25 February 2021

News Flash

फिटनेस बॅण्ड

फिटनेस बॅण्ड म्हणजे एक प्रकारे ‘स्वत:ची संख्यात्मक तपासणी.’ करणारं यंत्र. ‘व्यायाम करा, कॅलरीज जाळा, उत्तम पोषणमूल्यांचं जेवण घ्या,

| February 21, 2015 03:01 am

फिटनेस बॅण्ड म्हणजे एक प्रकारे ‘स्वत:ची संख्यात्मक तपासणी.’ करणारं यंत्र. ‘व्यायाम करा, कॅलरीज जाळा, उत्तम पोषणमूल्यांचं जेवण घ्या, निवांत झोपा, हे माहीत असतं पण ते किती करावं आणि का करावं, हे मनावर ठसवणारी यंत्रणा म्हणजे फिटनेस बॅण्ड. आधुनिक काळातला हा आधुनिक काळजीवाहू.
आजकालच्या तरुणाईमध्ये एक नवाच ट्रेण्ड मी बघते आहे. मैदानावर पळणारी, झपाझप पॉवरवॉक करणारी, सायकल मारणारी तरुण मुलं कानात हेडफोन अडकवून आपल्याच मस्तीत गाणी ऐकताना नेहमीच दिसतात. पण आता अधूनमधून त्यांच्या मनगटांवर किंवा दंडावर आकर्षक रंगातले कसलेसे पट्टे दिसायला लागलेत. घडय़ाळासारखं डायल असणारे हे पट्टे कसले म्हणून चौकशी करता, बरीच मनोरंजक माहिती मिळाली.
तंत्रज्ञानाच्या दुधावर लहानाची मोठी होणारी ही पिढी आता ‘फिटनेस बॅण्ड’ ऊर्फ ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’च्या प्रेमात पडते आहे. वेगवेगळय़ा रंगात, आकारात आणि किमतीत उपलब्ध असलेली ही उपकरणं म्हणजे विविध संवेदनशील यंत्रणा (सेन्सॉर्स) पोटात सामावून शरीराच्या वेगवेगळय़ा हालचालींचा तपशील नोंदवणारी साधनं आहेत. ‘ब्लू टूथ’च्या माध्यमातून ती ‘स्मार्टफोन’ला जोडता येतात किंवा लॅपटॉपला. आपल्या हॅण्डसेटमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जर आरोग्यविषयक अ‍ॅप्लिकेशन्स अंतर्भूत असतील तर हे फिटनेस बॅण्ड भराभर आपल्याशी संवाद साधू लागतात. अशा या जादूई उपकरणांचा उपयोग काय हे पाहणं मनोरंजक आहे.
‘मस्त व्यायाम करा, कॅलरीज जाळा, उत्तम पोषणमूल्यं असलेलं जेवण घ्या, निवांत झोपा, म्हणजे फिटनेस चांगला राहील.’ हा संदेश काही नवीन नाही. तुमच्या-आमच्याप्रमाणे फिटनेस बॅण्डच्या ग्राहकांनाही माहीतच आहे की, हा मंत्र. पण माहिती असणं आणि त्याप्रमाणे वागणं यात खूप अंतर पडतं. नुसताच उपदेश ऐकवण्यापेक्षा आपण व्यायाम का आणि किती करायला पाहिजे, हे मनावर ठसवणारी यंत्रणा म्हणजे फिटनेस बॅण्ड.
असा बॅण्ड ऐटीत मनगटावर घडय़ाळासारखा घाला, दंडावर बांधा किंवा खिशात ठेवा. पळणं, चालणं, टेकडी चढणं, नाचणं, सायकलिंग, पोहणं, योग, जिम.. व्यायामप्रकार कोणताही असो, आपला बॅण्ड आपल्याला सेवा देणारच. केवळ व्यायामाच्या वेळीच नव्हे तर चोवीस तास अंगावर बाळगा हा बॅण्ड आणि त्यातून तुम्हाला स्वत:बद्दल काय काय कळणार आहे ते बघा.
तुम्ही किती पावलं चाललात, किती अंतर कापलंत, किती कॅलरीज जाळल्यात, हृदयाचे ठोके किती पडले, शरीराचं तापमान काय होतं, ही सगळी माहिती बिनचूक आकडय़ांमध्ये येईल समोर. सकाळी सकाळीच या गोष्टी कळल्या की पुढचा दिवस कसा घालवायचा याची कल्पना येते. उदाहरणार्थ प्रत्येकानं दररोज किमान १०,००० पावलं चाललं पाहिजे, असं वैद्यकशास्त्र सांगतं. तुमच्या प्रभातफेरीत केवळ ३००० पावलं चाललात तर दुपारी ऑफिसमध्येसुद्धा जिन्यावरून वरखाली करावं लागेल, संध्याकाळी पुन्हा चालावं लागेल.
आता हा संदेश तुम्ही आपल्या मनानं समजून घ्या किंवा तुमच्या या बॅण्डमध्ये तुमचं टार्गेट काय आहे ते भरून ठेवा. म्हणजे बॅण्डच्या डायलवर आपल्याला टार्गेट काय आहे ते भरून ठेवा. म्हणजे बॅण्डच्या डायलवर आपल्या टार्गेटपासून किती जवळ किंवा दूर आहात ते कळेल. ऑफिसमध्ये एका जागी खूप खूप वेळ बसून राहिलात तर तुमचा हा मित्र तुमच्या मनगटावर कंप पावेल, हळूच धक्का मारून म्हणेल, ‘चला, उठा, अंग हलवा.’ याहूनही आणखी प्रगत अशा बॅण्डमध्ये तुमचा नेहमीचा आहार काय असतो ही माहितीसुद्धा भरू शकता. कहर म्हणजे हा बॅण्ड तुम्हाला आकडेमोड करून सांगतो की, तुम्ही आहारातल्या कॅलरीज जास्त घेतल्या आहेत की, तुमच्या हालचालीतून पुरेशा कॅलरीज जाळल्या आहेत.
रात्री आपण गाढ झोपतो तेव्हा शरीर अगदी निश्चल असतं. काही काळाने ही झोप जास्त सावध, हलकी होते. अंथरुणातच कूस पालटली जाते. अस्वस्थ हालचाली वाढतात. मिटल्या पापण्यांच्या आड बुबुळं हलू लागतात. ही ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ आणि शरीराची ही चुळबुळ फिटनेस बॅण्डमधले सेन्सॉर्स पटकन् टिपून घेतात. रात्रभर झोपेची अशी आवर्तनं चालू असतात. सकाळी हा आपला मित्र आपली झोप काय प्रतीची झाली ही माहिती हजर करतो. एखाद्या रात्री तुम्ही वाचत बसता, टी.व्ही. बघता, पार्टी करत राहता, अशा वेळी हा तुम्हाला धक्का मारून सांगेल-‘चल रे बाबा, आता झोपायची वेळ झाली.’ तुम्हाला दररोज किती तास झोपायचंय? (आदर्श म्हणजे ७-८ तास) हे ठरवून त्याला सांगा. तेवढे तास झाले की, तो तुम्हाला जागं करेल. मनगटावर कंपनं उठतील, ‘चला, कामाला लागा.’
फिटनेस बॅण्ड वापरणारे आपले आपले सोबती, ग्रुप जमवू शकतात. आपला जोडीदार कुठवर पोचलाय, त्याच्या किती कॅलरीज वापरून झाल्या, अशी स्पर्धात्मक माहितीसुद्धा बॅण्डमधून मिळते. पाश्चात्त्य जगात झपाटय़ानं लोकप्रिय झालेला हा प्रकार आता भारतातही उपलब्ध आहे. किमती सुमारे ३००० ते १२००० रुपये. अर्थात तुलनेनं स्वस्त असलेले बॅण्ड्स कमी काम करतात तर जास्त महाग अशी अत्याधुनिक उपकरणं वापरणाऱ्या व्यक्तीची इतकी सखोल माहिती काढू शकतात की, एखादं गुप्तहेर खातंही फिकं पडावं.
फिटनेस बॅण्डचा नेमका उद्देश काय? याला एक प्रकारे डिजिटल सेल्फ एक्झ्ॉमिनेशन म्हणता येईल. ‘स्वत:ची संख्यात्मक तपासणी.’ शरीरातल्या घडामोडी निश्चित आकडय़ांमध्ये मोजणं आणि त्यायोगे आपल्या प्रकृतीबद्दल अचूक माहिती मिळवणं. आपल्यापुढचं नेमकं ध्येय काय आहे (वजन किती, रक्तदाब किती वगैरे) हे एकदा ठरवलं की आपल्या स्मार्टफोनमधल्या विशिष्ट ‘अ‍ॅप’च्या मदतीनं हे समजून येतं की आपण आपल्या ध्येयाच्या कितपत जवळ किंवा लांब आहोत. या सगळय़ा खटाटोपातून आशा निर्माण होते की, स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणण्यासाठी आपण उद्युक्त होऊ. इथे सोनारही आपण आणि टोचणारे कानही आपलेच.
हे झालं सामान्य लोकांबद्दल. वैद्यक व्यावसायिकांनीही फिटनेस बॅण्डचा उपयोग कल्पकतेनं करायला सुरुवात केलीय. मोठय़ा शस्त्रक्रियांच्या नंतर रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याला लगेचच व्यायाम उपचार केले जातात. इथे फिटनेस बॅण्डचा वापर रुग्णांचा उत्साह वाढवतो. जे रुग्ण चांगला व्यायाम करतात ते लवकर बरे होतात, लवकर घरी जातात. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, संधिवाताच्या रुग्णांनाही त्यांचं त्यांचं उद्दिष्ट ठरवून देऊन फिटनेस बॅण्डच्या मदतीनं चांगला व्यायाम करायला प्रोत्साहन देणं आता शक्य व्हायला लागलंय.
फिटनेस बॅण्डच्या अधिकाधिक वापरामुळे अमेरिकेत खूप मोठय़ा प्रमाणात निरीक्षणं (डेटा) गोळा झालीयत. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे संशोधनाला मदत. उदाहरणार्थ जॉबोन नावाच्या कंपनीकडे त्यांच्या बॅण्ड वापराच्या माध्यमातून लक्षावधी तासांची झोप, अब्जावधी टाकलेली पावलं आणि तितकेच खाद्यपदार्थ यांचा जो डेटा उपलब्ध झाला त्यातून जगातला एक फार मोठा अहवाल आपोआप तयार झाला. देश, राज्यं, महानगरं, सेवानिवृत्तांची निवांत गावं यामधून लोकांच्या दैनंदिन आयुष्याचे पट उलगडले. समाज शास्त्रज्ञांना आणि सामाजिक आरोग्याच्या संशोधकांना महत्त्वाचे निष्कर्ष काढता आले. फिटनेस मिळवण्यासाठी कमीत कमी किती चालावं, उष्मांक सेवन करावे, किती तास झोपावं याची मार्गदर्शक तत्त्व लोकांसमोर मांडता आली.
अर्थात हे सगळे उद्योग करण्यासाठी फिटनेसची साधनं बनवणाऱ्या नाइकीसारख्या कंपन्या, अ‍ॅपलसारख्या हार्डवेअर आणि मायक्रोसॉफ्टसारख्या सॉफ्टवेअर कंपन्या पुढे सरकावल्या आहेत, यात काहीच नवल नाही. एवढंच नव्हे तर एकमेकांशी स्पर्धा किंवा हातमिळवणी करून अधिकाधिक चांगले, विश्वासार्ह बिनचूक माहिती देणारे, सोयीस्कर आणि किमतीत सर्वाना परवडतील असे फिटनेस बॅण्ड बनवण्यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न चालू आहेत. स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे आणि अनेक स्मार्टफोन्समध्ये ही फिटनेस अ‍ॅप्स आधीपासून अंतर्भूत केलेली आहेत. ‘अ‍ॅपलचं’ स्मार्टवॉच बाजारात येईल तेव्हा फिटनेस बॅण्डला अजूनच झळाळतं रूप मिळेल.
  या क्षेत्रात ज्या वेगानं प्रगती होते आहे, ते पाहता असं वाटतं की नजीकच्या भविष्यकाळात कोणतीही व्यक्ती स्वत:च्या शरीरातल्या घडामोडींची माहिती स्वत:च घेऊ शकेल. शरीराचं तपमान, रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वसनाचा वेग, झोपेचे तास हे सर्व आकडे स्पष्ट दिसतील, त्याचबरोबर तुमचा फिटनेस बॅण्ड हे आकडे सुधारण्यासाठी बहुमोल सूचना तिथल्या तिथे देऊ शकेल, जसं की- सकाळी जास्त जेवलात, आता कमी खा, शरीर शुष्क झालंय- पाणी प्या, हृदय जोरात चाललंय- स्वस्त बसा, झोप  कमी झालीय- चला बिछान्यावर, वगैरे.
फिटनेस बॅण्डच्या वापरातून एक संभाव्य धोकासुद्धा आहे, जो लक्षात घ्यायला हवा. या उपकरणात आपली वैयक्तिक माहिती नोंदली जात आहे, तिचा गैरवापर होऊ नये. हा डेटा हॅक करता येऊ शकतो. स्वार्थासाठी या माहितीचा वापर करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा हेही या कंपन्यांपुढे आव्हान राहील.
अगदी आत्ता आत्तापर्यंत आपल्या फिटनेसचा वेगळा विचार केला पाहिजे, असं बहुतेकांना वाटतच नसे. आजारी पडलो की डॉक्टरकडे जावं, औषधं घ्यावी, बरं व्हावं अशी पारंपरिक समजूत होती. आत्ताची धकाधकीची जीवनशैली पाहिली की, लक्षात येतं, आरोग्यव्यवस्थेचं हे मॉडेल आता चालणार नाही. आजच्या पिढीला ना आजारी पडायला वेळ आहे, ना डॉक्टरकडे जायला. आपल्या आरोग्याचं नियमन त्यांना स्वत:च करायचंय. स्वत:च्या त्रुटी ओळखून दुरुस्त करायच्या आहेत. स्वत: ठरवून घेतलेल्या ध्येयाकडे स्वप्रयत्नाने जायचंय आणि त्यासाठी त्यांना सोबती हवा आहे फिटनेस बॅण्ड!  
डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 3:01 am

Web Title: fitness bands
टॅग : Chaturang,Fitness
Next Stories
1 स्वच्छ नजर.. स्पष्ट दृष्टी..
2 आजची संमोहन विद्या
3 उद्याचे आज : वेदनाशमनाचे तंत्र!
Just Now!
X