13 July 2020

News Flash

लग्न सांभाळताना..

‘वा ढत्या घटस्फोटांची कारणे काय?’ हा प्रश्न अलीकडे बरेचदा विचारला जातो. उत्तरादाखलसुद्धा एक किंवा दोन विशिष्ट कारणं सांगता येणं तसं अवघड असतं.

| August 29, 2015 01:58 am

बदलत्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाबरोबर व्यक्तिमत्त्व चाचण्यांची गरज महत्त्वाची ठरणार आहे. तडजोडींची सवय नसलेल्या, ताणांखाली जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला, व्यक्तिमत्त्वातील टोकाचे फरक किंवा एका किंवा दोघांच्या वर्तनदोषाशी जुळवून घेणं फार कठीण जाणार आहे. अशा वेळी लग्न करणारी दोन माणसं स्वभावाने एकमेकांना किती अनुरूप आहेत, परस्परपूरक आहेत हे पाहणं त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी होण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. ‘नकारात्मक भावनांचं ओझं’ लेखाचा उत्तरार्ध.
‘वा ढत्या घटस्फोटांची कारणे काय?’ हा प्रश्न अलीकडे बरेचदा विचारला जातो. उत्तरादाखलसुद्धा एक किंवा दोन विशिष्ट कारणं सांगता येणं तसं अवघड असतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी. शिवाय बंद दरवाजांमागे जे घडतं ते नेमकेपणानं कळणं तसं सोपंही नसतं. मात्र कारणं अनेक दिसत, वाटत असली, सांगितली जात असली, तरी काही वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर समुपदेशनासाठी येणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला तर प्रत्येकाचं ‘व्यक्तिमत्त्व’ यात बरीच भूमिका बजावत असते हे लक्षात येतं!मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व म्हणजे चौदा प्रकारच्या व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांचा समुच्चय! प्रत्येक व्यक्तीमध्ये ही सर्व वैशिष्टय़ं असतातच. मात्र प्रत्येक व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ाचं (Personality traits) प्रमाण वेगवेगळं असते. म्हणूनच एक माणूस कधीही दुसऱ्या माणसासारखा नसतो! ज्या चाचण्यांमुळे प्रत्येकाला आपलं हे व्यक्तिमत्त्व शास्त्रीय पद्धतीने समजतं त्याला मानसशास्त्रीय चाचण्या (Psychometric testing) म्हणतात व त्या विविध प्रकारच्या असतात. आता तुम्ही म्हणाल या सगळ्यांचा लग्नांशी आणि घटस्फोटांशी काय संबंध आहे?  विशाल आणि शिल्पा हे नवरा-बायको सारखेसारखे भांडतात. कुणी शब्द म्हणून खाली पडू देत नाही. प्रत्येकाला वाटतं माझंच बरोबर! जे काही सगळं चुकतं ते दुसऱ्याचं. त्यामुळे ‘सॉरी’ म्हणायची कुणाचीच तयारी नसते. उलट ‘मी महान’! म्हणून दुसऱ्यानं माझं ऐकावं असं दोघांनाही वाटतं. त्यामुळे कुणीच कुणाचं ऐकत नाही आणि आपलं कुणी सोडत नाही. लहानशी चूक, ‘इगो’ अगदी नाकाच्या शेंडय़ावर असतो. कुणीच कुणाच्या भावनांची दखल घेण्याच्या मन:स्थितीत नसतं. उलट माझी दखल घेत राहा ही अपेक्षा! दोघेही आपल्या व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी. बऱ्याचदा मोठय़ा पदांवर कामाला. खूप कौतुक होतं. पुरस्कार मिळतात. पदोन्नती होत राहते. त्यामुळे अभिमान अजून पोसला जातो. ‘मला बाहेर, कामावर कुठे प्रॉब्लेम येत नाही; तुझ्याच बरोबर कसे येतात?’ असं दोघांनाही वाटतं. भांडून-भांडून दोघं कंटाळून, वैतागून जातात; पण नमतं घ्यायला कुणीच तयार होत नाही. रागाचा पारा चढतच राहतो. दुसऱ्याचे तेवढे दोष दिसत राहतात. मार्ग निघतच नाही. कारण दोघेही आपापले मार्ग चालत राहतात. भांडण्यापुरते एकत्र! जगाला मात्र ‘आमचं कसं सगळं छान चाललंय!’ असे दाखवत राहतात. त्यामुळे अशा जोडप्याच्या बेबनावाची किंवा घटस्फोटाची बातमी आली तर लोक आश्चर्यचकित होतात. ‘मी महान तर माझा घटस्फोट होणं कमीपणाचं!’ मग कधी कधी अशी लग्नं, फक्त धुमसत राहतात; जसं विशाल आणि शिल्पाचं लग्न!!प्रत्येक माणसामध्ये सर्वसाधारणपणे एक, दोन किंवा तीन व्यक्तिमत्त्वं वैशिष्टय़ अधिक प्रभावी असतात; म्हणजे या वैशिष्टय़ांवरचा त्यांचा स्कोअर एका ठरावीक पातळीच्या वर असतो. त्यामुळे साधारणत: एखाद्या घटनेत, प्रसंगामध्ये ती वैशिष्टय़ं वर्तनात उतरलेली दिसतात. मग तो या व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे असं म्हटलं जातं. जसं शांत, रागीट, अबोल, एकलकोंडा, एक्सप्रेसिव्ह, आत्मविश्वासू, स्वत:च्या हातानं स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणारा. अशा माणसांच्या स्वभावाचा, वर्तनाचा स्वत:ला आणि इतरांना थोडा त्रास झाला तरी बहुतेकदा ते (थोडेफार भांडले) तरी एकमेकांशी जमवून घेऊ शकतात. अगदी परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वाचे असले तरीही! म्हणजे वरच्या उदाहरणातल्या शिल्पाला समजा कुणाचा तरी भावनिक आधार लागतो. तिचा आत्मविश्वास कमी असेल, तिला काही कारणांनी न्यूनगंड असेल, स्वत:च्या क्षमता आणि शक्तिस्थानांची जाणीव कमी असेल, निर्णय घेण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी कुणाची तरी मदत, उत्तेजन लागत असेल तर विशालसारख्या जोडीदाराच्या सोबत तिला मनाने सुरक्षित वाटतं. त्याचा अहंकार तिला त्रास देत असला, तरी त्याचे ‘बळकट खांदे’ तिला ‘मान टाकायला’ आधाराचे वाटतात. तिची स्वभावप्रकृती काहीशी सौम्य, दुसऱ्याची काळजी घेणारी, दुसऱ्याचं ऐकून घेणारी अशी असल्यानं, ती विवाहाचं नातं सांभाळून घेण्यात महत्त्वाचा वाटा उचलते. याला परस्परपूरक वैवाहिक नातं असंही म्हणता येईल. स्वत:ची बाजू पडती आहे असं मानणारी व्यक्ती लग्नाच्या नात्यातही पडती बाजू घेते ती अशी! याबद्दल त्या व्यक्तीची फारशी तक्रार नसेल तर बाकी वाटणारे-बोलणारे कोण? नाही का?मात्र जेव्हा काही व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांचं मापन हे ‘कट ऑफ’ पातळीच्या बरंच वरती जातं, तेव्हा या माणसात तो व्यक्तिमत्त्व दोष आहे असं म्हटलं जातं. हा दोष मग वर्तनात सतत डोकावत राहतो, ज्याला वर्तनदोष म्हणतात. दुर्दैवाने सर्व जवळच्या आणि हक्काच्या नात्यांमध्ये हा वर्तनदोष जास्तीत जास्त प्रभावी होतो. (‘कुठे जाणार आहे सोडून?’) आणि मग तो नात्यांना काळवंडून टाकतो. बाहेरच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावेच लागते (बॉसवर ओरडता येते का?) मात्र घरी आल्यावर हे सर्व मुखवटे उतरवून ठेवले जातात आणि खरा चेहरा बाहेर येतो. आजकाल तर सर्व ताणही घरात आल्यावरच मोकळे होतात. जन्मानंतर आपल्या परिवारात लहानाचं मोठं होताना, घरातल्या माणसांबरोबर आपण हळूहळू जुळवून घेण्याची कला शिकत जातो; परंतु सहसा थोडक्या ओळखीवर एकत्र आलेल्या आणि २४ तास डोक्याला डोकं लावून राहणाऱ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या, आत्मभान आलेल्या, मिळवत्या माणसांना (आजकालच्या तरुण-तरुणींना) ना हा जुळवून घेण्याचा संयम असतो ना पडतं/ जुळवून घेण्याची सवय! त्यात भरीला तुमच्यामध्ये एखादा व्यक्तिमत्त्व दोषही असेल तर?
शरयू बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाची. सहसा एकटी राहू शकत नाही. तिला सारखी माणसं लागतात. या माणसांनी नेहमी तिची दखल घ्यावी (attention seeking behaviour) असंही तिला वाटतं (आजचा सोशल मीडिया ती गरज भागवतोय. पण नवऱ्यानेही ती भागवावी हीही अपेक्षा, नव्हे मागणी असते!) साधीशी गोष्टही खूप वाढवून-चढवून, रंगवून सांगायची. दुसऱ्याचं लक्ष वेधून घेईल अशी राहणं, वागणं, बोलणं. मात्र दुसऱ्यांच्या भावनांविषयी आस्था नाही. सदैव माझं घोडं नि जाऊ द्या पुढं! रोहनचा स्वभाव अगदी उलट, अंतर्मुख, टोकाचा एकलकोंडा, अबोल. कोणतीही गोष्ट बोलून न दाखवण्याचा, भावना व्यक्त करण्याचा स्वभावच नाही. स्वत:त रमलेला असतो तो. पुस्तकच वाचत बसेल, नाहीतर काम करत बसेल. स्वत:च्या कोषात रमणारी माणसं ही मी तुमच्यात पडत नाही; तुम्ही माझ्यात पडू नका. अनेक गोष्टी यांच्या मेंदूला सुचतच नाहीत. वैवाहिक नात्यात ‘इंटिमसी’ हवीच. त्यातही ही माणसं फारशी उत्सुक नसतात. अगदी लैंगिक नात्यातही जोडीदारालाच पुढाकार घ्यावा लागतो. कधी कधी तर त्याच्या लैंगिक गरजा पुऱ्याही होत नाहीत. पण ही माणसं बाहेरच्या जगाला भावनिकदृष्टय़ा समतोल दिसतात! कधी ओरडत नाहीत, चिडत नाहीत, हट्टाग्रही बनत नाहीत की दुराग्रही. त्यामुळे लोकांना शरयूचा रोहनविरुद्धचा ‘थयथयाट’ किंवा आक्रस्ताळेपणा खटकत राहतो आणि रोहनचे डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं शांत राहणं अचंबित करतं. अशा परस्परविरोधी स्वभावाच्या आणि त्यात व्यक्तिमत्त्व दोष असलेल्या जोडय़ांमध्ये विवाहबाह्य़ नात्यांच्या (दरवेळी ते लैंगिक असेलच असं नाही) शक्यता खूप वाढतात. रोहन हा खूप रुटीनप्रिय (शरयूच्या दृष्टीने ‘बोअरिंग’) तर शरयूला सतत काही तरी नवं हवं. विवाहबाहय़ नातं किंवा सतत बदलते उपक्रम नि बदलते मित्र-मैत्रिणी हा त्यातलाच एक प्रकार! आता हे नातं कसं टिकायचं?आपल्याकडे फार पूर्वीपासून ‘स्वभावाला औषध नाही’ ही म्हण आहे आणि मानसोपचारशास्त्र आज इतकं प्रगत झाल्यावरही ती म्हण खरी ठरली आहे; कारण स्वभाव, व्यक्तिमत्त्व औषधाने बदलता येत नाही,ही वस्तुस्थिती आहे. ते आपल्या मेंदूतलं हार्डवायरिंग आहे म्हणा ना! मात्र, आपल्या व्यक्तिमत्त्वाची आपल्याला शास्त्रीय ओळख झाल्यावर, आपण असे का वागतो हे आपल्याला कळतं (self intresection) आणि मग जाणीवपूर्वक, कष्टपूर्वक आणि सतत प्रयत्न करून आपल्याला आपलं, दुसऱ्याला आणि खरं तर स्वत:लाही त्रासदायक होणारं वर्तन बदलता येतं. नातेसंबंधांवर उठणारे ओरखडे, येणारे ताण थांबवता येतात. आपल्या वर्तनाने दुसऱ्याचं मन दुखणार नाही याची काळजी घेता येते. आपला स्वसंवाद – सेल्फ टॉक नि त्यातून निर्माण होणारे विचार, भावना आणि वर्तणूक जाणीवपूर्वक कशी बदलता येते याबद्दल डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव’ (विचार, भावना, वर्तन) हे पुस्तक खूप छान मार्गदर्शन करते.व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांमधले तीन प्रकार मात्र असे आहेत की जिथे व्यक्तिमत्त्व दोषासाठी औषधांची मदत घेता येते. टोकाचा संताप (क्रोध) (ज्यामध्ये माणसं आदळआपट, फेकाफेक, मोडतोड आणि अगदी मारहाणसुद्धा करतात), टोकाच्या भावनांचे झोके- मुड्स बदलणे, सततची संशयग्रस्तता, चिंता, नैराश्य, नकारात्मकता.. व्यक्तिमत्त्व दोषातील या आणि अशा पैलूंवर औषधं बहुमोल मदत करतात. ‘बॉर्डरलाइन’ नावाच्या व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ात दोष असलेल्या इतक्या केसेस सध्या आमच्याकडे येत आहेत, ज्यामध्ये लग्न टिकवणं जोडीदाराला अवघडच नाही तर कधी कधी अशक्यही होत आहे. सतत असुरक्षित वाटणं, त्यामुळे आपल्या मागण्या, दुसऱ्याकडून पूर्ण होण्यासाठी हट्टाग्रही बनणं, आक्रस्ताळेपणानं वागणं, रागावर, बोलण्यावर ताबा नसणं, कधी खूप छान तर कधी टोकाचं वाईट वागणं, त्यामुळे दुसऱ्याला आपल्या वागण्याचा अंदाजच न लावता येणं, त्यातून नात्यात अंतर पडणं, आत्महत्येच्या धमक्या किंवा प्रयत्न अशी वर्तणूक या व्यक्तिमत्त्वांमध्ये दिसते. हीच काय तर व्यक्तिमत्त्वदोष असलेली कुठलीच व्यक्ती हे सर्व मुद्दाम, जाणूनबुजून, दुसऱ्याला त्रास होईल म्हणून असं वर्तन करत नाही (नंतर त्यांना त्याबद्दल खूप वाईट आणि अपराधीही वाटतं), तर त्यांचा त्यांच्या वर्तनावर ताबाच राहत नाही. भावनांची उबळच तितकी तीव्र असते की अशा वेळी औषधांची मदत अतिशय उपयुक्त असते. परंतु मानसिक अस्वास्थ्य आणि मानसिक आजार (‘मदत घ्यायला तुम्ही काय मला वेडं ठरवता आहात का?’ किंवा ‘मला काय वेड लागलंय का?’ अशी अज्ञानी आणि टोकाची भूमिका) यांना एकाच पारडय़ात घालणाऱ्या आपल्या समाजात या एकूण शाखेविषयीच इतके गैरसमज आहेत की त्यामुळे माणसं नात्यांचा बळी देतात; पण मदत घ्यायला येत नाहीत!
बदलत्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाबरोबर व्यक्तिमत्त्व चाचण्या करून घेण्याची गरज महत्त्वपूर्ण बनते आहे. मुळातच तडजोडींची सवय नसलेल्या, विविध प्रकारच्या खूप ताणांखाली जगणाऱ्या आजच्या तरुण पिढीला, व्यक्तिमत्त्वातील टोकाचे फरक किंवा एका किंवा दोघांच्या व्यक्तिमत्त्व दोषाशी, म्हणजे वर्तनदोषाशी, जुळवून घेणं फार कठीण जाणार आहे. ‘घ्या जुळवून/ नमवून’चा जमाना आता हळूहळू मागे पडत चालला आहे. कम्पॅनीयनशीप वा सहजीवन हे विवाहाचे कारण बनते आहे. अशा वेळी लग्न करणारी दोन माणसं स्वभावाने एकमेकांना किती अनुरूप (कम्पॅटिबल) आहेत, परस्परपूरक (कॉम्प्लीमेंट्री) आहेत आणि कोणत्याही दोन माणसांमध्ये असणाऱ्या व्यक्तिमत्त्वातील फरकांमुळे त्यांना त्यांच्या जोडीदाराबरोबर नेमकं कुठे जुळवून घ्यावं लागणार आहे, ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला जमणार आहे का; तसंच आपण निवड केलेल्या व्यक्तीमध्ये कोणता व्यक्तिमत्त्वदोष तर नाही ना, व्यसन किंवा मानसिक आजार नाहीत ना, हे सर्व अशा चाचण्यांमधून (psychometric testing) बऱ्याच अंशी समजू शकते.
पन्नास एक वर्षांच्या निकोप, समाधानी वैवाहिक नात्यासाठी, सशक्त, आनंदी कौटुंबिक नात्यांसाठी आणि सुरक्षिततेची भावना देणाऱ्या घरकुलासाठी या चाचण्या गरजेच्या आहेत, असं तुम्हाला वाटतं का? घटस्फोट होण्याचं हे एक कारण तरी आपण या चाचण्यांनी टाळू शकू, नाही का?दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे विवाहातील लैंगिक नातं! निसर्गसुलभ आणि आपल्या तनामनाला सशक्त ठेवणाऱ्या ज्या लैंगिक नात्यांच्या महत्त्वपूर्ण पायावर वैवाहिक नातं उभं राहतं, फुलतं, त्या नात्याबद्दल अगदी आजच्या काळातही केवढं अज्ञान, अपुरी माहिती, चुकीची माहिती, गैरसमज, उदासीनता आहे याची आपण कल्पना करू शकणार नाही. वैवाहिक नात्यात राहून दहा-दहा र्वष लैंगिक नातं नसणारी जोडपी जशी दिङ्मूढ करतात, तसंच जोडीदाराबद्दलची नाराजी त्याला/तिला लैंगिक नात्यापासून मुद्दाम वंचित ठेवून व्यक्त करणारे जोडीदारही थक्क करतात. म्हणजे या नात्याचा बदला घेण्यासाठी केलेला शस्त्रासाखाच वापर! नुकत्याच माझ्याकडे आलेल्या तीन केसेसमध्ये जोडीदार दहा वर्षांहून अधिक काळ पोर्नोग्राफी (व्हच्र्युअल) सेक्सचा आनंद घेत आहे आणि आपल्या जोडीदाराबरोबर प्रत्यक्षात मात्र त्यांनी कोणतेही लैंगिक संबंध ठेवलेले नाहीत. ते एका खोलीत झोपतही नाहीत! आपल्याला जेव्हा एकीकडे घटस्फोट होताना दिसत असतात, तेव्हा दुसरीकडे असे शरीराचे, मनाचे घटस्फोट झालेली कित्येक जोडपी ‘लोक काय म्हणतील?’ या विचाराने किंवा स्वत:च्या वैचारिक-मानसिक बैठकीमुळे किंवा अन्य काही कारणांनी ‘किमान समान कार्यक्रम’ असलेला संसार ‘रेटत’ आहेत! ज्या लग्नांमध्ये लैंगिक सुख-समाधान-तृप्ती नाही, ते संसार समाधानी, नाती निकोप, म्हणता येतील का? लैंगिक व्यक्तिमत्त्वांची अनुरूपता दोघांच्या लैंगिक इच्छेची (सेक्स्युअल डिसायर आणि ड्राइव्ह) मिळती-जुळती पातळी आणि उत्तरोत्तर या नात्यामध्ये वैविध्य आणण्याच्या प्रयत्नांमधून, उभयतांनी इच्छेने आणि प्रेरणेने केलेल्या सशक्त प्रयोगांमधून, नात्याचा होणारा विकासही महत्त्वाचा नाही का?आजूबाजूचे सारे सतत बदलत असताना वैवाहिक नात्यातील ‘रस’ टिकवून ठेवण्यासाठी भावनांच्या, विचारांच्या आणि शरीरांच्या सुदृढ देवघेवीला पर्याय नाही. या शेअरिंग्जमधूनच या नात्याचं वर्धन आणि संवर्धन होत राहणार आहे, ज्यातून दोघांनाही विवाहाचं सुख-समाधान मिळत राहणार आहे. दोन व्यक्तिमत्त्वांची अनुरूपता आणि परस्परपूरकता आता वैवाहिक नात्यात कधी नव्हे इतकी महत्त्वाची झाली आहे. केवळ हजार-एक रुपयात अनेक ठिकाणी (ठाण्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थसह) सहजी उपलब्ध झालेल्या या व्यक्तिमत्त्व चाचण्यांचा जरूर लाभ घ्या. काळाच्या पुढे नाही तरी काळाबरोबर पुढे पाऊल टाकायला हरकत काय आहे?
वंदना सुधीर कुलकर्णी – vankulk57@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 1:58 am

Web Title: how to deal with married life
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 अण्णा
2 बदलाच्या शोधातली ग्रामीण स्त्री
3 जगणं मसणाच्या वाटेवरचं
Just Now!
X