मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

गेली अनेक वर्षं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आठवी इयत्तेपासून किंवा पाचवीपासूनच ‘सेमी इंग्रजी’चा पर्याय असतो. महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजीतून शिकणं मुलांसाठी एकदम नवीन असू नये, हा त्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश. मात्र गणित आणि विज्ञान हे इंग्रजीतून शिकलं तरी इंग्रजी संभाषण हा अनेकांना एक अडसरच वाटतो. पण आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं करिअर घडवणारे तरुण-तरुणी या अडचणीवर सहज मात करत आहेत. इतकंच नव्हे, तर मराठी माध्यमातून शिकल्याचा त्यांना फायदाच झाला, हे आवर्जून सांगत आहेत. अशा तीन तरुणांशी केलेल्या गप्पांमधून आम्ही त्यांची मतं जाणून घेतली.

मराठी माध्यमातून शिकण्याबद्दल तरुण पिढीची मतं आणि अनुभव जाणून घेणारा हा दुसरा लेख. सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पीक आलेलं असताना आणि इंग्रजी शाळेत शिकणं हेच उत्तम मानलं जात असताना मराठी माध्यमातून शिकलेले हे युवक-युवती. आजूबाजूच्या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढताना त्यांचे अनुभव काय होते- शाळेत, महाविद्यालयात आणि समाजातही?, मागे वळून पाहताना त्यांना काय वाटतं?, आदी प्रश्न आम्ही त्यांना विचारायचं ठरवलं.

मृण्मयी शेटे, हर्षद चव्हाण आणि पूजा झोपे यांच्याशी झालेल्या गप्पांमधून समोर आलेले हे त्यांचे विचार.

मृण्मयी नाशिकमध्ये मराठी शाळेत शिकली आणि बारावीनंतर  जनुकीय आजारांबद्दलचं समुपदेशन तंत्र- अर्थात ‘जेनेटिक काऊन्सिलग’ शिकायला अमेरिकेला गेली. पदवी मिळवून ती आता या क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम करायला लागली आहे. पूजा डोंबिवलीच्या ‘स्वामी विवेकानंद शाळे’त शिकून पुढे ‘मुलुंड महाविद्यालया’त गेली. आता ती सनदी लेखापाल होऊन नोकरी करत आहे. हर्षद वाशीच्या ‘नवी मुंबई हायस्कूल’मध्ये शिकला. पुढे ‘स्वामी विवेकानंद महाविद्यालया’तून बारावीचं शिक्षण पूर्ण करून त्याच संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यानं पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘आय.आय.टी.’मधून ‘एम. टेक’ पदवी घेऊन तो आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो आहे.

गेल्या काही वर्षांंतल्या ‘ट्रेंड’नुसार हे तिघंही शाळेत ‘सेमी इंग्रजी’ माध्यमात शिकले आहेत. मृण्मयीला पाचवीपासून सेमी इंग्रजी सुरू झालं, पण ते शाळेचं पहिलंच सेमी इंग्रजी वर्ष असल्यानं शिक्षक आणि मुलं एकदमच त्या बदलाला सामोरे गेले. त्यामुळे शिकवणं हे बऱ्याच वेळा मराठीतूनच असायचं आणि मग त्याचं भाषांतर करून सांगितलं जायचं. परीक्षा मात्र इंग्रजीत असे. पूजा आणि हर्षदसाठी मात्र सेमी इंग्रजी हे आठवीपासून सुरू झालं- म्हणजे गणित आणि विज्ञान इंग्रजीतून. पूजालाही सुरुवातीला हे थोडं जड गेलं. पण तिनं संदर्भासाठी मराठी पुस्तकं, शब्दकोश वापरला. शिवाय घरचे मदत करायला होतेच. कधी काही समजलं नाही, तर मराठी  माध्यमाचं पुस्तक वाचून ती ते समजावून घेत असे. हर्षदला वाटतं, की माध्यम आठवी इयत्तेत असताना बदलल्यानं जरा सोपं गेलं, कारण पाचवी ते सातवीत मूलभूत संकल्पना चांगल्या समजल्या होत्या. आठवीपासून फक्त शब्द बदलले. म्हणजे विविध गोष्टींची फक्त नावं आता वेगळी झाली होती. जर पाचवीतच सेमी इंग्रजी सुरू झालं असतं, तर नवीन संकल्पना- त्यादेखील नवीन भाषेत असं समजून घ्यायला त्रास झाला असता. कदाचित त्यामुळे संकल्पना सुस्पष्टही झाल्या नसत्या. सेमी इंग्रजीच्या सवयीमुळे पुढे बारावीत गेल्यावर केवळ आजूबाजूच्या वातावरणाचा फरक पडला. कारण तेव्हा संभाषणही इंग्रजीत किंवा िहदीत सुरू झालं. परीक्षा इंग्रजीतून द्यायची सवय आधीच झाली होती. त्यामुळे पाचवीपासून मातृभाषेत नवीन संकल्पना कळणं, आठवीपासून त्यांचे  इंग्रजी शब्द कळणं आणि मग अकरावीपासून पूर्ण शिक्षण आणि संभाषण इंग्रजीतून असा टप्प्याटप्प्यानं होत गेलेला बदल जास्त सुकर आणि म्हणूनच इष्ट, असं हर्षदला वाटतं.

पूजाही या मताला दुजोरा देते. हर्षदप्रमाणेच तिलाही वाटतं, की आठवीत माध्यम बदललं तर तोपर्यंत विषयांमधील संकल्पना आणि आपली मातृभाषा हे दोन्ही पक्कं  झालेलं असतं. शिवाय इंग्रजीचीही चांगली समज आलेली असते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा देऊन ती अजून बळकटही करता येऊ शकते. त्यामुळे इतर विषयांमधले नवीन इंग्रजी शब्द शिकायला पाचवीपेक्षा आठवीत जास्त सोपं होतं. या वयापर्यंत मुलांना शिक्षण महत्त्वाचं आहे याची जाणही आलेली असते. त्यामुळे अडचण आली तरी ती स्वत:हून त्यावर उपाय शोधू शकतात. अकरावीत शैक्षणिक वातावरणात बदल होतो आणि कितीतरी नवीन विषयही शिकवायला सुरुवात होते. माध्यमबदल जर आधीच होऊन गेला असेल, तर महाविद्यालयात गेल्यावर घडणारे हे बदल विद्यार्थ्यांंसाठी जास्त सोपे होऊन जातील, असं पूजा म्हणते.

अकरावी-बारावीला महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजीत संभाषण करायला लागणं हा फार मोठा बदल असतो. या तिघांच्याही महाविद्यालयांमध्ये ८० टक्क्य़ांहून अधिक मुलं इंग्रजी माध्यमाची होती. हर्षदच्या महाविद्यालयात त्याच्या इंग्रजीच्या शिक्षिकांनी स्थानिक भाषेतून शिकलेल्या मुलांना न घाबरता इंग्रजी बोलता यावं, यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याच्या वर्गात जेमतेम आठ-नऊ मुलं या गटात होती. पण या शिक्षिका दर आठवडय़ाच्या एका तासाला मुलांना एक विषय देऊन त्यावर बोलायला सांगत आणि या मुलांकडे विशेष लक्ष देत, त्यांना प्रोत्साहन देत. ‘चुका होणारच, पण प्रयत्न करत राहिलात तर वर्ष संपेपर्यंत तुम्हाला आत्मविश्वासानं बोलता येईल,’ असं त्या सांगत. त्या सरावाचा हर्षदला इंग्रजी संभाषणासाठी खूप फायदा झाला. हळूहळू सुधारणा होत अभियांत्रिकी महाविद्यालयात जाईपर्यंत त्याला इंग्रजी संभाषणही व्यवस्थित जमायला लागलं होतं.

पूजाच्या महाविद्यालयात असे विशेष प्रयत्न झाले नसले, तरी तिनं आपल्या मत्रिणीबरोबर राहून त्या बदलाचा सामना केला. पहिली सहामाही परीक्षा जरा जड गेली, पण हळूहळू बस्तान बसलं. पुढे सनदी लेखापाल अभ्यासक्रमातली ‘आर्टकिलशिप’ करताना मराठी माध्यमाच्या मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या आधी ती परीक्षा पार केली होती, असं तिचं निरीक्षण आहे. पूजाला वाटतं, की कदाचित सुरुवातीला मातृभाषेतून शिकल्यानं समजून घेऊन त्याबद्दल विचार करायची क्षमता कदाचित जास्त चांगली तयार होत असेल. कारण लहानपणी जी भाषा बोलत होतो त्यातूनच शिकल्यानं त्याचा अर्थ सहजच समजत होता. अर्थ समजावून  घेण्यात प्रयत्न आणि वेळ खर्ची पडत नव्हते. त्यामुळे शिकलेल्या गोष्टीचा नीट विचार करणं शक्य होत असे. पुढे ती सवय माध्यम बदललं तरी कायम राहात असावी. मृण्मयीच्या मते, तिच्या प्राध्यापकांना अशी जाणीव नव्हती, की काही मुलं मराठी माध्यमाची असतील आणि त्यांना काही विशेष मदत करावी लागेल. मुलं सेमी इंग्रजी माध्यमाची असली, तरीही त्यांना इंग्रजी संभाषणाची सवय नव्हती. लिहिणं इंग्रजीत असलं तरी विचार मराठीतच केला जायचा. पुढे बारावी झाल्यावर मृण्मयी अमेरिकेत आली. ‘युनिव्हर्सटिी  ऑफ वॉिशग्टन’मध्ये फार कुणी भारतीय विद्यार्थी नव्हते. मराठी तर नव्हतेच. तोपर्यंत तिला इंग्रजीत बोलण्याची कधी वेळच आली नव्हती. हा बदल मृण्मयीला खूप जड गेला. काही काळ तर तिला ‘आपण इथे येऊन चूक तर केली नाही ना,’ असंही वाटत होतं. पण ‘जेनेटिक काऊन्सलिंग’ मध्ये पदवी मिळवण्यासाठी तिला अमेरिकेतच राहणं आवश्यक होतं. दुसरा पर्याय नसल्यानं इंग्रजी बोलायची तिला सवय करावी लागली.

लहानपणी आजूबाजूला इंग्रजी माध्यमाची मुलं असताना, त्यांच्याशी खेळताना किंवा इतर वेळीही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे काही न्यूनगंड वाटला का, असं विचारल्यावर हर्षद म्हणाला, की मी मराठी माध्यमात, आपल्या भाषेतून शिकतो आहे, म्हणजे काहीतरी चांगलं आणि विशेष करतो आहे, हे माझ्या आई-वडिलांनी माझ्या मनावर िबबवलं होतं. त्यामुळे मला उलट त्याचा अभिमानच वाटत होता. नव्या पिढीच्या या तिन्ही युवा प्रतिनिधींना वाटतं, की मराठी शाळेत जाऊन त्यांना खूप फायदा झाला. पूजा म्हणते, की मराठीतून शिकल्यानं अगदी कठीण विषयदेखील समजून घेण्याची क्षमता आपल्यात आहे, असा विश्वास लहानपणीच मनात निर्माण झाला होता. तो पुढेही टिकून राहिला. मराठी येत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधणं सहज जमतं. मृण्मयीच्या मते, घरातलीच भाषा शाळेत असल्यानं ती अधिक पक्की झाली. त्यामुळे मराठीतून अवांतर वाचन करत असताना तिला किंवा मराठी माध्यमातल्या इतर मुलांना वरची काठिण्यपातळी असलेलं साहित्य लवकर वाचता आलं. त्यामुळे भाषा अधिक समृद्ध झाली.  इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या त्याच वयाच्या मुलांशी तुलना करता इंग्रजी माध्यमातली मुलं नवीन भाषा शिकत असल्यामुळे त्यांचं वाचन कदाचित तेवढं सखोल होत नाही आणि भाषेवरही त्याचा काहीसा परिणाम होण्याची शक्यता असते, असं तिला वाटतं. हर्षदचंही तेच मत आहे, की पाचवी-सहावीपर्यंत तरी विचार ज्या भाषेत होतो आणि आपण ज्या भाषेत व्यक्त होतो, त्या वेगळ्या भाषा असू नयेत. या वयापर्यंत आपण आपोआप (जाणीवपूर्वक नाही) खूप गोष्टी शिकतो, त्यांचे अर्थ लावतो, मतं बनवत असतो. माहिती मिळाल्यावर त्याबद्द्लचे आपले विचार, मतं दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची भाषाही तीच असावी.

या तिघांनाही असं वाटतं, की इंग्रजी ही आजच्या काळात आवश्यकच आहे, त्यामुळे ती शिकावीच. पण स्वत:च्या भाषेचाही अभिमान ठेवावा. हर्षद म्हणाला, की पालकांनी मुलांच्या मनावर हे ठसवायला हवं, की इंग्रजी येणं हा तुमच्या एकूण कौशल्यांचा (‘स्किल सेट’चा) भाग आहे, तो तुमचा पूर्ण स्किल सेट  नाही. प्राथमिक इंग्रजी यायला पाहिजे हे खरं आहे, पण तुमच्या विषयात तुम्हाला चांगली गती असणं हे नोकरीसाठी जास्त महत्त्वाचं असतं. हे तिघे आवर्जून सांगतात, की इंग्रजीचा बाऊ करण्याचं काही कारण नाही. ही भाषा शिकण्यासाठी खूप पर्याय आहेत. उदा. रोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं, रोज आपणहून पाच वाक्यं इंग्रजीत लिहिणं, इंग्रजी बोलण्याचा सराव, आदी गोष्टी सहज करता येतील.  त्यातही आवडीच्या विषयांच्या संदर्भात जर या गोष्टी केल्या तर मुलांनाही त्यात रस वाटेल. हर्षदनं याबाबत स्वत:चं उदाहरण दिलं. त्याला लहानपणापासून क्रिकेटचं वेड असल्यामुळे तो सामन्यांचं इंग्रजी समालोचन ऐकत असे. त्यामुळे त्याला त्या संदर्भातले शब्द खूप आधीपासून समजायला लागले होते. पुढे जरा मोठा झाल्यावर जसं इंग्रजी यायला लागलं, तसं तो आवड म्हणून आदल्या दिवशी पाहिलेल्या सामन्याच्या समालोचनाचा गोषवारा स्वत:  इंग्रजीत लिहून पाहात असे. या सवयीमुळे त्याचा नक्कीच फायदा झाला, असं त्याला वाटतं.

साधारणपणे मराठी माध्यमात शिकलेल्या सर्व मुलांचा प्रश्न हा इंग्रजी संभाषणाचाच असतो. पूजाला परदेशी जायची आणि सादरीकरण करायची वेळ आली, तेव्हा तिनं बरीच तयारी केल्यानंतरही तिच्या मनात धाकधूक होती. पण तिथे गेल्यावर तिच्या लक्षात आलं, की भारतीयांचं इंग्रजी हे जगातल्या इतर अनेक देशांतल्या लोकांपेक्षा कितीतरी सरस आहे. आता तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या गोष्टीचं पटकन भाषांतरही करून घेता येतं. त्यामुळे संभाषणावर प्रभुत्व मिळवणं हे सहज शक्य आहे. या संदर्भात या युवा पिढीनं काही छान कल्पनाही सुचवल्या. मराठी शाळांनी किंवा मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विविध ‘अ‍ॅप’चा वापर करून संभाषणात्मक  इंग्रजी हळूहळू मुलांना शिकवावं, असं हर्षदनं सुचवलं. अशी अ‍ॅप्स छोटय़ा वाक्यांपासून सुरुवात करून हळूहळू भाषा शिकवतात. एकदम अक्षरं, वाक्य आणि व्याकरण सुरू करण्यापेक्षा अशा अ‍ॅप्समधून किंवा मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा वापर करून- म्हणजे गाणी, कथाकथन, अ‍ॅनिमेटेड चित्रपट यातून जर भाषेची ओळख करून देता आली, तर मुलं उत्साहानं आणि सहजतेनं इंग्रजी किंवा कोणतीही नवीन भाषा शिकतील. समाजमाध्यमांचा वापर करूनदेखील मुलांना खूप नवीन गोष्टी शिकवता येतील. उदा. ‘यूटय़ूब’वर खूप वेगवेगळे व्हिडीओ उपलब्ध असतात. त्यांचा कल्पकतेनं वापर करता येऊ शकतो, असं या पिढीला वाटतं. मराठी शाळांनी मुलांच्या मनातून इंग्रजीचं दडपण घालवण्यासाठी या गोष्टींचा वापर केला, आणि संभाषणात्मक इंग्रजीचा सराव पाचवीपासूनच सुरू केला, तर कदाचित पालक पुन्हा मराठी शाळांकडे परततील, अशी आशाही हे तिघं व्यक्त करतात.

इंग्रजी माध्यमाचं लोण मोठय़ा शहरांमध्ये सर्वत्र पसरलेलं असताना या तरुण-तरुणींच्या पालकांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलं. या तिघांच्या मनात आपल्या पालकांच्या या निर्णयाबाबत नाराजी तर नाहीच, उलट मराठी माध्यमात शिकल्यामुळे आपल्याला आयुष्यात फायदाच झाला, असं त्यांना वाटतं. त्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन एक आशादायक चित्रच उभं करतो.