News Flash

गद्धेपंचविशी : ‘योगभ्रष्ट’ची दहा वर्ष!

बी.ए. झाल्यानंतर जिल्हा कचेरीत मी नोकरी धरावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती.

वसंत आबाजी डहाके vasantdahake@gmail.com

निरुद्देश भटकणं, कविता लिहिणं, चित्रं रेखाटणं आणि सतत अस्वस्थ असणं.. हेच बी. ए. झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस होते. यात मदतीला आलं ते ग्रंथालयातलं वाचन आणि संध्याकाळच्या कवी-लेखकांबरोबरच्या गप्पा. यांचा एकत्रित परिणाम माझ्यावर झाला आणि तोपर्यंत  लिहिलेल्या, छापलेल्या सर्व कविता एके दिवशी मी जाळून टाकल्या! पुढे आडवं-तिडवं, मराठी-इंग्रजी, सगळ्या विषयांचं वाचन होत गेलं, सलग ४५ मिनिटं विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याचं आव्हान त्यातूनच तर पेललं गेलं. खूप ठिकाणी फिरत राहिलो, प्रगल्भता देणारी माणसं आयुष्यात आली, जवळच्यांचे बेचैन करणारे अनुभव आले, तसं ‘फना’ करणारं विलक्षण प्रेमही अनुभवलं.  त्यातून मनात, कागदावर उमटत गेली ती, ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घ कविता.. हेच या काळाचं संचित.. 

चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातून मराठी साहित्य हा विषय घेऊन बी.ए. झालो तेव्हा मी वयाची वीस वर्ष पूर्ण केली होती. बी.ए.च्या पहिल्या वर्षांत असताना माझी एक कविता ‘सत्यकथा’ या तेव्हाच्या दर्जेदार मानल्या जाणाऱ्या मासिकात छापून आली होती. त्यानंतर ‘वाङ्मयशोभा’, ‘कथासागर’, ‘युगवाणी’ इत्यादी नियतकालिकांतही अनेक कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. माझं हे लेखनकर्तृत्व आमच्या गुरुजींना ठाऊक असल्यामुळे महाविद्यालयाच्या वार्षकि अंकाच्या संपादनाचंही काम माझ्याकडे आलं होतं.

त्याच काळात ‘नवकलिका’ या नावाचं नवोदित कवींच्या कवितांचं एक संकलन कृष्णा चौधरी आणि पुरुषोत्तम वनकर  यांच्या सहकार्यानं मी संपादित केलं होतं. ते छापण्यासाठी कृष्णा चौधरीला सोबत घेऊन नागपूरला जायचं होतं. मी चंद्रपूरहून अमरावतीला गेलो आणि तिथून वरूडला. हा माझा एकटय़ानं केलेला पहिला प्रवास होता. वयाची अठरा वर्ष  पूर्ण झाली होती, मात्र चंद्रपूरच्या बाहेर मी कधीही गेलेलो नव्हतो. अमरावती शहर पाहिलेलं नव्हतं. हातात कवितांचं बाड असलेली पत्र्याची पेटी आणि जुजबी कपडे असलेली एक पिशवी, एवढंच सामान माझ्याकडे होतं. पण एक जोखीमही होती. पुस्तक छापण्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे होते. अमरावतीला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. तेव्हा आगगाडीत भेटलेल्या एका भल्या माणसानं एका लॉजच्या दारापर्यंत पोहोचवलं. वाटेत त्यानं मला बऱ्याच सावधगिरीच्या सूचनाही दिल्या. रात्री तिथे थांबून सकाळी वरूडला गेलो. कृष्णासोबत नागपूरला गेलो, तिथे महालातल्या एका छापखान्यात ते बाड छापायला टाकलं. जवळचे पैसे छापखान्याच्या मालकाला दिले. कृष्णा प्रति घेऊन येणार होता. त्या पुस्तिकेचं चांगलं कौतुक झालं, तसंच एका समीक्षकानं कानउघडणीही केली.

बी.ए. झाल्यानंतर जिल्हा कचेरीत मी नोकरी धरावी, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. ती स्वाभाविकच होती. माझ्या वडीलभावानं पॉलिटेक्निकमधलं शिक्षण अर्धवट टाकून नोकरी स्वीकारली होती. राऊरकेला, रांची आणि आता कोलकाता, अशी त्याच्या नोकरीची गावं बदलत गेली होती. मला मराठी विषय घेऊन एम.ए. करायचं होतं. नागपूरला आमच्या सगळ्यात मोठय़ा बहिणीच्या घरी राहून मी एम.ए. करावं अशी तडजोड झाली. बर्डीवरच्या एका मोठय़ा वाडय़ात हे बिऱ्हाड होतं. तिथे काही दिवस राहिल्यानंतर इथे आपलं निभणार नाही असं दिसू लागलं. तेव्हा कमी भाडय़ाची एखादी खोली घ्यावी आणि जेवायला तिच्याकडे यावं, असं बहिणीनंच सुचवलं. चंद्रपूरहून आमच्याच महाविद्यालयातला एक मुलगा अर्थशास्त्रात एम.ए. करायला आला होता. मग आम्ही दोघांनी मिळून एक खोली घेतली. ती पहिली खोली होती. ती लवकरच सोडली. त्यानंतरच्या दोन वर्षांत पाच ठिकाणी मी राहिलो. या दरम्यान, वडीलभावानं पंचाहत्तर रुपये पाठवत जाईन असं लिहिलं होतं. १९६२-६३ च्या काळात एवढी रक्कम खूप होती. खोलीचं भाडं, खाणावळीचं देणं भागवून शनिवारी-रविवारी घरी जाण्यापुरते पैसे उरायचे.

चंद्रपूरहून नागपूरला येणं हे कोषातून बाहेर येण्यासारखं होतं. पहिल्या काही दिवसांत खोलीमित्राखेरीज दुसरं कोणीही ओळखीचं नव्हतं. पण खोलीच्या जवळच राजाराम वाचनालय होतं. तिथला मी सभासद झालो आणि सकाळी, संध्याकाळी तिथे जाऊन वाचत बसायला लागलो. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर एम.ए.चे वर्ग चालायचे. ग्रंथालयातील कर्मचारी वर्ग ओळखीचा झाल्यावर मी आत, पुस्तकांच्या रॅक्स ठेवलेल्या होत्या त्या भागात जाऊ लागलो. तिथे हव्या त्या रॅकसमोर उभं राहून पुस्तकं चाळायची, एखादं वाचनीय वाटलं तर तिथेच खाली बसून पुस्तकांना पाठ टेकवून वाचत राहायचं. नागपूरच्या दिवसांतले सगळ्यात अधिक तास मी या ग्रंथालयात घालवले. ते अक्षरश: ग्रंथभांडार होतं. शब्दांचा, माहितीचा, ज्ञानाचा अफाट समुद्रच म्हणा. माझ्याबाबतीत विषय-अविषय असं काही नव्हतं. मराठीत, हिंदीत जे वाचावंसं वाटेल ते वाचायचं. चंद्रपूरच्या काळात कथा, कादंबऱ्या, कविता मी खूप वाचल्या होत्या. आता त्या पलीकडचं- तत्त्वज्ञान, समाजविज्ञान, मानवविज्ञान, इतिहास आणि अभ्यासक्रमाशी निगडित, पण परीक्षेसाठी आवश्यक नसलेलं, असंही साहित्य मी वाचत बसायचो. या वाचनाची ओढ मला एवढी असायची की वर्गात उपस्थिती दर्शवून मागच्या दारानं मी हळूच निघून जात असे! मी बसायचो ते बाक या मागच्या दाराजवळच होते. वर्गात मुली खूप, पुरुष विद्यार्थी केवळ पाच. त्यातून उठून मी निघून गेलो तरी कुणाच्या लक्षात यायचं नाही. आमचे गुरुजन थोरच होते. डॉ. शं. दा. पेंडसे, डॉ. श्री. मा. कुळकर्णी हे अतिथी प्राध्यापक आणि भवानीशंकर श्रीधर पंडित, मधुकर शंकर वाबगावकर हे विभागातले प्राध्यापक होते. कुळकर्णी आणि पंडित या सरांच्या तासांना उपस्थिती दाखवून मी सटकत असे.

एका संध्याकाळी वामन तेलंग आणि प्रभाकर सिरास यांची ओळख झाली. व्हरायटी चौकात ‘काले अ‍ॅण्ड बाकरे’ या कायम बंद असलेल्या फोटो स्टुडिओजवळ असलेल्या लालाच्या पानठेल्याजवळ हे असत. ऑफिस सुटलं की तडक इकडे, असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असायचा. तिथे नागपुरातले अनेक कवी-लेखक भेटले. जयंत देवधर, सुधाकर नायगावकर, प्रभाकर पुराणिक, प्रभाकर धोटे, सुधाकर लोखंडे, श्रीधर शनवारे इत्यादी. इतस्तत: भटकून झाल्यावर जवळच्या ‘जगत रेस्टॉरंट’मध्ये आम्ही जायचो. तिकडे गणेश नायडू, राजा पाठक, भाऊ समर्थ हे येत असत. पानठेल्यावर एकदा पोहोचलो की खोलीवर परत जायला रात्रीचे दहा-साडेदहा, कधी बाराएक होऊन जायचे. मध्ये मी खाणावळीत जाऊन जेवून यायचो, कधी जेवण वर्ज्य करायचो. कविता, कथा, कादंबरी, नाटक, रंगभूमी, चित्र या विषयांवर अखंड गप्पा चालत. ग्रंथालयातले वाचन आणि संध्याकाळच्या या गप्पा यांचा एकत्रित परिणाम माझ्यावर झाला. तोपर्यंत  लिहिलेल्या, छापलेल्या सर्व कविता एके दिवशी मी जाळून टाकल्या!

तेलंग आणि सिरास नोकऱ्या सोडून भारतभ्रमणाला गेल्यानंतर माझं व्हरायटी चौकात जाणं थांबलं. आता आम्ही लोखंडी पुलाच्या अलीकडे, घाटरोडवरच्या खोलीत आलो होतो. ते अर्धवट बांधकाम झालेलं मोठं घर होतं. या घराला खिडक्या होत्या, पण काचा नव्हत्या. तिथून सारखी धूळ येत असायची. समोर रस्त्यापलीकडे झोपडपट्टी होती. रस्त्यावरून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रेतयात्रा जात. कोपऱ्यावर एक टॉकीज होती. तेथे ‘हँसता हुआ नूरानी चेहरा’ हे गाणं सतत वाजत असायचं. ते त्या वेळी नुकत्याच आलेल्या ‘पारसमणी’ नावाच्या सिनेमातलं होतं. त्या दोन वर्षांत नागपुरात बरंच काही पाहायला मिळालं. संध्याकाळी  सायकल काढायचो आणि कधी पुलाच्या अलीकडे शुक्रवार तलाव, अयाचित मंदिरापर्यंत तर कधी पुलाच्या पलीकडे एलएडी कॉलेजच्या पलीकडे, कधी सदरकडे, तर कधी वर्धा रोडवर जेलपर्यंत निरुद्देश भटकून यायचो. त्या वेळी नागपूरचा विस्तार आजच्याइतका नव्हता. काही भागांत मी जायचो नाही. तसंही नागपूर मला परकंच होतं.

त्या काळात चंद्रपूरला घरी बचेन व्हावं असं काही घडत होतं. नागपुरातही जवळिकीनं कुणाशी बोलावं असं नव्हतं. वर्गात मनोहर वराडपांडे आणि कृष्ण माधव घटाटे हे दोन प्रौढ विद्यार्थी होते. वराडपांडेंना नाटक आणि रंगभूमीची खोल समज होती. त्यांच्याशी गप्पा करण्यात खूप चांगला वेळ जात असे. कृष्ण माधव हे संत गुलाबराव महाराजांचे भक्त होते. त्यांच्याबरोबर महाराजांचं लेखन वाचण्यात-समजून घेण्यात मला रस होता. ते मला कितपत समजलं व कृष्ण माधवांना मी कितपत समजावून देऊ शकलो, कोण जाणे. पण नागपुरातल्या शेवटच्या दिवसांत त्यांनी मला राहाण्याचं ठिकाण उपलब्ध करून दिलं.

एम.ए.ची दुसऱ्या वर्षांची परीक्षा देऊन मी घरी आलो. त्या वेळी शहरातलं जुनं घर विकून शहराबाहेर नव्या घरात राहायला आलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तरी घरी स्वस्थ बसत नव्हतो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी भटकून यायचो आणि काळं कव्हर घातलेल्या एका वहीत काही लिहीत बसायचो. त्यातून पुढे ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घ कविता आकारास आली. त्या दोन वर्षांत जे मी अनुभवलं आणि जे मनात चाललेलं होतं, ते सगळं त्या कवितेत आलं. ‘सत्यकथा’च्या मे १९६६च्या अंकात ती छापून आली त्या वेळी तिनं ‘सत्यकथा’ची बावीस पृष्ठं व्यापलेली होती. एम.ए.चा निकाल लागला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. पण त्या वर्षी कुठल्याही महाविद्यालयात नोकरी मिळाली नाही. मनोहर सप्रे हे आमच्या नव्या घरात भाडेकरू होते. ते ‘लोकसत्ता’त व्यंगचित्रं काढत असत. तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या विषयांचे ते प्राध्यापक होते. ‘लिंक’ नावाचं इंग्रजी साप्ताहिक त्यांच्याकडे येत असे. याशिवाय राजकीय-सामाजिक विचारसरणी विशद करणारी उत्तम पुस्तकं त्यांच्याकडे होती. ती मी वाचायला लागलो. सप्रे यांच्याशी साहित्य, कला, राजकारण यांविषयी चांगल्या चर्चा होत. उत्तम शास्त्रीय संगीत मी त्यांच्यासोबत ऐकलं. एम.ए.च्या वर्गात असताना टिपणं घेण्याऐवजी मी रेखाटनं करीत असे. आता घरी आल्यावर रेखाटनं करू लागलो. आमच्या शेजारच्या घरात अरविंद सरमुकादम म्हणून एक करिअर टीचर होते. त्यांनी मला दोन पुस्तकं वाचायला दिली. ‘लस्ट फॉर लाइफ’ आणि ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’. तोपर्यंत मी इंग्रजी भाषेतल्या कादंबऱ्या वाचल्या नव्हत्या. ‘लस्ट फॉर लाइफ’मधल्या व्हिन्सेंट वॅन गॉगच्या चरित्रकथेत मी पूर्ण गुंतून गेलो. त्यानंतर जिथे कुठे या चित्रकाराची चित्रं पाहायला मिळत ती मी आवर्जून पाहात असे. व्हिन्सेंटनं तेव्हा लावलेलं वेड अद्यापही कायम आहे. काही वर्षांपूर्वी अ‍ॅमस्टरडॅमला जाणं झालं, ‘व्हिन्सेंट म्युझियम’मध्ये मूळ चित्रं पाहायला मिळाली तेव्हा अक्षरश: थरारून गेलो होतो. ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’नं तर मला झपाटून टाकलं होतं. या एकाच कादंबरीनं दस्तएवस्की किती थोर कादंबरीकार आहे हे लक्षात आणून दिलं होतं.

घरी मी नुसताच बसून आहे हे माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्याही पचनी पडत नव्हतं. लिहीत, रेखाटत होतो, पण मन अस्वस्थ असे. मग कोलकात्याला भावाकडे गेलो. एका अफाट महानगरात मी वावरत होतो. भाऊ सकाळीच नोकरीवर गेला की मला काहीच काम नसे. घरासमोरच ट्राम थांबायची, तिच्यात बसायचं, हवं तिथे उतरायचं, पुन्हा ट्राममध्ये बसून घरी परतायचं. कोलकात्यात हिंडताना त्या वेळी असुरक्षित वाटत नव्हतं. मी इतस्तत: भटकायचो. चौरंगीला उतरून निव्वळ रहदारी बघायचो. एकदा बेलूर मठापर्यंत जाऊन आलो. एकदा लोअर चितपूर रोडवरच्या जोडा सांको बाडीतलं रवींद्रनाथ ठाकुरांचं घर पाहून आलो. एकदा म्युझियम पाहून आलो. शेवटी पार्क स्ट्रीटवरच्या अमेरिकन लायब्ररीत स्थिरावलो. तिथे मला चित्रांवरची नियतकालिकं, पुस्तकं भरपूर पाहायला मिळाली. भावाबरोबर आर्ट गॅलरीज पाहिल्या, त्याच्याबरोबर दक्षिणेश्वरला गेलो. कोलकात्याचा माझ्या मनावर ठसा उमटला. ट्राम्स, बसेस, माणसाने ओढायच्या रिक्शा, खूप माणसं, मोठय़ा बाजारपेठा. महानगर काय असतं हे कळलं. वर्तमानपत्रात ‘हंग्री जनरेशन’विषयीची (बंगालीतील साहित्यिक चळवळ) माहिती मिळाली. मलय रायचौधरीनं लिहिलेल्या ‘हंग्री जनरेशन’च्या जाहीरनाम्याविषयी वाचलं, तो मागवला. त्या वेळी कोणत्याही लेखक-कवीला भेटता आलं नव्हतं. ती संधी पुढे काही वर्षांनी आली. भारतभ्रमणानंतर तेलंग-सिरास यांनी ‘असो’ या नियतकालिके चे  काही अंक आणले होते. त्यात या पिढीच्या साहित्याचे अनुवाद होते. त्यांतली काही नावं कोलकात्यात असताना वर्तमानपत्रात वाचली होती.

दुसऱ्या वर्षी चार महिने एका शाळेत काम केलं. दुसऱ्या सत्रापासून आर्वी गावातल्या महाविद्यालयात गेलो. तिथे हे सत्र आणि पुढच्या वर्षीची दोन सत्रं केली. त्या महाविद्यालयातून मुक्त झालो त्या वेळी ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घकविता छापून आली होती. त्या कवितेविषयी भा. ज. कविमंडन यांनी ‘साधना’त लेख लिहिला. श्री. पु. भागवतांचं त्या कवितेची वैशिष्टय़ं सांगणारं पत्र आलं. आणखीही खूप पत्रं आली. मी पुन्हा दुसऱ्या गावात नोकरी शोधण्यासाठी मुलाखती देत फिरत होतो. एका मुलाखतीच्या वेळी प्रभा गणोरकर या व्यक्तीशी माझी ओळख झाली. तिला भुसावळला नोकरी मिळाली, मी अजून बेकारच होतो. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तेव्हा पुढे आमची जन्माची गाठ बसायची आहे याची कल्पना नव्हती.

वाबगावकरसरांच्या सूचनेवरून मी िहगणघाट येथे मुलाखतीसाठी गेलो. ती नोकरी मात्र मला मिळाली. आर्वीच्या महाविद्यालयातच ‘शिकवावं कसं’ याविषयीचं माझं प्रशिक्षण झालेलं होतं. साठ-सत्तर मुलांना पंचेचाळीस मिनिटं गुंतवून ठेवायचं हे मोठंच आव्हान होतं. माझं तोपर्यंतचं वाचन तिकडे कामी आलं. िहगणघाटमध्ये काही प्रश्नच उद्भवला नाही. ग्रंथालयात मला रस होता. त्यामुळे नवी पुस्तकं मागवण्याच्या वेळी मी काही सुचवत असे. मी त्या गावात काही काळ रमलो ते या ग्रंथालयामुळे. नियमित वेतनाच्या बाबतीत बाकी आनंदच होता. घरी जायचं असलं की प्राचार्याकडे जाऊन पैसे मागायचे, मग ते अकाऊंटंटला सूचना द्यायचे. ते देतील तेवढे घ्यायचे. बाकी गावात कुणालाही कोणतीही अडचण नव्हती. उधारीवरच सगळं चालायचं. मला घरी पैसे द्यायचे असायचे. शेवटी वैतागून मी ते महाविद्यालय सोडलं. हिंगणघाट हे त्या वेळी बंद पडलेल्या गिरण्यांचं शहर होतं. तिथे माणसांचे बाजार भरत. आयुष्यात कायमच अपयश आलं म्हणून एक गृहस्थ चौकात उपोषणाला बसले होते. शहरात धुळीचे रस्ते होते. गल्लीबोळांत डुकरांचा वावर होता. प्राध्यापकांशी काय बोलावं ते समजत नव्हतं. मी वाचत असे, लिहीत असे, रेखाटनं करीत असे. दाटून आलेलं एकटेपण कमी करण्याचा प्रयत्न करीत असे. ते असह्य़ झालं की मिळेल ती बस पकडून, वर्धा स्टेशनवर अनंत काळ वाट पाहून आलेल्या गाडीत बसून अमरावतीला संध्याकाळी पोहोचत असे. तोपर्यंत प्रभा अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात आलेली होती. वर्धा स्टेशनवर व्हीलर बुकस्टॉलमध्ये बेकेट, काफ्का, ज्यां जेने, काम्यू, सार्त् यांची पुस्तकं असत. ती मी घ्यायचो. हिंगणघाटच्या याच काळात ‘फना’ होणं, आपलं अस्तित्व मिटवून टाकणं, अस्त स्वीकारणं, म्हणजे काय, याचा प्रत्यय देणारं विलक्षण प्रेम वाटय़ाला आलं.. नंतर हिंगणघाट सोडलं त्या उन्हाळ्यात वडील वारले. प्रभाच्या मांडीवरच त्यांचा प्राण गेला. काही दिवसांनी जनता महाविद्यालयाचे प्राचार्य बंड आणि माझे प्राध्यापक गुर्जर घरी आले. त्यांनी मला ‘जनता’मध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. रीतसर मुलाखत झाली आणि मी त्या महाविद्यालयात काम करू लागलो.

‘योगभ्रष्ट’ या संग्रहाचं काम सुरू झालं होतं. श्रीपुंनी आणि मंगेश पाडगावकरांनी सगळ्या कविता वाचल्या होत्या. सर्वच कविता श्रीपुंबरोबर मी वाचायच्या, पाहायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी मला मुंबईला बोलावलं होतं. मी त्यांच्याकडेच राहिलो. सकाळी आणि संध्याकाळी आम्ही कविता वाचायला बसायचो. श्रीपुंनी प्रत्येक कविता बारकाईनं वाचली होती. चांगल्या कवितांमधली बलस्थानं ते सांगत, त्याचप्रमाणे कोणत्या कविता सपाट किंवा कच्च्या आहेत हेही ते सांगत. श्रीपुंच्या मते कवितेत सर्व प्रकारची विरामचिन्हं वापरली पाहिजेत. त्यामुळे ‘योगभ्रष्ट’मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नवाचक चिन्हं आढळतात. त्याचप्रमाणे अनुच्चारित अनुस्वारही दिलेले आहेत.

चंद्र/ मला इथं पाहातो/ तुला तिथं पाहात असेल, ही स्थिती लवकरच संपली. लोकसेवा आयोगामार्फत निवड होऊन मीही विदर्भ महाविद्यालयात गेलो.  मी आणि प्रभा सहा महिने एकत्र राहिलो, सोबतच महाविद्यालयात जायचो. डॉ. म. ना. वानखडे, प्राचार्य मराठे घरी आले होते. ते म्हणाले, ‘औपचारिक लग्न करून टाका.’ वयाची तीस वर्ष पूर्ण व्हायला तीन महिने असताना आम्ही लग्न केलं. आतली आणि बाहेरची वणवण थांबली. लग्नाचा एकूण खर्च फक्त पाच रुपये! ज्या घरात प्रभा राहात होती तेच आमचं कायमचं घर झालं. प्रभानं त्याचं नाव ठेवलं, ‘कॅक्ट्स’.

तीन महिन्यांनंतर ‘योगभ्रष्ट’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहावर लवकरच  वा. रा. कांत, माधव मनोहर, विजया राजाध्यक्ष यांचे विस्तृत अभिप्राय आले.  दहा वर्ष  ‘योगभ्रष्ट’मधल्या कविता मी लिहीत होतो, की त्या मला लिहीत होत्या, सांगता येत नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 1:01 am

Web Title: gaddhepanchvishi marathi poet vasant abaji dahake article about his poem yogabhrast zws 70
Next Stories
1 मूल्यमापन व्हायलाच हवे..
2 ज्येष्ठांचे लिव्ह इन : अधुरी एक कहाणी..
3 व्यर्थ चिंता नको रे : दिसतं तसं नसतं, म्हणूनच..
Just Now!
X