05 August 2020

News Flash

‘फादर्स डे स्पेशल : फिटे.. नैराश्य कृष्णमेघी

रामचंद्र मार्कंडेय आणि समाजाकडून करुणा व उपेक्षा यांचीच अपेक्षा असणारी त्यांची एका मागोमाग झालेली तीन सौम्य डाऊन सिन्ड्रोमची मुलं, त्यातच आधार ठरलेल्या मुलीचं आकस्मिक निधन,

| June 14, 2014 01:06 am

रामचंद्र मार्कंडेय आणि समाजाकडून करुणा व उपेक्षा यांचीच अपेक्षा असणारी त्यांची एका मागोमाग झालेली तीन सौम्य डाऊन सिन्ड्रोमची मुलं, त्यातच आधार ठरलेल्या मुलीचं आकस्मिक निधन, या सगळ्यातूनही त्यांनी आपल्या तीनही मुलांचं आयुष्य घडवण्याचा निर्धार केला. मुलांना घरच्या घरीच शिकवलं आणि पायावर उभं केलंय.. कृष्णमेघी नैराश्याला मागे सारून स्वत:ला आणि मुलांनाही आयुष्य जगवायला शिकवणाऱ्या या जगावेगळ्या वडिलांची कथा. उद्याच्या (१५ जून) जागतिक ‘फादर्स डे’निमित्ताने..

ही गोष्ट आहे माझ्या एका सुशिक्षित जिवलग मित्राची आणि त्याच्या सौम्य डाऊन सिन्ड्रोम असलेल्या तीन मुलांची! समाजाकडून करुणा आणि उपेक्षा यांचीच अपेक्षा असणारी ही मुले आज थोडी हतबल आहेत. इतरांसारखं ‘फादर्स डे’च्या दिवशी त्यांना त्यांच्या वडिलांचे ऋण मार्गदर्शकाशिवाय व्यक्त करता येत नाही, पण आजूबाजूचे लोक, नातेवाईक यांनी या तीनही मुलांना आता कुटुंबाचा महत्त्वाचा घटक म्हणून स्वीकारले आहे आणि हे सर्व शक्य झाले ते माझ्या मित्राच्या गेली ४० वर्षे सुरू असलेल्या अथक प्रयत्नांमुळेच!
भाऊ (रामकृष्ण मरतडेय) हा माझा बालपणचा मित्र. मराठवाडय़ातील एका लहानशा गावात आमचे घराशेजारी घर. अतिशय बुद्धिमान असलेला माझा हा मित्र उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकीकडे वळला. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला असतानाच त्याचे लग्न ठरले. आम्हा सर्वासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता. आणि खरेच त्याचे लग्न अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांची परीक्षा देण्याअगोदरच झाले. दोन्हीही कुटुंबांनी ठरवून केलेला हा विवाह. तो काळ होता, १९७०चा. वहिनींच्याकडे पाहिल्यावर मला तो बालविवाह आहे की काय अशीच शंका वाटली. मित्राच्या या आनंदाच्या डोहात पुढे दु:खाचे अश्रू पडतील आणि त्याचा मी साक्षीदार असेन याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. भाऊ आणि रंजना वहिनीच्या संसारवेलीवर पहिले सुरेख फूल १९७२ साली उमलले. अतिशय गोड मुलगी. प्रचंड हुशार पण तेवढीच विनयशील आणि लाघवी. येणाऱ्यांचे प्रेमाने आतिथ्य करणारी. रुपालीचे बालपण ते पदव्युत्तर शिक्षण या चढत्या आलेखाचा मी एक साक्षीदार! तिचे खटय़ाळ बालपण आणि चालण्या बोलण्याचा आनंद लुटत असतानाच भाऊच्या संसारात १९७५ साली पुत्ररत्नाचे आगमन झाले. सत्येनच्या पहिल्या व दुसऱ्या वाढदिवसास मी गेलो होतो, पण रुपालीबरोबर खेळण्यामध्येच वेळ जात असे, त्यामुळे त्याच्या प्रगतीकडे फार लक्ष गेले नाही. १९७८ चा नोव्हेंबर महिना असावा. मी वेळ काढून त्याच्याकडे गेलो होतो. त्या मुलाकडे पाहताच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी भाऊस म्हटले, ‘हा तीन वर्षांचा आहे, यास तू डॉक्टरकडून तपासून घेतलेस का? उशीर करू नको. फक्त बोलता येत नाही, हा एकच प्रश्न नाही त्याच्या बरोबर इतर अनेक प्रश्न जोडले गेले आहेत. मला पूर्ण खात्री होती की हे बाळ ‘सौम्य डाऊन’चे शिकार झाले आहे. भाऊनं नंतर योग्य तपासणी करून त्याची खात्री करून घेतली आणि माझा अंदाज खरा निघाला. मनुष्यामधील अनुवांशिकता आणि त्यातून निर्माण होणारे दोष हा माझा अभ्यासाचा आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचा विषय. भाऊस मी यामागचे विज्ञान समजावून सांगितले. सर्वसाधारण निरोगी मुलामध्ये प्रत्येक पेशीत ४६ गुणसूत्रे २३ जोडय़ांमध्ये विभागलेली असतात. ‘डाऊन बेबी’मध्ये ती ४७ असतात, म्हणजेच २१व्या जोडीत एकाची भर पडलेली असते. निरोगी माता-पित्यामध्ये हा ४७ वा कुणाकडून आला हे शोधणे कठीण काम आहे. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवून झालेल्या बाळावर अन्याय करण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाला धैर्याने कसे सामोरे जाता येईल यासाठी उभयता एकत्र प्रयत्न हवेत हे त्यास पटवून देण्यात मी यशस्वी झालो. कमी वयात होणारे अथवा उशिरा होणारे लग्न हेसुद्धा त्याच्या अनेक कारणांपैकी एक असू शकते. भाऊ पूर्ण कोसळला होता. त्यास उभारी देण्याचे काम मित्र म्हणून मी करत होतो. या ताणतणावाच्या कालावधीत त्याने आणखी एका मुलाला जन्म दिला. पहिले मूल असे म्हणून याचा जन्म. हे तरी निरोगी असावं हे भाऊचे लॉजिक माझ्या पटण्याबाहेरचे होते आणि व्हायचे तेच झाले. हा मुलगा, अजय सुद्धा ‘सौम्य डाऊन’चाच निघाला. भाऊ आता मात्र पूर्ण हताश झाला. मुलगी आणि तिचे हे दोन भाऊ घरात बागडत होते. फक्त मुलीची प्रगती होत होती, मुले मात्र प्रगतीच्या पहिल्या टप्प्यावर खूपच मागे पडलेली. १९८६ मध्ये तिसऱ्या मुलाच्या जन्माआधी मी भाऊस होणाऱ्या बाळाची गुणसूत्र तपासणी करण्याचा आग्रह धरला. पद्धत समजाऊन सांगितली, पण पत्नीची प्रकृती, आई वडिलांचा दबाव, आईची दैवावरील श्रद्धा, यावेळी नक्कीच चांगले होणार हा काहीसा ठाम समज कुटुंबाने करून घेतला आणि घरात तिसऱ्या ‘डाऊन’चे मुलाच्या, विजयच्या रूपात आगमन झाले. यावेळी भाऊपेक्षा त्याचे आईवडीलच जास्त कोसळले होते. मृत्यूपर्यंत त्यांना आपल्या मुलाच्या आयुष्याची झालेली ही अवस्था सोबत करत होती. वहिनींची प्रतिक्रिया अबोलच होती. भाऊच्या तुलनेत त्यांचे शिक्षण अगदीच कमी असल्यामुळे त्यांना यामधले फारसे काही समजत नव्हते, पण मुलांचे खाणे-पिणे, त्यांच्यावर घरात लक्ष ठेवणे यात त्या कुठे कमी पडत नव्हत्या. मुलांचे सर्व काही करण्याचा भार भाऊ आणि त्याच्या मोठय़ा मुलीवर पडला. मुले मोठी होत होती, प्रकृती आणि आरोग्याचे वरदान होते, मात्र सौम्य डाऊनची सर्व लक्षणे प्रकर्षांने जाणवत होती. पाच मिनिटांच्या सहवासात ती सहज लक्षातसुद्धा येत. मुलांना खाऊ घालणे, त्यांना खेळवणे, बाहेर घेऊन जाणे ही कामे बऱ्यापैकी भाऊवरच पडली आणि वडील म्हणून त्याने ती स्वीकारलीसुद्धा. उच्च अधिकारपदाची तेवढीच जबाबदारीची नोकरी सांभाळून त्याने हे जगावेगळे आव्हान स्वीकारलं. एक काळ असा होता की, त्याच्या हाताखाली हजारो लोक कर्मचारी म्हणून काम करत होते. एकदा तो मला म्हणाला की, ‘एवढय़ा लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून काम करून घेण्यापेक्षाही मला माझ्या तीन मुलांना सांभाळणे जास्त आव्हानात्मक वाटते.’ त्याच्या घरात मी कधीही आरडाओरड, रागावणे, उच्च आवाजात बोलणे हे पाहिले नाही. त्याने अशा मुलांसाठी असलेली विशेष शाळा शोधली. पण त्या शाळेतील गर्दी व तेथील एकंदरीत वातावरण पाहून तो समाधानी नव्हता. शेवटी त्याने आपल्या तिन्हीही मुलांना घरीच शिक्षण देण्याचे ठरविले.
त्यांच्या या उपक्रमात त्यास मुलीचे बरोबरीने सहकार्य मिळाले. भाऊचे घर म्हणचे एक शाळाच वाटे. भिंतीवर लटकवलेले चार्ट, पाटी-पेन्सिल, रंगीत खडू, फळा, वैज्ञानिक खेळणी आणि त्याची शिकवण्याची सोपी पद्धत. याचा परिणाम मुलांच्या बौद्धिक वाढीवर दिसू लागला. कार्यालयातून थकून घरी आल्यावरसुद्धा तो नेहमीच शिक्षकाच्या भूमिकेत जात असे, फरक एवढाच की या शाळेतील मुले त्याची स्वत:ची होती. एके दिवशी मी असाच त्याच्या घरी गेलो असताना त्याची दोन मुले समोरच्या गॅलरीमधील फुलझाडांच्या कुंडय़ांकडे पाहून माझ्याशी बोलू लागली. माझ्या दृष्टीने हा त्यांच्यामधील प्रगतीचा, विशिष्ट गुणाचा ‘स्पार्क’ होता. भाऊशी चर्चा केल्यानंतर मुलांना कुंडीत रोप कसे लावायचे, ते कसे वाढवायचे हे शिकवण्याचे भाऊने ठरविले आणि मुलांच्या शिक्षणास वेगळी दिशा मिळाली आणि यामधूनच त्याच्या गॅलरीत ४०-५० फुलझाडांच्या कुंडय़ा जमा झाल्या. सोबत छोटासा गांडूळ खत प्रकल्पसुद्धा! घरी येणाऱ्या प्रत्येकास ही गॅलरीमधील हसरी बाग आणि घरच्याच निर्माल्य आणि भाजीच्या केरकचऱ्यापासून निर्माण केलेले खत दाखविण्यामध्ये मुले आघाडीवर राहू लागली. याचेसुद्धा श्रेय भाऊलाच! एवढय़ा मोठय़ा उच्च पदावरील माझ्या मित्राने आपल्या मुलांमधील बागकामाचा हा ‘स्पार्क’ पाहून हाताखालच्या ठेकेदारास त्यांना बागेत काम देण्याची विनंती केली. मुले बागेत झाडांना पाणी घालू लागली. खत देऊन रोपांची काळजी घेऊ लागली आणि या नावीन्यपूर्ण कल्पनेमधून एका सुंदर बागेची निर्मिती झाली. मुलांच्या प्रयत्नांनी, ठेकेदाराच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले. भाऊस आनंद झाला आणि त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्याच्या मोठय़ा मुलाने त्यास मिळालेल्या अल्प पगाराचे पैसे जेव्हा मला दाखवले तेव्हा त्याच्यापुढे पाच आकडी पगार मिळवूनही मी कफल्लक आहे, असे मला वाटले. माझ्या मित्राच्या कष्टाचे ते फळ होते.
मध्यंतरीच्या काळात मुलांची प्रगती सुरू असतानाच भाऊची लाडकी कन्या त्यास सोडून कायमची निघून गेली. अवघे २३ वर्षे वय! आपले लग्न, त्या पश्चात वडील आणि भावांची काळजी, त्यांच्यावरील तिचे प्रेम यामुळे ती कायम बेचैन असे, मात्र वरून ती आनंदी असल्याचेच भासवित असे. अरबी समुद्र आणि त्याच्या उसळत्या लाटा तिला एवढय़ा प्रिय का झाल्या? याचे उत्तर भाऊ अजूनही एकांतात भरल्या डोळय़ांनी शोधतो आहे! स्मशानभूमीत प्रथमच भाऊच्या डोळय़ांतील अनिवार अश्रू मी पाहिले. आता तो पूर्ण एकाकी झाला होता आणि या एकांतातूनच त्यानं राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. माझ्या तिन्ही मुलांना घडवायचं आहे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करावयाचे आहे, या एका ध्येयानेच या जगावेगळ्या वडिलांना अक्षरश: पछाडले. त्याच्यापुढे आता एकच ध्येय होते, मुलांना त्यांच्या पायावर उभं करायचेच..
सेवानिवृत्त झाल्यानंतर २००७ मध्ये मुंबई सोडून तो पत्नी आणि त्याच्या तिन्ही मुलांसह कायमस्वरूपी गावी वास्तव्यास गेला. आणि एकेक प्रयोग सुरू झाले. आपल्या या तीनही मुलांच्या मदतीने भाऊने विविध प्रकारचे आंबे, चिंचा, आवळे, जांभूळ, पेरू, डाळिंब अशी फळबाग विकसित केली. आज तो गावातील एक प्रगतिशील शेतकरी आहे. विविध पिके, गांडूळ खत प्रकल्प, गायीचा गोठा, घरचे दूध, फुलबाग, ताजा भाजीपाला हे सर्व त्याने त्याला मुलांमध्ये सापडलेल्या स्पार्कमधून निर्माण केले. आजही तो दररोज सकाळी मुलांना घेऊन शेतावर जातो, तेही रविवारची सुट्टी न घेता. वडील या नात्याने त्याने त्याच्या तिन्ही बौद्धिक अंपग मुलांवर मनापासून प्रेम केले, त्यांना घडवले, वाढवले, समाजात, मित्रमंडळींत, पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये प्रोत्साहित केले. घरामध्ये सणवार, उत्सव साजरा करून त्यात त्यांचा सहभाग वाढवला. अशी मुले घरात असल्यावर आई-वडील मुलांना घरातच राहण्यास आग्रह धरतात. भाऊने त्यांना समाजात मिसळू दिले. व्यवहारिक ज्ञान, बाजारातून मोजक्या वस्तू आणणे, निटनेटकेपणा, स्वच्छता, टापटीप, हसतमुख चेहरा, येणाऱ्यांचे स्वागत यामध्ये मुले कधीही कमी पडत नव्हती आणि अजूनही नाहीत. मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या नियमित औषध उपचारांसाठी भाऊनं नेहमीच प्राधान्य दिलं.
मुलांचे वडीलपण करताना, मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या मामांची आणि आजोळची खूप मदत झाली. मुलांना ग्रामीण भागाची आवड व शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये मामांचा वाटा मोठा होता. ‘डाऊन’च्या मुलाची जबाबदारी आईवर ढकलून तिलाच त्यांचे सर्व करावयास लावणारे वडीलही मी या समाजात पाहिले आहेत. भाऊ मात्र स्वत: आईच्या भूमिकेत गेला. तीच ममता, तेच प्रेम, सोबत वडील या नात्याने थोडा धाक आणि शिस्त यामुळे मुले घडत गेली. आजही ‘डाऊन’च्या मुलांना त्यांच्या विशेष शाळेत पाठवून रुमालाने अश्रू टिपणारे आईवडील मी पाहतो. प्रश्न प्रेमाचा अथवा अश्रूंचा नाही. या ‘सौम्य डाऊन’च्या मुलांना घरीच योग्य शिक्षण देऊन त्यांच्यातील ‘स्पार्क’ शोधणे जास्त महत्त्वाचे आहे आणि माझा मित्र वडील या नात्याने त्यात पूर्ण यशस्वी झाला.
माझा मित्र जगावेगळा ठरला आहे. मुलांकडून कसलीही अपेक्षा न बाळगता, केवळ माझ्या मुलांकडे कुणी बोट दाखवून त्यांना कमी लेखू नये म्हणून धडपडणारा! दु:खाचे डोंगर झेलणारा! तरीही पत्नी आणि मुलासह आनंदात राहणार! हा माझा जिवलग मित्र आज मला मित्रत्वाच्या नात्यापेक्षाही तीन मुलांना यशस्वीपणे घडवणारा वडील म्हणून जास्त प्रिय आहे. ‘यलो’हा तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या सत्यघटनेवरील मराठी चित्रपटात ‘सौम्य डाऊन’ची गौरी गाडगीळ, तिला घडवणारी तिची आई आणि तिच्यामध्ये पोहण्याच्या कलेमधील ‘स्पार्क’ शोधणारा ‘कोच’ हे सर्व पाहताना मला हा माझा मित्र व त्याची ही तीन मुले आठवून माझ्या डोळय़ांतील पाणी थांबत नव्हते. चित्रपटात आई आणि कोचने गौरीस घडवले. वडील मात्र बरोबरीचे वाटेकरी असूनही पळपुटे ठरले.
माझा मित्र पळपुटा ठरला नाही. तिन्ही मुलांसाठी आई तोच, वडील तोच आणि कोचसुद्धा तोच होता. ‘फादर्स डे’चा खरा अर्थ मला माझ्या या मित्राकडून समजला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:06 am

Web Title: fathers day special story of a father ramakrishna markandey
टॅग Fathers Day,Parents
Next Stories
1 ‘फादर्स डे स्पेशल : ‘वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि’
2 ‘फादर्स डे स्पेशल : पपांचा मदतीचा वसा
3 ‘फादर्स डे स्पेशल : कालचे बाबा आणि आजचा बाबा
Just Now!
X