नैसर्गिक गर्भधारणा न झाल्यास, विशिष्ट तंत्र वापरून गर्भधारणेला अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते- नव्हे, गर्भधारणा प्रत्यक्ष घडवूनच आणली जाते. अशा गर्भाला ‘मदत’ केलेलं पुनरुत्पादन अर्थात असिस्टेड रिप्रॉडक्शन म्हणतात. हे नवं तंत्रज्ञान वरदान आहेच, त्यातून यशस्वी गर्भधारणा होण्याचं प्रमाण ४०-४५ टक्क्यांपर्यंत वाढवणं शक्य झालं आहे.

शहरी राहणी, उच्च शिक्षण, बैठं काम, भरपूर पैसा, बाहेरचं खाणं, अपुरी झोप, व्यायाम नाही, तंबाखू-दारूचं बरेचदा सेवन, वाढणारं वजन.. घरोघरच्या तरुण मंडळींचं सध्या असंच राहणीमान आहे. त्यातच भर म्हणजे उशिरा लग्न, तुरळक कामजीवन, उशिरा मुलाचा विचार, पाळीच्या तक्रारी, गर्भ कसा राहतो याविषयी (अविश्वसनीय, पण खरं) अज्ञान.
परिणामी पस्तिशी जवळ आली तरी ‘पाळणा’ हलत नाही. एक वेळ अशी येते की आता बाळ पाहिजे, आत्ताच पाहिजे, असं वाटायला लागतं. डॉक्टर तपासतात, गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ, त्याच्या आसपासच आवश्यक असणारे लैंगिक संबंध इत्यादी गोष्टी समजावून सांगतात. व्यायामाचा, वजन कमी करण्याचा, फिटनेस वाढवण्याचा, तंबाखू-मद्य थांबवण्याचा सल्ला देतात. सहा महिने-वर्षांनी बोलवतात. पण आता ठरलं म्हणजे ठरलं. बाळ हवंच आहे. जेमतेम तीन महिन्यांतच पुन: डॉक्टरकडे फेरी. व्याख्येनुसार प्रत्येक महिन्यात गर्भ राहण्याची शक्यता सुमारे आठ टक्के असते. वर्षभर थांबलं तर जवळजवळ १०० टक्के गर्भधारणा होतेच, म्हणून डॉक्टर एक वर्ष थांबायचा सल्ला देतात. पण आता तपासण्या तरी करून घेऊ या असं ठरतं. या वेळी डॉक्टर इतर कुटुंबीयांना पण बोलावून समुपदेशन करतात. वाट पाहायला लागेल असं सांगून तपासण्यांना सुरुवात होते. नेहमीच्या सर्वागीण तपासण्यांबरोबरच स्त्रीच्या बाबतीत तीन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या जातात. गर्भाशय निरोगी असणं, बीजनलिका मोकळ्या असणं आणि बीजांडकोशातून दर महिन्याला परिपक्व स्त्री-बीज निर्माण होणं. पुरुषाचं वीर्य तपासलं जातं. गर्भधारणा होण्यासाठी त्यातले शुक्रजंतू १५ दशलक्षाहून जास्त पाहिजेत आणि त्यातले किमान ३२टक्के निरोगी, चपळ, ‘पोहू शकणारे’ हवेत, तरच ते स्त्री-बीजापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांच्यापैकी एकाला स्त्री-बीजावरण भेदून आत जाऊन ते फलित करता येईल. कधी कधी गर्भाशयाला क्षयरोग, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइडच्या गाठी, जन्मजात विकृती, योनिमार्गात शुक्रजंतूंना घातक अशी आम्लता किंवा अँटीबॉडीज अशी वेगवेगळी कारणंही असतात, जिथे उपचार करणं शक्य आहे तिथे ते केले जातात. कधी कधी कोणतंही कारण सापडत नाही आणि तरीही गर्भधारणा होत नाही.
वर्षभर वाट पाहून काहीच न घडल्यास विशिष्ट तंत्र वापरून गर्भधारणेला अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते- नव्हे, गर्भधारणा प्रत्यक्ष घडवूनच आणली जाते. अशा गर्भाला म्हणतात ‘मदत’ केलेलं पुनरुत्पादन (असिस्टेड रिप्रॉडक्शन ). आजच्या लेखात अशा नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणार आहे.
कोणत्या व्यक्तीला कोणतं तंत्र वापरायचं हे अर्थात डॉक्टर तपासणीअंती ठरवतात; परंतु बाळासाठी उत्सुक झालेल्या या जोडप्याला टप्प्याटप्प्यानंच पुढे जावं लागतं.
यात सुरुवातीला बीजांडकोश उत्तेजित करणारी औषधं त्या स्त्रीला देऊन दर महिन्याला एक किंवा अधिक स्त्री-बीजं तयार होतील असं पाहतात. सोनोग्राफी करून अथवा विशिष्ट मूत्र तपासणीतून हे बीज वरचं आवरण भेदून बाहेर पडल्याची खात्री करतात (ओव्ह्यूलेशन). त्या जोडप्याने या दिवशी लैंगिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. याला म्हणतात पूर्वनियोजित वेळ ठरवून केलेला संबंध. अशा प्रकारे तीन महिने वाट पाहून अपेक्षित फळ न मिळाल्यास दुसरा टप्पा गाठला जातो. आता आययूआय- इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन हा पर्याय स्वीकारला जातो. यामध्ये एका प्लास्टिक नलिकेमधून वीर्य थेट गर्भाशयात नेऊन सोडतात. उघडच आहे की ज्या स्त्रीच्या बीजनलिका मोकळ्या असून त्यात कोणताही दोष नाही, तिच्यावरच हा उपचार केला जातो. कारण फलधारणा तर बीजनलिकेतच होत असते. वीर्यामधील शुक्रजंतूंची संख्या कमी असेल किंवा ते अशक्त असतील तर इष्ट परिणाम साधण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. एका पद्धतीत विशिष्ट रसायन मिसळून सेंरिटफ्यूज पद्धतीने त्या मिश्रणातील खालचा जड भाग (ज्यात निरोगी, सशक्त शुक्रजंतू असतात) इंजेक्शनसाठी वापरला जातो. दुसऱ्या पद्धतीत जे शुक्रजंतू चपळ हालचाली करून वरच्या दिशेने ‘पोहत’ निघाले आहेत त्यांनाच गर्भाशयात सोडलं जातं. या प्रक्रियांमुळे आय यू आय यशस्वी होण्याचं प्रमाण नक्की वाढतं.
तरुणीच्या बीजनलिकेत क्षयरोग किंवा अन्य जंतुसंसर्गामुळे अडथळे असतील तर आयव्हीएफ ऊर्फ इन व्ह्रिटो फर्टिलायझेशन हाच पर्याय असतो. याचा शब्दश: अर्थ आहे शरीराबाहेरची गर्भधारणा. यामध्ये हॉर्मोन्सच्या साहाय्याने उत्तेजित केलेल्या बीजांड कोशातून सुमारे १०-१२ स्त्री-बीजं योनिमार्गामधून अल्ट्रासाऊंडच्या मदतीने एक बारीक सुई घालून बाहेर काढतात. ही सर्व बीजं एका डिशमध्ये घेऊन त्यात वर वर्णन केल्याप्रमाणे प्रक्रिया केलेलं पुरुषाचं वीर्य मिसळलं जातं. नंतर ही डिश आदर्श तापमान, आद्र्रता वगैरे स्थिती असलेल्या पेटीमध्ये (इनक्यूबेटर)ठेवतात. फलित झालेलं बीज लगेच पेशी विघटनाला सुरुवात करतं. दररोज बाहेर काढून त्याची प्रगती पाहिली जाते. ३ ते ५ दिवसांत पेशींची संख्या सुमारे ६४ पर्यंत पोहोचून पेशींच्या गठ्ठय़ाभोवती एक द्रव पदार्थ आणि त्याबाहेर एक आवरण असं चित्र दिसू लागतं. याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात आणि आता हा भ्रूण गर्भाशयात सोडण्याची वेळ आलेली असते. आधी दिलेल्या हॉर्मोन्समुळे गर्भाशयाची अंतस्त्वचा गर्भपोषण करण्यासाठी तयार  झालेली असते. त्यामुळे हा भ्रूण तिथे चिकटतो आणि वाढू लागतो. आता या संपूर्ण प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष गर्भधारणा होऊन बाळ जन्माला येण्याचा संभव किती? पूर्वी तो केवळ  १०-२० टक्के एवढाच होता. बाळासाठी अधीर झालेल्या जोडप्यांना हा आकडा खूप कमी वाटणार. परंतु हा टक्का वाढवण्यासाठी आता अधिकाधिक काय केलं जात आहे हे बघणं मनोवेधक ठरेल.
इक्सी अर्थात इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन- प्रत्येक स्त्री-बीजाच्या आतल्या गाभ्यापर्यंत एक सशक्त शुक्रजंतू विशिष्ट सुईने थेट पोहोचवला जातो. म्हणजे जे काम निसर्गानं आपापत: होण्याची योजना केली तेच आता मानवानं कुशल तंत्रज्ञानाने जमवलं आणि स्त्री-बीज नक्की फलित होणार अशी काळजी घेतली. अशी १०-१२ फलित स्त्री-बीजं इनक्यूबेटरमध्ये ठेवून, योग्य वेळी, ती स्त्री वयाने ४० पेक्षा लहान असल्यास त्यातली २ बीजं आणि ४० वर्षांपेक्षा मोठी असेल तर ३ स्त्री-बीजांचं आरोपण तिच्या गर्भाशयात केलं जातं. उरलेल्या फलित बीजांचं काय करणार? जलद गतीने अतिशीत तापमानाला नेऊन ती साठवता येतात. बीजारोपणाचा वरील प्रयत्न अयशस्वी ठरल्यास पुढच्या चक्रात त्यांपैकीच २-३ बीजं सामान्य तापमानाला आणून वापरता येतात. इतकंच नव्हे तर २-३ वर्षांनी त्या दाम्पत्याला पुन्हा बाळ हवं असेल तरी त्यांचा वापर त्यांना करता येतो.
आता भारतातील मुंबई, चेन्नई अशा मोठय़ा शहरांत एक नवीन तंत्रज्ञान आलं आहे. डिशमध्ये स्त्री-बीज फलित करून ते इनक्यूबेटरमध्ये ठेवतात हे आपण पाहिलंच आहे. रोज ते बाहेर काढून तपासून पुन्हा आत ठेवलं जातं. ही काढणं-ठेवणं प्रक्रिया टाळण्यासाठी एक उपकरण इन्क्यूबेटरला जोडलं जातं. त्यातील कॅमेरा विघटित होणाऱ्या स्त्री-बीजांचे फोटो काढतो, इतकंच नव्हे तर त्यातील सर्वात सशक्त, आदर्श स्थितीला पोहोचलेली बीजं कोणती हेसुद्धा दर्शवून देतो. अर्थात तीच फलित बीजं गर्भाशयात प्रस्थापित झाल्यास त्यातून निरोगी मूल जन्माला येण्याची शक्यता वाढते.
कधी कधी, विशेषत: ३७ पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये फलित बीजाचं आवरण खूप कडक असल्यानं ब्लास्टोसिस्ट त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि मग हे बीज गर्भाशयाच्या अंतस्त्वचेला न चिकटल्यामुळे हा आयव्हीएफचा प्रयत्न अयशस्वी होतो. अशा वेळी लेसर किरणांचा वापर करून फलित बीजाच्या कडक आवरणाला एक सूक्ष्म छिद्र पाडलं जातं, त्यातून ब्लास्टोसिस्ट बाहेर येऊन गर्भाशय त्वचेला चांगला चिकटतो आणि त्याची पुढची वाढ चांगली होते. याला ‘लेसर असिस्टेड हॅचिंग’ असं म्हणतात. वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानामुळे बाळ जन्माला येण्याची शक्यता आता १५-२० वरून ४०-४५टक्के पर्यंत पोहोचली आहे.
वीर्यतपासणीत शुक्रजंतू कमी असल्यास किंवा त्यांची हालचाल मंद असल्यास त्यातले सशक्त जंतू कसे निवडायचे हे आपण पाहिलं. पण शुक्रजंतू अजिबात नसलेच तर? कधी कधी शुक्रजंतू वीर्यकोशाच्या नलिकेत अडकून पडतात. तिथली जागा बधिर करून सुई घालून शुक्रजंतूंना बाहेर काढता येतं. हे न जमल्यास भूल देऊन छेद घेऊन वीर्यकोशनलिकेतून ते घेतले जातात.
याशिवाय मुळात शुक्रजंतूंची निर्मितीच होत नसेल तर वीर्यपेढीतून वीर्य उपलब्ध होऊ  शकतं, ते वापरून आयव्हीएफ पार पाडतात. त्याच प्रमाणे स्त्री-बीजाचा पूर्ण अभाव असेल तर बीज-पेढीतून स्त्री-बीज मिळू शकतं, गर्भाशय गर्भधारणेस अनुकूल नसेल तर दुसऱ्या स्त्रीचं गर्भाशय अगोदर करार करून वापरणं हा पर्याय असू शकतो (सरोगसी). हे सगळेच उपाय जसे खर्चीक आहेत तसेच भावनिक आंदोलनांमुळे  निर्णय घ्यायला अवघड आहेत. या अत्यंत वैयक्तिक आणि नाजूक मुद्दय़ावर बाह्य़ घटकांचा दबाव पडू न देता संबंधित जोडप्यानंच विचार करून निर्णय घ्यावा. अन्यथा मूल दत्तक घेणं हाही पर्याय आहेच. मात्र अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या व्यक्तींना या प्रगत तंत्रज्ञानाने आशेचा किरण दाखवलेला आहे हे निश्चित.
(या लेखासाठी विशेष साहाय्य : डॉ. चैतन्य गणपुले, एमडी एंडोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व चिकित्सातज्ज्ञ. पर्ल विमेन्स हॉस्पिटल, पुणे दूरध्वनी ०२०- २५५३१२०९)  
drlilyjoshi@gmail.com