News Flash

अनंत मरणातूनही पुनर्जन्म मिळू दे..

या स्वरचित कवितेच्या ओळी म्हणजे हिमनगाचा अष्टमांश भाग! सहकारी, वरिष्ठ, यजमान, स्वत:ची मुले यांच्याही अपेक्षा वेगवेगळय़ा. चाळीस वर्षांपूर्वी बी.एड्.चे शिक्षण, पाठोपाठ लग्न, गरोदरपण, सगळी एकच

| April 11, 2015 01:01 am

शाळेच्या बाई, काय त्यांचा थाट।
सकाळचे काम सोडून शाळेची वाट,
शेजारीण म्हणते,
झकपक साडी, बसायला गाडी
सणवार पूजायचे, खुर्चीत बसायचे॥
या स्वरचित कवितेच्या ओळी म्हणजे हिमनगाचा अष्टमांश भाग! सहकारी, वरिष्ठ, यजमान, स्वत:ची मुले यांच्याही अपेक्षा वेगवेगळय़ा. चाळीस वर्षांपूर्वी बी.एड्.चे शिक्षण, पाठोपाठ लग्न, गरोदरपण, सगळी एकच धांदल. अभावग्रस्ततेमुळे नोकरीची आत्यंतिक निकड. सुरुवातीलाच वरचे वर्ग, क-ड-ई तुकडय़ा मिळाल्याने विज्ञान-भूमिती शिकवताना ‘अभ्यासोनि प्रगटावे’ हे सूत्र अखेपर्यंत सांभाळले. रंगीत खडू, आकृतीचे फलक, रेखाटन यामुळे अनेकांची ब्रह्मानंदी टाळी लागे. तरीही नेले निभावून. सहल-आयोजन, विविध विज्ञान-उपक्रम, सूत्रसंचालन, काव्यवाचन, परिपाठ, दैनंदिन सूचना या प्रत्येक उपक्रमाने विद्यार्थ्यांसह माझेही व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले.
आईसुद्धा शिक्षिका होती. नकळत साहित्य-नृत्य-नाटय़ांचे संस्कार रुजले. चौसष्ट साली मी कथ्थक विशारद असल्याने शाळेचे सांस्कृतिक मंडळ सांभाळणे माझ्याकडे आले. प्रसंगानुरूप काव्यनिर्मिती करण्याकडेही वळले. माझ्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शहर, जिल्हा, राज्यपातळीवर चमकत होते, तर दुसरीकडे माझ्या लेखनालाही राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाले. या धावपळीत सण-समारंभ-पर्यटन यांचा विचारही नव्हता. स्वत:कडे दुर्लक्ष होई. मनातून वाटे-
घर भरले ठासोठास
आत्म्याला मिळेना वेळेवारी घास
सुखस्वप्ने स्वर्गीची पाहिली म्हणून
अनंत मरणे दिवसावारी!
पण, दुसऱ्याच क्षणाला नवा उत्साह,
नवा जोम.

एकूण पस्तीस वर्षांच्या सेवेत सलग तीस वर्षे स्वयंपाक-कट्टा आवरून साडेसहाला घर सोडले. मुलाला मेडिकलला पेइंग सीट घेतल्यावर शाळा सुटल्यावर सलग ८-१० वर्षे अत्यल्प मोबदल्यात शिकवण्या घेऊनच घरी आले. मुलगा आज यशस्वी डॉक्टर आहे.
दुसऱ्या मुलास जन्मत:च क्लेफ्ट लिप-पॅलेट अर्थात नाकापासून दुभंगलेले ओठ नशिबी होते. सतत तीन वर्षे उपचार-शस्त्रक्रिया चालली. त्या वेळी अविश्रांत मेहनत घेतली. आज उच्च न्यायालयात तो वकिली करतोय. तिसरा मुलगा इंजिनीअर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, स्वत:च्या घरासाठी दोघांचेही फंड उपसले, पतपेढय़ा काढल्या. मात्र आज सगळय़ाचे समाधान आहे.
केव्हाही, कुठेही असंख्य विद्यार्थी आस्थेने, आदराने भेटतात अन् शाळेच्या बाई म्हणतात-
एखाद्या विदीर्ण क्षणी,
जुने कुणी विद्यार्थी येतात.
बाईंचा आशीर्वाद घेत बाईंना म्हणतात-
बाई, येथवर आलो तो तुमच्यामुळेच..
बाईसुद्धा भरभरून आशीर्वाद देत मनोमन म्हणतात-
परमेश्वरा एकाच या क्षणासाठी,
अनंत मरणातूनही पुनर्जन्म मिळू दे
.. पुनर्जन्म मिळू दे!!!
हेमांगी, अहमदनगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2015 1:01 am

Web Title: honored of women school teacher
Next Stories
1 पालक
2 सौंदर्यातली रिस्क?
3 ध्येय शाळा संवर्धनाचं
Just Now!
X