News Flash

स्त्री आहे म्हणुनी..

स्वतंत्र भारतात स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाला धुमारे फुटले आणि त्याचा परिणाम स्त्रीने मोठय़ा संख्येने ‘बाहेर’ पडण्यात झाला, पण तिचं हे ‘बाहेर’ पडणं स्त्री म्हणून वेगळं ठरलं आहे

| August 29, 2014 01:09 am

स्वतंत्र भारतात स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाला धुमारे फुटले आणि त्याचा परिणाम स्त्रीने मोठय़ा संख्येने ‘बाहेर’ पडण्यात झाला, पण तिचं हे ‘बाहेर’ पडणं स्त्री म्हणून वेगळं ठरलं आहे का? तिच्या स्त्रीसुलभ गुणांचा उपयोग त्या त्या क्षेत्रांतले प्रश्न अधिक संवेदनशीलतेने सोडवण्यात मदत झाली का? हे शोधण्याचा प्रयत्न ‘चतुरंग’च्या या वर्धापन दिन पुरवणीच्या निमित्ताने करीत आहोत.
आजच्या या खास पुरवणीसाठी आम्ही सहा क्षेत्रं निवडली आहेत. राजकीय, प्रशासकीय, पोलीस, न्यायव्यवस्था, उद्योग आणि पत्रकारिता. या क्षेत्रांत आता स्त्रियांचा सहभाग जाणवण्याइतपत वाढला आहे. अर्थात येथेही पुरुष-स्त्री समानता यायला बराच कालावधी लागेल. कारण आजही अनेकदा स्त्रीला स्वत:ला सिद्ध करावं लागत आहे. पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याइतपत नव्हे तर पुरुषापेक्षा चार पावलं जास्त काम किंवा वेगळं काम करायला लागत आहे. तेव्हाच तिचं त्या क्षेत्रातलं स्थान अढळ होतं आहे.
राजकारणाचंच उदाहरण घ्यायचं झालंच तर तिला त्यासाठी आरक्षणाची मदत घ्यावी लागली. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर तिलाच झगडायला लागलं, लागत आहे. स्थानिक संस्थांमध्ये असलेल्या ५० टक्के आरक्षणाचा आता नजरेत भरेल असा परिणाम दिसतो आहे. सुरुवातीला असलेला नकार स्त्रीने तिच्याच कार्यकर्तृत्वाने होकारात बदलला आहे. ग्रामीण भागात स्त्रीने तिच्या स्तरावर का होईना बदल घडवायला सुरुवात केली आहे. स्त्री असल्याने स्त्रीला आणि पर्यायाने कुटुंबाला आणि समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांनाच तिने प्राधान्य दिलं.  ही सामूहिक स्त्रीशक्ती समाजाला बदलाच्या वाटेवर नेते आहे.
तोच प्रयत्न प्रशासन व्यवस्थेत घडतो आहे. या व्यवस्थेत आलेल्या अनेक उच्चशिक्षित स्त्री अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असे बदल घडवून आणले, जे ती स्त्री आहे म्हणूनच शक्य होते. स्त्री-आरोग्याचे, स्वच्छतेचे प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा माध्यमिक शाळांमधून विद्याíथनींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स बसवणं असो की रेशिनगच्या प्रश्नासाठीची ‘चावडी वाचन’ व्यवस्था असो. एमएमआरडीएअंतर्गत लोकांचे स्थलांतर असो की मतदान सुलभतेने होण्याची व्यवस्था असो स्त्रियांमधील मातृत्वाच्या अंत:प्रेरणांमुळेच हे बदल घडणं शक्य होतं, असं म्हणायला हरकत नाही.
तोच मुद्दा पत्रकारितेतही येतोच. या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता येईल तेव्हा येईल, परंतु स्त्रियांचे यापूर्वी न जाणवलेले प्रश्न पत्रकार स्त्रीलाच जाणवू शकतात आणि त्यातून समाजात विधायक घटना घडू शकतात. म्हणूनच एका बातमीतून लैंगिक अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होण्याची घटना घडू शकते. तर चित्रा अन्थेमसारखी स्त्री पत्रकार मणिपूरच्या एका बाजूला घुसखोर आणि दुसऱ्या बाजूला लष्कर या दोन्हींच्या कात्रीत सापडलेला आणि भांबावलेला सामान्य माणूस वेगळ्या दृष्टीतून मांडू शकते.
पोलिसाचं क्षेत्र तर बळाच्या वापराचं म्हणून प्रसिद्ध. तडफ आणि धडाडी अपेक्षित असलेल्या या क्षेत्रातही किरण बेदींसारख्या महानिरीक्षकपदावरच्या स्त्रीने कुख्यात तिहार तुरुंगाचा कायापालट करून तिथे माणुसकीची भावना जागवली. मीरा बोरवणकर यांच्यासारख्या अधिकारी स्त्रीने जळगांव येथील लैंगिक अत्याचारासारखं प्रकरण धसास लावलं. आज पोलीस ठाण्यात असलेल्या स्त्रियांसाठीचा सेल स्त्री तक्रारदारांसाठी आश्वासक ठरतो आहे. समाजासाठी मोलाचा ठरतो आहे.
वित्तव्यवस्था स्त्रीच्या हाती असली की घराप्रमाणेच आजचा व उद्याचा विचार करून साठवणीकडे लक्ष देणं तिला सहज जमू शकतं. त्यातूनच बँकिंगसारख्या क्षेत्रात स्त्री प्रगती करत आहे. स्त्री असल्याने जे उद्योग पुरुषांना सुचले नसते अशा काही उद्योगांना संजीवनी मिळाली. उदा ‘फेम’चा लिक्विड हॅण्डवॉश असो की ‘वीणा वल्र्ड’च्या महिला स्पेशल परदेशी टूर्स असो, की स्त्रीची शारीरिक मर्यादा लक्षात घेता ‘फ्लेझिबल अवर्स’ मध्ये काम करून घेणं असो. उद्योग क्षेत्रात तिची दमदार पावलं उमटत आहेत.    
न्यायव्यवस्था वा कायद्याच्या क्षेत्रात न्यायमूर्तीपासून वकिलांपर्यंत स्त्री अधिकारी आल्याने लैंगिक अत्याचारग्रस्त स्त्रियांना आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागणं सोयीचं झालं. कौटुंबिक न्यायालयात तर स्त्री-अधिकाऱ्यांचच निर्विवाद वर्चस्व आहे. अधिक संवेदनशीलतेने कौटुंबिक प्रश्नांकडे बघण्यास आणि न्यायदानात त्याची मदतच होते आहे.
एकुणात या सर्वच क्षेत्रांत स्त्रीने स्वत:चं असं वेगळं योगदान दिलं आहे. स्त्री असल्याने स्त्रीचे प्रश्न ती अधिक सहानुभूतीने, संवेदनशीलतेने पाहते आहे. सोडवते आहे. त्यातूनच समाजही घडतो आहे. खरं तर ही सगळीच क्षेत्र पुरुष-स्त्री भेदभाव न करता कार्य करायला लावणारी आहेत. पुरुषांनी तेथे उल्लेखनीय कार्य केलं आहेच, तरीही काही बाबतीत मात्र स्त्रियांचा दृष्टिकोन, स्त्रियांची कार्यपद्धती पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी असते. आणि त्यातून त्या स्त्रिया सशक्त होत आहेतच, पण समाजही सक्षम होतो आहे.     

‘चतुरंग’च्या वर्धापन दिनानिमित्त आपले वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला सलाम!   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:09 am

Web Title: importance of women
टॅग : Chaturang,Loksatta
Next Stories
1 तिच्या जगात, परदेशात : पुनर्वसन, पुनर्निर्माणातून विकास
2 स्वत:ला बदलताना : होते ओझे इतिहासाचे अन् पूर्वग्रहांचे!
3 उद्योगाचे दारी
Just Now!
X