News Flash

गद्धेपंचविशी : ‘स्व’च्या शोधात..

वर्ष २०१२. ग्लोब थिएटर, लंडनमध्ये मी ‘पिया बहरूपिया’ या नाटकाचा प्रयोग करत होते.

‘संगीत देबूच्या मुली’ (१९९९)

गीतांजली कुलकर्णी

‘‘जसं एखादा वादक आपल्या वाद्याला संपूर्णपणे ओळखतो, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला आपलं स्वयंपाकघर पूर्णपणे माहिती असतं, तसंच एका नटाला/नटीला आपलं ‘स्व’ माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. हे मला नाटकानं शिकवलं. नाटकाची प्रक्रिया शिकताना मी के वळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही घडत होते. रूढ अर्थानं यशस्वी मानलं गेलेलं शिक्षण घेऊन नोकरीला लागण्याच्या काळात अभ्यास म्हणून नाटक शिकण्याचा निर्णय अव्यावहारिकच! माझ्या ‘गद्धेपंचविशी’त तो निर्णय घेताना त्याचं महत्त्व मला कदाचित तितकं  जाणवलं नसावं, जे आता २५ वर्षांनंतर जाणवतं आहे..’’

वर्ष २०१२. ग्लोब थिएटर, लंडनमध्ये मी ‘पिया बहरूपिया’ या नाटकाचा प्रयोग करत होते. या ‘शेक्सपेरियन’ काळातल्या थिएटरच्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला शेक्सपीयरच्या एका नाटकाचा प्रयोग करायला मिळतंय यानं पूर्णपणे भारावून गेले होते. त्या रंगमंचाच्या पुढच्या भागात मध्यंतराच्या जरा आधी ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ हे गाणं गाताना, जसं मी वठवत असलेल्या ‘वायोला’ला कळत नसतं की आपलं प्रेम कसं व्यक्त करावं, तसंच माझंही झालं होतं. ‘इथे.. या स्टेजवर अभिनय करायचं भाग्य कसं काय मला मिळालं?,’ असा प्रश्न माझ्या मनात आला. त्याचं उत्तर एकच- ‘एन.एस.डी.’ अर्थात राष्ट्रीय नाटय़ विद्यालय.

शाळेत-कॉलेजमध्ये मी अभ्यासात बरी नव्हते. कॉलनीमध्ये नाटकात वगरे भाग घ्यायचे, तिथे कौतुकही व्हायचं. पण कॉलेजात आल्यावर माझी डाळ काही शिजली नाही. मला ‘रुईया’च्या ‘नाटय़वलय’मध्ये असताना काही एकांकिकेत बऱ्या भूमिका मिळाल्या नाहीत. आणि छोटय़ा भूमिकेतसुद्धा मी काही फार चमक दाखवू शकले, असं मला वाटत नाही. पण नाटकाच्या या अनुभवातून एक लक्षात आलं की आपल्याला हे तालमीचं वातावरण आवडतं. दिग्दर्शकांनी नटांना सूचना देणं, ते नटांनी घडवायचा प्रयत्न करणं, ते कधी जमणं, कधी न जमणं.. ही सगळी प्रक्रिया फार मजेशीर वाटली.

याच दरम्यान मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांला असताना मला ‘एन.एस.डी.’ची जाहिरात वर्तमानपत्रात दिसली आणि वाटलं अर्ज करावा. खरं सांगायचं तर मला नाटकांविषयी फार माहिती होती किंवा ज्ञान होतं असं अजिबात नाही. पण मी तयारी केली होती आणि जे प्रश्न विचारले गेले त्याची खरी खरी उत्तरं दिली. जे कळलं नाही ते सांगितलं ‘नाही कळलं’ म्हणून आणि जे येत नव्हतं ते ‘येत नाही’ म्हणून सांगितलं. मला वाटतं त्याचमुळे त्यांनी माझी निवड अंतिम कार्यशाळेसाठी केली. तिथे मला खूप मजा आली. मनापासून मी सगळ्यांत भाग घेतला. तेव्हा मी फक्त २० वर्षांची होते. फार अनुभव नव्हता, पण उत्साह आणि नाही म्हटलं तरी त्या वयाची एक निरागसता होती. माझी निवड झाली आणि आयुष्यच बदललं. आता हे वाचताना तुम्हाला वाटेल की ही इतकं ‘एन.एस.डी- एन.एस.डी.’ का करतेय?.. तर त्याचं कारणही तसंच आहे. तिथे माझा पुनर्जन्म झाला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण त्या आधीची मी आणि नंतरची मी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

तिथे प्रवेश घेताना, इथे काय फक्त अभिनय  करायचा, बाकी काही फारसा अभ्यास नसेल.. या भ्रमात मी होते, पण झालं उलटंच. ‘एन.एस.डी.’त गेल्यावर पहिला विचार आला की आपली शाळा अशी का नव्हती? कारण तिथे ज्या प्रकारे शिकवलं जायचं ते माझ्यासारख्या व्यक्तीला विचार करायला लावणारं, स्वत: हून काम करायला लावणारं होतं, जे शाळेत कधीच घडलं नाही. तीन वर्ष अगदी साहित्यापासून सुतारकामापर्यंत सगळं शिकवलं. दिवसाची सुरुवात व्यायामाच्या वर्गानं व्हायची. योग आणि ‘मूव्हमेंट’ असे दोन वर्ग आलटून पालटून असायचे. ‘वल्र्ड ड्रामा’, ‘मॉडर्न इंडियन ड्रामा’ यात जगातल्या आणि भारतातल्या नाटकांचा अभ्यास असायचा. शिक्षिका अनुराधा कपूर  जागतिक नाटक हा विषय शिकवताना, जे शिकवणार त्याच्या मुख्य मुद्यावर वादविवाद वा चर्चेने सुरुवात करायच्या. दुसऱ्या शिक्षिका होत्या निभा जोशी. त्या ‘अ‍ॅस्थेटिक्स- आर्ट हिस्टरी’ खूप प्रेमानं आणि उत्साहानं शिकवायच्या. फक्त वर्गातच नाही, तर अगदी कॉरिडॉरमधून जाता-येताही सांगायच्या, ‘‘अलग तरीके से बाल बनाओ.. अ‍ॅक्टर हो. दुपट्टा ऐसे सर पर बांधोगी तो ‘पिटा’में (म्हणजे दु:खी) मदर मेरी के जैसे लगोगी.. यूझ दॅट इन युअर सीन वर्क .’’ असे अनेक विषय अनेक शिक्षक इतक्या वेगळ्या पद्धतीनं शिकवायचे की मी अभ्यास करायला प्रवृत्त होत असे. गो. पु. देशपांडे मराठी नाटक शिकवायला यायचे. ते अत्यंत उत्तम शिक्षक होते. त्यांच्या मराठी नाटकाच्या विश्लेषणामुळे तर माझा मराठी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.

रॉबिन दास ‘सीनिक डिझाइन’ हा विषय शिकवायचे. म्हणजे नाटकाचं नेपथ्य कसं करावं, त्यामागचा विचार काय असायला हवा, वगरे. ते सगळे तास कुठे पारावार बसून, हिरवळीवर किंवा चहाच्या टपरीवर घ्यायचे. त्यामुळे त्या तासांमध्ये एक सहजता होती. नेपथ्य किंवा डिझाइनकडे बघण्याची वेगळी दृष्टी त्यामुळे मिळाली. अनेक विषय तर ‘प्रॅक्टिकल’चे होते, त्यामुळे त्यात मला रस होताच. आवाज आणि संवाद, रंगभूषा, नेपथ्य, हे विषय शिकताना फार मजा यायची. ‘मूव्हमेंट’च्या तासामुळे आपल्या शरीराची ताकद, त्याची चपळता, लवचीकता, मोकळेपणा, हे बघता आलं. आवाज आणि भाषणामुळे आपली बोलण्याची पट्टी काय, तारता किती आहे, आवाजाची जातकुळी काय, क्षमता काय, हे सगळे निकष जोखता आले. आम्हाला पहिल्या वर्षी साहित्याच्या अभ्यासात लेखक गोरकी यांचं ‘माझं बालपण’ होतं. त्यातून स्वत:च्या लहानपणाकडे जाणीवपूर्वक बघण्याची दृष्टी तयार झाली. कुठल्याही माणसाचा स्वभाव त्याच्या बालपणाशी जोडलेला असतो आणि व्यक्तिरेखा साकारताना त्याचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे ‘कॅ रेक्टरायझेशन’ कसं करायचं हे हळूहळू लक्षात यायला लागलं. ‘एन.एस.डी.’ला यायच्या आधी मी कधी मनापासून अभ्यास केलेला मला आठवत नाही. कुठल्याही गोष्टीत ‘असं का?’, ‘कशामुळे?’ वगरे प्रश्न पडलेले मला आठवत नाहीत. पण इथल्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानं माझ्यात प्रचंड बदल घडवला.

दुसऱ्या  वर्षांपासून अनेक दिग्दर्शक येऊन आमची नाटकं बसवू लागले. इथे रशियन नाटय़ शिक्षक व्हॅलेंटाईन तीएपलेकोव (ते त्यावेळी मॉस्कोहून आमचं नाटक बसवायला आले होते.  त्यांना जाऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं.) यांच्याबरोबरचा एक अनुभव सांगावासा वाटतो. स्वानंद किरकिरे माझ्या बॅचचा. त्याचं शेवटच्या वर्षांचं नाटक ब्रेख्तच्या कवितांवर आधारित होतं. मी त्यात एका वेश्येची भूमिका केली होती, जिचा वयामुळे धंदा कमी झाला असतो. सगळ्यांनी मला अशा भूमिके त प्रथमच पाहिलं होतं, त्यामुळे खूप कौतुक झालं. पण ते काम पाहून व्हॅलेंटाईन तीएपलेकोव म्हणाले, ‘‘तू काम छान केलंस, पण तुझ्या डोळ्यांत मला सतत अनेक स्वप्नं असलेली तरुणी दिसत होती.’’ ते ऐकलं आणि खट्कन मला जाणवलं, ‘‘हो की! आपण याचा विचारच नाही केला.’’ ते भूमिका देतानासुद्धा पासपोर्ट साईज फोटो बघून द्यायचे. त्यांचं म्हणणं होतं, की तुमच्या डोळ्यांत ते पात्र तुम्ही करू शकाल की नाही हे मला दिसतं.

दिग्दर्शक परेश मोकाशीबरोबर मी दोन नाटकांत काम केलं. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘संगीत देबूच्या मुली’. मी ‘एन.एस.डी.’ मध्ये शिकून आले असले तरी मला माझ्या कामाविषयी स्पष्टता नव्हती. परेशच्या लिखाणाची आणि नाटक बसवण्याची एक खास शैली आहे. त्याच्या या दोन्ही नाटकांमध्ये ठाशीव विनोद होता, ज्याची मला अभिनय करताना मोकळं  व्हायला खूप मदत झाली. माझ्या डोक्यात खूप काही असायचं, पण ते प्रत्यक्ष अमलात आणताना लागणारं ‘क्राफ्ट’ माझ्या हाती आलं नव्हतं. परेशच्या शैलीमुळे मला ते कळायला लागलं. आपला काय गोंधळ उडतोय ते लक्षात आलं. वाचिक अभिनयावर उत्तम काम झालं, कारण भाषा साधी नव्हती. जे संवाद होते, ते बोलताना एक विशिष्ट शैली वापरायची होती. या नाटकामुळे मला भाषेवर काम करता आलं. ते आजही उपयोगी पडतं.

अनामिका हकसर आमच्या  शिक्षिका होत्या. त्या मॉस्कोहून शिकून आल्या होत्या. त्या ‘एन.एस.डी.’च्याच माजी विद्यार्थिनी होत्या. ‘प्रॉडक्शन प्रोसेस’ शिकवायच्या. त्या वर्गात जे अनुभवलं ते फारच अप्रतिम होतं. वातावरणनिर्मिती कशी करायची, प्रतिमा कशा बनवायच्या, काव्य-चित्र-गाणी कशी उभी करायची, हे त्या वर्गात आम्ही प्रत्यक्ष करायचो. त्या अभ्यासामुळे आपण काय आहोत हे उमगू लागलं. हे अभिनय करताना अत्यंत गरजेचं असतं, कारण आपलं शरीर, आपलं मन, आपला  आवाज, आपली बुद्धी, हे सगळं आपण वापरत असतो. जसं  एखादा वादक आपल्या वाद्याला संपूर्ण ओळखतो, जसं एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला आपलं स्वयंपाकघर संपूर्णपणे माहिती असतं, तसंच एका नटाला/नटीला आपलं ‘स्व’ माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं हे मला जाणवलं. या सर्व अभ्यासात मी अभिनेत्री म्हणून शिकत होतेच, पण एक व्यक्ती म्हणूनही घडत होते.

माझ्याकडे ‘एक रिकामी बाजू’ ही संहिता होती, जिच्याबद्दल अनिरुद्ध खुटवड आणि प्रदीप वैद्य यांना आम्ही एक कार्यशाळा घेत असताना सांगितलं. अनिरुद्धनी पुढाकार घेऊन त्याचं प्रदीपकडून रूपांतर करून घेतलं. हे सगळं खूप पटकन घडलं आणि ‘एक रिकामी बाजू’नाटक करायचं ठरलं. या नाटकात मी काम करत होते आणि निर्मितीही माझी असल्यामुळे खूप जबाबदारी होती. नाटकाच्या तालमी, त्याची आखणी,चहा-नाश्ता, नेपथ्य, वेशभूषा, रंगमंचाच्या तारखा मिळवणं, जाहिराती, हिशेब.. वगरे वगरे. सगळी निर्मितीची कामं केली. माझ्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची संधी मला मिळाली. खूप मेहनत घेतली आणि त्याचं फळही मिळालं. माझं असं काही निर्माण करायचं होतं, ते साध्य झालं. या नाटकामुळे मला फक्त नटी म्हणून नाही, तर एक रंगकर्मी म्हणून अनुभव  मिळाला. पूर्वी मला फक्त माझं काम चांगलं होतंय की वाईट, याची चिंता असायची. पण आता माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. यानंतर मला काय करायचंय, कशा भूमिका करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टीचा भाग व्हायचंय, हे मला अधिक स्पष्टपणे कळायला लागलं.

२०१४ मध्ये जेव्हा व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘कोर्ट’ या चित्रपटाला दोन बक्षीसं मिळाली तेव्हा ‘रेड काप्रेट’वरून चालताना वाटत होतं, की मी इतक्या महत्त्वाच्या चित्रपटाचा भाग कशी झाले? आणि त्याचंही उत्तर होतं, एन.एस.डी.! तिथल्या शिक्षणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे देशभरातून वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जातीधर्माचे, वेगळ्या स्तरांतून आलेले विद्यार्थी होते. त्यांच्याबरोबर तीन वर्ष राहाणं, नाटक करणं, त्यांची नाटकाची पद्धत जाणून घेणं, वेगळी अभिनयशैली बघणं, या अनुभवामुळे जो ऐवज मिळाला तो कुठल्याही ऐहिक फायद्याच्या पलीकडचा आहे. सतत शिकत राहाणं किती गरजेचं आहे, विविधतेचे काय फायदे आहेत,  लिबरल विचारांमुळे कलाकृतीच्या शक्यता खुलतात, हे अनुभवलं. ‘कोर्ट’ या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक चतन्य ताम्हाणेची चित्रपट बनवण्याची पद्धत फारच वेगळी होती. त्यानं कलाकारांच्या निवडीसाठी अनेक कार्यशाळा घेतल्या आणि त्यासाठी अनेक महिने घेतले. चित्रपटाची संहिता वाचल्यामुळे मला त्याचं महत्त्व आणि चतन्यच्या कामाच्या प्रक्रियेविषयी कुतूहल होतं. त्यामुळे मी कास्टिंग डायरेक्टरला (सतचित पुराणिक) सांगितलं होतं, की ‘‘मला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या निवडप्रक्रियेचा भाग म्हणून ठेवा. अगदी ऐनवेळेस मला सांगितलंत, की तुला आम्ही निवडलं नाहीये, तरी मला चालेल.’’ ही चिकाटी माझ्यात कुठून आली? तर नाटकांमुळे. नाटकांमध्ये मी कधी धरसोड के ली नाही. ‘बोंबिलवाडी’चे सगळे प्रयोग- म्हणजे जवळजवळ ५०० प्रयोग केले. ‘पिया बहरूपीया’ गेली आठ वर्ष सातत्यानं करतेय. माझ्या स्वभावात मुळात ही चिकाटी आहे असं मला वाटत नाही. ती नाटकामुळे तयार झाली.

उत्तम दिग्दर्शक आणि चांगली कामं मिळाल्यामुळे मी जे काही शिकले होते त्याचा प्रत्यक्ष वापर करता आला आणि त्याची प्रचीतीही येत गेली. ‘अज्ञानात आनंद’ अशी म्हण आहे, ती खरीच आहे. प्रशिक्षण घेण्याआधी आपण जे करतोय ते उत्तमच आहे, यावर विश्वास असल्यामुळे ते काम बरंही व्हायचं कदाचित, पण जाणतेपणानं काम करताना होणारा त्रास, त्यातील शोधात येणारी मजा आणि ते सापडल्यावर मिळणारा आनंद, हा ‘अज्ञानातल्या आनंदापेक्षा’ जास्त रोमांचकारी (अ‍ॅडव्हेंचरस) असतो, याची प्रचीती मला नेहमी येत राहिली.

‘बाई गं कमालच झाली’ हे नाटक करताना मला लक्षात आलं होतं, की नट म्हणून आपल्या काही मर्यादा आहेत. हे नाटक माझ्या प्रकृतीचं नाही, हे लक्षात आलं. आपल्याला आतून पटल्याशिवाय आपण एखाद्या गोष्टीचा भाग होऊ शकत नाही हे कळलं. सध्या ‘गुल्लक’ नावाची एक ‘वेब-सीरिज’ गाजतेय. त्यात मी उत्तर प्रदेशातील कुटुंबातल्या आईची भूमिका केली आहे. ती पाहून अनेक लोकांकडून आणि समीक्षणांमध्ये असं म्हटलं जातंय, की त्यात मी अजिबात मराठी वाटत नाही, अगदी तिथलीच वाटते. इतकी वर्ष प्रामाणिकपणे के लेली मेहनत, आपला श्वास, क्षमता आणि वेग ओळखून आखलेला मार्ग आज दृश्य रूप घेऊ लागला  आहे.  हे कसं झालं? तर आधी म्हटल्याप्रमाणे ‘एन.एस.डी’ हेच त्याचं उत्तर म्हणावं लागेल. ‘गद्धेपंचविशी’त तिथे शिकायला जाण्याचा घेतलेला निर्णय खरं तर रूढ अर्थानं ‘अव्यावहारिक’ समजला जाणारा. पण २५ वर्षांनी मागे वळून पाहाताना तोच निर्णय खूप समाधान देतोय आणि समृद्ध करतोय असं मला वाटतं. ‘गजब कहाणी’ या नाटकात एक वाक्य होतं, ते अगदी सार्थ ठरतंय, ‘आपण शेवटी तिथेच पोहोचतो जिथे आपल्याला जायचं असतं’!

getkul@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:30 am

Web Title: gitanjali kulkarni gaddhepanchvishi article abn 97
Next Stories
1 शुभ्र काही करपलेले..
2 शारीरिक + मानसिक ताण = दुभंग
3 स्मृती आख्यान : अद्वितीय मेंदू
Just Now!
X