News Flash

नवरा नावाचा पुरुष

आजही बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वांत महत्त्वाचा अडसर त्यांचा नवरा असतो. असं का? गेल्या किमान सहा ते आठ पिढय़ांतील स्त्रीने आपली पारंपरिक

| January 11, 2014 07:36 am

आजही बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वांत महत्त्वाचा अडसर त्यांचा नवरा असतो. असं का? गेल्या किमान सहा ते आठ पिढय़ांतील स्त्रीने आपली पारंपरिक कौटुंबिक भूमिका न बदलता नोकरी-व्यवसायही सांभाळले तरी आजही पुरुष, विशेषत: तिचा नवरा तिला कौटुंबिक भूमिकेतच अडकवून ठेवू इच्छितो. तिचं दुय्यमत्व आजही अधोरेखित करतो. आजही असंख्य बायको नावाची व्यक्ती मन मारून जगते आहे आणि मग एखादीने नवरा गेल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडल्यास चुकीचं ठरेल?
काही वर्षांपूर्वी भारतातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये लिहिणाऱ्या महत्त्वाच्या लेखिकांचं संमेलन हैदराबादमधील ‘अस्मिता’ या संस्थेनं घेतलं होतं. अनेक लेखिकांच्या मुलाखती घेऊन, त्यांचं लेखन आणि त्यावर असलेल्या वेगवेगळ्या नियंत्रण पद्धतींविषयी चर्चा घडवून आणली होती. त्यात काही लेखिकांनी सांगितलेले अनुभव हे आपल्या एकूण समाजव्यवस्थेवर आणि या व्यवस्थेत सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या पुरुषाच्या विशेषत: त्यांच्या नवरा म्हणून असलेल्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे होते. एका तामीळ कवयित्रीला एका काव्यस्पध्रेत पहिलं आणि तिच्या कवी असलेल्या नवऱ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्यावर (यामुळं आपल्या मुलीचा संसार तर मोडणार नाही ना! या भावनेनं) तिच्या आईनं तुझं बक्षीस त्याला आणि त्याचं बक्षीस तुला घेता येणार नाही का, असा भाबडा प्रश्न विचारला होता. तेव्हा खरं तर तिच्या नवऱ्याला आपल्या बायकोला बक्षीस मिळालं आहे याची कल्पनाही नव्हती. तो त्याचं उत्तेजनार्थ बक्षीस ‘साजरं’ करण्यातच रमला होता. आपण काही चांगलं लिहिलं तर ‘हे तुझ्या नवऱ्यानंच तुला लिहून दिलं असणार’ असं सहज बोलणारे लोक बाईला एवढी चांगली दृष्टी असू शकते किंवा तीही पुरुषाएवढीच किंवा कधी त्याच्याहूनही जास्त प्रतिभावान असू शकते, हे आजही कबूल करायला तयार नसतात हे सांगताना या कवयित्री आणि लेखिका आपली स्वतंत्र ओळख मिळविण्यासाठी बाईला काय काय पणाला लावावं लागतं याच्या गोष्टी सांगत होत्या.  
आपल्या बायकोनं लेखन करावं ही गोष्टच न आवडलेले नवरे तिनं लिहिलेली पानं फाडून फेकून देत होतेच, पण काही जण ती ज्या पेनानं लिहीत होती त्या पेनाचेच तुकडे करून आपला निषेध नोंदवत होते. त्याउप्पर जर तिनं लिहिलं तर तिचा हात तोडायला कमी करत नव्हते. काही नवऱ्यांना आपली बायको लिहिते याचं कौतुक होतं, पण ते लिहिताना आपल्या बायकोनं काय लिहायचं आणि काय लिहायचं नाही याचा अधिकार आपल्याला असायला हवा असं वाटत होतं. काही नवरे तर घरातल्या कोणत्याही अनर्थाला आपल्या बायकोचं लेखन कारणीभूत असल्याचं ठामपणे सांगत होते. भाजी करपली, तरी ती ‘तुझ्या डोक्यात कथेचा विचार चालू होता म्हणून करपली’ असं सहज म्हणणाऱ्या नवऱ्यांना मनाआड करून या लेखिका नेटानं लिहीत होत्या, तर काही आपल्याला हवं तसं आणि मनाप्रमाणे लिहिता यावं म्हणून त्याची किंमत मोजत होत्या. बायको ही स्वयंपाकघरात स्वत:ला गाडून घेण्यासाठीच जन्माला येते असं मानून रोज ढीगभर मासळी आणून स्वयंपाक करायला लावणाऱ्या नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा कवितेसोबत आयुष्य काढण्याचा पर्यायही काही जणी निवडत होत्या. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक देशात सापडणाऱ्या अशा अनेक नवऱ्यांच्या कहाण्या तिथं सांगितल्या गेल्या तेव्हा आठवले ते सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यांसारख्या स्त्रियांची व्यक्तिमत्त्वं फुलवून ती बहराला आणणारे महात्मा जोतिराव फुले, गोपाळराव जोशी, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे नवरे. आपल्या बायकोनं शिकावं, पुढे जावं म्हणून प्रयत्न करणारे, त्यांना आदरानं वागवणारे, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे हे पुरुष आजही या व्यवस्थेनं त्यांना दिलेल्या उच्च स्थानावर बसून स्त्रीवर हवी तशी सत्ता गाजवणाऱ्या नवऱ्यांपेक्षा नक्कीच वेगळे होते. आपल्या बायकांना सन्मानानं वागवणाऱ्या आणि त्यांच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या या लोकांनी आपल्या बायकांना घडवण्यात फार महत्त्वाची भूमिका पार पाडली असली तरी आज एकशे तेवीस कोटींची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात खरोखरच किती नवरे आपल्या बायकोला एक स्वतंत्र व्यक्ती मानून तिनं तिचं व्यक्तिमत्त्व फुलवावं म्हणून प्रयत्न करतात, हा या आधुनिकतेचा मुखवटा घातलेल्या जगातला मोठाच प्रश्न आहे.
आज महाराष्ट्रापुरता विचार केला तर या फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर यांची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी राज्यात स्त्रियांची नेमकी काय स्थिती आहे याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आज अनेक स्त्रिया आपलं कसब दाखवायला लागल्या आहेत. शासकीय, राजकीय, आíथक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत एका उंचीवर पोचल्या आहेत. काही जणी नवरा आणि घर सांभाळून स्वत:ची ओळख मिळवताहेत, तर काही स्वत:च्या यशाची किंमत चुकवून एकटय़ा राहून सारं पेलतात. आपल्या यशात नवऱ्याचं पूर्णपणे सहकार्य मिळणाऱ्या स्त्रियाही आजूबाजूला दिसत असतात, पण त्यांची संख्या अगदी हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. अनेकदा इच्छा असूनही अनेक स्त्रियांना आपापल्या प्रांतात काम करता येत नाही. कधी त्यांना ओलांडून त्यांच्या बायकोने त्यांच्या पुढे जावं अशी नवऱ्यांची इच्छा नसते म्हणून, तर कधी मुलांना वाढविण्यासाठी आईचीच गरज जास्त असते या समाजनिर्मित गरसमजामुळे मुलं झाल्यावर त्यांच्या देखभालीसाठी म्हणून तिचे पंख छाटून तिला कायमचं घरटय़ात कोंडलं जातं. समाजात नावारूपाला आलेली एखादी कर्तृत्ववान स्त्री अनेकदा पुरुषांच्या आदरास प्राप्त होते. तिच्या कर्तृत्वाचे हे पुरुष गोडवे गात असतात, पण अशी बाई आपल्या घरात असू नये, अशीच प्रार्थना मनोमन करत असतात. पुरुषांच्या या मानसिकतेला तिनं आव्हान दिलं तर त्याची किंमत तुला मोजावी लागेल, अशी धमकी दिली जाते, आणि त्याउप्परही तिनं त्या त्या प्रांतात उंच भरारी मारायचं, आपलं वेगळं काम करायचं किंवा आपली स्वत:ची अशी ओळख निर्माण करायचं ठरवलंच तर तिला बाहेरचं दार दाखवलं जातं.
आपल्या स्वत्वासाठी काही स्त्रिया अशी किंमत मोजतातही, पण अनेक जणी आपले पंख मिटून घेणंच पसंत करतात आणि ‘नाच ग घुमा’ असं स्वत:ला बजावत तो सांगेल तसं आयुष्यभर घुमत राहतात. स्वत:ला वाढविण्याचा, स्वत:चे छंद जोपासण्याचा आपल्यालाही हक्क आहे हे विसरून जातात. आज अगदी साधं आपापल्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं तरीही मुलं झाल्यावर अनेक स्त्रियांनाच आपलं करिअर सोडून द्यावं लागतं. माझ्या माहितीतल्या एका एम.बी.ए. मुलीला मी नोकरी का करत नाहीस, म्हणून विचारलं तेव्हा तिच्या नवऱ्यानं अभिमानानं उत्तर दिलं की, माझ्या आईच्या नोकरीमुळे मला आईचं प्रेम, तिचा वेळ मिळाला नाही. माझ्या मुलांच्या वाटय़ाला हे येऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून ती घरीच असते. मुलांना सांभाळणं ही फक्त आईची जबाबदारी असते असं मानणाऱ्या या मुलाला स्वत:च्या आईला समजावून घेता आलं नाही तो बायकोला समजावून घेणं शक्यच नाही याची जाणीव झाल्यानं मी फक्त हसले त्या वेळी. पण मनात आलं की पूर्णवेळ घरात राहाणाऱ्याच स्त्रिया आपल्या मुलांना खरोखरच परिपूर्णतेने वाढवू शकतात का? की ही व्यवस्थेनं किंवा परंपरेनं लादलेली जबाबदारी आहे म्हणून आपलं आईपणही निभावून नेत असतात?
पूर्वी बाईनं चूल आणि मूल सांभाळावं अशी अपेक्षा केली जायची, पण आज अनेक मराठी कुटुंबांत आणि विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांत स्त्रिया नोकरी करताना दिसतात. अर्थात त्या नोकरी करतात तो केवळ घराला आíथक हातभार लागावा म्हणून. खूपच कमी घरांत आपल्या बायकोनं आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपावं, ते फुलवावं, आपल्यात असलेल्या साऱ्या शक्यता अजमाव्यात म्हणून तिला स्वत:च्या मनासारखं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. अनेकदा तिला परवानगी दिली जाते ती दोन पगारांत मजेत जगता यावं म्हणून. त्यामुळेच आजच्या होऊ घातलेल्या किती तरी नवऱ्यांना या एकविसाव्या शतकातही नोकरी न करणारी, गृहकर्तव्यदक्ष बायको हवी असते हे आपल्याकडच्या विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तर लक्षात येतं.
 या अशा मानसिकतेमुळे अनेक स्त्रियांमध्ये असलेली प्रतिभा, कला, बुद्धी मारली जाते. लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्या क्षणापासून या गोष्टी तिला आपल्या मनात कुठं तरी मागे सरकून ठेवाव्या लागतात किंवा या गोष्टी मनाच्या एका कप्प्यात ठेवून तो कायमचा बंद करावा लागतो. मग आजूबाजूला दिसणाऱ्या काही धडाडीनं काम करणाऱ्या स्त्रियांची हुशारी, त्यांच्यातली प्रतिभा, कला, काम करण्याची अफाट ताकद पाहिली, की या आपल्या इच्छा स्वत:च्या हातानं दाबून टाकलेल्या या स्त्रियांना त्यांनी फार पूर्वी पाहिलेली आणि लग्नानंतर ठरवून मारलेली आणि पुरून टाकलेली त्यांची स्वप्नं आठवायला लागतात, त्या अस्वस्थ होतात, आपलं आयुष्य म्हणजे एक निर्थकाचा प्रवास आहे याची जाणीव त्यांना व्हायला लागते आणि मग त्या अनेकदा यांत्रिकपणे संसार रेटत राहातात. कधी कधी मोठय़ा मनानं काही नवरे म्हणतात, आता मुलं मोठी झालीत. तुझे छंद जोपासायचे तर जोपास, पण तोपर्यंत या स्त्रियांचा जगण्यातला रसच हरवलेला असतो. मग अनेकदा त्या आपले छंद आपल्या मुलांवर लादायला लागतात. छोटय़ा-छोटय़ा मुलींना वेगवेगळ्या टी.व्ही. शोमध्ये नाचण्यासाठी किंवा गाण्यासाठी आणणाऱ्या बऱ्याचशा आया आपल्या मुलांमार्फतच आपली हौस भागवून घेत असतात किंवा बऱ्याचदा असंही होतं की नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या आपल्या कडीकुलपात बंद केलेल्या स्वप्नांना बाहेर काढतात. हळूहळू ती वास्तवात न आलेली स्वप्नं, अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा त्या पूर्ण करू पाहतात.एवढे दिवस केवळ मनातल्या मनात जगू पाहिलेलं आयुष्य मोकळेपणानं जगायला लागतात. कर्तृत्व दाखवणं वगरे तर पुढची गोष्ट, पण अनेक स्त्रियांना तर त्यांच्या साध्या साध्या इच्छाही पूर्ण करता येत नसतात. नवऱ्याच्या धाकात किंवा त्याला आवडतं ते करण्यासाठी धडपडत सारं आयुष्य काढणाऱ्या स्त्रियांना फार काही नको असतंच. एखादीला कधीतरी पहिल्या पंगतीला बसून गरम गरम अन्न खावंसं वाटतं तर कधी घरातल्या माणसांना चांगल्या फोडी देत केवळ बाठाच खाणाऱ्या बाईला एकदा तरी आख्खा आंबा खावासा वाटतो. कधी आपल्या चष्म्याची फ्रेम तरी स्वत:च्या पसंतीनं घ्यावीशी वाटते तर कधी एकटीनं हॉटेलात जाऊन आवडीची डीश खावीशी वाटते. आज दमली आहेस तू, मी वरणभात करतो, असं नवऱ्यानं नुसतं म्हटलं तरी नव्या जोमानं किचनमध्ये शिरणाऱ्या स्त्रियांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न काही नवरे करतातही. पण खूप कमी स्त्रियांच्या वाटय़ाला हे सुख येत असतं. सर्वसाधारणपणे आपल्या समाजात स्त्रियांना गृहीतच धरलं जातं. त्यामुळेच तो असेपर्यंत तोंडातून चकार शब्द न काढता जगणाऱ्या या स्त्रिया अनेकदा नवऱ्याच्या मृत्यूनंतर मोकळ्या होतात. स्वत:च्या छोटय़ा-छोटय़ा इच्छा पूर्ण करू पाहतात. नीटनेटक्या राहू लागतात, नाटक सिनेमा पाहायला जातात, आपले मनामागे सारलेले छंद जोपासायला लागतात, मन भरून जगतात. ज्यांच्यात खरोखरच काही करण्याची धमक असते त्या नेटानं उभ्या रहातात. एवढी र्वष त्यांच्यात असलेली कर्तबगार स्त्री मारली गेली असली तरी त्या नव्यानं या स्त्रीला उभी करतात. लोकांच्या नजरेत यावं इतक्या वेगानं कामं करत राहतात.
आणखी एक गोष्ट अनेकदा जाणवते ती चार मित्र आपापल्या बायकांबरोबर एकत्र जमले की आपली बायको मूर्ख असल्याचं, तिला चार माणसांत वावरायची अक्कल कमी असल्याचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी ती आपल्यावर अवलंबून असल्याचं खूप कौतुकानं सांगत असतात. विनोद निर्माण कण्यासाठी का होईना पण बायकोमध्ये असलेल्या धडाडीला कायम हास्यास्पद ठरवलं जातं. त्यामुळे हळूहळू या बायका स्वत:ला मिटून घेतात. काही दिवसांनी तर आपल्याला साध्या साध्या गोष्टी येत नसल्याची किंवा त्या करण्याची आपली लायकी नसल्याची त्यांना खात्री वाटायला लागते. साधं घराबाहेर पडायचं असेल तर नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या या स्त्रियांना कधीकाळी त्याच्याशिवाय एकटय़ानं प्रवास करण्याची वेळ आली तर हतबल व्हायला होतं. हळूहळू हे अवलंबून राहणं एवढं वाढतं की एकटय़ानं बाहेर पडायचंही धाडस होत नाही. वेळप्रसंग आला तर त्या हबकून जातात. नवऱ्याचे खर्च, त्याची बँकेतली पुंजी, त्याचे आíथक व्यवहार याविषयी नवराही त्यांना काही सांगत नाही की त्याही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याविषयी नवऱ्याला कसं विचारायचं हे भय मनात असतं तर कधी कधी हा आपला प्रांतच नाही हे स्वत:च ठरवून त्या त्यांना दिलेल्या गृहिणीच्या भूमिकेत चपखल बसण्याचा प्रयत्न करत राहतात.
अशा स्त्रिया आपल्या आजूबाजूला अनेक आहेत. त्यांचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की अशा स्त्रिया नवऱ्याच्या मृत्यूनंतर साफ कोलमडून जातात. कारण स्वत:च्या पायावर जगायचं कसं हेच त्या विसरलेल्या असतात. स्वत:वर अवलंबून ठेवून पुरुषांनी पांगळं केलेल्या या बायकांना नव्यानं उभं राहताच येत नाही. सारं आयुष्य अपंगासारखं कोणावर तरी अवलंबून राहून त्या काढत राहतात.
आपल्या समाजव्यवस्थेनं पुरुषाला कायम वरच्या क्रमांकाचं स्थान दिलेलं आहे. स्त्रीही त्याच्या दृष्टीनं दुय्यमच मानली गेली आहे. तिचं संरक्षण करण्यात तो धन्यता मानत असतो. तिची काळजी घ्यायला त्याला आवडते. पण अनेकदा तो जेव्हा मुलाच्या भूमिकेत असतो किंवा भावाच्या अथवा पित्याच्या भूमिकेत असतो तेव्हा आपल्या आईची, बहिणीची, मुलीची किंवा अगदी मत्रिणीचीही काळजी तो घेत असतो. त्यांना स्त्री म्हणून समजावूनही घेतो. पण जेव्हा तो नवऱ्याच्या भूमिकेत जातो तेव्हा नकळत त्याच्यातला वर्चस्ववादी नर जागा होतो. आपल्या बायकोनं आपल्या मनाप्रमाणे वागायलाच हवं हा हट्ट सुरू होतो. तिची काळजी तो घेतो पण त्याचबरोबर त्याच्यातला अहंही जागा होतो. आणि मग ‘बायको आहेस बायकोसारखी राहा’ हे शब्द ऐकायला यायला लागतात. बायकोसारखी राहणं म्हणजे त्याच्या दृष्टीनं काय असतं तर नवऱ्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याबरहुकूम चालणं. तसं जगायचं ठरवलेल्या स्त्रिया आनंदानं नाही तर परिस्थिती स्वीकारून जमेल तसं जगण्यालायक करत राहतात. आयुष्य आणि आयुष्याच्या संध्याकाळी नवऱ्यांना ऐकवत-सुनवत सूडही घेतात. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. ज्यांना स्वत:विषयी आत्मविश्वास असतो, स्वत:तल्या शक्यता तपासून पाहायच्या असतात त्या क्वचितच नवऱ्याच्या सहकार्यानं, तर कधी नात्यातला ताण सहन करत पुढे जातात. काही तर नात्यांची किंमत चुकवून एकटं राहण्याचा निर्णय घेतात. पाश्चात्त्य देशात याचं प्रमाण वाढलेलं असलं तरी आपल्याकडे मात्र अजून तेवढं झालेलं नाही. पण अशा स्वत:च्या बळावर पुढे गेलेल्या स्त्रियांची उदाहरणं मात्र अनेक आहेत.
पाश्चात्त्य देशात तर आपली करिअर आणि आपली मुलं दोन्ही लीलया सांभाळत जगणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. नवऱ्यांना सहन होत नसेल तर त्याला सोडून राहण्याची त्यांची तयारी आहे. त्यांचं आयुष्य तर इतकं व्यस्त असतं की आपली मुलं आणि काम यातून त्यांना कोणाचा विचार करायलाही वेळ मिळत नाही. उलट स्त्रियांनी सोडून दिलेल्या नवऱ्याला कोणत्याच भूमिका न उरल्यानं तो ऑफिसमधून आला की एकटा होऊन जातो. कारण आपल्या आईला समजून न घेणाऱ्या बापाबरोबर राहण्यापेक्षा कर्तृत्ववान आईबरोबर राहण्याचा पर्याय मुलांनी निवडलेला असतो. आपल्याकडे अशी वेळ या तथाकथित नवऱ्यांवर येऊ शकते. ती येऊ नये म्हणून नवरा या शब्दात असलेली स्वामित्वाची भावना प्रथम डोक्यातून काढून आपल्या बायकोला एक स्वतंत्र व्यक्ती, मत्रीण म्हणून मानायला सुरुवात करायला हवी. तिच्या प्रगतीच्या आड येण्यापेक्षा तिला प्रोत्साहन द्यायला हवं. असे काही पुरुष माझ्या आजूबाजूला आहेत. बायकोच्या प्रगतीत समाधानच नाही तर आनंद मानणाऱ्या काही नवऱ्यांसारखं होण्याचा साऱ्याच नवऱ्यांनी नव्या वर्षांत विचार करायला काय हरकत आहे? असं झालं तर कदाचित नवरा-बायको या नात्यालाच एक वेगळा आयाम प्राप्त होईल. त्यांच्यात अतिशय समृद्ध अनुभव देणारं नातं तयार होईल.    

    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 7:36 am

Web Title: man in the name of husband
टॅग : Husband
Next Stories
1 दक्षता.. एक अभाव
2 मौन
3 कोंडी पुरुषांची!
Just Now!
X