‘‘कला या जुळ्या बहिणी असतात. एकीची सेवा केली असता दुसरी आपोआप वाढते. माझे आशीर्वाद आहेत तुला.’’ कविवर्य बोरकरांनी प्रोत्साहन दिले नि माझं आयुष्य कलांनी बहरलं.

लग्न म्हणजे आनंद, सुखाची पर्वणी. बहुतेक जोडपी तो आनंद भरभरून उपभोगतात, पण एखाद्याचा अनुभव या उलटही असू शकतो. या उलट अनुभवातील मी एक. दोन-तीन वर्षे रडत-कुढत काढली. संसाराचा गाडा पुढे नेत राहिले. या सगळय़ा प्रवासात सोबतीला होत्या फक्त कविता. एकदा, मुलांना घेऊन निघाले होते, रस्त्यात अचानक शाळेतल्या बाई भेटल्या, म्हणाल्या, ‘तू गॅ्रज्युएट झाली  असशीलच ना.’ तेव्हा ‘नाही’ म्हणताना अंतरी कळ उमटलीच नी, मी बीए व्हायचे ठरवले. प्रा. डॉ. गो. पु. कुलकर्णी यांचा परिचय झाला. मी कविता लिहिते याचे सरांना कौतुक. एकदा सर म्हणाले, ‘सावळेबाई, गावात कविवर्य बा.भ. बोरकर आलेत तिथे जा आणि ‘अथांग इवले’ ही तुमची कविता म्हणा.’
 माझी कविता कविवर्य बोरकरांना खूप आवडली म्हणाले, ‘उद्या वही घेऊन ये.’ त्यांनी माझी वही बघितली. समाधान व्यक्त केले. समोर एक पेंटिंग होते ते म्हणाले, ‘हे पेंटिंग किती छान आहे.’ त्यावर मी हळूच त्यांना म्हणाले, ‘मी पण पेंटिंग करीत होते.’ त्यावर त्यांनी मला ती घेऊन यायला सांगितली. मी त्यांना माझी शालेय काळातील पेंटिंग्ज दाखविली. ते म्हणाले, ‘तुझ्याजवळ पोर्टेट, लॅण्डस्केप सगळं आहे की, मग आता काढतेस की, नाही?’ मी ‘नाही’ म्हणाले त्यावर ते म्हणाले, ‘असं करू नकोस तू परत काढायला लाग. ईश्वरानं दिलेलं स्फुलिंग असं विझू देऊ नये. फुंकत राहावं.’ मी म्हटले, ‘आता पंचवीस वर्षे झाली खंड पडून.’ तर म्हणाले, ‘हरकत नाही. तू परत काढायला लाग. तुला येईलच. त्यामुळे तुझी कवितासुद्धा वाढेल. कला या जुळ्या बहिणी असतात. एकीची सेवा केली असता दुसरी आपोआप वाढते. माझे आशीर्वाद आहेत तुला.’ कविवर्य बोरकरांनी प्रोत्साहन दिले नि माझ्या आशा पल्लवीत झाल्या. वर्षभर आमचा पत्र-व्यवहार होत होता. माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रास्ताविक देण्याचे त्यांनी कबूल केले, पण दुर्दैवाने त्या आधीच ते गेले.
कविवर्य बोरकरांचे मित्र ज्येष्ठ कवी वा. रा. कांत यांचा परिचय होऊन त्यांनी पहिला संग्रह ‘मन:स्विनी’ याला प्रास्ताविक दिले. हा माझा कवितासंग्रह महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाने १९८७ मध्ये प्रकाशित झाला. १९९४ ला मला शासनाचे अनुदान पुन्हा मिळाले आणि ‘घनु बरसला’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मी २००९ साली ‘कृष्णभूल,’ ‘क्षितिजाला भेटताना’ असे दोन कवितासंग्रह एकदम प्रकाशित केले. तीस वर्षे आकाशवाणी मुंबईवरून कवितेचे कार्यक्रम करीत राहिले.
कविवर्य बोरकरांनी कौतुकाची थाप दिल्यामुळे चित्रकलेची सेवाही करीत राहले. शेकडो पेंटिग्ज केली आहे. आश्चर्य म्हणजे १ नोव्हेंबर २०१३ ला माझ्या ५६ पेंटिग्जचा स्लाइड शो ‘शिपिंग कॉर्पेरेशन ऑफ इंडिया’ मध्ये झाला. मागे वळून पाहते तेव्हा वाटते, बोरकर भेटले हाच आयुष्यातला टर्निग पॉइंट. तो आला आणि माझं आयुष्य कलांनी बहरलं.