समाज घडवायचा असेल तर शिक्षण घ्यायलाच हवे आणि स्त्रियांनी शिक्षण घेऊन अर्थार्जनही करायला हवे, हा विचार मांडणाऱ्या तसेच ‘क्षत्रिय भगिनी समाज’ आणि शिशुविहाराची स्थापना करणाऱ्या लीला मस्तकार-रेळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांच्या स्नुषा लता रेळे यांनी घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा….
ली ला मस्तकार-रेळे हे समाजसेवा क्षेत्रातले, विशेषत मुंबईत गाजलेले नाव. पंडिता रमाबाईंकडून प्रेरणा घेऊन लग्नानंतर माहेरचे व सासरचे जोडनाव लावायला सुरुवात केलेल्या लीलाताईंच्या समाजकार्याची सुरुवात शिक्षण संपतासंपताच १९३९ साली झाली. ती जरी त्यांच्या मुंबईतील क्षत्रिय ज्ञातीपासून झाली असली तरी कालांतराने त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारत गेले. स्त्रियांनी शिक्षण घ्यायला हवे यासाठी आग्रही असणाऱ्या लीलाताईंनी सारे आयुष्य त्यासाठी वेचले.
त्या काळाचा विचार केला तर स्त्री स्वातंत्र्य, सामाजिक व आíथक स्वावलंबन, मुलांचे शास्त्रशुद्ध संगोपन व शिक्षण याविषयीचे परखड विचार लीलाताईंनी पुरुषप्रधान समाजात मांडणे हे धडाडीचेच होते. मात्र पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, वीर सावरकर, माँॅटेसरी मॅडम वगरे मान्यवर प्रभृतीच्या विचारांचा पगडाही त्यांच्यावर होता. त्यातूनच त्यांना पुढची वाट सापडली.
क्षत्रिय ज्ञातीतील बी.ए. व एम.ए. झालेल्या त्या पहिल्यावहिल्या होत्या. म्हणून ज्ञातीने त्यांचे वेळोवेळी कौतुक केले. त्याचे ऋण आपण अंशत तरी फेडले पाहिजे, अशी तळमळ त्यांना नेहमी होतीच. त्या काळी क्षत्रिय ज्ञाती आधीच लहान, त्यात सुशिक्षित स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या! त्यामुळे लीलाताई लग्नाआधीपासून इतर भगिनींना घेऊन सभांना हजर राहू लागल्या हे फार महत्त्वपूर्ण होते. त्यांनी ज्ञातीत केलेली दोन भाषणे त्यांच्या नवविचारांनी व वक्तृत्व शैलीमुळे
फार गाजली. पहिले, जून १९३९मध्ये केलेले बालशिक्षणावर
व दुसरे १९४२ साली केलेले ‘स्त्री शिक्षणाचा प्रवाह’ या विषयावर होते.
पहिल्या भाषणात शास्त्रशुद्ध बालशिक्षणाचा मूलमंत्र देताना त्यांनी प्रतिपादन केले की, ‘मुलाची बुद्धी कोणत्या बाजूला झुकते याचा ठाव घेतल्याशिवाय त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या मनाविरुद्ध शाळेचा किंवा विश्वविद्यालयाचा कार्यक्रम पार करण्यास भाग पाडणे म्हणजे मुलाच्या बुद्धीचा व वडिलांच्या पशाचा अपव्यय होय. त्याचप्रमाणे, मुलीचा जर शिक्षणाकडे
कल असेल तर तिच्या आकांक्षा पूर्ण होतील अशीच तिच्या शिक्षणाची तजवीज, तिच्या वडिलांकडून केली जावी.’ हे सगळे विचार ज्ञातीत अगदी नवीन होते. इतकेच नव्हे तर लहान मुलांच्या सोयीसाठी ज्ञातीच्या वाडीत प्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरू करण्याबद्दल त्यांनी एक सूचना केली. दुसऱ्या,‘स्त्री शिक्षणाचा प्रवाह’ या भाषणात त्यांनी प्राचीन कालापासून ब्रिटिश आमदनीपर्यंत स्त्री शिक्षणाचा संपूर्ण आढावा तर घेतलाच, वर स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची व सुधारणांची आवश्यकता आहे या मोठय़ा वादग्रस्त प्रश्नावर, वयाच्या २९ व्या वर्षी, स्वतचे स्वतंत्र विचार, त्यांनी इतक्या प्रभावी व प्रगल्भपणे मांडले, की सर्वजण अंतर्मुख झाले नसतील तरच आश्चर्य! त्यांनी म्हटलं की, ‘प्रत्येक स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समाजात मानाने वागता येईल, पुरुषांची सखी व अर्धागी होण्यास पुरेसे, बौद्धिक शिक्षण दिले पाहिजे. ज्या स्त्रियांचा कल शिक्षणाकडे नसेल त्यांनी विश्वविद्यालयीन शिक्षणाकडे धाव घेण्याची जरुरी नाही. एखादे धंदेशिक्षण घ्यावे किंवा एखादी कला (गायन, वादन, चित्रकला) आत्मसात करावी की जिच्यामुळे वेळ पडल्यास नवऱ्याच्या मिळकतीत भर घालता येईल किंवा आपल्या पायावर उभे राहता येईल. स्त्री सुशिक्षित झाली की पुरुषाप्रमाणे तिलाही आपला जोडीदार पसंत/नापसंत करण्याचा अधिकार असावा. स्त्रियांनी स्वतची सुधारणा स्वतच करून घेण्यासाठी खुळ्या समजुती, आचारविचार चटकन सोडून, धर्माच्या आणि रूढींच्या नावाखाली होणारा पशांचा, वेळेचा व अमूल्य आयुष्याचा अपव्यय थांबवून, बदलत्या काळाला व परिस्थितीला अनुसरून वागण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, चालीरीतींचे संवर्धन करता करता, समाजकार्य व देशभक्ती करता येईल असे शिक्षण स्त्रियांना मिळाले तर कुटुंबाची व पर्यायाने समाजाची व देशाची उन्नती होईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी मांडलेले विचार त्या काळी नक्कीच बंडखोर व वादग्रस्त ठरले असणार! लीलाताईंनी तेव्हाच्या पुरुषप्रधान समाजाला दिलेला, हा स्त्री स्वातंत्र्याचा पहिला दणका!
क्षत्रिय ज्ञातीच्या भगिनींना एकत्र आणावे व लहान मुलांसाठी दादरला ताराबाई मोडकांनी काढलेल्या ‘शिशुविहार’प्रमाणे मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढावी, ही कल्पना लीलाताईच्या मनात, त्यांच्या मातोश्री शांताबाई मस्तकार यांनी लग्नाआधीच रुजवली होती. जेव्हा लीलाताईंनी एम.ए.बी.टी. संपवून एम.एड.चा अभ्यास सुरू केला तेव्हा कर्मधर्मसंयोगाने, एकदा एका मत्रिणीबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे जाण्याचा योग आला. ते लीलाताईंना म्हणाले, ‘एकटीने इतके शिकून काय करायचे? स्त्री वर्गात फार अज्ञान आहे, त्यांच्या जागृतीचे काम केलेत तर बरे होईल.’ सावरकरांच्या बोलण्याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला.
सुदैवाने, ज्ञातीतसुद्धा क्षत्रिय ज्ञातीच्या भगिनींनी एकत्र यावे ही कल्पना अगदी १९३६ सालापासून विचारात यायला लागली होती. ज्ञातीतून या कामासाठी जागा व आíथक मदत देण्याची तयारी होती. या विचाराला चालना मिळाली जेव्हा लीलाताई १९४२ साली वयाच्या तिसाव्या वर्षी, आपल्या मोठय़ा बहिणीचे दीर, मेजर ज्योतिन्द्र रेळे यांच्याशी लग्न करून गिरगावात राहण्यास आल्या. (लग्न रजिस्टर पद्धतीने घरातच मोजक्या माणसांच्या उपस्थितीत झाले.) स्त्रियांची बौद्धिक व वैचारिक प्रगती व्हावी, जुन्या चालीरीती, रूढी, धार्मिक व्रतवैकल्य यांचा ज्ञातीभगिनींवर असणारा पगडा कमी व्हावा, हीच लीलाताईंची कळकळ होती. म्हणूनच लीलाताईंनी पुढाकार घेऊन ‘क्षत्रिय भगिनी समाज’ (क्ष.भ.स.) मकरसंक्रांतीच्या दिवशी १९४४ साली स्थापन केला. लीलाताईंच्या सासूबाईंनीसुद्धा अवंतिकाबाई गोखल्यांना, आपल्या पांच सुनापकी एक समाजकार्याला देण्याचे वचन तंतोतंत पाळले व लीलाताईंना मार्ग मोकळा केला.
ज्ञातीतील ज्येष्ठ भगिनींना समाजाचे अध्यक्षपद दिल्यामुळे त्यांच्या सुना, मुलींना कार्यक्रमांना येणे सोपे झाले. त्या नुसता भगिनी समाज काढून थांबल्या नाहीत, तर १९४५ साली ज्ञातीच्या वाडीत अडीच ते सहा वर्षांच्या मुलांसाठी मॉन्टेसरी पद्धतीवर ‘शिशुविहार’ चालू केला. ज्ञातीबाहेरच्या मुलांनासुद्धा यात प्रवेश दिला गेला. भगिनी समाजात व शिशुविहारात चालवलेल्या मातृमंडळात, त्यांनी मुलांची शारीरिक व मानसिक वाढ, आहार, शास्त्रशुद्ध संगोपन या विषयांवर जाणकार लोकांची, डॉक्टरांची भाषणे ठेवली.
१९४६ साली त्यांनी ज्ञातीतील अनाथ भगिनींना, त्यांच्या शिशुविहारात काम करून पसे मिळवून, ज्ञातीकडून मिळणाऱ्या पोटगीच्या अपुऱ्या रकमेत भर घालण्याचे आवाहन केले. आपल्या आईवडिलांच्या नावाने देणगी देऊन, भगिनींना वेगवेगळ्या शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या सुरू करून मदतीचा हात पुढे केला व पारितोषिके देऊन प्रोत्साहन दिले. त्यानंतर क्ष.भ.स.वर देणग्यांचा पाऊस पडू लागला तो आजपर्यंत.
 मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, अखिल भारतीय महिला परिषद, दक्षिण विभाग स्त्री संस्था संयुक्त समिती, महाराष्ट्र सरकारच्या अल्प बचत सल्लागार समिती, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक समिती, कुष्ठरोग निवारण समिती व शांतिवन, पनवेल या संस्थांमध्ये लीलाताईंनी बरीच वष्रे वेगवेगळ्या पदांवर काम केले.
१९५६ साली त्यांची जे.पी. व ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून सरकारने नेमणूक केली. तेव्हापासून त्या डोंगरीच्या बाल गुन्हेगारांच्या कोर्टात काम करू लागल्या ते १९९० पर्यंत. १९६५ साली ‘चिल्ड्रेन्स एड सोसायटी’च्या गव्हìनग कौन्सिलवर नेमणूक झाल्यापासून ऑनररी सेक्रेटरी, खजिनदार अशा वेगवेगळ्या पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सोसायटीच्या माध्यमिक हायस्कूल समितीच्या अध्यक्षपदाची धुरा वाहताना १९८४ साली माध्यमिक हायस्कूल स्थापन केले. सरकारने १९९२ साली नव्याने स्थापन केलेल्या बाल कल्याण मंडळात लीलाताईंची नेमणूक केल्यावर डोंगरीतील रिमांड होममध्ये त्या चार वष्रे काम करत होत्या, तेव्हा त्यांचे वय ८०च्या आसपास होते.
हे सगळे चालू असताना त्यांनी विपुल लेखनही केले. स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, बाल संगोपन व बाल शिक्षण, बाल गुन्हेगार व अध्यात्म या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर जवळजवळ शंभरेक लेख त्यांनी विविध मासिकांतून व वर्तमानपत्रांतून लिहिले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरच्या वनिता मंडळातून नियमित भाषणे केली.
‘कल्लोळ’(आत्मचरित्र); ‘मानिनी’ (पर्ल बक हिच्या ‘धीस प्राउड हार्ट’ या कादंबरीवर आधारलेली कथा); ‘अपरिचित िलकन’ (डेल कान्रेजी यांच्या ‘लिंकन द अननोन’ या पुस्तकाचा स्वैर अनुवाद), ‘इसापचे चरित्र’; ‘तुम्ही आई होणार ना?’; ‘आज खायला काय आहे’; ‘कृपादृष्टीच्या चांदण्यात’- ज्ञानेश्वरी १२वा अध्याय; ‘हा मार्ग सोपा रे सोपा’ आदी त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.
लीलाताईंच्या ६०वर्षांच्या समाजसेवेबद्दल १९९३ साली, दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे त्यांना पहिल्या ‘आनंदमयी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे पती ज्योतिन्द्र आर्मीमध्ये मेजर होते. त्यामुळे लीलाताईंना नेहमीच मुंबईत आपल्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी राहावे लागले. याचा त्रागा न करता, एकत्र कुटुंबामुळे मिळालेला फावला वेळ त्यांनी समाजकार्यात खर्च केला. १९६२ साली, ज्योतिन्द्रांच्या अकाली मृत्यूमुळे ढासळून न जाता लीलाताईंनी
१० वष्रे शाळेत शिक्षिकेची नोकरी करून, संधी मिळताच समाजसेवेत परत स्वतला झोकून दिले. आई व वडील या दोन्ही नात्याने मुलांना वाढवलेल्या परिश्रमाचे फळ त्यांना त्यांच्या सुज्ञ, सुशिक्षित व समजूतदार मुलांच्या रूपाने मिळाले. वयाच्या ९३ वर्षांपर्यंत कार्यरत राहून आपले आयुष्य सत्कारणी कसे लावावे याचा फार मोठा आदर्श त्यांनी आजच्या स्त्रियांपुढे ठेवला आहे.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा