.. इतक्यात लाइट्स गेले! सगळीकडे अंधारच अंधार. त्याला अंधाराची फार भीती वाटायची.. तो इमर्जन्सी लाइट शोधू लागला.. सापडला! त्याने थरथरत्या बोटांनी स्विच ऑन केला.. तो क्षीण पेटला नि लगेच बंद झाला. परत काळोख! घरात एकटा पडलेला सहर्ष म्हणाला, ‘गणपतीबाप्पा.. लवकर लाइट आण!.. मम्मी लवकर घरी येऊ दे!..’

टु मदार रो हाऊसेसची एक छान पॉश कॉलनी. कॉलनीच्या मध्यभागी एक मैदान. बाजूला जरा दूर झोपडपट्टी पसरलेली. त्या झोपडपट्टीतल्या बायका रो हाऊसमध्ये काम करतात. अशाच एका रो हाऊसमध्ये राहणारे एक कुटुंब. डॅडी, मम्मी नि सहर्ष. नुकताच तिसरीत गेलेल्या सहर्षचे डॅडी कार्डिओलॉजिस्ट, तर मम्मी ई.एन.टी. स्पेशालिस्ट! दोघं सकाळी सकाळीच घराबाहेर पडतात. सहर्षला न्यायला शाळेची बस येते. दुपारी दीड वाजता आणून सोडते. घरात त्या तिघांशिवाय काही दिवस मम्मीची आई राहात होती, पण एक दिवस अचानक हार्ट अटॅक येऊन ती वारली. तेव्हा सहर्ष दुसरीत होता. मग डॅडीचे वडील, सहर्षचे आजोबा येऊन राहिले, त्यानंतर एक मुलगी कामाला ठेवली. तीही गेली. त्यानंतर एक वीसेक वर्षांचा मुलगा कामाला ठेवला. तोही गेला.. आता दुपारी दोन ते रात्री सातपर्यंत सहर्ष एकटाच असतो..
आज मम्मी कुठल्याशा समारंभात लेक्चर द्यायला दुपारीच गेली होती. जरा झोप काढून तो फ्रेश झाला. त्याने होमवर्क केला. मम्मीने आणलेल्या चित्राच्या पुस्तकातली दोन चित्रं त्याने रंगवली. मग तो कंटाळला! बॅग भरून ठेवत त्यानं खिडकी गाठली. सोफ्यावरून खिडकीवर चढून तो गज धरून उभा राहिला. नेहमीप्रमाणे जीभ ग्रिल्सवर घासत तो बाहेर पाहू लागला..
मैदानावर हळूहळू एक-एक सवंगडी जमू लागले. शिटय़ा मारून उरलेल्यांनाही बोलावून घेण्यात आलं. हळूहळू उन्हं कलली तसे सगळेच गोळा झाले. रामू, भिक्या, राघू, अशोक, बन्या, मकबुल, रहिम, नाऱ्या.. सगळेच! रहिमने बॅट हातात घेतली. नाऱ्या नेहमीप्रमाणे लंगडत उडी मारून बॉलिंग करू लागला. रहिमने बॅट फिरवली, नि.. ठो ऽ क! बॉल उंच उडाला. भिक्या धावत येऊन बॉल कॅच करायला उभा राहिला, पण कॅच हुकला नी सहर्षच्या डोक्यात आनंद लुकलुकला. टाळी मारून तो म्हणाला.. ‘गुड!’.. खेळ चालूच राहिला.. मधेच कोणाला तरी बॉल लागला. सगळे गडी एकत्र जमले.. तावातावाने बोलू लागले. आवाज ऐकू येत होते, पण शब्द कळत नव्हते.
सहर्षला आठवलं, आजोबा इथं असताना, तो त्यांची परवानगी घेऊन, त्यांच्या कामवाल्या बाईच्या, सुमनच्या राघुबरोबर या खेळात सामील व्हायचा.. किती मजा यायची तेव्हा! हं! कधी एकदा पाच वाजतात नी आपण ग्राऊंडवर जातो असं व्हायचं.. पण त्यांची घाणेरडी भाषा, मधूनमधून शिव्या देत बोलणं, ग्राऊंडवर थुंकणं, घाणेरडे कपडे घालून बाहीला शेंबूड, घाम पुसणं त्याला आवडायचं नाही. पण त्याला खेळायला दुसरे कोणी सवंगडीच नव्हते! कॉलनीतली बहुतेक मुलं मोठी होती. तशा त्याच्या वर्गातल्या दोन-तीन मुली होत्या, पण त्याला त्यांच्याबरोबर बोलायलाच लाज वाटायची!..
आठ दिवस सलग तो त्या मुलांबरोबर खेळला असेल नसेल, एक दिवस अचानक डॅडी घरी आले, त्या मुलांबरोबर सहर्षला पाहून दोन धपाटे घालत ओढून घरी आणलं! बापरे! असे रागीट डॅडी त्यानं कधीच पाहिले नव्हते..! रात्री मग डॅडी, मम्मी त्याला समोर बसवून खूप बोलले.. अशा मुलांबरोबर खेळून तो चांगला मुलगा न होता चोर-लुटेरा होईल, सिगरेट ओढू लागेल, दारू पिऊ लागेल, शिव्या देऊ लागेल, आई वडिलांना मारू लागेल.. असं खूप काही सांगितलं. त्याला घाणेरडे स्कीन डिसिज होतील, इन्फेक्शन होईल वगैरे वगैरे सांगितले. मध्ये बाबांना अडवणाऱ्या आजोबांनाही ओरडा खावा लागला.
मग सहर्ष घरीच राहू लागला. आजोबांच्या अवतीभवती फिरायचा. त्यांच्याबरोबर लांबवर फिरायला जायचा. आजोबा त्याच्या सगळय़ा प्रश्नांची न कंटाळता उत्तरे देत. ते झाडांना पाणी घालू लागताच तोही त्यांच्याबरोबर फिरायचा, ते जप करत बसले, बातम्या पाहू लागले की जवळच बसून गोष्टीची पुस्तके वाचायचा, चित्र रंगवायचा. संध्याकाळी आजोबा दिवा लावायचे. त्याला वेगवेगळी स्तोत्रं शिकवायचे. रात्री डॅडी-मम्मी पार्टीला गेले, तर दोघेही जेऊन घेत. मग तो गोष्टी ऐकत आजोबांच्या खोलीत, त्यांच्या मांडीवर झोपायचा. ते दिवस किती छान होते!
एके रात्री झोपेतून मोठमोठय़ाने बोलण्याच्या आवाजाने सहर्षला जाग आली. हॉलमध्ये लाइट होती. डॅडी मोठमोठय़ाने बोलत होते. मधून मधून मम्मीही बोलत होती. आजोबा बिच्चारे खाली मान घालून नुसतं ऐकत होते. त्याला आजोबांकडे जायचे होतं, पण मम्मीनी त्याला पाहिलं, नी ‘गो टू स्लीप!’ म्हणून रागावली. सकाळी आजोबा खोलीत आले, त्याला घट्ट धरून खूप खूप पाप्या घेतल्या. एक पतंग दिला. दुपारी शाळेतून आला, तर आजोबा घरी नव्हते! मम्मी म्हणाली, ‘ते काकांकडे राहायला गेलेत.’
थोडय़ाच दिवसांनी एक मुलगी कामाला ठेवली. काही दिवस तिने सहर्षचे लाड केले, पण एक दिवस तिचा फ्रेंड तिला भेटायला आला. हळूहळू तो रोज येऊ लागला. मग सहर्षला खोलीत कोंडून ते हॉलमध्ये सीडी लावून पाहात बसत. मम्मी-डॅडीना सांगू नकोस नाही तर.. असे दटावत ती त्याला लाल लाल चिमटे काढायची! एकदा सुमन घर पुसायला दुपारी आली, तिनं हे पाहून मम्मीला सांगितलं. मम्मीने दुसऱ्या दिवशी दोघांना पकडलं व तिला ओरडून सामानासकट हाकलून दिलं. परत सहर्ष एकटा पडला.
नंतर डॅडीने गावाकडून एक मुलगा आणला. तो सहर्षबरोबर छान बॉलिंग करून खेळायचा. पण एक दिवस मार्केटमध्ये जातो म्हणून जो गेला, तो गेलाच! नंतर, कळलं की त्यानं मम्मीचं कपाट उघडून तिच्या बांगडय़ा आणि इतर दागिने व पैसे चोरले.. किती तरी दिवस पोलीस येत राहिले..
त्यानंतर मम्मी दुपारी घरी जेवायला येऊ लागली. जेवून सहर्ष झोपला की ती क्लिनिकमध्ये जाई. सहर्ष उठून, दूध पिऊन जवळच्या तबला क्लासला जायचा. येऊन होमवर्क करेपर्यंत मम्मी यायची! पण एक दिवस गुरुजींनी सांगितलं की गावात मार्केटमध्ये एक रूम घेतलाय व तिथे क्लास ठेवले आहेत. तिथे क्लासला जायला एक तास लागायचा, शिवाय तो क्लिनिकच्या उलटय़ा दिशेला होता.. मग काय, ते पण क्लास बंद झाले! आता सहर्ष दुपारी दोन ते मम्मी घरी येईपर्यंत एकटाच घरी असायचा! ..
ग्रिल्सला धरून धरून सहर्षचे हात दुखू लागले. लाल झाले, मग त्याने आत उडी मारली. थर्मासमधलं दूध ओतून घेतलं, बिस्किटं घेतली. थोडावेळ तो टॅबवर गेम खेळला. मग त्याला कंटाळा आला!
त्याला वाटलं, आपले मम्मी-डॅडी साधेच लोक असते तर किती बरं झालं असतं!.. मम्मी सतत त्याच्याबरोबर राहिली असती, डॅडी रोहन व निखिलच्या बाबांसारखे सहा वाजता ऑफिसमधून घरी आले असते.. त्याला लाँग ड्राइव्हला नेलं असतं.. त्याच्याबरोबर फुटबॉल, क्रिकेट खेळले असते.. मम्मी-डॅडीबरोबर सोबत काढलेले क्षण सहर्ष आठवू लागला. हल्ली तर रविवारसुद्धा नकोसा वाटायचा. एक तर क्लबच्या मीटिंग्स असायच्या, नाही तर संध्याकाळी पार्टी असायची कुठे तरी! किंवा सेमिनार तर नक्की असायचा.. मागच्या वर्षी ते तिघंही आठ दिवस मॉरीशिअसला गेले. ते दिवस किती सुंदर होते! सहर्षने लगेच टिपॉयखालचा आल्बम काढला.. तो फोटो पाहू लागला. एक एक फोटो पाहताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला..हं हे रिव्हर जॉर्जस् पार्क! इथं पाण्यात पाय सोडून तिथल्या दगडावर ते किती तरी वेळ बोलत बसले होते.. हे बॉटनिकल गार्डन.. इथं त्याने विविध फुलांसोबत किती तरी फोटो काढले होते. सगळे दूरवरचे लोक सहर्षच्या कॅमेरा हाताळण्यावर अजब झाले होते. सगळय़ात छान फोटो त्यानेच काढले होते.. नी किती विविध अँगलने!.. हे सुंदर शिवा टेंपल.. इथं पाण्यातल्या दगडावरून उडय़ा मारत येताना मम्मी जाम घाबरली होती! या टेंपलच्या पायऱ्या.. इथे डॅडीने व त्याने रेस लावली होती व धावता धावता तो पडला व खरचटलं होते.. हे पॅनी म्युजियम.. इथे तो हरवला होता. किती घाबरला होता तो!.. एकही ओळखीचा मनुष्य दिसत नव्हता.. मम्मी तर रडायलाच लागली म्हणे. डॅडीही धावत धावत ओरडत शोधत होते त्याला! शेवटी टूर गाईडला तो रडत बसलेला दिसला. असे सगळे प्रसंग पुन्हा रवंथ करत त्याने दोन्ही आल्बम पाहून संपवले. मग तो पुन्हा खिडकीवर चढला.
आता बाहेर काळोख दाटून आला होता. ग्राऊंडवर कोणी नव्हतं.. दिवाळीचे दिवस.. कोणी पणत्या तर कोणी दिव्यांच्या माळा घरावर सोडल्या होत्या. सुंदर सुंदर आकाशदिवे लावले होते. सहर्षने एकोणीस आकाशदिवे मोजले. सगळी कॉलनी कशी छान पार्टी असल्यासारखी दिसत होती! दिव्यांच्या माळा लावून सर्वानी अंधाराला पळवून लावलं होतं खरं! पण त्या पिटुकल्याच्या मनातला अंधार कोण दूर करणार होता?
सहर्षने घडय़ाळात पाहिले, सात वाजले होते.. आजोबांनी त्याला वेळ पाहायला शिकवलं होते, त्या कातरवेळेला त्याला आजोबांची खूप आठवण आली नि त्यानं आवंढा गिळला.. आजोबांचा प्रेमळ आवाज, मायेचा स्पर्श त्याला आठवला. त्याने आजोबांच्या खोलीत जाऊन उशी घट्ट धरली. उशीला आजोबांचा वास असल्याचं त्याला वाटलं. तिथला टॉवेल त्याने हुंगून श्वास आत भरून घेतला.. आजोबांच्या कुशीत शिरल्यासारखं वाटलं त्याला! त्याने हॉलमध्ये जाऊन सर्व लाइट्स लावले. उजेडाने घर उजळून निघालं.. त्याला आता खूप एकटं वाटू लागलं. तो एकटेपणा घालवण्यासाठी तो मोठमोठय़ाने आजोबांनी शिकवलेले स्तोत्र म्हणू लागला.. काय करावं ते त्याला सुचेना..
इतक्यात लाइट्स गेले! सगळीकडे अंधारच अंधार! घराबाहेरही काळोख नि आतही! त्याला अंधाराची फार भीती वाटायची.. तो इमर्जन्सी लाइट शोधू लागला.. सापडला! त्याने थरथरत्या बोटांनी स्विच ऑन केला.. तो क्षीण पेटला नि लगेच बंद झाला. परत काळोख! त्याचे हात-पाय थंडगार पडले भीतीने! डोळे फाडून पाहिलं तरी काही दिसत नव्हतं. तसाच चाचपडत तो चालू लागला. इमर्जन्सी लाइट आजोबा आठवणीने चार्ज करायचे..
इतक्यात त्याला उजेडाची तिरीप दिसली. देवघरातलं निरंजन अजून पेटत होतं.. त्याने देवघरात धाव घेतली. गणपती बाप्पांना पाया पडून तो निरंजन विझण्याअगोदर लाइट येऊ दे म्हणून प्रार्थना करू लागला.. पण त्यातलंही तेल संपत आलं होतं.
‘गणपतीबाप्पा.. लवकर लाइट आण!.. मम्मी लवकर घरी येऊ दे!.. मला खूप भीती वाटते.. तू आहेस ना बरोबर?’.. हळूहळू निरंजनही क्षीण होऊ लागलं.. सहर्ष रडू लागला.. त्याची छाती धडधडू लागली. आपल्या हुंदक्याचा आवाजही त्याला घाबरवू लागला.. मध्येच फोन वाजला. मम्मीने केला असावा.. येईल लगेच! सहर्षने स्वत:ला समजावलं..
रात्री साडेआठ वाजता मम्मी-डॅडी हसत हसत घरात घुसले.. लॅच कीने दार उघडून दोघे आत आले. नेहमीसारखा सहर्ष दारात आला नाही. मम्मीने सहर्षच्या खोलीत डोकावून पाहिलं, आपल्या बेडरूममध्ये पाहिलं, गेस्टरूम पाहिला, आजोबांचा रूम पाहिला, स्वयंपाक घर, टॉयलेट्स, पाठची बाग, पुढची बाग, टेरेस सगळं सगळं पाहिलं.. सहर्षचा पत्ता नव्हता. डॅडी मम्मीवर ओरडू लागले, ‘तू सात वाजता येणार होतीस ना? मग? एवढा उशीर का झाला तुला?’
‘अरे.. चीफ गेस्टच लेट आले!. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.. त्यानंतर लेक्चर. लेक्चर झाल्यावर लगेच कसं निघायचं?.. तरी मी थोडय़ा वेळाने निघालेच!’ डॅडी हताश होऊन डोक्याला हात लावून बसले. मम्मी शेजारी-पाजारी, कामवालीच्या घरी जाऊन आली. डॅडींनी सहर्षच्या मित्रांना फोन लावले.. आपल्या भावाला, वडिलांना फोन लावला व येरझारा घालू लागले.
हळूहळू कॉलनीतले लोक जमू लागले. सहर्षचे काकाही आजोबांना घेऊन आले. आजोबा थोडा वेळ डॅडींशी बोलले. त्यांचे हात पाय लटलटू लागले. देवघरातल्या गणपतीला साकडं घालायला ते गेले.. नि काय आश्चर्य! तिथे जमिनीवर, अंगाचं मुटकुळं करून सहर्ष गाढ झोपला होता! आपल्या हातात त्याने काही तरी घट्ट पकडून ठेवले होते. आजोबांनी हळूच मूठ उघडली. त्यात देवघरातील गणपतीची मूर्ती होती! 

माझा त्याग, माझं समाधान
बहुसंख्य विवाहित स्त्रियांना आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात तडजोडी करणं, त्याग करणं अपरिहार्य ठरतं. मात्र नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या वाटय़ाला ते प्रमाण अधिक येतं. त्यासाठी त्याग-समाधानाचं गणित सोडवतच तिला पुढे जावं लागतं, तिच्यासाठी घरातली प्रत्येक व्यक्ती, तिची प्रगती , तिंचा आनंद महत्त्वाचा असतो. त्यासाठी अनेकदा तिला स्वत:ला मागे ठेवावं लागतं. आपल्या आनंदाला, इच्छेला मुरड घालावी लागते. सगळ्यांशी जुळतं घेत, सगळ्यांच्या समाधानासाठी प्रत्येक टप्प्यावर तिला काही ठोस निर्णय घ्यावेच लागतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या स्त्रियांना आम्ही आवाहन करत आहोत. त्यांनी पाठवावेत आपले अनुभव. नोकरी-व्यवसाय आणि संसार यांची सांगड घालताना जेव्हा जेव्हा तुम्ही थांबलात, अडलात, निराश झालात, द्विधा मनस्थिती झाली तेव्हा काय समजावलंत मनाला? कोणते निर्णय घेतलेत? कोणते त्याग केलेत? कोणत्या पारंपरिक गोष्टींना फाटा दिला? कोणत्या नवीन गोष्टी आत्मसात केल्या? ज्यामुळे तुम्ही आज याघडीला समाधानी आहात. हे सदर पुढील वर्षी (२०१५) दर शनिवारी चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध होणार असून नोकरदार वा व्यावसायिक स्त्रियांनीच आपले (फक्त एक वा दोनच) अनुभव पाठवावेत. लेखाची शब्दमर्यादा ३०० असून ठोस आणि वेगळ्या घटना, प्रसंगांचेच स्वागत असेल. तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आमच्या पत्त्यावर वा ई-मेलवर पाठवावेत. सोबत आपला संपर्क क्रमांक असणे गरजेचे. आपले अनुभव आमच्यापर्यंत २० डिसेंबपर्यंत येणे अपेक्षित आहे.पाकिटावर वा इमेल सब्जेक्टमध्ये ‘माझा त्याग माझं समाधान’ असा उल्लेख अवश्य करावा. पत्ता- लोकसत्ता-चतुरंग पुरवणी विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४०० ७१० ई मेल -chaturang@expressindia.com