17 February 2020

News Flash

रचना स्मरणाची!

मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग सतत कार्यरत असतो. कोणतीही गोष्ट, घटना, प्रसंग, व्यक्ती, केलेला अभ्यास, गाणं, नुकताच लक्षात ठेवलेला फोन नंबर, कुठेतरी ठेवलेली किल्ली या गोष्टी

| September 21, 2013 01:01 am

मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग सतत कार्यरत असतो. कोणतीही गोष्ट, घटना, प्रसंग, व्यक्ती, केलेला अभ्यास, गाणं, नुकताच लक्षात ठेवलेला फोन नंबर, कुठेतरी ठेवलेली किल्ली या गोष्टी आधी हिप्पोकॅम्पस या भागात जातात. तिथे त्या रेंगाळतात. जर त्या जास्त काळासाठी लक्षात ठेवायच्या आहेत, असं वाटलं तर त्या पुढे पाठवल्या जातात. कारण त्या बाबी दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची-लाँगटर्म मेमरीत साठवण्याची गरज पडते. आपल्या लक्षात कसं राहतं? कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात? कोणत्या गोष्टी आपण विसरतो? कालचा प्रसंग आपण विसरतो, पण लहानपणचे कितीतरी प्रसंग काल घडल्यासारखे कसे काय लक्षात असतात? परीक्षेसाठी केलेला अभ्यास सगळा लक्षात असतो. पण परीक्षा सुरू झाली, प्रश्नपत्रिका हातात पडली की आठवत का नाही? असे प्रश्न आपल्याला कितीदा तरी पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मेंदूच्या कार्यपद्धती समजावून घेण्यातून मिळू शकतात. हे समजून घेताना असं लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. तर लक्षात का राहतं याची कारणं वेगवेगळी असू शकतात. एखादी गोष्ट स्मरणात कशी जाते आणि हवी तेव्हा बाहेर कशी येते, हे समजावून घेण्यासाठी एका चांगल्या वाचनालयाचं चित्र डोळ्यासमोर आणा. समजा आपण एखाद्या वाचनालयात गेलो. आपल्याला हवं असलेलं पुस्तक मागितलं, तर आता एवढय़ा कपाटांमध्ये हे पुस्तक कसं सापडेल, असा प्रश्न त्यांना पडत नाही. त्यांना शोधाशोध करावी लागत नाही. ते अवघ्या दोन मिनिटांच्या आत पुस्तक हातात आणून देतात, हे त्यांना शक्य होतं. कारण त्यांनी पुस्तकांची व्यवस्था पद्धतशीर आणि नेटकी लावलेली असते. दुसरं उदाहरण स्वयंपाकघरातलं. स्वयंपाकघरात प्रत्येक वस्तूला एक निश्चित जागा असते. ती इतकी नक्की ठरलेली असते की अंधारातही हवी ती वस्तू बरोबर सापडते. समजा अव्यवस्थितपणानं कुठेही कोणतीही वस्तू ठेवलेली असेल तर ती सापडत नाही. तशीच पद्धत नेमकेपणाने मेंदूही वापरत असतो. मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग सतत कार्यरत असतो. कोणतीही गोष्ट- घटना, प्रसंग, व्यक्ती, केलेला अभ्यास, ऐकलेलं गाणं, नुकताच लक्षात ठेवलेला फोन नंबर, कुठेतरी ठेवलेली किल्ली या गोष्टी आधी हिप्पोकॅम्पस या भागात जातात. तिथे त्या रेंगाळतात. जर त्या जास्त काळासाठी लक्षात ठेवायच्या आहेत, असं वाटलं तर त्या पुढे पाठवल्या जातात. कारण त्या दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची-लाँगटर्म मेमरीत साठवण्याची गरज पडते. पण दिवसभरात घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी हिप्पोकॅम्पसपर्यंत येऊन नंतर विरूनही जातात. मेंदूला जागतं ठेवलं तर अल्पकालीन स्मरणातून दीर्घकालीन स्मरणात गोष्टी जातील. मात्र त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. वास्तविक लक्षात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट आवश्यक आहे तर ती आहे लक्ष देणे. आपण खूप अभ्यास करतो, पण आपल्या लक्षात का राहत नाही? याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं तर असं म्हणावं लागेल की, लक्ष (attention)) असेल तर लक्षात राहील (memory). कोणत्याही अभ्यासात चार पायऱ्या महत्त्वाच्या असतात. श्रवण, वाचन, मनन आणि संभाषण. यात सर्वात जास्त महत्त्व आहे ते श्रवणाला. आपण जर नीट ऐकलंच नाही, तर कळणार कसं? लक्ष देऊन ऐकणं हे सर्वात महत्त्वाचं. वर्गातल्या साठ मुलांना एकाच वेळी शिकवलं. काहींच्या लक्षात राहिलं, काहींच्या नाही. असं का होतं? याचं पहिलं कारण म्हणजे ज्यांचं लक्ष होतं, त्यांच्या लक्षात राहण्याच्या शक्यता जास्त. दुसरं म्हणजे शिकवत असताना मुलाला- मुलीला कोणत्याही कारणासाठी कसलाही (आपल्याला क्षुल्लक वाटणारा) ताण असेल तर त्यांचं लक्ष नसेल आणि म्हणून लक्षात राहणार नाही. म्हणून सर्व मुलं ताणरहित असायला हवीत. अभ्यासातला हा पाया रचण्याचं काम मेंदू एका विशिष्ट पद्धतीने करतो. मेंदूला सर्व काही समजून घ्यायला योग्य तेवढी उसंत मिळाली तर तो सर्व अभ्यास, सर्व माहिती जागच्या जागेवर लावून ठेवतो. अशा वेळी हवी ती माहिती हव्या त्या वेळेला सापडते अगदी वाचनालयासारखीच. पण तसं झालं नाही, तर मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही! ज्या गोष्टींची आधीपासून माहिती आहे, त्यात नवी भर टाकली की ती संकल्पना ओळखीची वाटते, म्हणून सोपी वाटते. यालाच ज्ञानरचनावाद असं म्हणतात. संबंध जोडला गेला नाही तर मात्र लक्षात राहण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी जास्त सराव करावा लागतो. काहीही न समजता वरून फक्त माहिती ओतली गेली तर ती दीर्घकालीन स्मरणात जाणं अवघड. तसेच पोपटपंची पाठांतर करून उत्तरं पाठ करून लिहिली तर मेंदूवर अतोनात ताण येतो. कारण अर्थ न समजता केलेलं हे पाठांतर आहे. अशा मुलांना बौद्धिक थकवा येतो. पुन्हा त्यांना आळशी म्हणायला आपण खूपच तत्पर असतो. अशी ‘रट्टा मारके’ पाठ केलेली माहिती लगेच विसरली जाते. ‘पुढचं पाठ मागचं सपाट’ हे आपल्याला माहिती आहे. याचं कारण हेच. नीट लक्षात राहण्यासाठी मेंदूला वेळ दिला पाहिजे. मिळालेल्या थोडय़ा थोडय़ा माहितीवर काही एक विचार करणं हा एक मार्ग आहे. एिबगहॉस या शास्त्रज्ञांनी केलेला एक प्रयोग फार महत्त्वाचा आहे. हा प्रयोग १८८५ मध्ये केला आहे. ज्या शब्दांना काहीही अर्थ नाही, असे शब्द पाठ केले आणि काही अर्थपूर्ण शब्द पाठ केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की असे निर्थक शब्द पाठ करणं ही अवघड गोष्ट आहे. त्याऐवजी अर्थपूर्ण माहितीचं पाठांतर सोपं आहे. कारण मेंदूचा नेहमीच अर्थपूर्ण माहिती लक्षात ठेवण्याकडे कल असतो. जे अर्थपूर्ण नाही ते लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही अशी ज्यांची तक्रार असते त्यांनी या गोष्टी निश्चितच तपासून पाहाव्यात. आपल्याला जे पाठ करायचंय ते आधी समजलंय का, हे बघणं आवश्यक आहे. आपल्याला निर्थक माहितीही पाठ करता येते. परंतु त्याला जास्त कष्ट पडतात आणि दुसरं म्हणजे ते कधीही कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. अवघ्या काही तासांत, काही दिवसांत विसरून जातं. मात्र समजलेलं सगळं लक्षात ठेवायलाही नियमित सराव लागतो. अभ्यास तयार आहेच, फक्त त्यावरची धूळ झटकून तो उजळवून ठेवायचाय, असा या उजळणीचा अर्थ. तेवढं मात्र आपल्याच हातात; नव्हे मेंदूत आहे. एखादी गोष्ट लक्षात कशी राहते, यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना. या भावना स्थिर असतील, तर मन स्थिर असेल, मन शांत असेल तर आकलन चांगल्या प्रकारे होईल. तसं झालं तरच शरीराचा रक्तपुरवठा हिप्पोकॅम्पसकडे वळेल. आणि केलेला अभ्यास शांतपणे आठवेल. परीक्षा चांगली जावी असं वाटत असेल तर शांत मनाची गरज आहे. जोपर्यंत आपली परीक्षा पद्धती ही स्मरणशक्तीवर आधारित आहे, तोपर्यंत तरी याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. स्मरणाप्रमाणे विस्मरण हेदेखील आवश्यक आहे. माहिती घेण्याचं आणि ती स्मरणात ठेवण्याचं काम महत्त्वाचं आहेच, तसंच नको ती माहिती विसरून जाणं हेही! जी माहिती नक्कीच नको आहे ती माहिती मेंदू विसरून जातो. असं बघा की, जन्माला आल्यापासूनची प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली गेली असती तर ..? drshrutipanse@gmail.com

First Published on September 21, 2013 1:01 am

Web Title: hippocampus part of brain
टॅग Chaturang
Next Stories
1 वंदे मातरम् ..
2 टॉयलेट ट्रेनिंग
3 .. आणि कृतार्थ झालो
Just Now!
X