याची पूड, तिळाची-लसणाची चटणी सहज करून ठेवता येईल.
* पूर्वी उन्हाळय़ामध्ये वाळवणाचे पदार्थ केले जायचे. त्याच धर्तीवर मुलांना रोज आवडणारा सॉस, जॅम, साखरांबा किंवा आपल्याला भाज्यांना पुरवठा म्हणून लागतात त्या मुंगवडय़ा, सांडगे, भरलेल्या मिरच्या, लोणचं हे पदार्थ तिघी-चौघींनी सवडीप्रमाणे एकत्र येऊन करायला हरकत नाही.
* तसेच दिवाळीच्या फराळाचेही. बाहेरून ते विकत आणण्यापेक्षा ३-४ कुटुंबांनी आचारी बोलावून करता येतो. चांगले जिन्नस आणि स्वच्छता यांची हमी तर निश्चित राहील.
या समस्येची, त्याच्या परिणामांची तीव्रता जर आपल्याला कळली, तर त्यावर पर्यायही सुचायला लागतील. आपल्या गरजा कमी करणे हा एक तोडगा असू शकेल? Reduce, Reuse, Recycle  ही त्रिसूत्री नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहचवता येईल?
तसा हा प्रश्न कठीणच आहे. सहजासहजी सुटणारा नाही. मात्र तो अधिक गंभीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा हातात वेळ आहे तेव्हाच सोडवावा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर- हे म्हणतोच ना आपण!

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
kitchen cleaning tips things to avoid doing dishes
भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…