‘‘माझं सगळं जगणं ही एक आनंदयात्रा आहे. या आनंदयात्रेचा उद्देश अभिनय पंढरीला जाऊन पोहोचणं हाच होता. तक्रार असेल तर ती एवढीच माझ्यातील पुरेपूर क्षमतांचा वापर करणारी जबरदस्त भूमिका अद्याप मिळाली नाही. आयुष्य बदलवून टाकणारी भूमिका मिळणाऱ्या ‘त्या’ क्षणाची मी आजही वाट पहातोय!
मा झं सगळं जगणं ही एक आनंदयात्रा आहे. या आनंदयात्रेचा उद्देश अभिनय पंढरीला जाऊन पोहोचणं हाच होता. या यात्रेत कधी ऊन होतं. कधी सावली होती. कधी आभाळमाया पसरली होती तर कधी संघर्षविजांचा कडकडाट होता. पहिल्यांदा रंग तोंडाला लागला तो ४२ वर्षांपूर्वी. तेव्हाच निश्चित झालं होतं की, मनोजला जगायचंय ते रंगभूमीसाठीच. दुसरं काही, कदाचित, मला जमलं नसतं!
आम्ही गुजराती. पण रायगड जिल्ह्य़ातल्या गोरेगावमध्ये २००हून अधिक वर्षे राहतोय, म्हणून मी मराठी! माझे वडील नवनीतभाई जोशी. ते मराठी व गुजराती भाषेत कीर्तन करायचे. मराठी व गुजरातीमधील नारदीय कीर्तन परंपरेचा, ते एक महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे आमच्या घरात कीर्तनकारांचा कायम वावर असायचा. गोविंदस्वामी आफळे, खरेबुवा, आज करवीर पीठाचे शंकराचार्य असणारे रामचंद्रबुवा कऱ्हाडकर येत असत. वडिलांबरोबरच्या त्यांच्या गप्पा, चर्चा ऐकायला मिळत. तो एक मोठा संस्कार होता. आमच्या शाळेतल्या दानवे गुरुजींनी मला हेरले व शाळेच्या ‘भरतभेट’ नाटकात मला भरताची भूमिका दिली व नंतर मी शाळेच्या नाटकांत कायम काम करू लागलो.
वडिलांनी मला कीर्तन शिकवलं, हार्मोनिअम-तबल्याच्या शिकवण्या लावल्या. सातवी पास झालो व आम्ही गोरेगावातून मुंबईत विलेपार्ले येथे राहायला आलो. अगदी ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात आल्यावर मला मोठा सांस्कृतिक धक्का बसला. महिला संघाच्या शाळेत प्रवेश घेतला. आठवीत गणितात नापास झालो. नववीतही तीच स्थिती. माझं गोरेगावमध्ये रमलेलं मन मुंबईत रमेना. वडिलांनी मला पुन्हा गोरेगावला पाठवलं. तिथे मी दहावी उत्तीर्ण झालो. आजोबा होते, काका होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करणारे ‘दलितमित्र’ अधिकारी वकील होते, वडिलांचे शिक्षक व स्नेही भातखंडेशास्त्री होते. भातखंडेशास्त्रींबरोबर दररोज संध्याकाळी मी फिरायला जायचो. त्यांच्याकडून पुराणं, भागवतातल्या गोष्टी ऐकायचो, त्यांनी त्या फिरण्यादरम्यान मला गीता समजावून दिली. लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य उलगडून दाखवलं. चाणक्याचं अर्थशास्त्र उकलून दाखवलं. फार काही कळत नसे, पण कानावर पडत होतं, ते महत्त्वाचं आहे हेही उमगत होतं. त्यांनी लोकमान्यांची भाषणे ऐकून स्वत:च्या हातांनी लिहून काढली होती.
माझी चित्रकला उत्तम होती. जे. जे. स्कूलला प्रवेश घ्यावा असं वाटत होतं, पण त्या वर्षी लगेच जमलं नाही. वर्षभर काय करायचं. म्हणून मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला कला शाखेत. वर्गात प्रवेश केल्यावर दिसल्या त्या फक्त मुली. ९५ टक्के मुली होत्या व आम्ही चार-पाच मुलं. आजवर मराठी माध्यमात शिकलेलो. तिथे इंग्रजीत शिकवत होते. काहीच कळेना. मन रमेना. वर्षभर वेळच काढायचा होता. बाहेर आलो तर समोर मराठी वाङ्मय मंडळाचा (मवामं) बोर्ड. नाटकाच्या ऑडिशन्स लावल्या होत्या. नाटकात निवड झाली. नंतरचे दिवस छान गेले. मवामंच्या कार्यकर्त्यांना मान होता आणि नाटकाच्या काळात कूपन्स मिळायची. कॅन्टिनमध्ये खायला मिळायचं तेही फुकट! आईच्या लक्षात आलं की मी वर्गाबाहेरच अधिक असतो. रोजचा दहा रुपयांचा पॉकेटमनी तिने बंद केला, पण माझं नाटक सुरूच राहिलं. मी वाया जाईन असं वाटून तिनं मला पुन्हा गावी कॉलेजात शिकायला पाठवलं. आर्ट्समधून अकरावी. नंतर कॉमर्स! नापास होण्याखेरीज पर्याय नव्हता. मुंबईतल्या सहा महिन्यांत मला इप्टा, आय्.एन्.टी., यूथ फेस्टिवलची जादू कळली. नाटक करायचं तर मुंबईतच असायला हवं. मी नंतरच्या वर्षी मुंबईत परतलो. जे.जे.ला ‘हॉबी पेन्टिंग’मध्ये प्रवेश मिळाला. संध्याकाळी पब्लिकेशन डिझायनिंगचा कोर्स लावला. इतर वेळात नाटक सुरू झालं. वडिलांनी नोकरी करून सर्व उद्योग कर असा सल्ला दिला. पब्लिकेशन डिझायनिंगच्या बळावर नंतर १७ नोकऱ्या केल्या. दोन नाटकांच्या दरम्यान नोकरी करायची. नोकरीत मिळवलेले पैसे नाटकासाठी खर्च करायचे. सर्व तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. गॅली लावण्यापासून, ते पेज डिझायनिंगपर्यंत सारी कामं करायचो. ‘युवदर्शन’, ‘मध्यंतर’ ते ‘इकॉनॉमिक अॅण्ड पोलिटिकल वीकली’ अशी सतरा पब्लिशिंग हाऊसेस केली. त्यात शेवटच्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड पोलिटिकल विकली’मध्ये मी कायमतत्त्वावर नोकरीवर होतो. येथे एम. जे. अकबर, प्रकाश बाळ यांसारख्या मान्यवरांना नेहमी भेटायची संधी मिळे. पण माझं मन नाटकातच रमायचं. राज्य नाटय़ स्पर्धा, वेगवेगळ्या ठिकाणच्या नाटय़ स्पर्धातून भाग घ्यायचा, कामं करायची, स्पर्धा जिंकायच्या, हरलो तर आत्मपरीक्षण करायचं, असा सारा खाक्या होता. इथेच मला मिहीर भुता भेटला.
दाजीशास्त्री पणशीकर हे माझ्या वडिलांचे स्नेही. माझी नाटकाची आवड पाहून दाजींनी मला प्रभाकर पणशीकरांकडे पाठवलं. ते म्हणजे स्वत:च एक संस्था होते. एक माणूस कित्येक लोकांचा पसारा सांभाळतो, दैनंदिन व्यवहार पाहतो, नवनवीन नाटकं निर्माण करतो, ‘तो मी नव्हेच’सारख्या नाटकात चतुराईनं आणि चपळाईनं कपडे बदलतो, लोकप्रिय असतो, तरीही त्याचा अहं न करता हसतखेळत सारं करतो, हे ‘नाटय़संपदा’सोबत असताना मी पाहिलं. जाणवायला लागलं की मराठी रंगभूमीवर केवढे तरी मोठे कलाकार आहेत, हिंदीतही आहेत. आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी स्वत:च नाटक निर्माण केलं पाहिजे, स्वत:ची निर्मिती संस्था असायला हवी. तेव्हा मी एकविशीत होतो. मिहिरशी बोललो. तोही राजी झाला. तो नाटक लिहिणार होता. भातखंडेशास्त्रींबरोबरच्या चर्चेतून कौटिल्य-चाणक्य ही व्यक्तिरेखा मनात ठाण मांडून बसली होतीच. मिहिरला मला कळलेला चाणक्य सांगितला. ‘तो पुरेसा नाही’ असं तो म्हणाला. मग त्याच्यासमोर ‘मुद्राराक्षस’ नाटक ठेवलं. ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ ठेवलं. भारतीय विद्या भवन व एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास केला. चाणक्यांचा प्रयत्न एकसंध भारत निर्माण करण्याचा होता, हा उद्देश सर्वासमोर आणायचं ठरवलं. मिहिरने गुजराती भाषेत पदवी मिळवली होती. तो म्हणाला, ‘‘हे नाटक आपण गुजराती भाषेत करू.’’ चार वर्षांच्या अखंड प्रयत्नांतून ‘चाणक्य’ लिहून पूर्ण झाले. त्याचा निर्मितीखर्च, तामझाम अवाढव्य होता. त्या काळात ३० हजार रुपयांची गरज होती. आम्ही दोघेही तसे फाटके! निर्मात्याचा शोध सुरू होता. एक निर्माते आम्हाला सापडले. पण त्यांचा कल वेगळ्या नाटकांकडे होता. मी ‘चाणक्य’ त्यांच्या गळी उतरवलं. त्याच दरम्यान मी पूर्वी ज्या ‘अभियान’मध्ये काम करायचो त्या पब्लिशिंग हाऊसने नाटय़स्पर्धा आयोजित केली होती. पहिलं पारितोषिक एक लाख रुपयांचं होतं. निर्मात्यांना आम्ही विनंती केली, स्टॅम्पपेपरवर लिहून दिलं की, ‘‘जर नाटकाला पारितोषिक मिळालं नाही, तर आम्ही हा खर्च भरून देऊ.’’ प्रयोग झाला. स्पर्धेत परेश रावळ, भक्ती बर्वे आदींसारख्यांनी भाग घेतला होता. आमच्या नाटकाला, मला अभिनयाचं, मिहिरला लेखनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. दुसऱ्या दिवशी मी नोकरीचा राजीनामा दिला. बक्षिसाची अकरा हजार रुपयांची रक्कम आईच्या नावावर बँकेत ठेवली, तिने ती अजून जपून ठेवलीय.
त्या दिवसापासून आजवर ‘चाणक्य’ आम्ही निष्ठेनं करतो आहोत. कोणतीही गोष्ट करताना पॅशन हवंच. स्वत:ला झोकून दिल्याखेरीज काहीही होत नाही. तुम्ही तुमच्या कलेला सर्वस्व समर्पण करायलाच हवं. मनाची त्वचा सोलून तिचा होम करायला हवा, तेव्हा कुठे ही रंगदेवता प्रसन्न होते. मी व्यसनांपासून दूर आहे. कलेची धुंदी मला जगण्यासाठी पुरेशी आहे. ‘चाणक्य’ या नाटकानं ही
धुंदी फुलवली; राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान, राष्ट्रतेज, एकसंधता या गोष्टी बोलण्याच्या नसून अमलात आणण्याच्या आहेत ही जाणीव दिली. नुकतीच १३ सप्टेंबरला या नाटकाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला हे नाटक करताना काही तरी करण्याची ऊर्मी होती, ऊर्जा होती; आज पंचवीस वर्षांनंतर हे नाटक वेगळं जीवनभान देतं. तीच ऊर्जा, तीच ऊर्मी आज अधिक समंजसपणे व समृद्धतेने मांडता येते.
याच नाटकाच्या एका प्रयोगाला रचना वाघमारे स्मिता तळवळकरांना घेऊन आली. विंडोतून प्रयोग पाहिला त्यांनी. स्मिता म्हणाली, ‘‘हा सुटेबल बाज्या आहे.’’ मला काही कळलंच नाही. तिनं सांगितलं, ‘‘इनामदारांच्या ‘राऊ’ कादंबरीवर मालिका करतो आहोत. तुषार दळवी बाजीराव करत होता. पण त्याला जमत नाहीए. तू करशील का?’’ पण हे नाटक जोरात सुरू होतं. म्हणून म्हटलं, ‘‘निर्मात्यांची परवानगी घेतो, मग सांगतो.’’ निर्मात्यांनी परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी आम्ही इनामदारांना भेटलो. त्यांनी आशीर्वाद दिले. म्हणाले, ‘‘पक्के बाजीराव दिसता.’’ आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी ६ ते रात्री १० शूटिंग सुरू. संजय सूरकरांनी ट्रेनमध्येच कथा ऐकवली. २६ दिवस शूटिंग सुरू होतं. पाच मिनिटांचीही फुरसत नसायची. पहाटे ५ला उठायचं. ५.३०ला मेकअप, ६ वाजता पहिला शॉट. त्यानंतर सकाळची न्याहारी. कमालीचा अनुभव!
अश्विनी भावे मस्तानी करत होती. प्रेमप्रसंग चित्रित करायचा होता. माझ्या अभिनयाच्या क्षेत्रातला पहिलाच अनुभव. मी बावरलो होतो. अश्विनीच्या कपाळावर ओठ टेकवायचे होते. मी तिला इतक्या जोरात पकडलं की, तिचा विग माझ्या हातात आला. काय झालं असेल नंतर कल्पना करा.
दुसऱ्या एका प्रसंगात राऊ मद्यपान करतात. त्या वेळी पितळी ग्लासात कोकम सरबत ओतून ठेवलं होतं. झालं. त्यात रासायनिक प्रक्रिया घडली. मी त्या पेल्यातलं पेय प्यायलो आणि दहा-बारा सेकंदांत उलटय़ा सुरू झाल्या. शूटिंगचा पार विचका झाला. अशा एक ना अनेक गमती. ‘राऊ’ या मालिकेनं कमीत कमी वेळात आपलं सवरेत्कृष्ट कसं द्यायचं, हे शिकवलं. त्यानंतर मी दूरदर्शनवरच्या ‘चाणक्य’ मालिकेत चाणक्याचा मित्र म्हणून आलो आणि मालिकांचा क्रम सुरू झाला. मी असंख्य मालिका केल्या. मालिकांमुळे तुम्हाला प्रचंड लोकप्रियता मिळते. पण अलीकडच्या काळात मालिकांवर टी.आर.पी.चे राज्य आलंय. त्यामध्ये यांत्रिकता येत चाललीय. कामापेक्षा कधी कधी कारागिरी अधिक होतेय. पैसे खूप मिळतात, पण समाधान हरवतंय. हे बदलायला हवं.
माझा जीव नाटकात, चित्रपटात रमलेला आहे. हिंदी-गुजराती रंगभूमीवर मी खूप काम केलंय. मराठीत मी फारसा आलेलो नाही. ‘चाणक्य’नंतर नवनवे विषय घेऊन खूप नाटकं केली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ गुजरातीत केलं, ‘शपथ’ केलं, ‘सुखाशी भांडतो आम्ही’चा गुजराती अनुवाद केला. एकदा ‘हसवाफसवी’चा गुजराती प्रयोग पृथ्वी थिएटर्सवर चालू होता. मस्त रंगला होता आणि अचानक पाय मुरगळला. काही भाग शेवटी बसून केला. नाटकाला बाबा, यशवंत दत्त आले होते. मध्यंतरात ते आत आले व म्हणाले, ‘‘एक दोरी आण.’’ कोणी तरी सुतळ आणली. बाबांनी स्वत: एकेक बोट सुतळीनं विशिष्ट पद्धतीनं, तळपायाच्या सांध्याजवळ बांधलं. तेल घेऊन स्वत:च्या हातांनी मालिश केलं. म्हणाले, ‘‘आता काम कर जा.’’ पुढचा प्रयोग व्यवस्थित केला. केवढा ज्येष्ठ कलावंत पण केवढी आपुलकी!
हिंदी चित्रपटांमध्ये खूप काम केले. १००हून अधिक चित्रपट केले. भारतातल्या प्रत्येक मोठय़ा चित्रपट दिग्दर्शकाबरोबर काम केलं. मणिरत्नम, सूरज बडजात्या, संजय लीला भन्साळी, प्रियदर्शन, जॉन मॅथ्यू मत्थन, मधुर भांडारकर, कुंदन शहा, सुधीर मिश्रा हे त्यातील काही. संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’च्या सेटवर एकदा चक्कर येऊन पडलो. असा पडलो की पुढे चार दिवस मी कोमात होतो, काही दिवस मला दिसत नव्हतं, पुढे वर्षभर अंथरुणात पडून होतो. मेंदूत कुठे तरी बारीक रक्तगाठ आली होती. बुद्धी व स्मरणशक्ती शाबूत होती. कोमातून शुद्धीवर आलो तो नाटकाचे संवाद म्हणतच. त्या वेळी विक्रम गोखले, मला भेटायला कायम रुग्णालयात यायचे. खचून गेलेल्या मला धीर द्यायचे. विश्वास द्यायचे. मी त्यांचा कृतज्ञ आहे. सर्व स्थिरस्थावर व्हायला चार वर्षे लागली. मग मला ‘कहता है दिल’ ही मालिका मिळाली व हळूहळू लोकांना कळलं की मी पुन्हा काम करू लागलो आहे. काम मिळू लागलं. त्याच वेळी योगायोगाने मला प्रियदर्शन यांचा ‘हंगामा’ सिनेमा मिळाला. ‘सरफरोश’ हा माझा पहिला चित्रपट होता, पण त्याचा फायदा नाही झाला. ‘हंगामा’मध्ये मी केलेली भूमिका अशीच योगायोगाने मिळाली. प्रियदर्शनना माझ्याबद्दल फारसे माहिती नव्हते. मला ती भूमिका दिग्दर्शकांनी समजावून सांगितल्यावर माझ्या वकुबाप्रमाणे जशी वठवता आली तशी मी वठवली. ती भूमिका मी माझे गोरेगावचे चित्रकलेचे शिक्षक ज्या आवाजात बोलायचे तसा टोन लावून केली. फिल्मच्या ट्रायलला मी गेलो नव्हतो, कारण माझ्या ‘महापुरुष’ या गुजराती नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्या वेळी मोबाइलवर मला कॉल आला, ‘‘मी प्रियदर्शन बोलतोय.’’ मला कोणी तरी मस्करी करतोय असं वाटलं. मी फोन कट केला. असं चार वेळा झालं. नंतर ‘हंगामा’च्या निर्मात्यांचा फोन आला, ‘‘अरे बाबा, तुला प्रियदर्शन बोलवताहेत. पार्टी सुरू आहे, तू ये.’’ मी रिक्षाने जुहूला गेलो. तोवर सारं संपलं होतं. प्रियदर्शन जिना उतरत होते. त्यांनी मला मिठी मारली व म्हणाले, ‘‘सॉरी मित्रा, मी तुला अंडरएस्टिमेट केलं.’’ त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांची फिल्म जाहीर होते, दोन महिने आधी मला फोन येतो, रोल समजावला जातो व मी ती भूमिका करतो. असे १२ चित्रपट आम्ही केले. बच्चनसाहेब वगळता सर्व मोठय़ा अभिनेत्यांबरोबर मी काम करू शकलो. शिवाय राजकुमार हिरानी, तिग्मांशू धुलिया, आशुतोष गोवारीकरबरोबर अद्याप काम करायचं राहिलंय. राजूबरोबरची एक मोठी संधी हुकली. मुन्नाभाईमधली एक भूमिका देऊ केली. लूक टेस्ट झाल्यावर मी त्याला म्हणालो, ‘‘या भूमिकेपेक्षा मला सर्किटची भूमिका दे. मी फुकट करेन. ती भूमिका तेव्हा मकरंद देशपांडे करणार होता व मुन्नाभाई करणार होता शाहरुख खान. त्याला अपघात झाल्यावर ती भूमिका संजय दत्तला मिळाली व मकरंद ऐवजी अर्शद वारसी आला. निराश अर्शदसाठी ही संधी नशीब बदलवून जाणारी ठरली. ‘‘अरे कुछ नही होगा यहाँ यार,’’ असे वैतागून म्हणणारा इरफान खानही नंतर टॉपला गेला. नवाजुद्दीन सिद्दिकी ‘सरफरोश’मध्ये एका शॉटपुरता होता. आज त्याचं आयुष्य केवढं गतिमान झालंय. ‘तो’ एक क्षण आयुष्यात आला पाहिजे. आजही मी वाट बघतोय अशाच एका क्षणाची! त्या भूमिकेची!
‘चाणक्य’नंतर अर्थातच मी काही छान भूमिका केल्या. ‘गांधी विरुद्ध गांधी’मधला हरिलाल केला. महापुरुषाच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वासमोर उभा राहिलेल्या, पण पराभूत मनोवृत्तीच्या हरिलालची भूमिका करताना मला स्वत:ला शोधता आलं. हरिलालने बापूंना २७ पानी पत्र लिहिलं होतं. त्यात तो सर्व काही स्पष्टपणे लिहितो, त्यातून मला हरिलाल शोधता आला. तुमच्यात नऊ रसांची माती हवी. शरीर, आत्मा नवरसांचा हवा. मी सतत त्यांचा शोध घेत राहतो.
२००८ मध्ये तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही ‘चाणक्य’ या नाटकाचा प्रयोग केला. निमंत्रितांसाठीच तो प्रयोग होता. आम्ही त्या कुटुंबीयांना मदत म्हणून दीड लाख रुपये दिले. अक्षयकुमारने, ‘यार, तू तो बडा काम कर रहा है,’’ असं म्हणून पाच लाख दिले, जॅकी श्रॉफने पंचाहत्तर हजार दिले. त्या दिवशी ओंबळे यांच्या कन्येच्या हाती आम्ही नऊ लाख रुपये सुपूर्द करू शकलो. आज नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंनी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. अभिमान वाटतो त्यांचा. सामाजिक जबाबदारीचं भान कलावंताला असतंच, ते असं व्यक्तही व्हावं असं मला वाटतं.
मी भाग्यशाली यासाठी की संस्कारांचा समृद्ध वारसा देणाऱ्या घरात ईश्वराने जन्म दिला, योग्य सहधर्मचारिणी मिळाली, छान मुलं देवानं दिली. मनाजोगता व्यवसाय करू शकलो. व्यवसाय हा पैसे कमवायचं साधन न बनता तो आनंद बनला. तक्रार असेल तर ती एवढीच माझ्यातील पुरेपूर क्षमतांचा वापर करणारी एखादी भूमिका मिळावी व ती आनंदयात्रा महाआनंदयात्रा बनावी.
माझ्या या प्रवासात चारूची, माझ्या बायकोची साथ मोलाची आहे. एका लग्नात माझी व तिची ओळख जिजाजींनी करून दिली. आम्ही एकमेकांना समजून घेत अडीच वर्षांनी लग्न केलं. त्या वेळी मी नोकरी करत होतो. ऑफिसमधून पस्तीस हजार रुपयांचं कर्ज लग्नासाठी म्हणून काढलं. त्यातले तीस हजार रुपये नाटकावर खर्च केले. चारूच्या हातात पाच हजार ठेवले. काही दिवसांनी ‘चाणक्य’ला पारितोषिक मिळाले. मी तिच्याशी बोलून दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. माझा हा स्वभाव तिने सांभाळला, त्याला कोंदण दिलं, सांभाळलं. उतार-चढाव आले पण त्याचा परिणाम आमच्या संसाराच्या आनंदयात्रेवर तिने होऊ दिला नाही. प्रारंभी तिने शिकवण्या करून संसार उभा केलाय. माझ्या भयाण आजाराच्या काळात ती ठामपणे उभी राहिली, म्हणून तर आजवर मी जे काही थोडंफार करू शकलो ते झालं. आम्हाला दोन गुणी मुलं आहेत. रुद्र आणि धर्मज. चारू आमची दोन प्रॉडक्शन हाऊस सांभाळते. रुद्र, धर्मज आणि मी अशी तीन मुले सांभाळते. शिवाय नाटकात कामंही करते.
मराठी चित्रपटात मी खूप मोजकं काम केलंय. बहुधा लोकांना वाटत असावं, मी मराठीत काम करणार नाही. पण तसं नाही. ‘बालगंधर्व’, ‘यलो’, ‘नारबाची वाडी’ मी केलं. ‘वाघ्या’ नावाचा एक चित्रपट अवघ्या चार तारखा जुळू शकल्या नाहीत, म्हणून मला सोडावा लागला. खूप वाईट वाटलं त्या वेळी. नुकताच मी ‘किल्ला’ पाहिला, ‘फँड्री’ पाहिलाय. ‘एलिझाबेथ एकादशी’ हे चित्रपट आवडले. मराठीत जसं काम होतं, तसं अन्य भारतीय भाषांत फारसं होत नाही. प्रेक्षक फारसे वळत नाहीत. भलाभक्कम पाठिंबा असणारे चित्रपट चालतात. ते हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन, महाराष्ट्रात एक पडदा चित्रपटगृहे १७५ आहेत. त्यांना १ टक्के व्याजाने कर्ज देऊन तंत्रदृष्टय़ा अद्ययावत करा व कटाक्षाने प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवावेत असे बंधन घाला. नवीन निर्मात्यांची मोठी सोय होईल. चित्रपट महामंडळानेही यासंदर्भात भूमिका घेत जबाबदारी उचलायलाच हवी.
शब्दांकन- प्रा. नितीन आरेकर , nitinacomrekar@gmail.